नोव्हेंबर २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१६)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थांचा ज्ञानबोधयाग अखंड कार्यरत होता. समर्थ त्यात नित्य नवीन विचारांच्या समिधा अर्पित करून त्याची धग अखंड जोपासत होते. सामान्य जनांचे जीवन अधिक सुखी, अधिक समृद्ध व्हावे ही त्यांची तळमळ होती. श्रोते आणि शिष्यगणांना ते  उत्तम प्रतिचे जीवन जगण्यासाठी प्रोत्साहीत करीत होते. मृत्युभयाने निराश झालेल्यांना ते सांगत, जीवनाच्या शेवटी मृत्यूला सामोरे जायचे हे तर वास्तव आहेच. पण त्या अटळ मृत्यूच्या भीतीने आयुष्याचा सर्वोतोपरी उपभोग घेऊ नये असं तर नाही ना? असे करणे हा त्या देवाचा अपमानच . जन्म आणि मृत्यू या दोन अटळ आणि मानवी नियंत्रणाच्या कक्षेबाहेरच्या घटना आहेत. पण त्या मधील आयुष्य तर आपण चांगल्या पद्धतीने व्यतीत करू शकतो.   भौतिक सुख-साधनांना किती महत्त्वं द्यायचे? तसेच जे घटीत आपल्या नियंत्रणामध्ये नाही, त्याची किती काळजी करावी हे ज्याने त्याने ठरवावे. 

मना पाहता सत्य हे मृत्युभूमी । 
जिता बोलती सर्वही जीव मी मी ।
चिरंजीव हें सर्वही मानिताती ।।
अकस्मात सांडूनिया सर्व जाती ॥

असे सारे क्षणिक आणि अनिश्चित आहे. म्हणून हे जाणावे की जगात सत्य आणि शाश्वत जर काही/कुणी असेल तर तो म्हणजे परमात्मा, परमेश्वर.   मनुष्याला मृत्यू आहे म्हणून भयभीत होण्याचे कारण नाही. आपल्या सर्व चिंता देवाच्या चरणी अर्पण केल्यावर कसलेच भय उरत नाही. काळजी घेण्यास श्री समर्थ आहे. 

मनीं मानव व्यर्थ चिंता वाहतें ।
अकस्मात होणार होऊन जातें ॥
घडे भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतिमंद तें खेद मानी वियोगे ॥

समर्थांचे सांगणे आहे की, देवाच्या चरणी श्रद्धा, भक्ती अर्पण करावी.  म्हणजे हे जीवन चिंतारहीत, निरामय आनंदाने व्यतीत करता येणे शक्य होईल. ज्या देवाची उपासना करायची, त्याचे  स्वरूप कसे असते? विविध व्यक्तींसाठी त्याची असंख्य आणि निरनिराळी रूपे कशी असतात? याची चर्चा समर्थ सविस्तरपणे करतात. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात असे म्हणतात. आणि जितक्या प्रवृत्ती तितकीच देवाची रूपे.  

जैसा भाव जयापासी । तैसा देव तयासी । 
जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्राचा ॥ 

एखाद्या महाठकास देव तसाच भासेल. दैत्याचा देव त्याच्या प्रमाणेच असुर असेल, तर एखाद्या सज्जन भाविका चा देव त्याच्या प्रमाणेच भोळा असेल. देव म्हणजे मानवी भावभावनांचे प्रतिबिंबच जणू. 

जैसा भाव प्रतिबिंबला । तयाचाची देव जाला ।
जो जैसे भजे तयाला । तैसाची वोळे (दिसतो/प्रसन्न होतो) ॥ 

असे देवाचे वर्णन करून समर्थ सांगतात, श्रद्धा, भक्तिपूर्वक देवास चित्ती धरावे, म्हणजे जीवनात अखंड समाधानाची प्राप्ती होते. समर्थ सांगतात देव आणि धर्म आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचे अविभाज्य घटक आहेत. देवाचे स्मरण हे फक्त कारणापरत्वेच आणि तात्पुरते केल्याने खरी बावनकशी भक्ती सिद्ध होत नाही. सदासर्वकाळ त्याचे स्मरण करत राहिले पाहिजे. किंबहुना आपल्या हरएक श्वासोच्छवासा गणिक ईश्वरनाम स्फुरले तर ती खरी श्रद्धा. 

ईश्वराप्रती श्रद्धा, भक्ती असणे हा उत्तमगुण आहे. भक्तीयोग, भजन, पुजन, हरिकीर्तन इ. म्हणजे काय? ते कसे करावे?  याची सविस्तर चर्चा समर्थ  त्यांच्या ग्रंथातून करतात. अनेक प्रकाराने ईश्वरोपासना केली जाते. उपासनेचा मार्ग/पद्धत वेगवेगळी असली तरी अंतिम उद्देश्य एकच असते आणि ते म्हणजे ईश्वरप्राप्ती. 

ईश्वरोपासनेची पहिली पायरी म्हणजे श्रवणभक्ती. जो उत्तम श्रोता असतो तोच उत्तम शिष्य होऊ शकतो. आणि त्यालाच ज्ञानप्राप्ती होऊ शकते. पण श्रवण कशाचे करावे. वाटेल ते ऐकून ज्ञानवृद्धी होत नाही. त्यासाठी आधी नीट पारखून सद्गुरूची निवड करावी. शास्त्री, पंडित, ज्ञानी आणि अधिकारी (स्वतःच्या कार्यक्षेत्रात पारंगत असलेला/असलेली) व्यक्तींची संगत धरावी. त्यांच्या मुखीचे बोल लक्षपूर्वक ऐकावेत, स्मरण करावेत. कुठलाही विषय नीच अथवा त्याज्यं समजू नये. श्रोत्यांना/शिष्यांना समर्थ सांगतात --

प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथापुराणश्रवण ।
नाना अध्यात्मनिरूपण । ऐकत जावे ॥ 
कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सिद्धांतमार्ग ।
योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ 

विविध धर्म, पंथ आणि त्यांचे आचरण कसे ? कोण ? कुठे करतात याची माहिती ऐकावी. विविध व्रते, अनुष्ठाने यांची माहिती घ्यावी. उपासनेचे प्रकार जाणून घ्यावेत. दानधर्म कसा अनुसरावा, जप आणि तप कसे करावे हे देखिल ऐकावे. आहारविहार शास्त्राची माहिती घ्यावी, विविध अधिवास कसे असतात ते ऐकावे. ऋतू कसे बदलतात, हवामान आणि त्यांनुसार राहणीमान कसे असावे ते ऐकावे. जीवशास्त्र, भूगोल, भूगर्भशास्त्र, अवकाश आणि ग्रह-तारे या संबधीची माहिती ऐकावी. 

नाना पिंडाची रचना । नाना भूगोळरचना ।
नाना सृष्टीची रचना । कैसी ते ऐकावी ॥ 
चंद्रसूर्य तारामंडळे । ग्रहमंडळे मेघमंडळे ।
येकवीस स्वर्गे सप्तपाताळे । कैसी ते ऐकावी ॥ 

विविध पौराणिक कथा ऐकाव्यात, देवादिकांच्या कथा श्रवण कराव्यात, नाना प्रकाराची वने, उपवने, भुवने कशी ते जाणावी. तालज्ञान, रागज्ञान ग्रहण करावे. नाट्यशास्त्रे, नृत्यशास्त्रे  कशी ते ऐकावे. ज्योतिष्य शास्त्रा संबधी माहिती घ्यावी. 

चौदा विद्या चौसष्टी ळा सामुद्रिक लक्षणें सकळ कळा
बत्तीस लक्षणे नाना कळा । कशा ते ऐकावे ॥

विविध औषधे, उपचार पद्धती याची माहिती घ्यावी. धातू आणि रसायनांची माहिती घ्यावी. तसेच वेद, शास्त्रे, पुराणे यांची माहिती ऐकावी. पाप-पुण्य म्हणजे काय, स्वर्ग-नरक काय असतात याचे श्रवण करावे. 

पिंड ब्रम्हांडाची रचना । नाना तत्त्व विवंचना ।
सारासारविचारणा । कैसी ते ऐकावे ॥

मोक्ष, मुक्तीचे मार्ग शोधावेत, सगुण-साकार परमेश्वर आणि निर्गुण-निराकार दैवी तत्त्वे अभ्यासावीत. अशा प्रकारे श्रवणभक्ती करून जे ज्ञान संपादन केले ते अनमोल असेल. कुठलाही विषय, कोणतेही क्षेत्र हे हीन समजू नये. कारण या सर्वांनी मिळूनच मानवी जीवन घडलेले असते. योगशास्त्राप्रमाणेच पाकशास्त्र जरूरीचे आहे, तर युद्धशास्त्राप्रमाणेच विविध कलाशास्त्रांमूळे जगणे सुकर, आनंददायी बनते. म्हणून कुठलीही माहिती त्याज्य मानू नये. कधी ना कधी त्याचा उपयोग होतोच.  विविध विषय आणि त्या संदर्भातील ज्ञान मनुष्यास आणि मानवी जीवनास समृद्ध करतात. उत्तम श्रोता असल्यास वक्त्यासही आपली विचार मौक्तिके त्यासमोर खुली करण्यास उत्साह येतो, आणि ज्ञानाचे अदान-प्रदान घडून येते. 

अशा प्रकारे श्रवणभक्तीचे महत्त्व समर्थांनी विशद केले आहे. भजन आणि भक्तीचे प्रथम लक्षण म्हणजे श्रवणभक्ती होय. ईश्वरावर श्रद्धा असावी परंतु अंधभक्ती नसावी. परमेश्वर प्राप्तीसाठी भक्तीला यत्नांची जोड असणे देखिल आवश्यक आहे. यासाठी श्रवणभक्ती करून विविध प्रकारे ज्ञान संपादन करावे.  त्या ज्ञानाचा उपयोग करून  मानवी जीवन समृद्ध करणे ही त्या सृष्टी निर्मात्या परमेश्वाराप्रती व्यक्त केलेली भक्तीच आहे. आणि हाच ईश्वरप्राप्तीचा मार्ग देखिल आहे. 

मना गूज रे तूज हे प्राप्त जाले । 
परी अंतरी पाहिजे यत्न केले ॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी ।
धरी सज्जनी संगती धन्य होसी ॥ 

(क्रमशः)

संदर्भ :- 
(१) श्री मनाचे श्लोक 
(२) श्री ग्रंथराज दासबोध 

Post to Feed
Typing help hide