मे २१ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (७)

चिंता करी जो विश्वाची
श्री समर्थांनी, जनहितार्थ आरंभलेल्या या ज्ञानदान यज्ञाला सामान्य जनांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. समर्थांचा शिष्य परिवार तर विस्तृत होताच, परंतु सर्वसामान्य संसारी लोक देखिल समर्थांकडून ज्ञानबोध घेण्यास आदरपूर्वक येत असत. त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयास करीत असत. त्यांना समजेल, उमजेल अशाच भाषेत समर्थ त्यांना उपदेश देत होते. जीवनाचे मर्म सहजपणे उलगडीत होते. 

मना सज्जना भक्तीपंथेची जावे । तरी श्रीहरी पविजेतो स्वभावे ॥
जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे । जनी वंद्य ते सर्व भावे करावे ॥ 

ईश्वर प्राप्ती ही सामान्यांसाठी अप्राप्य असतेच असे नाही. मनामध्ये अनन्यसाधारण भक्तिभाव असेल तर देवदर्शन घडणे शक्य आहे. त्यासाठी शुद्ध, नैतिक आचरण आणि आदर, भक्तिभावयुक्त मन असणे मात्र जरूरी आहे. विकारी मन आणि दुराचारी असलेल्या व्यक्तीला कितीही जपतप केले तरी हे साधत नाही. अशी माणसे लोकामध्ये अप्रिय होतात.  म्हणून त्यासाठी त्रिगुणांची चर्चा . सत्त्व, रज आणि तामस गुण हेच मानवी मनाचे कार्यकर्ते आहेत. त्यांचे संतुलन करणे ज्यांस साधते, तोच सर्व जनलोकात वंद्य असतो.  परमेश्वराचे अस्तित्व त्याचे ठायी दिसून येते. अशा  सद्गुणी , सदाचारी व्यक्ती चे वर्तन कसे असते ? 

विचारूनी बोले विवंचूनी (विचारपूर्वक) चाले । तयाचेनी संतप्त तेही निवाले ।
बरे शोधल्यावीण बोलो नको हो । जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो ॥ 

परमेश्वराच्या निकट जाण्याची, त्याचे सान्निद्ध्य  लाभण्यासाठीची गुरूकिल्लीच समर्थ देत होते. संसार सोडून रानावनात जाऊन केलेल्या तपश्चर्येलाच देव प्रसन्न होतो असे नाही. सद्गुणी, सदाचारी माणसासही तो प्राप्तं होऊ शकतो. त्या साठी तमोगुणां म्हणजेच तामस गुणांपासून पासून आपली सुटका करून घेणे जरूरी आहे. सत्त्वगुण लाभदायी तर तमोगुण अहितकारक असतो.   असे क्लेशकारक तामसगुण  कोणते याचे विवेचन करताना त्याची अनेक लक्षणे वर्णिली आहेत. 

संसारी दुःखसंंमंध । प्राप्त होता उठे खेद । 
का अद्भुत आला क्रोध । तो तमोगुण ॥ 
शरिरी क्रोध भरता । नोळखे मातापिता । 
बंधू बहीण कांता । ताडी, तो तमोगुण ॥ 

क्रोधाचा ज्या मध्ये संचार झालेला असतो. त्या योगे आपले विहित वर्तन विसरून जो इतरांना दुःख देतो, अपमान करतो तो तमोगुणी असतो. तमोगुणांचे प्राबल्य झाल्यास योग्य अयोग्यतेचा विचार सूचत नाही. स्वतःला झालेले दुःख, संताप प्रकट करण्यास तमोगुणी व्यक्ती सदा अधीर असते. सहनशीलता, क्षमाशीलता हे गुण त्याच्यामध्ये जराही आढळून येत नाही. तमोगुणी मनुष्याचे वर्तन अनियंत्रित असते. स्वतःच्या क्रोधाला तो आवर घालू शकत नाही. सतत कलह, युद्धाचे विचार त्याच्या मनीमानसी येत राहतात. मनाविरूद्ध काही घडल्यास तो दुसऱ्यास अपमानास्पद बोलणे, शारीरिक इजा करणे, हत्या करणे अथवा आत्महत्या करण्याच्या थराला देखिल जाऊ शकतो. अशा व्यक्तीं  मुळे  सामाजिक स्वास्थ्य तर बिघडतेच, परंतु त्या व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे अपरिमित नुकसान होते. म्हणून तमोगुण हा सर्वथा त्याज्य समजला जातो, त्रिगुणातील सर्वाधिक हीन गुण समजला जातो. 

तमोगुणी माणसास कधीच स्वस्थता मिळत नाही. इतरांचे भले त्याला कदापि सहन होत नसते. कायम दुसऱ्याचा अकारण द्वेष आणि हेवा त्याच्या मनामध्ये रेंगाळत असतो. सदासर्वकाळ दुसऱ्याचे अहित व्हावे/करावे म्हणून तो तळमळत असतो. 

अंतरी धरूनी कपट । पराचे करी तळपट ।
सदा मस्त सदा उद्धट । तो तमोगुण ॥ 

तमोगुणी माणसाची सहनशक्ती कमी असते, अथवा नसतेच. दुसऱ्याचे आपल्या मनाविरूद्ध वागणे, बोलणे तो सहन करू शकत नाही. शारीरिक इजा, वेदना अथवा जरासे आजारपणही त्याला असह्य होते. इतके, की तो लगेच वेदना संपविण्यासाठी विष पिऊन आयुष्य संपविण्याच्या गोष्टी करू लागतो. त्याला सुग्रास भोजन आणि सुखनिद्रा अत्यंतिक प्रिय असते. त्या साठी तो नित्यनेम देखिल करण्याची टाळाटाळ करतो. स्वतः कष्ट न करता इतरांकडून कामे करविणे त्याला चांगले वाटते. त्यासाठी तो वाचिक अथवा शारीरिक हिंसाचाराचा सहजपणे वापर करतो.  त्याबद्दल  त्याला जराही अपराधी  वाटत नाही. दुसऱ्यास शासन करण्यास तो सदैव तत्पर असतो. परंतु त्याची चूक कोणी नजरेस आणून दिली, तर त्याचा संताप होतो. अन्य जनांप्रती द्वेष आणि मत्सर याने त्याचे मन सदा कलुषित झालेले असते. दुसऱ्याचे नुकसान झाले, किंवा काही दुःखदायक घडले तर तामसी माणूस आनंदीत होतो. कारण इतरांचे बरे झालेले त्याला बघवत नसते.  

परपीडेचा संतोष । निष्ठुरपणाचा हव्यास ।
संसाराचा नये त्रास । तो तमोगुण ॥ 
भांडण लावोनी द्यावे । स्वये कौतुक पाहावे । 
कुबुद्धी घेतली जीवें । तो तमोगुण ॥ 

समाजात अशांतता निर्माण झाली, लोकांमध्ये कलह उत्पन्न झाला की तमोगुणी माणसास सुख होते. दुसऱ्यास मदत करणे, दानधर्म करणे इत्यादी कर्मे त्यास अप्रिय असतात. ती तो कधीच करत नाही. स्वतःचे हित व्हावे असे वाटणे काहीच गैर नाही, परंतु तमोगुणी व्यक्ती सदा इतरांचे अहित चिंतीत असते. जे सर्वदृष्टीने हानिकारक असते. दुसऱ्याबद्दल त्याला कधीच दया वाटत नाही. देवधर्म , नित्यकर्मे करावी वाटत नाही, इतरांस अद्वातद्वा बोलतो परंतु कुणी त्यांस सांगू गेल्यास त्याला आवडत नाही. त्याला थोरांबद्दल आदर नसतो किंवा आपणांहून लहान असणाऱ्याबद्दल माया नसते. अशा व्यक्तीची कुणाबरोबरच मैत्री होऊ शकत नाही . त्याच्या आवडी निवडी देखिल तामसी असतात. चेटकविद्या, अघोरविद्या, तंत्रविद्या इत्यादीबद्दल अनावर असे आकर्षण असते. हवे ते प्राप्तं करण्यासाठी  तो दुसऱ्यास संकटात लोटू शकतो. 

कुठलीही क्रिया अविचाराने, अविवेकाने आणि अतिरेकी पद्धतीने करणारा माणूस हा तमोगुणांनी युक्तं आहे हे जाणावे. स्वतःच्या दुःखासाठी तो देवास दूषणे देतो, आणि दुःख निवारण्यासाठी अघोरविद्येचा अवलंब करतो. त्याला संतसज्जनांचा सहवास नकोसा वाटतो, त्यांनी केलेल्या उपदेशाकडे तो दुर्लक्ष्य करतो, उपमर्द करतो. असा तामसी मनुष्य समाजासाठी निरूपयोगी आणि घातक असतो. 

निग्रह करून धरणे । का ते टांगून घेणे । 
देवद्वारी जीव देणे । तो तमोगुण ॥ 
निराहार उपोषण । पंचाग्नी धूम्रपान । 
आपणास घ्यावे पुरून । तो तमोगुण ॥ 

तमोगुणी माणसाचे वर्तन समाजस्वास्थ्यासाठी बाधक असते.  अनेक तमोगुणांचे सविस्तर वर्णन समर्थ करतात. तमोगुणांमुळे मानवाचे आणि पर्यायाने समाजाचे  अधः पतन घडते, ईश्वरप्राप्तीची संधी त्यांस दुरावते. म्हणून तमोगुणांपासून मानवाने आणि तामसी व्यक्तींपासून समाजाने दूर राहावे हे उत्तम. 
 
समर्थांचे विचार त्यांच्या काळाच्या मानाने कितीतरी पुढारलेले, सुधारक असे होते. श्रीरामावर निःसीम भक्ती होती, परंतु ती अंधभक्ती नव्हती. त्यांची भक्ती ही फक्त पूजाअर्चा, व्रतवैकल्ये, अनुष्ठाने इथपर्यंतच सीमित नव्हती. त्यांना श्रीरामासारखी आदर्श नीतिमत्ता असणारे लोक घडवायचे होते. श्रीरामासारखी आदर्श जीवनपद्धती अनुसरणारा समाज त्यांना निर्माण करायचा होता. म्हणूनच ते लोकांना सतत सांगत होते, ईश्वरप्राप्तीसाठी काया, वाचा आणि मनाची शुद्धता जरूरी आहे. परमेश्वराला शोधण्यासाठी रानावनात भटकण्याची जरूर नाही. तो तुमच्या, माझ्या मध्येच आहे. तुमचे आचार, विचार शुद्ध असले की दर्शन देतो. त्याला ओळखण्याइतकी बुद्धी लाभावी, यासाठी प्रयास करायास हवे. रामदास स्वामींचे  त्यांच्या आराध्य दैवताकडे हेच तर मागणे  होते -- 

मनी कामना कल्पना ते नसावी ।
कुबुद्धी कुडी वासना नीरसावी । 
नको संशयो तोडी संसारव्यथा ।
रघूनायका मागणे हेचि आता ॥ 

(क्रमशः) 
Post to Feed
Typing help hide