एप्रिल २३ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (३)

चिंता करी जो विश्वाची
श्री रामदास स्वामींच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातला साधेपणा. अतिशय सुगम , सरळ अशी भाषा. विचारातील प्रांजळपणा आणि स्पष्टपणा. तसेच निगर्वी आणि निरलस वृत्ती. त्यांच्या लेखनात त्यांनी कुणाचीही खोटी स्तुती अथवा निंदा केलेली दिसत नाही. घरातील शहाणीसुर्ती व्यक्ती आपणांहून वयाने, ज्ञानाने सान असलेल्यांस  व्यवहारज्ञानाच्या, शहाणपणाच्या चार गोष्टी जशा सांगेल तीच रीत, तीच कळकळ. केवळ अज्ञानापायी कुणाच्याही आयुष्याची माती होऊ नये हीच  तळमळ. चारित्र्यवान, नीतीवान,  बुद्धीवान आणि  कार्यकुशल अशा व्यक्तींचा हा समाज व्हावा हीच सदीच्छा. अन्यथा सन्यासी व्रत स्विकारल्यानंतर, रामनामाचा जप करीत कुठल्या मठात शांतपणे आयुष्य व्यतीत करणे त्यांना सहज शक्य होते. परंतु लोकोद्धार, जनजागृती हेच त्यांचे जीवन ध्येय होते, म्हणून समाजातील अनेक वैगुण्ये त्यांनी टिपली, लोकांसमोर मांडली आणि त्यांपासून सावध राहण्याची शिकवणूक दिली. 

प्रारंभी सर्व इष्टं देवी, देवता, गुरुजन, संत, सज्जन, विद्वान इत्यादींना नमन करून समर्थ आता मनुष्य जन्माची महती सांगतात. हिंदू धर्मात असे सांगितले जाते की - अनेक जन्मीच्या पुण्याचे फलस्वरूप म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म मिळाल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे सुयोग्य पद्धतीने जीवन व्यतीत केल्यानंतरच मुक्ती मिळते. मनुष्य जन्म सत्कारणी लावला असता अनंत यमयातनांतून मुक्ती मिळते असे समर्थ सांगतात. मनुष्य स्वभाव विविधरंगी, आणि बहुढंगी असतो. प्रत्येकाची आवड, निवड, आचार, विचार, स्वभाव, बुद्धी आणि शारीरिक क्षमता वेगळी असते आणि त्यानुसारच जो तो आपले जीवन व्यतीत करतो. पण जेव्हा मनुष्य आपल्या कुवतीनुसार योग्य त्या पद्धतीने आयुष्य जगतो तेव्हा त्यांस सद्गती प्राप्तं होते. 

नरदेही येऊन सकळ । उधरागती (सद्गती) पावले केवळ ।
येथे संशयाचे मूळ । खंडोन गेले ॥ 
पशुदेही नाही गती । ऐसे सर्वत्र बोलती ।
म्हणौन नरदेहीच प्राप्ती । परलोकाची ॥ 

मनुष्य जन्माची महती समर्थ सांगतात.  समर्थ म्हणतात  अप्राप्य असा मनुष्य जन्म महत्प्रयासाने प्राप्तं झाल्यानंतर जो मनुष्य दुर्वर्तनाने आणि कुबुद्धीने तो वाया घालवतो तो केवळ मूढ असतो.

सांग नरदेह जोडले । आणि परमार्थबुद्धी विसरले ।
ते मूर्ख कैसे भ्रमले । मायाजळी ॥ 

आपणास मनुष्यजन्म प्राप्तं झाला ते आपले भाग्यं हे विसरून जो वर्तन करतो, त्याचे जीवन वाया जाते. अहंपणा,  मी पणा मनात धरून जो जगतो .. अंततः त्याला त्याचे फळ (शिक्षा) मिळते. आपले म्हणणे  विस्ताराने सांगण्यासाठी समर्थ मनुष्यदेहास  घराची उपमा देतात. मनुष्याचे गुण, अवगुण, विकार हे या घरातील रहिवासी असतात. मनुष्य समजतो हा जन्म माझा आहे. मला पाहिजे त्याप्रमाणे व्यतीत करीन. हा देह माझा आहे, जन्मतः मला मिळालेला आहे. त्याचा उपयोग मी माझ्या सुखासाठी, इच्छापूर्तिसाठी करीन. परंतु हा त्याचा भ्रम असतो. त्याच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या गुण-अवगुणांनी कधीच त्यात प्रवेश केलेला असतो. 

मृत्तिका खणोन घर केले । ते माझे ऐसे दृढ कल्पिले । 
परी ते बहुतांचे हे कळले । नाहीच तयांसी ॥ 

मनुष्य जन्म मिळाला आहे म्हणून वाटेल तसे वर्तन करून जो राहतो त्यास हे कळत नाही की हा जन्म ,आयुष्य जरी तुझे असले तरी त्यावर अनेकांची सत्ता चालते. त्यामुळे अंती जर दुर्गुण अथवा वाईट सवयींचा विजय झाला तर तुला सद्गती प्राप्तं होणे कठीण . आपले म्हणणे समजवण्यासाठी समर्थ म्हणतात -- किडा, मुंगी, उंदीर इ. प्राणी, दास, दासी, चोर, चिलटे हे सर्वच जण ते घर त्यांचेच आहेत असे समजतात. तेथे सुखेनैव आणि यथेच्छं निवास करतात. तेच या घराचे स्वामी आहेत असे समजतात, आणि काही अंशी ते सत्यच असते. घर म्हणजे मनुष्य देह असे समजल्यास उपरोक्तं उल्लेखलेले सर्व रहिवासी म्हणजे गुण, अवगुण, विचार आणि कर्मे हे होय. या सर्वांच्या योगेच मानवी जीवन घडत असते. म्हणजेच ते सर्व या जन्माचे नियमन आणि नियंत्रण करीत असतात. मनुष्यास हे कळत नाही आणि तो बेसावध राहतो. आणि मग त्याची अधोगती होत राहते. 

समस्त म्हणती घर माझे। हे मूर्खही म्हणे माझे माझे ।
सेवट जड झाले ओझे । टाकिला देश ॥ 

वैभवाच्या कालात, चांगल्या दिवसात सर्वच या घराला चिकटून राहतात आणि हळू हळू अधोगतीकडे नेतात. दुःख आणि दैन्य आले की पाठ फिरवून निघून जातात आणि मग असा मनुष्य देशोधडीला लागतो. आधी सगळेजण भांडतात की हे घर माझे म्हणून.. त्यांमुळे घरातील सुखशांती निघून जाते आणि आयुष्य हेच  एक मोठे ओझे होऊन राहते. अशी स्थिती जवळपास सर्वांचीच असते. 

अवघी घरे भंगली । गावांची पांढरी पडली ( गावे उजाड झाली ) ।
मग ते गृही राहिली । आरण्य स्वापदे ॥ 

मी, माझे या भांडणात शांती, सुख, समाधान निघून गेले , आणि तेथे दुःख, दैन्यं आणि अवगुणांचे वास्तव्य राहिले. ही स्थिती आपली होऊ नये म्हणून सर्वांनी समजून घ्यावे की -- 

ऐसी गृहांची स्थिती । मिथ्या आली आत्मप्रचिती ।
जन्म दो दिसांची वस्ती । कोठेतरी करावी ॥ 

हे जग नश्वर आहे, जीवन क्षणभंगुर आहे हे जाणून वृथा त्याचा लोभ ठेवू नये. निर्लेप वृत्तीने जीवन व्यतीत करावे. आपली मर्यादा जाणावी, आपले विहित कार्य विरक्तपणे करत जावे म्हणजेच या आयुष्याचे ओझे होणार नाही. या सृष्टीवर आपल्या इतकाच इतर प्राणिमात्रांचाही तितकाच हक्क आहे हे जाणून घ्यावे, म्हणजे अधिकारासाठीचा संघर्ष संपेल. क्रोध, मद, मत्सर आणि त्या योगे येणारे क्रौर्य लोप पावेल आणि हे जग आणि जगणे सुंदर होईल. अशा प्रकारे समर्थ अतिशय सुलभ पद्धतीने मनुष्य जन्माचे प्रयोजन सांगतात. देह हा परमार्थाचे साधन आहे. जो हे जाणत नाही त्याचे जीवन व्यर्थ आहे. इतके सारे सांगून झाल्यानंतरही समर्थ जाणतात की या उपदेशाला दुर्लक्षून, अनिष्ट तेच करणारे महाभाग असतातच. समर्थ अशांना मूढ अथवा मूर्ख असे संबोधतात . अर्थात त्यांचा तेव्हढा अधिकार आहेच. त्यांनी स्वतः कठोर साधनेने तो प्राप्तं केलेला आहे. 

मग असे मूर्ख कसे ओळखायचे ते सांगतात. मूर्खांची लक्षणे वर्णन करतात. ते सांगतात जो माता, पित्यांचा अनादर करतो, आपल्या पत्नीच्या अधीन होऊन त्यांना अवमानित करतो तो मनुष्य मूर्ख समजावा. समाजात वावरताना अविवेकाने कृती करतो, सामाजिक संकेतांना झुगारून देतो, सामर्थ्यवान व्यक्तींच्या पुढे पुढे करतो तो निश्चितच मूर्ख असतो. स्वतःबद्दल गर्व बाळगून स्वतःचेच गुणगान करणाऱ्यासही समर्थ मूर्ख म्हणतात. 

आपली आपण करी स्तुती । स्वदेशी भोगी विपत्ती । 
सांगे वडिलांची कीर्ती । तो येक मूर्ख ॥ 

स्वकर्तुत्वावर न विसंबता वाडवडिलांच्या मोठेपणावर जीवन जगणे अयोग्य आहे असेच ते म्हणतात. आपले विचार ज्यास योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे व्यक्त करता येत नाही, जो अहंकाराने आपणापेक्षा थोर आणि ज्ञानी व्यक्तीस देखिल शहाणपण शिकविण्यास जातो, तसेच जो घरातील लोकांवर अधिकार गाजवून बाहेरील समाजात वावरताना मात्र हीन दीन होतो अशा सर्वांना समर्थ मूर्ख असे संबोधतात. धनवान व्यक्तीपुढे लाचारी पत्करणारा तसेच अविचाराने वेडे साहस करणारा देखिल शहाणा नक्कीच नसतो. मर्यादा सोडून वागणारा, लहानसहान बाबींमध्ये देखिल कद्रूपणा करणारा , तसेच स्वबळाने गर्विष्ठ होऊन,  आकसाने, मन मानेल तसे इतरांस  शासन करणारा देखिल याच सूची  मध्ये येतो .

विचार न करिता कारण । दंड करी अपराधेविण । 
स्वल्पासाठी जो कृपण । तो येक मूर्ख ॥ 

अनेक दुर्गुणांनी भरलेल्या मनुष्यांचे समर्थ वर्णन करतात. यातून ते व्यावहारिक ज्ञानच आपल्या श्रोत्यांना देत आहेत. समाजात, व्यवहारात कसे असावे, कसे वागावे आणि काय केल्याने आपल्याला समाजात, जनलोकात सन्मानाची वागणूक मिळेल हे ते सांगतात. त्यांचे म्हणणे आहे की ते वर्णन करीत असलेल्या दुर्गुणांपासून दूर राहण्यातच सर्वांचे हित आहे. 

तापीळ (तापट ) खादाड आळसी । कुश्चिळ कुटीळ मानसी । 
धारिष्टं नाही जयापासीं । तो येक मूर्ख ॥ 
विद्या वैभव ना धन । पुरूषार्थ सामर्थ्य ना मान ।
कोरडाच वाहे अभिमान । तो येक मूर्ख ॥ 

अनेक परीने समर्थ आपल्या शिष्यांस शहाणपणाच्या, युक्तीच्या गोष्टी सांगतात. क्रोध, दुर्वर्तन, उद्धटपणा, अधम आणि नीच पणा या अवगुणांपायी तुमची पत, प्रतिष्ठा आणि त्या योगे सुखही लयास जाईल असे ते सांगतात. अधिक बोलणे , कुसंगती करणे , व्यभिचार आणि व्यसनांच्या आहारी जाणे सर्वथा त्याज्य आहे कारण असे करणाऱ्या व्यक्तीस समाज देखील दूर ठेवतो. समर्थ सांगतात उक्ती पेक्षा कृती श्रेष्ठ असते .  केलेले उपकार बोलून दाखविल्याने पुण्याई घटते. तसेच दुसऱ्याने केलेल्या चांगुलपणाचे, उपकाराचे नेहमी स्मरण करीत राहील्याने जनमानसात सदभावना वाढीस लागते. उगीचच जास्तं बोलणाऱ्यांना ते दूषण देतात. 

स्वये नेणे परोपकार । उपकाराचा अनोपकार ।
करी थोडे बोले फार । तो येक मूर्ख ॥ 

पुढे ते सांगतात --

जैसे जैसे करावे । तैसे तैसे पावावे ।
हे जयास नेणवे । तो येक मूर्ख ॥ 

पेरावे तेच उगवते अशी म्हण आहे.  समर्थ सांगतात की समाज हा आरसा आहे. तुम्ही जसे त्यांस सामोरे जाल तसेच प्रतिबिंब तुम्हांस दिसेल. आपण अन्यायाने वागून, दुसऱ्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे खचितच गैर आहे. पण हे अनेकांस उमगत नाही. आणि तेच त्यांच्या दुः खाचे कारण होते. परपीडा, परनिंदा करणे तसेच दुसऱ्याचे धन, वस्तू अथवा स्त्री चे हरण करणे, थोरांस योग्य तो आदर न देणे, स्व बळावर उन्मत्त होऊन दुसऱ्याला त्रास होईल असे वागणे -- पाप आहे. असे केल्याने दुष्कीर्ती होऊन अधोगती होते. 

परपीडेचे मानी सुख । परसंतोषाचे मानी दुः ख । 
गेले वस्तुचा करी शोक । तो येक मूर्ख ॥ 

नंतर ते सांगतात, मित्रांना आपली रहस्ये सांगणारा, आपल्या कुटुंबीयावर जरूरीपेक्षा जास्त विश्वास ठेवणारा, अनोळखी व्यक्तीबरोबर संभाषण करणारा आणि एखादा गुन्हेगार आहे हे माहिती असून त्याच्याशी मैत्रीचे संबंध राखणारा मनुष्य हा निंदेचा धनी होतो. आपल्या अपयशा साठी इतरास दोष देणे, लहान सहान चुकांसाठी इतरांस क्षमा न करणे, अनीतीने द्र्व्यार्जन करणे, हे देखील अयोग्य आहे. आपल्या स्वभाव दोषामुळे, संशयीपणामूळे जो आपले इष्टमित्र आणि नातेवाईक गमावतो, दुसऱ्यास जो हीन लेखतो, इतरांचे दोष दाखवीत राहतो तो मनुष्य निश्चितच लोकनिंदेस पात्र असतो. 

समर्थ संगतीचे महत्त्व जाणून आहेत. आपण ज्यांच्या संगतीत आहोत त्यांच्या प्रमाणेच आपली ओळख जगास राहते. म्हणून सावधानता बाळगणे अत्यंत जरूरीचे असते. उपकाराची फेड अपकाराने करणारा, स्वार्थी, आणि कारस्थानी मनुष्य संगतीस अयोग्य आहे असे ते म्हणतात. त्याच प्रमाणे सदोदित कसलीतरी चिंता करणारा, इतरांचे संभाषण उगीचच ऐकत राहणारा जो मनुष्य आहे त्याची संगती टाळणेच चांगले. 

अतिताचा अंत पाहे । कुग्रामामध्ये राहे । 
सर्वकाळ चिंता वाहे । तो येक मूर्ख ॥
दोघे बोलत असती जेथे । तिसरा जाऊन बैसे तेथे ।
डोई खाजवी दोहीं हाते । तो येक मूर्ख ॥ 

 समर्थ आपल्या श्रोत्यांस सावधान करीत आहेत. असे अनेक अवगुण ते वर्णितात जे सहजपणे दिसतात, परंतु ते अवगुण आहेत, निंदनीय आणि त्याज्य आहेत हेच कुणाच्या लक्षात येत नाहीत. आणि  त्याचे दुष्परिणाम मात्र भोगायला लागतात. समर्थांची निरीक्षण शक्ती, आणि नीर-क्षीर विवेक बुद्धी किती अचूक होती हेही यावरून समजते. इतकी मूर्ख लक्षणे वर्णन करून त्याचे परिणाम काय होतात हे जनांस कळेल अशा पद्धतीने आणि सुस्पष्टपणे सांगणे हे समर्थच करू जाणोत. त्यांच्या विद्वत्तेबरोबरच त्यांचे असामान्य शब्दप्रभुत्वं देखिल ठायी ठायी जाणवते. कुठे समजावणीचा सूर तर कुठे रोखठोक भाषा . क्धी कुणी दुखावला जाईल असे वाटले तर "... क्षमा केली पाहिजे " असं म्हणण्याची विनयशीलताही प्रकर्षाने दिसून येते. पण तरीही आपल्या बोलण्यात, विचारात, लिखाणात कुठेही तडजोड केलेली  सुद्धा दिसत नाही. श्रोत्यांस आपण सांगीतलेले विचार कडू वाटले तरी ते सांगणे आपले कर्तव्यच आहे असा निर्धारही दिसतो. 

समर्थ सांगतात या अनेक लक्षणांबरोबरच आणखीही काही आहेत, जी टाळली नाही तर विनाश अटळ आहे. जो परस्त्रीची अभिलाषा करतो अथवा तिच्याशी वैरभाव धरतो, कलह करतो तो विनाश पावतो. जो  मूर्खांच्या संगतीत कालक्रमणा करतो, देवा ब्राम्हणांवर देखील तोंडसुख घेतो तो टीकेस पात्रं ठरतो . अंततः ते सांगतात ज्ञानार्जनात साहाय्य करणाऱ्या पुस्तकांचे जो योग्य प्रकारे जतन करीत नाही,  पुस्तक वाचताना मधील काही भाग गाळून वाचतो अथवा  पुस्तकात नसलेला मजकूर स्वतः च्या मनाने तेथे घालून वाचतो तो माणूस अज्ञानी असतो. त्याला संपूर्ण ज्ञान होण्याची शक्यता नसते आणि मग समाजात तो मूर्ख म्हणूनच गणला जातो . 

अशा प्रकारे अनेक मूर्खलक्षणे समर्थ सांगतात. ही लक्षणे म्हणजेच अवगुण .. त्यांच्यापासून सदैव दूर राहायला हवे. या अवगुणांपासून स्वतःचे रक्षण केले तरच उत्तम गती प्राप्तं होते. ते म्हणतात -- मला जितकी आढळली, लक्षात राहिली तितकी मूर्खांची लक्षणे मी सांगितली. ती सांगण्यामागे, लोकांना त्या अवगुणांच्या दुष्परिणामांपासून  सावध करणे आणि दूर ठेवणे हाच सदहेतू होता. तरी त्या बाबतीत गैरसमज नसावा. 

लक्षणे अपार असती । परी काही येक येथामती । 
त्यागार्थ बोलिलें श्रोती । क्षमा केली पाहिजे ॥ 

(क्रमशः ) 
Post to Feed
Typing help hide