ऑक्टोबर १९ २०१६

चिंता करी जो विश्वाची ... (१४)

चिंता करी जो विश्वाची
श्री रामदास स्वामींची  ज्ञानसाधना अखंड आणि अहोरात्र घडत होती.  त्याचबरोबर ज्ञानदानाच्या कार्याला देखिल खंड नव्हता. आपल्या शिष्यागणांच्या माध्यमातून ते समाजाच्या सर्व थरातील लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करीत होते. त्यांची सुखदुःखे जाणून घेत होते. त्यांच्या अडीअडचणीतून सुयोग्य मार्ग शोधण्यासाठी त्यांना मदत करीत होते. 

समर्थांचा संचार सर्वदूर असे. अनेक ठिकाणी त्यांनी रामदासी मठांची स्थापना केलेली होती. त्या मठांतील साधक, शिष्यगण समर्थांचे कार्य आपापल्या कुवतीनुसार चालावीत होते. त्यांच्या कार्यास समर्थांचे आशीर्वाद आणि समर्थन लाभलेले होते. देशोदेशींच्या प्रवासातून आणि भेटलेल्या असंख्य जनसमुदायापासून समर्थांनी एक सत्य जाणले होते. सर्वसामान्यांची दुःखे, अडचणी यांचे कारण त्यांचा स्वतःचा स्वभाव, सवयी आणि गुणदोष  असतात.  त्याचे उपाय देखिल साधे, सोपे असतात. गरज असते फक्त निश्चय आणि प्रामाणिकपणाची. थोडेफार कौशल्य, काही उत्तमगुण आणि व्यवहारज्ञान असल्यास, मनुष्य सुखसमाधानाने आयुष्याची कालक्रमणा करू शकतो. 

बहुसंख्य लोक संसारामध्ये गुंतून गेलेले असतात. भौतिक सुख आणि मोह, मायेच्या पाशातून त्यांची सुटका नसते. त्यांमुळे दुः ख आणि चिंता त्यांना घेरतात. त्यातही जसे वय वाढत असते, तसे अपरिहार्य पणे मृत्यूचे भय देखिल सामोरे येते. आपणच निर्मिलेला मोहमायेचा पसारा सोडून जाण्याची कल्पना असह्यं वाटू लागते.  मृत्यूपश्चात आपले सगेसोयरे कसे राहतील, काय करतील याची चिंता त्यांचे चित्तं  कुरतडत असते. त्यांना हे सत्य ध्यानी येत नाही, की या जगात कुणाचेच, कुणाविना अडत नसते. असंख्य येतात आणि असंख्य जातात, -- त्यांच्या असण्याने अथवा नसण्याने पृथ्वीच्या  चलनवलनात जराही खंड  नसतो.  परंतु आधीच तापत्रयांनी पोळलेला मनुष्य, हे सत्यं दृष्टीआड करायचा प्रयत्न करतो, अथवा त्यांस ते उमगत नसते. 
अशांना समर्थ उपदेश करतात, सत्याकडे डोळेझाक केल्याने काहीच साधत नाही. जर जे घडणार आहे, ते थांबणार नाही,  तर  त्याचा स्वीकार करणे चांगले नाही का?  सावध आणि सजगतेने सत्याला सामोरे जाणे नेहमीच सुखकर असते. 

नित्य काळाची संगती । न कळे होणाराची गती ।
कर्मासारिखे प्राणी पडती । नाना देसी विदेसी ॥
सरता संचिताचे  शेष । नाही क्षणाचा अवकाश । 
भरता न भरता निमिष्य । जाणें लागे ॥ 

जे अपरिहार्य आहे, त्याला सामोरे जाण्यातच हित आहे. असे केल्याने भीती आणि चिंता त्यांपासून मुक्ती मिळेल. प्रत्येक प्राणिमात्राला, सजीवाला मृत्युभय असतेच, आणि  त्यापासून मुक्ती  देखिल नाही. अमरत्वाचे दान कुणाच्याच नशिबात नसते. पुराण कथांमध्ये हनुमान, अश्वत्थामा इ. चिरंजीवांचा उल्लेख आढळतो. तसेच इच्छामरणी भीष्माची कथा सर्वश्रुत आहे. परंतु हे सर्व केवळ अपवाद, ... नियम सिद्ध करण्यापुरतेच .
म्हणून समर्थ मृत्यूचे स्वरूप वर्णन करतात. ते सांगतात, मृत्यू अपरिहार्य आहे. त्याचे बोलावणे आले की तात्काळ जावेच लागते. मृत्यू कुणाची सोय, गैरसोय जाणत नाही. पाप-पुण्याची त्याला क्षिती नसते. लहान-थोर हा भेदभाव नसतो. दुर्बलाप्रमाणेच सबळांनाही त्याच्या मागे जावेच लागते. त्याच्यासमोर सर्व समान असतात. 

मृत्यू न म्हणे हा भूपती ।  मृत्यू  म्हणे हा चक्रवर्ती ।
मृत्यू न म्हणे हा करामती । कैवाड  ( तंत्र, मंत्र, प्रयोग ) जाणे ॥ 

काळासमोर गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी, सबळ-दुर्बळ असा काही भेद नसतो. ज्याचा कार्यकाल संपला, त्याला कुठल्याही प्रकारे काळाची अवज्ञा करता येत नाही. 

मृत्यू न म्हणे शास्त्रज्ञ । मृत्यू  म्हणे वेदज्ञ ।
मृत्यू न म्हणे सर्वज्ञ । सर्व जाणे ॥
मृत्यू न म्हणे रागज्ञानी । मृत्यू  म्हणे ताळज्ञानी ।
मृत्यू न म्हणे तत्त्वज्ञानी । तत्त्ववेत्ता ॥ 

देवधर्म, तप: साधना केल्यास, कदाचित मृत्युभय राहणार नाही असे काहींना वाटते. अज्ञानी आणि भयभीत लोकांना अमरत्व मिळवून देण्याचे वायदे करून आपले महत्त्वं वाढवून घेणारे आणि कार्यभाग साधणारे असतात. अशा लोकांचे सत्यस्वरूप लोकांना समजावताना समर्थ सांगतात, की असे कुणीही करू जाणत नाही, कुणीही करू शकत नाही. त्यांमुळे अशा लोकांच्या फसव्या मायाजालापासून दूर राहणे श्रेयस्कर. 

मृत्यू न म्हणे हठयोगी । मृत्यू  म्हणे राजयोगी ।
मृत्यू न म्हणे वितरागी । निरंतर ॥ 
मृत्यू न म्हणे ब्रह्मचारी । मृत्यू  म्हणे जटाधारी ।
मृत्यू न म्हणे निराहारी । योगेश्वर ॥ 

पृथ्वीतलावरील सर्व सजीवांस मरण आहे. मृत्युसाठी हा योग्य अथवा अयोग्य, असा भेदभाव काळ करीत नाही. त्यांमुळे त्यापासून दूर जाण्याचा, त्याचे अस्तित्व नाकारण्याचा, प्रयत्न करण्यात काहीच अर्थ नाही. हेच निर्विवाद सत्य समर्थ पुनः पुन्हा सांगतात. 

च्यारी खाणी ( चार प्रकारचे सजीव ) च्यारी वाणी ( परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी ) । चौर्यासी लक्ष जीवयोनी । 
जन्मा आले तितुके प्राणी ।  मृत्य पावती ॥ 
मृत्याभेणे पळो जाता । तरी मृत्य सोडिना सर्वथा । 
मृत्यास न ये चुकविता । काही केल्या ॥ 

म्हणून समर्थ सांगतात, -- मी थोर, ज्ञानी, पराक्रमी, पुण्यवंत असा अहंकार मिरवू नये. कारण असे अनेक थोर होऊन गेले, ज्यांना मृत्युपंथ चुकविता आलेला नाही.  अहंकार, आणि दुसऱ्याबद्दल तुच्छं भाव बाळगू नये, कारण अशांचे गर्वहरण करण्यास काळ सदैव  तत्पर असतो. एकदा मृत्यू, हे कधी न बदलणारे शाश्वत सत्यं आहे, याचा स्वीकार केल्यावर  मनः शांती प्राप्तं होते. कशापासून तरी दूर जाण्याची धडपड संपते. त्यामुळे त्या प्रयत्नांमध्ये वाया जाणणारी उर्जा अधिक चांगल्या प्रकारे उपयोगात येऊ शकते. प्रारब्धाची चिंता नसल्याने, मनुष्याची बुद्धी, विचारशक्ती विधायक कार्यासाठी उपलब्ध होते.  त्यामुळे मनुष्याचा वैयक्तिक, कौटुंबिक फायदा तर होतोच, पण त्याच बरोबर सामाजिक कल्याण देखिल साधते. 

अशा प्रकारे मृत्यूची विवंचना त्यागली, तरी संसार हे एक मोठे कोडे मनुष्यासमोर असते. त्याची सोडवणूक करत करता जीव थकून जातो. मी -- मी म्हणवणारे देखिल, या समोर हतबल होतात. "प्रयत्ने वाळूचे कण रगडीता -- तेलही गळे " वगैरे बोलायला आणि ऐकायला चांगले वाटते. परंतु पावलोपावली सामोरे येणारे कूटचक्र भेदताना, कित्येकवेळा शक्ती आणि बुद्धी क्षीण होते. 

संसार म्हणिजे महापूर । माजीं जलचरें अपार ।
डंखू धावती विकार । काळसर्प ॥ 

असे या अनाहत संसारचक्राचे वर्णन समर्थ करतात. मनुष्याच्या हाती, पायी आशा-निराशेच्या बेड्या पडलेल्या असतात, त्यामुळे त्याची गती आणि मती  कुंठीत झालेली असते.  अहंकार रुपी सैतानाचा मन आणि बुद्धीवर ताबा असतो, त्यायोगे जीवन साक्षात नरकाचे रूप धारण करते. वासना आणि लालसेची मगरमिठी अत्यंत यातनादायक होते. तिरस्कार, मद, मत्सर यांनी मनीमानसी ठाण मांडलेले असते. त्यामुळे सारे वर्तमान आणि भवितव्य काळवंडून जाते. माया आणि मोहाच्या गुंत्यात गुरफटलेला माणूस फक्त 'मी' आणि 'माझे' यातच अडकलेला असतो.   त्या बाहेरील विश्व त्याच्यासाठी अपरिचित होऊन जाते. स्वतःहोऊनच तो आपल्या मर्यादा सीमित करून घेतो. काही काळाने या सर्वांचे ओझे असह्य होऊ लागते. अभिमान आणि अहंकाराने  चित्त भ्रमित झालेले असते. स्वतःभोवती गिरक्या घेऊन, भोवंडायला होऊ लागते. यातून मुक्तीचा मार्ग दिसत नसतो. मग संसार हाच सर्व दुःखांचे   मूळकारण आहे असे वाटायला लागते. भय, क्रोध, चिंता चित्तं व्यापून टाकतात. सृष्टी अंधःकारामय आहे, पावलोपावली काळसर्प फुत्कार टाकत आहेत, असे भास होऊ लागतात.  अशा हतप्रभ, हतोत्साहीत झालेल्यांना समर्थ शहाणपणाचे, समजुतीचे बोल सुनावतात.   आहे या परिस्थितीचे निर्माते तुम्हीच आहात, आणि यातून सुधारणा घडवणे देखिल तुमच्याच हाती आहे, असे सांगतात. भ्रमित झालेली बुद्धी आणि दुश्चित झालेले चित्त एकाग्रं व्हावे म्हणून परमेश्वर चरणी लीन व्हावे असा उपदेश करतात. एकाग्रता साधल्यावर नकोसे, अनुचित आणि अहितकारक विचार दूर जाईल. दृष्टी निर्मळ होऊन  सुखाचा मार्ग गवसेल, असा धीर देतात. 

बहुतेक आवर्ती पडिले । प्राणी वाहातची गेले।
जेहिं भगवंतासी बोभाइलें (बोलावले) । भावार्थबळें ॥ 
देव आपण घालुनी उडी । तयांसी नेले पैलथडी ।
येर तें अभाविकें बापुडी । वाहातची गेली ॥ 
भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोन भुलला ।
संकटी पावे भाविकाला । रक्षितसे ॥ 

(क्रमशः) 

Post to Feed
Typing help hide