तुम्ही काय कराल?

मी ज्या इमारतीत राहतो, त्याच इमारतीत एक तरुण जोडपे राहते. दोघेही तिशीच्या आसपासचे, एक पाच वर्षाचा मुलगा. दोघेही उच्चशिक्षित, आयटीमध्ये काम करणारे, पगार अर्थातच भरपूर. या दोघांचे लग्नानंतर कधी एकमेकांशी धड पटलेच नाही. शेकडो वेळा बेबनाव, उंच आवाजात भांडणे, तिचे एकदोन वेळा घर सोडून जाणे, दोघांच्या आईवडीलांनी समजूत काढून त्यांना परत एकत्र आणणे वगैरे. तो आणि त्याचे आईवडील खरेतर अत्यंत सज्जन, शांत स्वभावाचे. पण अलीकडे तोही अत्यंत अबोल झाला आहे. कुणाशी बोलताना नजर चुकवत, अडखळत बोलतो. त्याचे आईवडील तर त्याचे लग्न झाल्याझाल्या दुसरीकडे रहायला गेले, ते नंतर इकडे आलेलेही नाहीत. त्यांचे इकडे येणे तिला म्हणे आवडत नाही. ते जवळच राहतात, पण तिचा मुलगा बाकी शाळेनंतर ती परत येईपर्यंत पाळणाघरात असतो. ती अलीकडे सतत कर्कश आवाजात त्याच्यावर आणि मुलावर करवादत असते. तो छोटा मुलगा अगदी लहान असल्यापासून 'मामा - मामी' करत आमच्याकडे येत असतो. अगदी गोड, बोलक्या डोळ्यांचा चुणचुणीत मुलगा. संध्याकाळची माझ्याबरोबरची बुद्धीबळाची एक गेम जवळपास ठरलेली.
कालपरवाची गोष्ट. संध्याकाळी त्या दोघांचे इमारतभर सगळ्यांना ऐकू जाईल अशा आवाजात जोरदार भांडण झाले. तो तावातावाने बाहेर निघून गेला. ती - विश्वास बसणे कठीण आहे- शेजाऱ्यांकडे मालिका बघायला गेली. (मुलावर वाईट संस्कार होतात म्हणून त्यांनी घरात केबलचे कनेक्शन घेतलेले नाही!) माझ्या दाराची कडी वाजली. दारात तो पाच वर्षाचा मुलगा उभा होता. रडवेला चेहरा, मळके कपडे, चेहऱ्यावर सुकलेले ओघळ... माझ्या शेजारच्या खुर्चीत तो पाय वर घेऊन बसला आणि त्याचे हडकुळे, बारीक पाय बघून मला कालवल्यासारखे झाले. काही वेळाने तो अडखळत बारीक आवाजात म्हणाला, "मामा... खायला दे ना.."  माझ्या घशाशी काहीतरी दाटून आले. मी एका ताटलीत वरणभात कालवून त्याला खायला दिला. तो त्याने संपवला आणि पेलाभर पाणी पिऊन काही न बोलता माझ्याबरोबर टीव्ही बघत बसला. रात्रीचे दहा वाजले. त्याचे बाबा अद्यापही घरी आले नव्हते. त्याच्या आईची हाक ऐकू आली. मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. अगदी नाईलाज झाल्यासारखा चेहरा करून तो मुलगा रेंगाळत रेंगाळत त्याच्या घरी गेला.
अंथरुणावर पडलो तरी मला झोप येईना. या आणि अशा मुलांचे पुढे काय होणार? अशा विस्कटत जाणाऱ्या संसारांमध्ये कुणाकुणाची आहुती जाणार? या बाबतीत बाहेरचा माणूस काय करू शकतो? या तरुण-तरुणींशी, त्यांच्या आईवडीलांशी बोलावे, त्यांना काही मदत करावी, तर त्यांना ती त्यांच्या खाजगी जीवनात केलेली लुडबूड वाटेल.. मग जाड, निबर मनाने हे सगळे पाहत राहणे आणि काय होईल ते होवो असे म्हणून शांत राहणे हेच पांढरपेशा समाजाने शतकानुशतके केलेले पुढे करत राहणे एवढेच आपल्या हातात आहे काय?
तुम्ही माझ्या जागी असता, तर काय केले असते?