उभी भिंत डागाळलेली छताशी

किती सावल्या दाटलेल्या तळाशी, खुजे ऊन गच्चीवरी सांडलेले
उभी भिंत डागाळलेली छताशी, शिळे अन्न भांड्यांत थंडावलेले

कुठे जळमटे वंशविस्तारवाढीमधे मग्न होती कधीची सुखाने
कुठे चार मुंग्या कपारींमधूनी जणू घेत जाती किराणा दुकाने

लवंडून गेल्या कुप्या अत्तराच्या धुळीची पुटे सोबतीला नवेली
उश्या कोंबल्या, चादरी फाटलेल्या आणि एक साडी कपाटात मेली

जरी नांदते शांतता फक्त आता, कधी भेटते ती मलाही नव्याने
घरी शोधतो,मोजतो मी तरीही - पुरावे किती ठेवले पावसाने

-नीलहंस