राजाराम सुलतानाला नीट न्याहाळत होता. ती चांगली तीन चार फूट उंच आणि सात आठ फूट लांब अशी पूर्ण वाढ झालेली चित्तीण होती. तिचा चेहेरा चांगला गोल आणि मोठ्ठा होता. चेहेऱ्यावर क्रूरता भेदकता होतीच पण त्यात एक विशिष्ट शुचिता पण होती. तिची नजर काळजाचं पाणी पाणी करणारी होती पण एखाद्या सुंदर तरुणीचा मदही त्यात होता. तिच्या चेहेऱ्यावरचा आनंद आणि खेळकरपणा लपत नव्हता. घरातल्या मांजरासारखं सुलताना पण राजारामच्या पायाला अंग घासत होती.
हा एकमेकांच्या ओळखीचा कार्यक्रम जवळ जवळ तासभर चालला होता. राजारामनं नीट सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेतला की हिला मारायचं नाही. फक्त खबरदारीचा उपाय म्हणून एका हातात सुरा सतत तयार ठेवायचा. अन हिला मारण्यापेक्षा या जंगलच्या सम्राज्ञीला आपल्या प्रेमात पाडावं. आपल्या गटातल्या लोकांना इथं यायला कदाचित अजून पंधरा दिवसही लागतील, तोपर्यंत केवढा मोठा आधार आहे हिचा आपल्याला. हिला मारण्यापेक्षा हिच्या डोळ्यात दिसणाऱ्या प्रेमाचा, मैत्रीचा आदर करावा.
हा सगळा विचार चालू असताना सलताना अचानक वळून ओढ्याच्या दिशेनं खाली जायला लागली. मोठमोठ्या दगडांवरून सहज उड्या मारत ती खाली जात होती. "सुलताना..." राजारामनं जोरात हाक मारली. तिनं क्षणभर थांबून राजारामकडे वळून बघितलं आणि पुन्हा आपल्याच दिमाखात खाली उतरायला लागली. राजारामच्या लक्षात आलं, ओढ्यापासून शंभर एक फूटावर खाली एका मोठ्या दगडाच्या मागं, तिनं काल रात्री मारलेलं अर्धवट खाल्लेलं भक्ष्य दडवून ठेवलं होतं. बहुदा चितळ काळवीट असं काहीतरी होतं. भक्ष्य पुढे ओढून सुलतानानं त्यावर ताव मारला.
दुपारनंतर उन्हं उतरंडीला लागली, तसं दगडांच्या कपारीला धरत धरत राजाराम गुहेचा डोंगर गुहेपासून आणखी वरती चढत चढत गेला. डोंगराच्या वरच्या अंगाला पुन्हा थोडं जंगल होतं. त्यातनंही चढत राजाराम वरच्या पठारावर पोहोचला. पाठोपाठ सुलतानाही होतीच. वरती चढायला राजारामला जेवढं कठिण गेलं, सुलताना तेवढीच लीलया वरती आली. वरती भलं प्रचंड पठार मोकळं होतं. शेकडो हात उभा आडवा पसरलेला काळा जांभळा कातळ आणि त्यात मधेमधे उगवलेलं खुरटं गवत. जागोजाग पडलेली गव्यांची मोठी विष्ठा त्यांच्या अस्तित्वाची आणि त्याच्या कळपाच्या आकाराची जाणीव करून देत होती. हे कातळ आणि याच्या दक्षिणेला असलेलं घाटमाथ्याचं जंगल हे या गव्यांच्या कळपांचं आवडतं निवासस्थान. पठार जेवढं भव्य होतं तेवढीच पश्चिमेकडची क्षितीज रेषाही.
सुलतानाबरोबर राजारामला अगदी मोकळं वाटत होतं. भीती कुठल्याकुठे पळून गेली होती. अर्थात तरीही एका हातात सुऱ्याची खबरदारी होतीच. पण सुलतानासुध्दा अगदी एखाद्या पाळलेल्या कुत्रासारखी राजारमच्या पाठोपाठ चालत होती. पठाराच्या पश्चिम टोकापर्यंत राजाराम चालत गेला आणि तिथेच एक स्वच्छ कातळ बघून खाली बसला. सुलताना अणि तो आता एकमेकांशी खेळत होते. राजारामची आणि तिची एवढी गट्टी जमली होती की त्यानं आता तिला शेपटीला धरून ओढलं तरी ती चिडत नव्हती. उलट तीच त्याचं मनगट तोंडात पकडायची किंवा त्याच्या मांडीवर पाय ठेवायची. राजाराम आणि सुलतानाचं म्हणजे प्रियकर आणि प्रेयसी जसे एकमेकाला साद प्रतिसाद देतात तसंच चाललं होतं. पश्चिमेला आकाश लाल झालं तसं राजाराम जायला उठला. सुलतानातर एवढी खुशीत आली होती की राजाराम उठल्यावर पठाराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत ती पळून आली. ती जेव्हा चारही पाय एकत्र करून पुढे झेप घेत पळायची त्या वेळेला तिच्या वेगावर नजर ठरत नहती. उतरत्या उन्हात तिचा वेगवान हालचाल करणारा देह विजेच्या लोळासारखा भासत होता. सुलतानाची प्रत्येक अदा खानदानी होती. तिचा दिमाख खऱ्या अर्थानं राजेशाही होता.
राजाराम गुहेजवळ परतला त्यावेळेस गुहेत बऱ्यापैकी अंधार पसरला होता. सुलताना परत खाली गेली. सकाळच्यातलं राहिलेलं जेवण तिनं परत दगडाआड ठेवून दिलं होतं. ती जेवायला गेली त्यावेळेस समोरच्या जंगलातनं एक माकडांची टोळी आणि काळवीटांची एक जोडी ओढ्याजवळ पाण्यावर यायला बघत होते. सुलताना दिसताच त्यांची पळता भुई थोडी झाली. सुलतानानं त्यांच्याकडे ढुंकूनही बघितलं नाही.
हा सगळा आता रोजचाच कार्यक्रम झाला होता. सुलताना गुहेतच राजारामजवळ रहात होती. रात्री अंधार पडल्यावर मात्र चार सहा तास ती कुठेतरी निघून जायची. बहुतेक ती तिच्या शिकारीची वेळ होती. रात्री कधीतरी परत यायची त्यावेळेस राजाराम गाढ झोपलेला असायचा. बाकी दिवसभर ती राजारामबरोबरच असायची. सकाळी ओढ्यावर आंघोळ करताना, दुपारी जंगलात जाऊन आवळे, जांभळं, चिंचा खाताना किंवा संध्याकाळी वरच्या पठारावर फिरायला जाताना सुलताना अन राजाराम एकत्रच असायचे. त्या दोघांचं एकमेकावर जीवापाड प्रेम जमलं होतं.
तरी सुध्दा राजाराम सतत सावध असायचा. एका हातात उघडा सुरा तो कायम तयार ठेवायचा. "न जाणो कधी हिचं डोकं फिरलं किंवा दोन चार दिवस सलग तिला दुसरी काही शिकारच मिळाली नाही तर...?" त्याच्या डोक्यात अधून मधून यायचं. त्यामुळे तो ही खबरदारी सतत घ्यायचा. राजाराम अन सुलतानाचं नातं एव्हाना एवढं घट्ट झालं होतं की मनात एका बाजूला राजारामला नक्की खात्री होती की कितीही उपाशी राहिली तरी ती आता आपल्यावर हल्ला करणार नाही. पण तरीही तो कुठलाही धोका पत्करायला तयार नव्हता.
दिवस भराभर जात होते. अजूनही त्यांच्या गटातल्या कुणाही सदस्याचा काही पत्ता नव्हता. राजाराम रोज उंच ठिकाणी जाऊन कुणी येताना दिसतंय का याचा अंदाज घ्यायचा. या काळात त्यानं सुलतानाचं अगदी सखोल निरीक्षण केलं. तिचे वेगवेगळे आवाज, त्यांचे अर्थ, तिच्या डोळ्यात दिसणारे तऱ्हे तऱ्हेचे भाव, तिच्यातला खोडकरपणा, भक्ष्य दिसल्यावर तिची सावध दबकत चालण्याची आणि नंतर अचानक झेप घेण्याची पध्दत, तिचा वेग राजाराम सारं काही विस्मयचकित नजरेनं बघत रहायचा.
पंधरा एक दिवस असेच गेले आणि मग एक दिवस, जसा इतर कुठच्याही प्रेमकथेचा होतो तसाच शेवट याही कथेचा झाला. निव्वळ गैरसमजातून झालेला शेवट. प्रेमप्रकरणात जसं एक जण दुसऱ्यावर शंका घेतो आणि त्या शंकेपोटी काही न बोलता सवरता संबंध तोडून टाकतो तसंच याही कथेत झालं. म्हणजे स्वतःच स्वतःच्या हातानं स्वतःच्या सुखाचा गळा दाबण्यासारखंच होतं हे.
रोजच्यासारखंच राजाराम अन सुलताना वरच्या पठारावर फिरायला गेले होते. पठाराचं प्रचंड मोकळं मैदान पाहून सुलताना अगदी चेकाळून जायची. पठाराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत लांब उड्या घेत धावायला तिला मनापासून आवडायचं. राजारामपासून खूप लांब जाऊन तिकडनं ती धावत आली आणि तिनं सरळ राजारामवर झेप घेतली. हाच तो क्षण... याचीच आपल्याला सतत भीती होती... शेवटी तिनं आपल्यावर हल्ला चढवलाच... फार विचार करायला वेळच नव्हता... क्षणात राजारामनंही सुरा सरसावला... लक्ष्यावर नीट नजर स्थिर केली... आणि सुलताना हवेत असतानाच निमिषार्धात त्याच्या सुऱ्याचं पातं तिच्या पोटात आरपार घुसलं. सुलतानाचं धूड तिथेच जमिनीवर कोसळलं. तिचे डोळे उघडेच होते, त्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. करुण आर्त भाव त्यात दाटून आले. सुलतानाला बोलता येत नव्हतं पण तिचे डोळे बरंच काही सांगत होते. "काय केलंस हे मित्रा..? माझं काही चुकलं का...? मी तर तुझ्यावर प्रेम करत होते... तुझ्याशी खेळत होते.. असा दगा करायचा होता तर प्रेम तरी कशासाठी केलंस माझ्यावर...?" राजाराम मटकन खाली बसला. देवा काय करून बसलो मी हे.. माझ्या सुलतानाचा मी खून केला... देवा काहीही करून माझ्या सुलतानाला परत आण, झालं तरी माझा जीव घे त्याऐवजी... राजारामनं सुलतानाचा चेहरा हातात घेतला पण तिथपर्यंत खूप उशीर झाला होता. "सुलताना..सुलताना... मी चुकलो सुलताना... परत ये...परत ये.." राजाराम ओरडत होता. सुलतानानं केव्हाच प्राण सोडला होता. तिच्या थंडगार कलेवरावर डोकं ठेवून राजाराम ओक्साबोक्शी रडायला लागला.
- समाप्त