त्याबरोबर राजा त्या नेपाळी बहाद्दराला ढकलून आत घुसला.
"नमस्कार." दोन्ही हात जोडून समोरच्या व्यक्तीला नमस्कार करत राजा म्हणाला. चेहर्यावर एक ओळखीचे हास्य. (त्यात त्याचे सिगारेटने पिवळे पडलेले दात दिसलेच पाहिजेत.) राजाची ही खास पद्धत. फक्त "काय वळख लागतीय का?" हा नेहमीचा पुढचा प्रश्न मुळात आधीची ओळख नसल्याने त्याने विचारला नाही. "मी राजू देशपांडे ." त्याच्या मागोमाग आम्ही सारे आत घुसलोच होतो. "नमस्कार, नमस्कार, या - तुमचीच वाट पाहत होतो." समोर उन्हाने रापलेल्या तांबूस गोर्या रंगाचा, डोक्यावरचे केस थोडेफार विरळ झालेला, मजबूत बांध्याचा, हसतमुख, पस्तिशीच्या आत बाहेरचा माणूस उभा होता. डोळ्यात हिरवट घारेपणाची छटा होती. डाव्या डोळ्यापासून वर उजव्या बाजूला डोक्याकडे तिरका गेलेला एक खोल व्रण कपाळभर पसरला होता - एखाद्या वीर योद्ध्याच्या अंगावर शोभणार्या जखमेच्या खुणेप्रमाणे. कुठल्याशा रेसमधला अपघात असावा बहुधा.
"मी श्रीकांत. या, आत या." गोगट्यांनी व्हरांड्याकडे हात केला.
गोगट्यांचा बंगला फारच सुंदर होता. कुंपणावर भरगच्च झाडी, समोर बाग, हिरवीगार लॉन, एक छोटेसे कारंजे, व्हिक्टोरियन पद्धतीच्या उंच खिडक्या, व्हरांडा, प्रशस्त दिवाणखान्यात एक झोपाळा, भिंतीवर लटकणारी सुंदर पेंटिंग्ज, वरच्या मजल्यावर जाणारा पांढरा शुभ्र जिना. त्या सगळ्यात एक खानदानी साधेपणा होता. काहीही दाखवण्यासाठी मांडले आहे असे वाटत नव्हते. एखाद्या इंग्रजी चित्रपटात शोभेलसे घर आम्ही सर्वजण प्रत्यक्षात पाहत होतो. काय बोलावे कुणालाच सुचत नव्हते.
" बसा." गोगटे म्हणाले.
"वा! झकास आहे हो तुमचं घर!" माझ्या तोंडून चुकून निघून गेले. पण गोगट्यांना आवडले असावे. "हे आमच्या आजोबांनी विकत घेतले एका साहेबाकडून. आम्ही तसेच जपतोय." मग राजाला म्हणाले, "बोला देशपांडे! मग मोटोक्रॉस ठेवायची म्हणता?"
"जुळणी करतोय, साहेब. आता बघू कसं कसं जमतंय..." राजा.
" जमेल की, त्यात काय आहे ? आम्हीपण असेच चुकतमाकत शिकलो हळूहळू. आम्ही करू तुम्हाला मदत. तुम्ही फक्त काम करायची तयारी ठेवा." गोगटे.
"कामाला काय हयगय व्हायची न्हाई. तसं आमी मान्साला कमी पडनार न्हाई. किती मान्सं लागतेली?" निव्या.
"माणसं तर पाहिजेतच. बरीच. पण त्यांना शिकवायला लागेल बरंच." मग गोगट्यांनी मोटोक्रॉस म्हणजे काय प्रकार असतो, ते सविस्तर सांगायला सुरुवात केली.
आम्ही तोवर मोटोक्रॉस फक्त फोटोंमध्ये बघितली होती. संजय बारकुटे हौशी (ऍमॅच्युअर) गटात एकदाच पुण्याच्या स्पर्धेत खेळला होता. पण स्पर्धेत भाग घेणे वेगळे आणि स्वतः स्पर्धा आयोजित करणे वेगळे.
या स्पर्धेची आमची कल्पना म्हणजे चुन्याची फक्की मारून एक वाकडातिकडा रस्ता तयार करायचा, तो रस्ता निरनिराळ्या खड्ड्यांतून, ढिगार्यांवरून, पाण्यातून न्यायचा. स्पर्धेची जाहिरात करायची - दोन-तीन पेपरात जाहिराती, गावात फलक ’जंगी / भव्य मोटोक्रॉस स्पर्धा. दिनांक -, वेळ- वाजता, स्थळ -कोडोलीचा माळ , प्रमुख पाहुणे- अमुकतमुक, उदघाटक - अलाणेफलाणे. सर्व नागरिकांनी या स्पर्धेस उपस्थित राहून आनंद घ्यावा. इच्छुक स्पर्धकांनी देशपांडे गॅरेज येथे नाव नोंदणी करावी’. मग स्पर्धक नावे नोंदवतील. लोक स्पर्धा बघायला येतील. स्पर्धक गाड्या 'उडवतील'. लोक टोप्या-फेटे उडवतील, शिट्ट्या मारतील, टाळ्या वाजवतील. पहिल्या पाच नंबरांना बक्षिसं दिली की खलास. झाली मोटोक्रॉस स्पर्धा..!
गोगटे सांगत होते - साहसी मोटरसायकल स्पर्धांचे वेगवेगळे प्रकार आहेत. मोटोक्रॉस, सुपरक्रॉस आणि डर्टट्रॅक हे प्रकार आपल्याकडे खेळले जातात. स्पर्धा घेण्याचा अधिकार फक्त अधिकृत मान्यताप्राप्त मोटरस्पोर्ट संघटनांनाच असतो. त्यासाठी एफआयएम (फेडेरेशन इन्तरनॅशनले दे मोतोसायक्लिज्मे) अशा फ्रेंच नावाच्या आंतरराष्ट्रीय (ऑलिंपिक संघटनेकडून मान्यताप्राप्त) संघटनेचे सदस्य बनावे लागते. भारतात या स्पर्धांसाठी एफएमएससीआय (फेडरेशन ऑफ मोटरस्पोर्टस् क्लब्स ऑफ इंडिया) या मध्यवर्ती संस्थेकडून मान्यता असावी लागते. अशी मान्यता मिळाल्यावर ही संघटना स्पर्धेसाठी निरीक्षक नेमते. प्रत्येक स्पर्धेसाठी नियमावली आहे. ही नियमावली अत्यंत बारकाईने बनवलेली आहे. स्पर्धेच्या प्रत्येक बाबीचा सांगोपांग विचार करून हे नियम बनवलेले आहेत. स्पर्धेचा कोणताही नियम जर पूर्ण झाला नाही, तर निरीक्षक अगदी शेवटच्या क्षणीसुद्धा ती स्पर्धाच रद्द करू शकतो.
ऐकताना लक्षात येऊ लागले की मोटोक्रॉस स्पर्धा घेणे म्हणजे काही खाण्याचे काम नव्हते. टेबलटॉप जंप, कॅमलबॅक जंप, ट्रिपल जंप, वॉटरहोल्स, बर्म, रँप या सर्वांनी परिपूर्ण असलेला नागमोडी, डाव्या-उजव्या काटकोनी वळणांचा ट्रॅक बनवणे; प्रेक्षक आणि स्पर्धक यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे; (त्यासाठी जुन्या निकामी टायर्सच्या भिंती उभ्या करणे); ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचे पोषाख घातलेले पिवळे झेंडे हातात घेतलेले फ्लॅगर उभे करणे; काळ्या-पांढर्या चौकटी असलेला, लाल, पिवळा, काळा - या झेंड्यांचे अर्थ; ऑफिशियल, रेफरी, स्टिवर्ड ह्या पदावरच्या व्यक्तींच्या जबाबदार्या... गोगटे सांगतच होते. या महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच स्पर्धेसाठी नावाजलेले आणि निष्णात स्पर्धक (रायडर्स) मिळवणे, त्यांच्या गाड्यांसह येण्या-जाण्याची, राहण्याची सोय करणे, गाड्यांची तांत्रिक तपासणी करणे, स्पर्धेला विविध शासकीय परवानग्या आणि या खेळातील (मोटरस्पोर्टेस) अधिकृत संघटनांची मान्यता मिळवणे या बाबी किरकोळ नव्हत्याच. पुण्यात-नाशकात ज्या स्पर्धा होत, त्या पुण्यातल्या पारा (पुणे ऑटोमोटिव्ह रेसिंग असोसिएशन) आणि नाशकातल्या नासा (नासिक ऑटोमोटिव्ह स्पोर्टिंग असोसिऍशन) संघटनेकडून घेतल्या जात. `पारा` या संघटनेला श्रीकांत गोगटेसारख्या मोटरस्पोर्ट मधल्या अत्यंत अनुभवी आणि मुरब्बी माणसाचे नेतृत्व होते. त्यांच्या संघटनेने अनेक वर्षे या खेळासाठी कष्ट केल्यावर पुण्यात या स्पर्धा नियमाने भरू शकत होत्या. शिवाय त्यासाठी भरपूर खर्च होत होता - एकेका स्पर्धेसाठी किमान चार-पाच लाख रुपये...पुण्यातल्या स्पर्धांना व्हीडॉल-कॅस्ट्रॉल अशा जागतिक ऑईल कंपन्यांनी प्रायोजित केल्यामुळेच हा खर्च परवडत असे.
हे सगळे त्यांनी सविस्तर सांगितले, तेव्हा उपस्थित मंडळीच्या डोळ्यांसमोर काजवे चमकू लागले. आमचे मोटोक्रॉसचे स्वप्न त्या कॅस्ट्रॉल कॅलेंडरपुरतेच राहणार काय अशी शंका सर्वांनाच वाटू लागली. तेवढ्यात आतल्या खोलीत टेलिफोन वाजला आणि गोगटे फोन घेण्यासाठी गेले.
आम्ही आपापसात कुजबुजू लागलो -
"अगदी कमीत कमी म्हटलं तरी ४ ते ५ लाख रुपये खर्च येईल!! " राजा चिंताक्रांत.
"मागं नाटकाला आपण पाच हजार जमवले तेव्हा किती त्रास झाला!" मी.
"आणि इतके पैसे गोळा करायचे तर दोनेक वर्षे तरी लागतील." विजय बारकुटे.
"आपनच उतरलो तर स्पर्धेत? तेवढा रायडरचा खर्च वाचंल." निव्याची सूचना.
"आपणच स्पर्धा भरवायची आणि आपणच भाग घ्यायचा? हॅ, हे काय बरोबर नाही!" संजय बारकुटे.
"आता सप्टेंबर चालू हाय. पुढल्या वर्साला १५ आगस्टपावतर तरी हुईल का ह्ये ?" उत्म्या.
"..." असेच बरेच काही.
आम्ही सगळेच हौशी. कुणाच्या खिशात शंभर रुपये निघाले तरी फार झाले. नोकरी ना धंदा. त्यातल्या त्यात गॅरेजवाली मंडळी ४-५ हजारांपर्यंत पदरमोड करू शकणारी. तीही जिकिरीने. बारकुटे धंदेवाईक. त्याला तर नेहमी पैसा कमी पडे. सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं नाही - हेच खरं.
"बघू या की कसं होत नाही. मी करतो कायतरी," राजा उद्गारला खरा, पण त्यालाही हे ओझे कसे आवरणार, असा प्रश्न होताच. "काय पण झालं तरी या वर्षीच ही स्पर्धा घ्यायची, ही काळ्या दगडावरची रेघ. नाही झाली तर कुणाच्यापण ढांगेखालून जाईन मी" - राजा इरेला पेटला होता. "ते पैशाचं मागनं बघू या. अगोदर त्या एफेमसीआय च्या परवानगीचं बघू की." राजानं एफएमएससीआयचं एफेमसीआय केलं होतं.
आत गोगट्यांना आमची 'कुजबूज' ऐकू गेली असावी. "खर्चाबद्दल म्हणत असाल तर चार-पाच लाख रुपये तरी खर्च येतोच." ते फोन ठेवून बाहेर येत म्हणाले. "स्पॉन्सरशिपसाठी मी कॅस्ट्रॉलसारख्या एखाद्या कंपनीला गळ घालीन." आमचा जीव भांड्यात पडणार इतक्यात ते पुढे म्हणाले, "...पण एका नव्या क्लबच्या नव्या स्पर्धेला ते इतके पैसे देतील, याची खात्री नाही. शिवाय तुमचा क्लब अजून 'एफएमएससीआय' कडे रजिस्टर नसल्याने स्पर्धेची परवानगी मिळणं अवघड दिसतंय."
बाप रे! पैशांचं खटले अजून मिटले नाही आणि आता हे परवानगीचे घोडे अडले, म्हणजे संपलेच! इकडे आड आणि तिकडे विहीर. हा गोगटेबाबा आपल्याला मदत करतोय की स्पर्धा तुम्ही घेऊ शकत नाही, हे आडवळणानं सुचवतोय? असं मला वाटू लागले. पुण्याच्या माणसांचं काही खरं नाही. पण त्यांच्या पुढच्याच वाक्याने या शंका पळवून लावल्या. "...पण काही हरकत नाही. स्पर्धा घेऊच आपण. मी तुम्हाला एक मार्ग सुचवतो. बघा पटला तर!"
"तुम्ही जसं म्हणाल तसं!" विज्या बारकुटे अधीर झाला होता.
"हे बघा, आता तुमचा एक क्लब स्थापन झालाय, असं समजा. ते क्लबची घटना वगैरे सावकाशीनं बघू. तर खर्च कमी करण्याच्या दृष्टीनं तुमच्या क्लबतर्फे पहिल्या वर्षी मोटोक्रॉस ऐवजी डर्टट्रॅक स्पर्धा ठेवू. या स्पर्धेत जंप नसतात. त्यामुळे ट्रॅकला होणारा खर्च कमी होईल."
"पण जंप नसल्या तर लोकान्ला मजा कशी येनार?" विक्शा.
"विक्शा, ऐक रे!" राजा समजुतीच्या स्वरात.
गोगटे पुढे म्हणाले, "नाही, नाही... डर्टट्रॅकमध्येही जंप नसल्या तरी बेंड, पाणी, चिखल असतंच. अरे, प्रेक्षकांना मजा येत नसती तर इतक्या डर्टट्रॅक स्पर्धा झाल्या असत्या काय जगात? शिवाय डर्टट्रॅकचे नियमही थोडे शिथिल आहेत मोटोपेक्षा. तिथे फ्लॅगरना फार ट्रेनिंगही लागणार नाही. त्याचे बरेच ऑफिशियल पण उपलब्ध आहेत. रायदारही कमी पैसे घेतील."
"आणि पुढल्या वर्षी घिऊ की मोटोक्रॉस!" राजाला आता डर्टट्रॅक पचनी पडू लागली होती.
"तेच तर म्हणतोय मी!" गोगटे त्याचा उत्साह वाढवत म्हणाले," आणि परवानगीचं म्हणाल तर पारानं एफएमएससीआयकडून वर्षभराची लायसन्स घेऊन ठेवली आहेत, स्पर्धा भरवण्यासाठी. त्यातलं एखादं डर्टट्रॅकचं लायसन्स बदलून घेऊ तुमच्या रेसांसाठी.. काय ?"
ही लायसन्स वर्षभराच्या स्पर्धांसाठी अगोदरच दिलेली असतात हे त्यांनी सांगितलेच नव्हते. "मी मुद्दामच बोललो नाही आधी. वर्षभरात भारतात होणार्या सर्व मोटरस्पोर्ट स्पर्धांचं वेळापत्रक अगोदरच तयार असतं. तशी लायसन्स त्या - त्या क्लबांना - संघटनांना अगोदरच इश्यू होतात. आम्ही 'पारा'कडून पाच-सहा स्पर्धांची लायसन्स घेऊन ठेवतो. मग त्याप्रमाणे वर्षभर स्पर्धा भरवतो. "गोगटे बोलत होते. "आता अगोदर तुम्हाला मी हे सांगितलं नाही, कारण तो प्रश्न येणार नाही हे माहीत होतं. आमचं एक डर्टट्रॅकचं लायसन्स आहे -नोव्हेंबरचं. ती स्पर्धा आम्ही पुण्यात घेणार होतो. आता तुमच्या गावाला घेऊ. काय?"
"पण असं कसं करता येईल ? मग स्पर्धा तुमच्या 'पारा'च्या नावानं होणार!" मी वकिली मुद्दा काढला.
माझ्याकडे मिस्किल नजरेने पाहत गोगटे म्हणाले "म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं - बघा पटलं तर. नाहीतर असं करू या का? समजा तुमच्या क्लबचं नाव.... हां.. असोसिएशन ऑफ ऑटोमोटिव्ह स्पोर्ट्स - आस - तर 'आस' आणि 'पारा' यांच्या संयुक्त विद्यमाने वगैरे भव्य डर्टट्रॅक स्पर्धांचे आयोजन करता येईल," त्यांनी आमच्या अजून अस्तित्वातच नसलेल्या क्लबचे नामकरणही करून टाकले होते. नावही चांगले वाटत होते - आस म्हणजे (मोटरसायकलच्या) चाकाचा कणा आणि आस म्हणजे (स्पर्धेची / खेळाची / बक्षिसाची) ओढ" या दोन्ही अर्थांनी.
"खरंच की. गोगटे साहेब, मानलं तुम्हाला - एका झटक्यात आमचा प्राब्लेम मिटला." राजा आनंदात असताना नेहमी विंग्रजी शब्द वापरतो.
"म्हंजे हे ठरलं म्हंतायसा?" निव्या आश्चर्याने म्हणाला.
"अजून काही बाबी आहेत. शिवाय डर्टट्रॅकलाही थोडाफार खर्च येणारच. त्याची तयारी कशी करायची ते पाहावं लागेल. पण मी स्पॉन्सर्सशी बोलेन." इति गोगटे. "पण गरज पडल्यास एक लाख रुपयांची तरतूद करावी लागेल. शिवाय स्पर्धेसाठी एक सपाट मैदानही मिळवावं लागेल."
"ते सोडा हो. आमच्या गावचं शिवाजी मैदान आहे की झकास. नगरपालिका स्टेडियम बांधतीय. एका झटक्यात पालिकेची परवानगी मिळवतो की न्हाई बघा की," हे राजाचं खास क्षेत्र होतं.
"मग ठरलं तर.. पाच नोव्हेंबर.. शिवाजी मैदान.. डर्टट्रॅक..." गोगटे म्हणाले..
"आस आणि पाराच्या संयुक्त विद्यमाने -" मी उठता उठता हसत म्हणालो.
"अरे, उठलात कशाला? काही तरी घ्या गोडाचं!" गोगटे म्हणाले आणि आत हाक दिली, "रामभाऊ, चहा-फराळाचं बघा पाहुणेमंडळींचं! बरं, चला, तोपर्यंत आपण माझ्या गाड्या बघू."
बंगल्याच्या मागे असलेल्या गॅरेजमध्ये अनेक मोटरसायकल होत्या - आम्ही फक्त पोस्टरमध्ये पाहिलेल्या - इंपोर्टेड निंजा, कावासाकी १२५ मोटो (होली काव), होंडा २५० पासून अगदी राजदूत - जावा पर्यंत - स्टॉक आणि मॉडीफाईड. गोगटे म्हणाले,"मी आता मोटरसायकल खेळत नाही. पण गाड्या ठेवल्यात. आठवणी आहेत एकेक गाड्यांच्या. कार रॅलीत मात्र भाग घेतो."
मग राजा, निव्या, संज्या आणि विज्या वेड्यासारखे गाड्यांभोवती फिरत राहिले. गोगटेही त्यांच्या प्रश्नांच्या भडीमाराला उत्तरे देत होते. या गाडीचा फोर्क असा का? सीसी किती? हा सायलेन्सर मॉडिफाय केला तर काय होईल? या गाडीचा गियर रेशो कसा बदलला? या चेनचे स्प्रॉकेट मोठे बसवले तर काय होईल ? असे बरेच प्रश्न. त्यांची वेव्हलेंग्थ जुळली होती.
***