एखाद्या किल्ल्याला बाहेरून खंदक असावा तसा सुंदरनगराच्या कडेकडेने एक नाला वाहत होता. काळ्याकभिन्न नागड्या कातळावर हजारो झोपड्या अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या. संध्याकाळ! दिवेलागणीची वेळ झाली होती. वस्तीवर अंधार पसरत होता. झोपड्यांच्या छपरातून धुराचे लोट बाहेर पडत होते. नाल्यावर एक नव्याने बांधलेला पूल होता. पुलाच्या कठड्यावर पाचसहा शिलेदार सिग्रेटी फुंकत बसले होते. मकरंदला पाहताच ते चटकन उभे राहिले आणि सलाम ठोकत त्यांनी खडी ताजीम दिली. मकरंदचा वस्तीवर किती वचक होता ते त्यांच्या भयभीत चर्येवरून स्पष्ट दिसत होते.
"काय भिवऱ्या, डिलिव्हरी झाली का आजची?"
"झाली, दादा!" फुलांफुलांचा शर्ट घातलेला एक झिपऱ्या उद्गारला.
"किती?"
"तीन ट्रक गेले दादा."
"आणि पोलिस आलेत का बंदोबस्ताला?" मकरंद.
"पाच-सहा जणं आल्यात. आणि येतील पंधरा जणं." भिवऱ्या.
"बर, आता इथे बसून बिड्या फुंकू नका... देवळात जा. पूजेची तयारी करा. तासाभरात येतीलच भाऊ. काय? चला निघा."
तसे सगळेजण वस्तीकडे पसार झाले. वस्ती म्हणजे टीनच्या पत्र्याच्या, कुडाच्या आणि काही विटांच्या झोपड्या होत्या. काही टपरीवजा दुकानंही होती.मधून जाणारे बोळ काम गटारे. प्रत्येक झोपडीचे सांडपाणी त्या रस्त्यांवरून वाहत होते आणि नाल्यात विसर्जित होत होते. इथले रहिवासी आपली पाण्याशी संबंधित नित्य नैमित्तिक कार्ये बहुतेक रस्त्यांवरच करत असावेत.
आम्ही जात होतो तो रस्ताही फारतर दहा फूट रुंदीचा होता. त्यातूनच रिक्षा, सायकली, मोटरसायकली, हातगाड्या येत जात होत्या. पण मकरंदाला पाहताच सगळेजण रस्त्याच्या कडेला सरकून आम्हाला वाट करून देत होते, वंजारी भाषेत कलकल भांडणाऱ्या बायका एकदम चिडीचूप होत होत्या, रस्त्याच्या कडेला पोटे साफ करणारी पोरे झोपडीत पळून जात होती.
"आत राधाकृष्णाचं मंदिर बांधलंय भाऊने. दर अमावास्येला पूजा करतात भाऊ. ते नसले तर मी. आजची पूजा तर फार महत्त्वाची असते - वर्षातली सर्वात मोठी." मकरंदाने माहिती पुरवली.
मध्येच तो एका बोळात शिरला. एका मोठ्या झोपडीच्या बाहेर धिप्पाड शरीराचे दोन पहारेकरी उभे होते. त्यांच्या कमरेला पिस्तुलंही खोचलेली होती. मकरंदाला पाहताच ते बाजूला झाले. मकरंद त्या झोपडीत शिरला. आम्ही बाहेरच थांबलो. तो आत जाताच आतले दिवे लागले. मग दोन मिनिटात तो पुन्हा बाहेर आला आणि म्हणाला, "या, आत या...बसा, बसा."
आम्ही आत शिरलो. ती झोपडी नसून बाहेरून झोपडीचा आकार दिलेला एक मोठा हॉल होता. एक गोड, आंबूस वास तरळत होता. आत वीसेक माणसे काम करत होती. मधोमध एक बॉईलर धगधगत होता. त्यावर तांब्याच्या बऱ्याच नळ्या असलेले कसलेसे भांडे होते. एका बाजूला चारपाच खुर्च्या मांडलेल्या होत्या."ही आमची भट्टी. दररोज इथे दोन हजार बाटल्या तयार होतात. अशा चार भट्ट्या आहेत अजून. "
"बरंच मोठं दिसतंय की..." राजा एका खुर्चीवर बसत म्हणाला.
"म्हणजे? हातभट्टी म्हणतात ती अशी असते काय? मग ते टायर, बॅटऱ्या, गंजलेली पिपं, नवसागर - ते कुठं आहे?" माझ्या डोळ्यासमोर सिनेमात किंवा पेपरातल्या फोटोतल्या हातभट्टीचे चित्र होते. पण हा तर भलताच सॉफिस्टिकेटेड प्रकार दिसत होता.
"ते दिवस गेले. दहा-बारा वर्षापूर्वी इथे अशाच भट्ट्या होत्या. आता त्या भट्ट्या आम्ही पोलिसांच्या रेडसाठी राखून ठेवल्या आहेत. पोलिस लोक येतात, ती पिपं फोडतात, टायरी जप्त करतात, काही लोकांना पकडतात आणि पेपरात फोटो देतात. लोकांना वाटतं - चला, एक हातभट्टी उध्वस्त झाली. पण ते नाटक असत रें. आमची माणसं लगेच जामिनावर सुटतात. खरी भट्टी इथं आहे. ही तोडली तर आमचं फार नुकसान होईल. म्हणून लुटुपुटूच्या भट्ट्या तोडतो."
"मग सरळ देशी दारूचा परवाना घेऊन त्याची डिस्टिलरी काढायची. असं चोरून कशाला?"
"तेसुद्धा आहेच. आता भाऊंची डिस्टिलरी येतेय इंदापूरला. पण लोकांना स्वस्तात हवी असते. दोन-तीन रुपयात चपटी बाटली. आणि काही शौकिन तर फक्त हातभट्टी पितात - तुला सांगतो, आमचा एक खास माणूस पुण्यातल्या काही बड्या माणसांकडे दररोज पोच करून येतो. त्यात डॉक्टर्स आहेत, पुढारी आहेत, वकीलसुद्धा आहेत - आणि हे काही चोरून नाही. सगळ्यांना माहीत आहे. पुण्याच्या बाजारपेठेतला खराब झालेला सग्गळा गूळ इकडे येतो - राजरोस. मीच मॅनेज करतो ना हा धंदा!" मकरंद बिनधास्त सांगत होता.
"तू?"
"का? काय झालं? उलट मी आल्यामुळे आता सगळं स्वच्छ झालं. लोकांना चांगली दारू तरी प्यायला मिळेल. पिऊ नका म्हणून कितीही सांगितलं तरी लोक प्यायची सोडणार नाहीत हे त्रिकालाबाधित सत्य! आणि गरीब माणसाला हीच परवडणार. मग निदान चांगल्या क्वालिटीची तरी असावी ना? आणि हातभट्टी म्हणजे काय रे? जरा विचार कर, अरे आपल्याकडेही या धंद्याकडे नीट पाहिलं असतं लोकांनी तर आपणही पाचशे वर्षापूर्वीच्या दारूच्या बाटल्या आज विकल्या असत्या - वेरूई ओल्ड व्हॅटेड! आपल्याकडे हा व्यवसाय केला तर हातभट्टी आणि तोच इंग्लंड -अमेरिकेत केला तर ते स्कॉच- बर्बन काय? जाऊ दे! हिप्पोक्रसी दाय नेम इज इंडिया!" मकरंदच्या आवाजात त्वेष होता.
"पण व्यसनाधीन होणाऱ्यांच्या आयुष्याची परवड होते....कामातनं जातात ती!"
"तो एक स्वतंत्र विषय आहे. तू सांग राजा मला.. दारू कुठेही मिळते - उघड - दुकानात, बारमधे. तुझ्याकडे पैसेही असतात बऱ्यापैकी. पीत असशील अधूनमधून.. पण तू झालास का व्यसनाधीन? भाऊ तर माळकरी आहेत. दारूचा थेंबही चाखत नाहीत. बाहेरदेशातली माणसं सर्रास वाईन पितात - पाण्यासारखी. ती काय सगळी देशोधडीला लागतात काय? आपल्याकडे मात्र - 'एकच प्याला' - एकदा दारू चाखली की संपलंच सगळं! मला तर कधी कधी वाटतं - दारू निषिद्ध मानल्यामुळेच लोकांना तिचं प्रचंड आकर्षण आहे. लोकांना दारू प्यायला शिकवण्याची गरज नाहीच मुळी. गरज आहे ती किती प्यावी हे शिकवण्याची...अरे, व्यसनाधीन होणाऱ्या माणसाला कळतच नसतं तो काय करतोय ते! तो एक मनोरुग्ण असतो. दारू हे फक्त एक निमित्त असतं - त्याला आयुष्याची किंमत नसते."
"पण काही झालं तरी दारू ही काही गरज नाही माणसाची. पण एकदा दारू प्यायला लागल्यावर मात्र ती गरज बनते. तुला कशीं कळणार एखाद्या दारुड्याची परिस्थिती? तू कधी झालायस व्यसनाधीन?" मी त्याला विचारले.
तो एकदम गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर विषण्णतेचे भाव पसरत गेले. " विसू, मी इथे आलो याचं कारण हेच. मी एक ठार वाया गेलेला दारुडा होतो - वयाच्या बाविसाव्या वर्षी! सकाळी उठल्यापासून रात्री बेशुद्ध होईपर्यंत दारू पीत होतो. या भाऊचा खून करायचा होता मला. का? तर माझी मोठी बहीण पळून गेली त्याच्या बरोबर. एका दारू गाळणाऱ्या वंजारी पोराचा हात धरून कोकणस्थ मुलगी पळून गेली. लग्न केलं आणि त्याच्याबरोबर या झोपडपट्टीत राहायला लागली माझी सख्खी बहीण - राजरोस. लोक शेण घालायला लागले तोंडात. सहन नाही झालं मला. भाऊचा खून करायचा एवढंच डोक्यात. पण ते शक्य नाही हे लवकरच कळून चुकलं. म्हणून दुःख बुडवण्यासाठी बेदम दारू प्यायचो. मग ते दुःख बाजूला राहिलं आणि फक्त दारू उरली."
त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळातली दृश्यं तरळत असावीत - मकरंद बोलतच होता - त्याच्या घरच्यांची अवस्था - मुलगी पळून गेलेली, हातातोंडाशी आलेला इंजिनियर मुलगा दारूपायी मरणपंथाला लागलेला... ऐकताना मी बधिर झालो होतो.राजाही थक्क झाला होता..
"संपलंच होतं सगळं. पण पुढं याच भाऊनं मला परत माणसात आणलं. एकदा असाच झिंगून पडलो होतो. मयुराला कळलं ते. मग भाऊनं मला उचलून आणलं रस्त्यातून. इथं एका झोपडीत दोन महिने बांधून घातलं. मग माळ घातली. माणसात आणला मला. नाहीतर मी कधीच मेलो असतो - लिव्हर फाटून किंवा एखाद्या ट्रकखाली येऊन." मकरंद आता शांतपणे बोलत होता."आता वाटतं, आपलीच मतं किती कोती असतात. आपल्या झापडातून दिसला तोच एकमेव रस्ता. आपल्या डोक्यात मावलं तेवढंच आपलं जग. इथे आल्यावर कळलं की खरं जग आपण पाहिलंच नाही. माझा नवीन जन्मच झाला म्हणा ना! आमच्या गल्लीतले लोक म्हणायचे - पोरगी पळून गेली, पोरगा कामातून गेला - पण आता? कुणाच्या तोंडून चकार शब्द निघत नाही. टापच नाही. मी नुसता आलोय म्हटलं की बोबडी वळते. आणि भाऊंच्या तर आरत्या ओवाळतात ते. ताई सुंदरनगराची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवडून आली तेव्हा तर सत्कार केला ह्याच लोकांनी तिचा - आहेस कुठं? "
"अरे, बोलता, बोलता किती वेळ गेला... चला, ताई वाट पाहत असेल!" मग भानावर येत आम्ही निघालो.
पंधरा मिनिटात मकरंदचा सारा जीवनपट आमच्यासमोर उलगडला होता. काय बोलावं ते सुचत नव्हतं. पण थक्क होऊन शुद्ध हरपण्याची वेळ आली ती सुंदराताई उर्फ मयुराच्या झोपडीवजा घरात!
त्या गिचमिड वस्तीतही या झोपडीच्या चारी बाजूंनी मात्र प्रशस्त जागा होती. समोर अंगण होते. अंगणात तुळस होती. भिंतीपासून काही अंतर सोडून चारी बाजूंनी फुलझाडांच्या रांगा होत्या. मागच्या बाजूला अंधारात अस्ताव्यस्त पसरलेले चिंचेचे की तसलेच कसले मोठे झाड असावे. एका बाजूला छप्पर वाढवून उघड्यावर बसण्यासाठी पडवी केलेली होती. ती झोपडी बघून एकदम मला चित्रात पाहिलेल्या ऋषिमुनींच्या पुराणकालीन आश्रमाची आठवण झाली. फक्त हरीण आणि मोर सोडले तर त्या चित्रातले सारे काही तिथे होते.
दिवाळी म्हणून बाहेरून लाईटच्या माळांची रोषणाई होती. झोपडीसमोर सारवलेल्या अंगणात भलीमोठी रांगोळी काढलेली होती. दाराशी काही टोपल्या भरून फटाके ठेवलेले होते आणि नवीन कपडे घातलेली लहान लहान मुलं मनसोक्त फटाके उडवत होती. सारवलेल्या भिंतीच्या कडेने आणि कोनाड्यात पणत्यांच्या रांगा तेवत होत्या.
"ताई, आम्ही आलोय बरंका," अशी वर्दी देत मकरंद आत शिरला. त्याच्यामागे आम्हीही. "बसा, बसा! आलेच मी..." आतून आवाज आला. झोपडी कसली तो एक बंगलाच होता - चार खोल्यांचा. दिसायला झोपडीसारखा असला तरी आतून राजमहालच होता तो. एक एअरकंडिशन्ड झोपडी मी पहिल्यांदाच पहात होतो. आत एखाद्या ऐतिहासिक चित्रपटात शोभेलसे मोजकेच पण कलात्मक फर्निचर होते. नक्षीकाम केलेल्या शिसवी खुर्च्या, एका बाजूला उभ्या काचा बसवलेले अनेक मराठी, इंग्रजी पुस्तकांनी भरलेले लाकडी कपाट, एक छोटेखानी सुबक टेबल. त्या बैठकीच्या खोलीत उच्चभ्रू साधेपणा म्हणतात तो अगदी ओतप्रोत भरलेला होता.
"काय? कशी वाटली आमची झोपडी?" समोर साक्षात मयुरा ऊर्फ सुंदरनगरची सम्राज्ञी उभी होती - सुंदराताई!
चेहरा सुंदर, सोज्ज्वळ, हसतमुख - आपल्या सामर्थ्याची, अधिकाराची कुठलीच जाणीव तिच्या शांत मुद्रेवर नव्हती. एखाद्या सर्वसामान्य गृहिणीप्रमाणे ती दिसत होती. लक्ष्मीपूजनासाठी थोडी सजली होती एवढेच. तिच्या हातात फराळाचं ताट होतं.
"छान आहे.. अगदी एखाद्या आश्रमात आल्यासारखं वाटतंय!" मी.
"आमच्याकडे आला नाहीत तुम्ही जेवायला.. घ्या, फराळ तरी करा आता."
"ताई, तिकडं सुरेखाताईंनी फार आग्रह केला. पोट गच्च झालंय! " राजा पोटावरून हात फिरवत म्हणाला.
"एवढ्याशा फराळानं काय होतंय... घ्या, घ्या - बघा तरी मला जमलंय का फराळाचं करायला!"
"की लाडू फोडायला हातोडा लागतोय?" मकरंदने बहिणीची खोडी काढली.
"असले फालतू, जुनाट विनोद करू नकोस. ते हातोड्यानं फोडायचे लाडू काढून ठेवलेत तुझ्यासाठी. भाऊबिजेला देईन फराळात.." मयुरा.
बकाल सुंदरनगरातल्या एका 'झोपडी'त भावाबहिणीचा तो गंमतीदार संवाद किती विसंगत होता!! क्षणभर आपण पेठेतल्या एखाद्या वाड्यात आहोत असा भास झाला. पोटात जराही जागा नव्हती तरी आम्ही बळेबळे दोन घास खाल्ले.
"छान झालंय फराळाचं हां. चला, येतो आम्ही..." राजाला आता परतीचे वेध लागले होते.
"एवढ्यात कुठं जाताय? आता पूजा आहे देवळात... ती झाली की मग निघा सावकाश." मयुरा आर्जवानं म्हणाली.
"ताई, त्यांना घेऊन पुढे होतो. तू ये नंतर," मकरंद उठला.
"निघताय? बरं... आता पुढच्या वेळेला आलात की माझ्याकडं यायचं जेवायला आठवणीनं!" मयुरानं आम्हाला निरोप दिला.
शेजारच्या एका झोपडीसमोर थांबून मकरंद म्हणाला," ही आमची ट्रेझरी. आमच्या टेरिटरीचं सगळं बुकिंग इथं जमा होतं आणि इथूनच मागेपुढे जातं..."
"समजलं नाही मला", त्याचं बोलणं मला काहीच कळलं नव्हतं.
"विश्या, बुकिंग म्हणजे आकड्याचं रे!" राजा वैतागला होता.
"त्याला मी प्रायव्हेट लॉटरी म्हणतो." मकरंद म्हणाला. "खासगी लॉटरीच आहे ही. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्र - ही आमची टेरीटरी. कल्याण आणि मुंबई मटक्याबरोबरच आमचाही स्वतःचा वेगळा बिझनेस आहे - पूना मटका."
"आता या धंद्यासाठीही तुझ्याकडं स्पष्टीकरण असणार!" मी हसत म्हटलं. आता निर्ढावलो होतो.
"विसू, तुला हे सगळं वाईट दिसतंय कारण तू स्वतःला वेगळा समजतोस. त्यात तुझा काही दोष नाही. तुझं जग फार वेगळं आहे रे. तुला यातला काही अनुभव नाही. घेण्याची गरजही नाही. लांबून पहायचं आणि म्हणायचं - हे वाईट, ते वाईट. फार सोपं आहे तसं म्हणणं. पण फक्त फुकाच्या गपा आहेत त्या. या जगात दारू, जुगार, बाई या गोष्टी अगदी पुराण काळापासून होत्या, आहेत आणि यापुढेही असणार. हे कितीही वाईट म्हटलं तरी ते एक निखळ सत्य आहे."
"ते मलाही माहीत आहे. पण म्हणून ते मान्य करून त्याला प्रतिष्ठा द्यायची?" मी दाबून बोलत होतो.
मकरंद हसला, म्हणाला, "प्रतिष्ठा मिळवून द्यायची काय गरज आहे रे? आज तू इथे आहेस म्हणून बोलतोय्स. उद्या तिकडे अमेरिकेत गेलास आणि चार पैसे खुळखुळायला लागले खिषात की तू ही जाशीलच ना "लास व्हेगास"ला - एंजॉय करायला? तिथे बघशील, अरे जगाच्या नाड्या हातात असलेले सुप्रसिद्ध, प्रतिष्ठीत लोक येतात तिथे - करमणूक करून घ्यायला."
"त्यांच्याकडे भलेही भरपूर पैसा असेल पण सुसंस्कॄतपणा? रानटी लोक असतात सगळे.." मलाही आवेश आवरत नव्हता.
मकरंदाच्या स्वरात कडवटपणा उतरला होता, "सुसंस्कृतपणा? काय असतो रे तो? मुलगी पळून गेली म्हणून थुंकणारे सुसंस्कॄत? मुलगा वाया गेला म्हणून कोरडी सहानुभूती दाखवणारे आणि मागे कुत्सितपणे हसणारे सुसंस्कृत? माझे वडील हाय खाऊन पॅरालिसिस होऊन पडले तर कोणी हॉस्पिटलमध्ये न्यायला आलं नाही बरोबर. म्हणे सुसंस्कृत! या लोकांच्या सुसंस्कृतपणाच्या व्याख्याही किती लवचिक! वा! ताई नगरसेविका झाली की ती सन्माननीय, भाऊने गणेशोत्सवाला पाच लाख दिले की तो दानशूर, सुविद्य नागरिक! मी तर काय म्हणे तरुणाईचे आशास्थान! तीन महिन्यापूर्वी वडील वारले तर अंतयात्रेला मात्र ही गर्दी. वैकुंठावर भाषणं केली लोकांनी - पुरोगामी विचारांचे, दूरदृष्टीचे , सुजाण आणि काय काय... आपल्या मुलीच्या आंतरजातीय विवाहाला मान्यता देवून त्यांनी नव्या समाजरचनेचा पाया घातला - असा साक्षात्कार झाला तुझ्या या सुसंस्कृत लोकांना!"
"तुला एक जगाचा वाईट अनुभव आला म्हणून सगळ्यांना एकाच रांगेत उभे करणार काय तू?" मी
"विश्या, लेका बास की आता, आं?" राजा मला आडवत म्हणाला.
"राजा, बोलू दे त्याला. विसू, मीही तुझ्यासारखाच विचार करायचो रे. आयुष्य सुरळीत सुरू असलं ना की आपण किती सुसंस्कृत आहोत ते दाखवण्याचा सोस असतो प्रत्येकाला. मलाही होता. मीसुद्धा ताईच्या लग्नाला विरोधच केला की रे... पण कोण आलं माझ्या मदतीला? घेऊन येऊ तिला परत म्हणालो, कुण्णी पुढं आलं नाही. “आता काय फायदा? तिचं लग्नही झालं असेल”, “शेण खायच्या अगोदरच आवरलं असतं तर बरं झालं असतं - आता मारामाऱ्या करून काय मिळणार?” - हे उद्गार. हे कसले मारामाऱ्या करणार? - हे नुसते मार खाणार. आणि मी कामातनं गेलो तेव्हा कोणी मला सावरायला आलं? “चला, मुलगी पळून गेली, साठ्यांचा मुलगाही आता...' " मकरंद एकदम थांबला.,"सगळे एका माळेचे मणी !"
"पण आदर्शवादी, ध्येयवेडी माणसं असतातच की जगात!"
"असतात रे विसू.. म्हणूनच त्यांना वेडे म्हणतात. त्यांना तरी कुठे तुझा सुसंस्कृत समाज डोक्यावर घेतो? एकतर दुर्लक्ष करतो नाहीतर वेडे ठरवून दगड, शेण मारतो. सुसंस्कृत म्हणजे सगळे कातडीबचाऊ शहाणे. आणि मुळात सभ्य, सुसंस्कृत म्हणवणाऱ्या समाजाला काय चांगलं, काय वाईट ठरवण्याचा अधिकार दिला कुणी? दुसऱ्याच्या पोळीवर पडणारं तूप ओढून घ्यायला धडपडणारी ती माणसं. मी दहावीला बोर्डात आलो तेव्हा शेजारी दुःस्वासानं जळफळत होते. पण मी दारू प्यायला लागल्यावर आनंदानं हुरळून गेले सगळे. असल्या सुसंस्कृत माणसांपेक्षा इथली असंस्कृत, रानटी, गुंड माणसं बरी की! जीव घेतात कधीकधी पण जीवाला जीव देतातही. या झोपडीत आत्ताच्या क्षणी जवळजवळ ऐंशी लाख रुपये पडलेत - कॅश! वस्तीतल्या प्रत्येकाला माहीत आहे. पण कुणी इकडे ढुंकूनही बघत नाही. ही माणसं असंस्कृत?... जाऊ दे. तुला कळणार नाही मी काय म्हणतोय ते! ते कळायला तशी वेळ यावी लागते माणसावर.." त्याने चर्चेला पूर्णविराम दिला.
त्याच्या वैयक्तिक अनुभवांनी त्याला फारच कडवट बनवला होता. खवळलेला मकरंद एकदम भरभरा चालू लागला - आम्ही त्याच्या मागोमाग मुकाट्याने.