मारुती वाहनामधून कँपात चक्कर मारली. मग परत येऊन मस्तपैकी जेवलो. ही मेजवानी खास भाऊंच्या घरातील डायनिंग हॉलमध्ये होती. बारा खुर्च्या असलेलं लांब, शिसवी टेबल; बारीक कोरीवकाम केलेल्या राजेशाही खुर्च्या; टेबलाच्या मधोमध फ्लोरल डेको...
पंचविशीतली एक सुंदर तरुणी वेटरना ऑर्डर्स सोडत होती.
"नमस्ते, मी सुरेखा...आन्नानी फोन क्येलता मला. धाकली भैन मी त्यांची. बसा, बसा..."
म्हणजे ही भाऊंची दुसरी बायको!
"आमी वंजाऱ्याचं - तुमी बामनाचं! तुमाला चालंल - नाय चालंल म्हून तिक्डं सुंदराताईकडं ज्येवाला पाठवायचं म्हनत होते आमचे साहेब. पर म्याच म्हनलं, माझ्या म्हायेराची मान्सं हायती.. तवा माझ्याकडं जेऊं देत - सम्दं केलंया - भात-भाजी-आमटी- म्या शिकलोय आता सुंदराताईकड्नं बामनावानी सैपाक करायला. सायेबांना आवडतं ना! आनि ते दुसरं - खारंबी आहे, बर्का!. तुम्हाला पायजे ते सांगा." 'म्हायेराची - भावाची मान्सं' आल्याने ती बहीण काय करू-काय नको असं करत होती.
"मला चालेल," मी स्थितप्रज्ञाप्रमाणे म्हणालो. राजा मात्र बिचारा आपल्या ब्राह्मण धर्माला जागत होता.
त्याच्यासाठी भात-आमटी-कोशिंबीर- लोणचे - चपाती -भाजी हे घासफूस तर माझ्यासमोर चिकन सूप, बटर चिकन, मटन मसाला, बटर नान, फिश बिर्यानी...असे शाही - पदार्थ येतच होते. तेव्हा ठरवून टाकलं, आता जे जे होईल ते फक्त पाहत राहायचं. म्हणजे- आता जे जे येईल ते ते खायचं - पोटाचा फारसा विचार करायचा नाही. फार डोकं चालवायचं नाही. नाहीतरी ते आतापर्यंत बधिर झालंच होतं.
"कसं झालंया?" सुरेखा विचारत होती.
"मस्त! फस्कलास!" राजा
"आमच्या आन्नाला सांगा बरंका. न्हाई, त्याला माज्या सैपाकाची लै काळजी- कशी करंल म्हून ," सुरेखा खुश होती.
"अगदी नक्की सांगीन - आन्ना , तुमची भईन बामनाच्या तोंडात मारंल असा सैपाक करती.." राजा कौतुकाने म्हणाला तशी ती आणखी आनंदित झाली.
"आणि तुम्ही घरसुद्धा मस्त ठेवलंय हं," मी पुस्ती जोडली.
"व्हय तर! त्या सुंदरनगरात ऱ्हान्यापरीस हितं ऱ्हाऊ म्हनून म्याच म्हनले सायबास्नी. पर सुंदराताई न्हाई म्हनाली. ती तितंच ऱ्हाते - वस्तीवर. तिचीच हाय न्हवं ती!" एक तक्रारवजा कौतुक डोकावत होतं. "सायेबांनी मग ही बिल्डिंग घिऊन दिली मला. हितं कसं निवांत हाय. कसली झगझग न्हाई."
आम्ही हात धुऊन उठलो तेवढ्यात फोन वाजला.
"सायेब आलेत हापिसात. बलिवलंय तुमास्नी. गाडी घिऊन जाईल तुम्हाला..." सुरेखा म्हणाली.
"बरंय! येतो ताई!" राजानं निरोप घेतला.
व्हॅनमधून आम्ही 'मयुरी फिल्म्स इंटरनॅशनल प्रा. लि.' अशी पाटी लावलेल्या एका दुकानगाळ्यासमोर उतरलो. तो एक दुमजली गाळा होता. खालच्या मजल्यावर काही पोचलेले दिसणारे तरुण बियर पीत बसले होते. जवळजवळ प्रत्येकाची शर्टाची वरची बटणे उघडी होती.
आम्ही आत गेल्यावर आमची कसून 'चाचपणी' झाली. मगच वरच्या मजल्यावर जाण्याचा क्लिअरन्स मिळाला. वरच्या मजल्यावर जाणाऱ्या जिन्याची शेवटची पायरी चढलो आणि तिथेच थबकलो. तो मजला एखादा रंगमहाल सजवावा तसा सजवला होता. सगळीकडे रंगांची उधळणं होती. भिंती वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या, खिडक्यांना निळ्या, लाल, पिवळ्या काचा, प्रत्येक खिडकीला आणि गॅलरीला सात आठ रंगांचे लांबसडक पडदे, छताला रंगीबेरंगी लोलकांचं प्रचंड झुंबर, खाली लालभडक गालिचा, मध्ये बरीच मोकळी जागा, दोन्ही बाजूंना कोचांची रांग आणि मागे एक लाकडी झोपाळा.
त्या झोपाळ्यावर भाऊसाहेब झुलत बसले होते. झोपाळ्यावर बाजूलाच एक पिस्तूल होतं - हातासरशी. वय साधारण पस्तीस, लालसर गोरा वर्ण, पसरट, गुबगुबीत चेहरा, डबल हनुवट, सरळ, लांब नाक, खुरटलेली दाढी, काना-खांद्यावर रुळणारे कुरळे केस, रुंद खांदे, जाडजूड हात, जाड भुवया आणि भेदक नजर. "या, या... गाववाले... या बसा..." भाऊ आपल्या खर्जात. भाऊ त्या रंगमहालात विसंगत दिसत होते. त्यांनी एक सफेद शर्ट आणि सफेद पँट घातली होती.
माझी नजर त्या पिस्तुलावर रोखलेली पाहून त्यांनी स्मितहास्य केलं आणि ते पिस्तूल उचलून कमरेला मागे खोचलं,"ठेवावं लागतं, बाबा..."
त्याबरोबर उपस्थित मंडळींच्या अनुमोदक हास्याची लकेर उमटली. तिथे चार-पाच मंडळी बसली होती. त्यातच मकरंदही होता. आम्हीही अंग चोरून बसलो.
"तो दोस्तलोग, ये हमारे राजासाब और विश्वनाथसाब... हमारे गांवसे आये है!" भाऊसाहेबानी आमची ओळख करून दिली. माझा विश्वासचा विश्वनाथ झाला. असो. "और ये - आमचे डायरेक्टर - शानीसाब आणि रायटर - शर्मासाब - आम्ही फिल्म काडतोय - 'रावण की लंका' नावाची. - त्याचे."
शानी किंवा साहनी - जो कोणी असेल तो- एक पन्नाशीला पोचलेला, अर्धवट टक्कल पडलेला, बसक्या बांध्याचा इसम होता तर शर्मा तिशीचा, गोरापान तरूण होता. त्याचीही अवस्था माझ्याहून वेगळी नसावी. त्याच्याही डोळ्यात बळी व्हायला निघालेल्या कोकराचे भाव दिसत होते.
"शानीसाब, ये विश्वनाथसाब मराठीके बहुत अच्छे रायटर है हां..." मकरंदने पुस्ती जोडली, "उधर बहुत नाम है इनका!" मी थक्क! एकतर ह्या भल्या गृहस्थाला मी काहीबाही लिहितो हे कळले कसे? आणि वर "मेरा नाम है हे मेरेकुच मालूम नाही?"
"क्या साठेसाब? ऐसा कुछ खास नही लिखता मै!" मी ओशाळून म्हणालो.
"नय, नय! बहुत अच्छा लिखते है हां!" आता भाऊसाहेबच म्हणतात तर मी काय बोलणार?
"ऐसा करो -आपकी स्टोरी इन्को सुनाव! क्या, शर्मासाब... इनको पसंत आयी ना तो फायनल कर डालेंगे - क्या?" भाऊ एका दमात म्हणाले.
मी आता पार कामातूनच गेलो होतो. एक क्षणभर माझ्यासमोर राजाच्या गॅरेजमधले ते मोटोक्रॉसचे चित्र तरळून गेले. त्या एका चित्राच्या दर्शनाने मला हे काय-काय पाहायला मिळत होते! माझ्या रुकारावर एका हिंदी चित्रपटाची कथा निश्चित होणार होती!!?? मला तर ती सगळी चेष्टाच वाटायला लागली.
"प्लीज, एकबार आप सुन लिजिये ना साहब! बहोत पसंद आयेगी आपको..." शर्मा मलाच अजिजी करू लागला. खुद्द फायनान्सर - प्रोड्युसरच सांगतोय म्हटल्यावर शर्मासाहेबाला ती स्टोरी माझ्यासारख्या गाढवापुढे सांगणे भागच होते.
"पण भाऊसाहेब, आमचे काम... मोटोक्रॉसच्या गाड्या, ते रायडर..."मी चाचरत म्हणालो.
"इकडे रायटरचं फायनल झालं की तिकडे रायडरचं फायनल झालंच म्हणून समजा..." भाऊ आपल्या कोटीवर खूश होऊन हासले तसे साऱ्यांना हसावेच लागले.
"विश्वास, अरे ऐक रे एकदा!" राजा अत्यंत जबाबदारीने शब्द उच्चारत म्हणाला. विश्याचा विश्वास! आता मात्र मला त्याची कथा ऐकणे भागच होते.
"ठीक आहे," मी तयारी दाखवली.
"ठैरो! अरे सँडी, एक पाच-सहा बियर आणि काजू लेकर आव!" मकरंदने फर्मान सोडले तसा सांडासारखा माजलेला सँडी बाटल्या, काजू आणि ग्लास घेऊन आला...,"हा, अब शुरू करो..."
मग बियरचे घुटके घेत घेत एका होऊ घातलेल्या हिंदी चित्रपटाच्या कथेचे पारायण सुरू झाले. मी मात्र सोवळ्यात होतो. गंमत म्हणजे की माझ्याप्रमाणेच भाऊ आणि मकरंद दोघेही बियर घेत नव्हते.
शर्मा मन लावून कथा सांगत होता. कथा अगदी तद्दन भिकार किंवा फालतू होती. (मिथुन किंवा गोविंदाच्या कोणत्याही चित्रपटाला शोभेलशी) तथाकथित 'अन्यायाविरुद्ध लढा' किंवा 'दुष्टप्रवृत्तीवर सुष्टांचा विजय' या पठडीची कथा! त्यात रंगवण्यासारखे काय होते ते त्या शर्मालाच माहीत.
पण जसजशा बाटल्या संपू लागल्या तसतसा तो स्वतःच रंगात येऊ लागला. "यहांपे एक गाना डालेंगे..”, “आहा, क्या शॉट बनेगा ये!”, “तो क्या होता है के...”, “उसकी मां केहती है बेटा, तुझे मेरी सौगंध है, जला डाल इस रावन की लंका को”, “इधर वो जो हिरोकी बहेन है...” , “और वो क्या देखता है...” अशी वाक्ये हातवारे करत तो मला सुनावू लागला. मीही "वा, क्या बात है!", "सुपर्ब", "जबरदस्त ट्विस्ट है ये तो" अशा घोषणा करून मी त्याची कथा ऐकतो आहे याची खात्री देत होतो. तो प्रसंग फारफार विनोदी दिसत असणार. दहा रुपयांना मिळणाऱ्या हिंदी पॉकेटबुकातसुद्धा यापेक्षा काही नवी सापडले असते. पण शानीसाहेबाला मात्र कथेतला 'जर्म' पुरेपूर कळला होता. तो बसल्याबसल्या अंगात आल्यासारखा वळवळत होता. त्याच्यातला दिग्दर्शक कथेला, "वा!वा!”, “क्लोजप लेंगे यहां पे”, “ये शॉट के लिए मेरेपास भोत अच्छा लोकेशन है” वगैरे दाद देत होता.
"और फिर हिरोकी मा केहती है,- जब, जब कोई रावन पैदा होता है , उसकी लंकाको मिट्टीमे मिलाने के लिए कोई रामभी पैदा होता है - दी एंड"... लालबुंद झालेल्या चेहऱ्याचा शर्मा विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहत होता. जणू त्यानेच रावणाची लंका जाळून टाकली होती. चांगले दोन तास बडबड करून तो दमला होता आणि ती ऐकून मीही.
"कैसी लगी, साब?" त्याला हा चित्रपट गेलाबाजार सिल्व्हर जुबिली तरी करणार याची खात्री वाटत असावी.मी हळूच एक नजर भाऊ आणि मकरंदकडे टाकली. भाऊ माझ्याकडे मोठ्या अपेक्षेने तर मकरंद मिस्किलपणे पाहत होते.
"अच्छी हे! लेकीन और आच्ची हो सक्ती है. " मी गंभीरपणे म्हटले. मग उगाचच काही निरर्थक सूचना केल्या..." “वो हिरोकी बहेन हे ना वो भौत लेट आती हे स्टोरी में. उसका और हिरोका इमोशनल बॉँडिंग दिखाने के लिये थोडा जल्दी लाना चाहिये उसको...”, “और हिरो का दोस्त का कॅरेक्टर कुच जमा नही. वो नही रहेगा तो भी चलेगा ना?”, “वो व्हीलन च्युइंग गम खाणेवाला दिखाया तो मजा आयेगा...”, “सिग्रेट पिनेवाले व्हीलन तो भौत हो गये ना!" मी माझी अक्कल पाजळत होतो आणि अर्थातच लेखक आणि दिग्दर्शकाला ते लगेच पटत होते.
"वा! वा! क्या विशनाथ साब... आपको तो बंबईमे होना चाहिये.. गांवमें क्या कर रहे है आप? कोई इस्टोरी है तो सुनावो. एक पिक्चर बना डालेंगे" शानी मला मस्का मारत होता.
"कशी काय वाटली?" भाऊ विचारत होते.
"मला तरी बरी वाटली. पण तुम्ही अजून कुणाला तरी विचारले तर बरे होईल," मी माझी जबाबदारी झटकत म्हणालो.
"किती बजेट आहे?" राजाने पृच्छा केली.
"आहे दोन-तीन कोटींचं ," मकरंद सहजपणे म्हणाला.
"जास्त लागले तर पाहू..." भाऊ म्हणाले. "आच्छा, ठिक है शर्मासाब, नेक्श्ट टाईम फायनल बोलेंगे. और शानीसाब, हिरो बोलेतो कौन आयेगा वो देखो तो जरा..."
"आप बोलो, किसको लेंगे..., आपका खाली नाम बताया तो कोईभी आएगा भाऊसाब"शानी हसत म्हणाला.
"और हां...एक बात बताना तो मै भूलही गया! ये लोग उधर गांवमें एक मोटरसायकल रेस करनेवाले है... कुछ स्टंटमन का बंदोबस्त करो.. सबको बोलो, भाऊका घरका काम है.. एकदम फस्क्लास जंप मारनेका उधर जाके...सब लोगको मजा आना मंगता, क्या?" भाऊंनी आदेश दिला.
"जी साहब, आजही बीस-पच्चीस मोटरसायकलवालोंको बोल के रखता हूं," शानी.
"उनको बोलो, भाऊ का ट्रक आयेगा, उसमे गाडिया डाल्के हमारे गावको चले जाव..हरेक को दो - दो हज्जार मिलेगा. लेकिन पाच तारिख को सब लोग उधर चाहिये. नय तो भाऊ देख लेगा एक-एक को. क्या?" भाऊ पिस्तूल काढून कुरवाळू लागले.
"उसकी जरूरत नय, भाऊसाब... पैसा क्या चाटनेका है? मै खाली आपका नाम बोलता हूं - बस! सब सिधे चले जायेंगे." शानीचा असिस्टंट डिरेक्टर ऊर्फ चमचा म्हणाला.
"ऐसा करो, इनका नाम, पता, फोन नं. लिख लो. बंबई बात होते की फोन करो इनको. क्या?" मकरंद.
राजाने त्याच्या गॅरेजचा पत्ता शानीच्या चमच्याला दिला.
"आणि आमचेही रायडर आहेतच," मकरंद म्हणाला," हे खालच्या मजल्यावर बसलेले रायडर्स!!"
"झालं ना तुमच्या मनासारखं? अजून कुणाला उचलायचं असेल तर सांगा, राजू," भाऊ..
"बास! पंचवीस-तीस पुरेत," राजाने समाधानानं मान डोलावली.
"बरं आहे, निघतो आम्ही आता.." मी सटकण्याच्या तयारीत होतो.
"आहो, आताच कुठं जाताय? आज लक्ष्मीपूजन आहे.. जरा आमचं लक्ष्मीपूजनही बघून जा..." भाऊसाहेबांचा शब्द म्हणजे हुकूमच होता. तो कसा टाळणार?
"मकरंदा, अरे, त्यांना सुंदरनगर दाखव. लेखकांना बघायला आवडतं असं काहीतरी नवीन वातावरण. काय? " भाऊ हसत होते, "रात्रीची पूजा बघा. जेवण करा आणि मग निघा. माझी गाडी जाणारच आहे गावाकडं. तिच्यातनं जा. सकाळपर्यंत पोचाल की."
या भाऊचं अस्खलित, सदाशिवपेठी मराठी ऐकून थक्क झालो. पण काय-काय होते ते पाहायचे , जरासुद्धा विचार करायचा नाही हे पुन्हा मनाला बजावले. सुंदरनगर ही वसाहत किंवा पाल किंवा वस्ती किंवा झोपडपट्टी त्या ऑफिसमागेच होती.आम्ही मकरंदाबरोबर निघालो.
* * * *