गावाला मागं टाकून स्कूटर निघाली होती. "इकडं कुठं?" मी विचारलं.
"इथं माझा एक दोस्त आहे- कलावंत म्हणून - तेरवडीच्या नदीजवळ त्याची वीटभट्टी आहे. त्याच्याकडं जाऊ या," राजा म्हणाला.
तेरवाडी (त्याला बोलीभाषेत तेरवडी म्हणतात) हे शेजारचं खेडं. तिथे तेरगंगा नदीच्या काठावर बऱ्याच वीटभट्ट्या होत्या. ऑक्टोबरातल्या उतरत्या संध्याकाळी सूर्य तेरगंगेत डुंबत होता. बुटक्या, अर्धवट बांधलेल्या पिरॅमिडसारख्या दिसणाऱ्या वीटभट्ट्यांतून हळूहळू धूर निघत होता. आसमंत त्या धुराच्या गंधाने भरून गेला होता. अर्धवट जळलेल्या दगडी कोळशाचा तो वास मला सुखावून जात होता.
एका वीटभट्टीजवळ स्कूटर थांबवून राजा उतरला. मी त्याच्या मागोमाग गेलो.
"नमस्कार, आण्णा!" राजानं समोर उभ्या असलेल्या एका नेहरू शर्ट, पायजमा आणि गांधी टोपी घातलेल्या अधेड वयाच्या इसमाला हात जोडले आणि मग उभ्या उभ्याच त्याच्याशी बोलू लागला.
"नमस्कार! बोला राजूमालक, काय? काय? लै दिसानं आलासा गरीबाकडं, काय इशेष?" आण्णा म्हणाला.
"हां, तसंच म्हत्त्वाचं काम निघालं म्हनून आलो तुमच्या दर्शनाला" राजा हसत म्हणाला.
"काय ह्ये राजू? आमी-तुमी काय दोन हाय व्हय? तुमी हुकूम करायचा फकस्त!" आण्णा दिलखुलास.
"त्याचं असं झालं बघा आण्णा...." अशी सुरुवात करत राजूने अथपासून इतिपर्यंत सगळी हकिगत आण्णाला सांगितली.
"हां, आमीबी येनार की शेर्त्या बघाया. मग काय करायचं म्हंता? त्यो कोन श्यान कोठारी का काय? आनुया काय उचलून त्येला?" हा आण्णा म्हणजे काय प्रकार असावा त्याचा थोडाथोडा अंदाज त्याच्या बोलण्याने मला येऊ लागला. श्यामचे श्यान (शेण) करून तो मोकळा झाला होता.
"नको, नको.... आण्णा!" राजा गडबडीने म्हणाला,"तसलं काय बोलू बी नका!" मग माझी ओळख करून देत म्हणाला,"आण्णा, ह्यो माझा भाचा... इंजिनेर झाला यंदा."
त्याची हिंट आण्णाला कळली,"आसं का? वा! वा! कसलं विंजनेर म्हनाचं? शिविल का?"
वीटभट्टीचा संबंध त्या एकाच जातीच्या इंजिनियरशी येत असल्याने त्याचा प्रश्न योग्यच होता.
"नाही. इले़ट्रॉनिक्स- म्हणजे हे रेडिओ, टी.व्ही. वगैरे..." मी त्याला म्हणालो.
"आसं का? वा!वा! तेलाबी विंजनेर असत्यात का? भले! आमाला वाटलं ते काम टी.व्ही. मेक्यानिक करत्यात." आण्णा.
त्याचंही खरंच होतं. मलातर त्या टेक्निशियन इतकंही इलेक्ट्रॉनिक्स् येत नव्हतं.
"आणि आण्णा, ह्यो नाटकं, गोष्टीबी लिवतो बरं का!" राजाने माझी स्तुती केली.
"आसं का? वा! वा!" आण्णा हसत म्हणाला. हे 'असं का? वा! वा!' म्हणण्याची त्याची एक लकब होती.
"बरं... मग राजू? काय कराचं तुमच्या कामाचं?" आण्णा म्हणाला.
"तुम्ही मागं म्हणालावता.. तुमचे भावजी अस्त्यात पुन्याला. काय बी काम निगालं पुन्याला तर सांग म्हनून." राजा.
"हां, तेच विचार करत होतो." आण्णा टोपी काढून डोके खाजवत म्हणाला. "त्यो करंल खरं! राजु, तुमी असं करा - म्या फोन करतो तेला. तुमी स्वताच जाऊन भेटा तेला. तसं म्याबी सांगीनच. होऊन जाईल तुमचं काम." मग खिशातल्या पाकिटातून एक व्हिजिटिंग कार्ड काढून राजाच्या हातात देत म्हणाला," ह्यो पत्ता..., तेच्यावर फोनबी हाय दिल्याला."
राजाने कार्ड पाहून माझ्या हातात दिले. त्याच्यावर "आनंद धारगुडे, बी.ए." हे नाव आणि खाली सुबक, मोठ्या अक्षरात "मयुरी इंटरनॅशनल फिल्म्स प्रा. लि." आणि "सुंदरनगर, हडपसर, पुणे" इतकाच पत्ता आणि एक फोन नंबर होता.
ते पाहून मी," पण या पत्त्यात रस्त्याचे, गल्लीचे नाव नाही. मग एवढ्या पत्त्यावर कसे जाता येईल?" असा सुशिक्षित मध्यमवर्गीय प्रश्न विचारला.
त्यावर आण्णा खिंकाळून हसला. म्हणाला, "राजू मालक, लै हुश्यार हाय तुमचा भाचा."
राज चपापून म्हणाला, "विश्या, तू जरा गप बश्शील काय?"मग आण्णाला म्हणाला, "याला काय माहित नाय त्यातलं. आम्ही जातो लगोलग."
"बरं, बरं! जावा. आनंदराव आता आलाय पुन्यात. न्हायतर तुमची पंचाईत झाली असती. जावा लागलीच. दिवाळीनंतर पुन्ना भाईर जानाराय म्हनं," आण्णानं माहिती दिली.
"बरं, निगतो मग आन्ना." राजा.
"हे काय राजू? इक्त्या दिसांनी आलायसा गरीबाकडं. कायतरी घिऊन जावा..." आण्णा.
"आता नको, पुन्ना कधी," राजानं स्कूटर स्टँडवरून काढली.
परतीच्या मार्गावर हळूहळू राजानं आण्णा आणि आनंदराव या दोन माणसांची कथा सागितली. आण्णा ऊर्फ लेकोजी कलावंत हा माणूस असंख्य वीटभट्ट्यांचा मालक होता हे खरेच. पण त्याहीपलिकडे त्याचे एक साम्राज्य होते. आमच्या गावातले समस्त हातभट्टी आणि देशी दारूचे अड्डे त्याच्याच मालकीचे होते. वीटभट्ट्यांच्या मागे त्याच्या दारूभट्ट्याही लागत असत. शिवाय आमच्या गावातला तो मटका-किंग होता. पानपट्ट्यांच्या नावाखाली बुकिंग घेणाऱ्या यंत्रणेचा तो प्रमुख होता.
"त्याच्या दिसण्यावर जाऊ नकोस, विश्या!" राजा म्हणाला."भलेभले पुढारी त्याच्यासमोर लोटांगण घालताना मी पाहिलं आहे."
आनंद धारगुडे हा तर अख्ख्या पुण्याचा मटका-किंग होता.मुंबई, कल्याण ही कुप्रसिद्ध मटका रॅकेट पुण्यात चालवण्याबरोबरच त्याचा स्वतःचाही पुणे मटका होता. शिवाय देशी दारू - हातभट्टी यात त्याचा हातखंडा होताच. सुंदरनगर ही हडपसर भागातली झोपडपट्टी त्याच्या अक्षरशः मालकीची होती. आनंद धारगुडे ऊर्फ भाऊ याचा पत्ता सुंदरनगर, हडपसर, पुणे इतकासुद्धा गरजेपेक्षा जास्त होता.
आण्णाची बहीण आनंदाला दिली होती - पण ते त्याचे दुसरे लग्न होते. त्याची पहिली बायको सुंदरनगरची राणी होती म्हणे. आनंद वर्षातले कित्येक दिवस बाहेर-म्हणजे दुबई, सिंगापूर, हाँगकाँग इत्यादी ठिकाणी असे. त्याचे खालच्या आणि वरच्या जगात मोठमोठे लागेबांधे होते.
त्यामुळे पुण्याचे कसलेही 'काम' त्याच्या डाव्या हाताचा मळ होता. वरच्या जगात त्याची एक चित्रपटनिर्मिती संस्था होती - मयुरी फिल्म्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड. तो अनेक निर्मात्यांना भांडवल पुरवत असे. हा त्याचा उच्चभ्रू व्यवसाय.
"म्हणजे अंडरवर्ल्डची मदत घेऊन स्पर्धा घ्यायची काय रे, राजा?" मी घाबरलो होतो. अंडरवर्ल्ड - मारामाऱ्या - खून - एन्काउंटर - बापरे!
"विश्या, तू म्हणजे बच्चा आहेस अजून बघ. अरे लेका, तीपण माणसंच आहेत रे. ती काय खातायत व्हय रे आपल्याला?" राजा माझी समजूत घालत म्हणाला.
"पण राजा, हे लोक गुन्हेगार असतात. त्यांची मदत घेऊन आपण स्पर्धा घ्यायची? नको, नको!" मी सुशिक्षित मध्यमवर्गीय.
"विश्या, त्यांच्या गुन्हेगारीशी आपला काही संबंध येणार नाही. कुणाला काहीही गैर करायला लागणार नाही. मग तर झालं?" राजानं मला पुन्हा समजावलं.
"ते कसं काय?" माझी शंका.
"अरे, आपण फक्त रायडर मिळवण्यासाठी त्यांची मदत मागायची. त्यांची ओळख असते ना..." राजा.
"पण ते उचलून आणणं वगैरे... रायडरच्या मर्जीविरुद्ध?" माझे अजूनही समाधान होत नव्हते.
"बरं, जे स्वतःच्या मर्जीने येतील ते तरी चालतील ना?" राजा म्हणाला.
"पण..." मी.
"विश्या, शेवटचा उपाय म्हणून हे करायचं. नाहीतर स्पर्धा रद्द हुईल. तू बघ रे, आता जादा बडबड नको!"राजा त्रासिकपणे म्हणाला. अर्थातच मी मग फक्त जेजे होईल तेते पाहायचे ठरवले- उगी राहून.
* * *
* * *
दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंडळी जमल्यावर राजानं त्याचा बेत सर्वांच्या कानावर घातला. काहीजणांनी कुरकूर केली. पण माझ्यासारखेच नंतर गप्प झाले. राजानं आनंद धारगुडेला फोन लावला. हा माणूस काय म्हणतोय त्यावरच आमच्या स्पर्धेचं भवितव्य ठरणार होतं.
"हॅलो, धारगुडेसाहेब आहेत काय? मी राजू देशपांडे बोलतोय," राजा.
"नाही.. ते बिझी आहेत. मी त्यांचा मॅनेजर बोलतोय - मकरंद साठे. बोला, काय काम होतं, भाऊंकडे?" साठे.
मग राजाने आपण कोण, भाऊंकडे आपलं काम काय आहे ते सविस्तर सांगितलं आणि आण्णा कलावंत यांची ओळख दिली.
"हो, हो.. आला होता त्यांचा फोन. मीच भाऊंना दिला होता. भाऊ दिवाळीपर्यंत बिझी आहेत. आणि लक्ष्मीपूजनानंतर लगेच बाहेर जाणार आहेत. तुम्ही असं करा - लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच या त्यांना भेटायला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांना मध्येमध्ये वेळ आहे. त्यावेळी बोलता येईल." साठे.
"बराय."राजा म्हणाला आणि त्यानं फोन ठेवला.
धारगुडे या माणसाला मकरंद साठे नावाचा मॅनेजर वगैरे असतो यावर माझा विश्वासच बसला नाही.
ऐन दिवाळीत तेही लक्ष्मीपूजनाला (घरात राहून पूजा करायचं सोडून) पुण्याला भाऊ धारगुडेला भेटायला जायचं या गोष्टीला कुणाचाच रुकार नव्हता. निव्या, बालमुकुंद, संज्या, विज्या, विकशा या साऱ्याच मंडळींनी “बग बाबा राजा, आता तूच कायतरी कर!" असं म्हणत हळूच काढता पाय घेतला. मग मी आणि राजा अशी दोनच 'कारभारी' मंडळी ग्यारेजात उरलो.
"मग विश्या, येनार ना पुण्याला?" राजानं मला यक्षप्रश्न केला.
ऐन दिवाळीत पुण्याला जाण्याच्या माझ्या निर्णयाने चिडलेले घरच्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर तरळून गेले. पण न जाऊन सांगतो कुणाला. स्पर्धेच्या भवितव्याचा प्रश्न होता.
"ठरलं, राजा. लक्ष्मीपूजन पुण्यात!" मी उसन्या अवसानानं म्हणालो.
मग राजाने परत पुण्याला फोन लावून साठ्याला आम्ही दोघे लक्ष्मीपूजनाला पहाटे येणार असल्याचे कळवून टाकले.
****