समोर एक संगमरवरी देऊळ होते. नव्यानेच बांधले असावे. देवळात ही गर्दी जमली होती. आम्ही पोचलो तर भाऊ राधाकृष्णाच्या संगमरवरी मूर्तीसमोर बसून पूजा करत होते. कपाळावर उभा नाम ओढलेले पांढऱ्या शुभ्र पोषाखातले भाऊ एखाद्या पुढाऱ्यासारखे दिसत होते. शेजारी त्यांच्या दोन्ही पत्नी सुंदरा आणि सुरेखा हात जोडून बसलेल्या होत्या. सोवळ्यातला भटजी मोठमोठ्याने मंत्र उच्चारत होता. आम्हीही हात जोडून उभे राहिलो.
पूजा संपली तसे आम्ही भाऊंच्या मागोमाग मंदिराच्या मागे गेलो. तिथे आता काळोख माजला होता. पण त्या अंधारातही एक कोलाहल ऐकू येत होता. बरीच माणसं जमली असावीत.
"भाऊ करायची का सुरुवात?" मकरंदने विचारले. भाऊंनी मानेनेच रुकार दिला.
दोन माणसांनी अंधारातच फटाक्यांच्या माळेची एक गुंडाळी उलगडायला सुरुवात केली. माळ बरीच लांब असावी. ते अंधारात दिसेनासे झाले.
"संपली का रे?" मकरंद.
"हां, झालं दादा.लावा आता." अंधारातून आवाज आला.
भाऊंनी माळेला बत्ती दिली त्यासरशी कानठळ्या बसणारा आवाज करत फटाके उडू लागले. तब्बल दहा मिनिटे तो मुसळधार पावसासारखा आवाज आसमंतात घुमत होता. शेवटचा फटाका उडाल्यावर काही क्षण शांतता पसरली. देवळाच्या पाठभिंतीलगतच्या कट्ट्यावर एक मोठा स्विच बोर्ड ठेवलेला होता. भाऊंनी एकापाठोपाठ एक पंधरावीस बटनं दाबली, काही झगझगीत फ्लडलाइट्स उजळले आणि माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसेना...
समोर एक भव्य पटांगण पसरलं होतं. त्यात प्रचंड गर्दी उसळलेली होती. पटांगणाच्या तीन बाजूंना उंच भिंती होत्या आणि चौथ्या बाजूला पाठमोरं देऊळ. या भिंतीच्या कडेने ओळीने बरीच टेबले मांडलेली होती आणि प्रत्येक टेबलभोवती लोकांचे कोंडाळे होते. भिंतींवर रंगीबेरंगी बल्बच्या माळा झगमग करत होत्या. टेबलाच्या वरून एक दोरखंड फिरवलेला होता. या दोरखंडाला मध्येमध्ये बांबूंनी आधार दिलेला होता. त्या दोरखंडावर शंभराच्या बल्बच्या माळा लटकत होत्या. शिवाय प्रत्येक टेबलाच्या बरोबर वर गुलाब, शेवंती आणि झेंडूंच्या जाडजूड माळा लटकत होत्या. शेकडो माणसं भाऊंकडे कसल्याशा अपेक्षेनं पाहत होती. चित्रात असावीत तशी ती स्तब्ध होती. फ्लड लाइट आणि बल्बांच्या प्रकाशात लख्ख उजळलेल्या त्या गर्दीचा अर्थ मला समजलाच नाही.
मकरंदने एक नारळ भाऊंच्या हातात दिला. भाऊंनी कट्ट्याच्या कोपऱ्यावर आपटून एका फटक्यात तो फोडला आणि मोठ्याने म्हणाले," हां, करा आता सुरू..."
त्याक्षणी त्या गर्दीला जीव आला. चारी कोपऱ्यात लावलेल्या कर्ण्यांमधून 'बिलनशी नागिन निघाली..ढिंगढिंग.. नागोबा घुमाया लागला..ढिंगढिंग..बिलनशी नागिन निघाली.. नागोबा घुमाया लागला..ढिंगांटिकां.. ढिंगांटिकां..' सुरू झालं. "पाच खाली...पाच खाली...", "लगाव..लगाव..", "आव...आव...", "एक का दस! एक का दस!", "है शाब्बास! लगा,लगा, लगा" अशा ललकाऱ्या प्रत्येक टेबलावरून ऐकू येऊ लागल्या. हजारभर माणसं एका विलक्षण धुंदीत बेहोष होत होती.
"हा आमचा ग्रँड कसीनो हां..." मकरंद म्हणाला आणि माझ्या टाळक्यात थोडा उजेड पडला.
"प्रत्येक टेबलावर चक्री, फासे किंवा पत्ते आहेत. सुसंस्कृत भाषेत रोले व्हील, डाइस आणि ब्लॅक जॅक म्हण रे!" मकरंद उपरोधिकपणे म्हणाला,"खेळतोस काय?"
"मी?"
"का रे? लक्ष्मीपूजनाला जुगार खेळावा असं म्हणतात ना ती सुसंस्कृत माणसं? मग बघ की खेळून कशी मजा येते!" मकरंद हसत होता,
"खेळतोस काय? एका रुपयाला दहा रुपये मिळतील बघ!"
"नको, नको!" मी घाईघाईनं म्हणालो.
"आणि राजा तू रे?" मकरंद राजाकडे वळला. तोही नुसता बघत होता.
"आं?"
"खेळतोस काय?" मकरंद आमंत्रण देत होता.
"नाय राव. हे आपल्याला नाही जमायचं, बघताबघता गंडवतील मला ," राजा.
" राजा, इथं फसवाफसवी नाही. एकदम चोख व्यवहार असतो. माझा हुकूमच आहे तसा!"
"म्हणजे, हेपण तूच!?" मी आवंढा गिळला.
"मग? अरे, भाऊंना बाहेरचे काँटॅक्ट बघायचे असतात. शिवाय आता राजकारण आहे. दरवर्षी कसल्यातरी निवडणुका असतातच. मग त्यात त्यांचा वेळ जातो. माणसं, पैसे, मतं... कटकटीचं काम. शिवाय आपल्या माणसांना सांभाळायचं, त्यांच्या पोलिस-केसेस, कोर्ट, कुटुंबं - सगळं करायला लागतं त्यांना. म्हणून सगळे धंदे मीच सांभाळतो!" मकरंद तटस्थपणे सांगत होता. " पुणे मटकासुद्धा!"
"मटका म्हणजे काय असतं?" मी कुतूहलानं विचारलं," हा काय प्रकार असतो? मडक्याशी काय संबंध याचा?"
"पूर्वी मडक्यातून पत्ते काढत असत. मलाही नक्की माहीत नाही. पण मटका म्हणजे नक्की काय ते असं सांगून नाही कळायचं तुला. तो एक चमत्कार आहे म्हण की. 'सचोटी' कशाला म्हणतात ते शिकावं त्यात. एका कागदाच्या चिटोऱ्यावर रिफिलनं खरडलेल्या काही आकड्यात करोडो रुपयांचा व्यवहार होतो. आहेस कुठं? आज कल्याणाला पाच कोटी, मुंबईला साडे तीन आणि आमच्या मटक्याला ऐंशी लाख लागलेत ओपनला. क्लोजला तितकेच... हे फक्त आमच्या भागातून. एकूण किती असतील त्याची कल्पना कर फक्त."
"ओपन काय..क्लोज काय! काही समजत नाही मला. जाऊ दे." मी आक्रसलो.
"अरे ते सोपं आहे.. एक ते दहा कोणतेही तीन अंक सांग मला.."
"पाच.. तीन.. दोन.." मी गमतीत म्हणालो.
"हा.. आता या तीन संख्यांची बेरीज कर.."
"दहा.."
"हां.. हे दोन, तीन, पाच म्हणजे पानं आणि हा दहा म्हणजे आकडा."
"आकडा?"
"हा झाला ओपन. आता पुन्हा तीन अंक सांग..."
"चार.. सहा.. आठ.."
"बेरीज अठरा.. आठ आणि एक नऊ..म्हणजे नऊ. चार, सहा, आठ आणि नऊ .. हा झाला क्लोज." मकरंद लिहून घेत होता.
"आता बघ. लोक या एक ते दहा यांपैकी कोणत्याही सहा अंकांवर पैसे लावतात. ओपनला आणि क्लोजला - असं म्हणायची पद्धत आहे - ती आली लंडन कॉटन, मुंबै कॉटन स्पेक्युलेशनच्या काळात - इंग्रजांचं राज्य होतं तेव्हाच सट्टा होता. लंडन कॉटनच्या मार्केट ओपन आणि क्लोज होण्याच्या भावावर सट्टा खेळत लोक. इंग्रज गेले पण ओपन-क्लोज मागे ठेवून. आज शेअर मार्केटसुद्धा स्पेक्युलेशनवरच चालतं. हर्षद मेहताचं नाव ऐकलं आहेस ना?"
त्यावेळी हर्षद मेहता अजून जोरात होता. शेअर मार्केटचा सम्राट होता. प्रत्येक वर्तमानपत्रात दररोज त्याच्या अफाट श्रीमंतीच्या बातम्या छापून येत होत्या. सुशिक्षित, मध्यमवर्गीय समाज झटपट श्रीमंत होण्याशी स्वप्नं पाहत होता.
"मटका म्हणजे या असंस्कृत, रानटी माणसांचं स्टॉक मार्केट रे! फक्त नाव वेगळं, दर्जा वेगळा.. " मकरंद मिस्किलपणे म्हणाला,"एका रुपयाला आठ, ऐंशी किंवा आठ हजार रुपये मिळतात इथे. एका पानाला आठपट, दोन्ही आकड्यांना ऐंशीपट आणि जर सगळी पानं बरोबर आली तर - आठ हजार पट!! आणि एक रुपयासुद्धा पुरतो हा सट्टा खेळायला. स्टॉक मार्केटसाठी लागणारे हजारो रुपये नसले तरी चालतात. कोणीही भिकारीसुद्धा खेळू शकतो आणि लक्षाधीश बनू शकतो. लॉटरीचं तिकीट लागलं तर सरकार इन्कम टॅक्स कापून घेतं.. इथं नो टॅक्स.. रोखीचा व्यवहार, ताबडतोब पैसे... काय घेतोस ना लॉटरीचं तिकीट?" मकरंद डोळे मिचकावत म्हणाला.
"अरे पण, लॉटरीतून मिळणारा फायदा शेवटी सरकारच्या म्हणजे लोकांच्याच वापरासाठी खर्च होतो!" मी लॉटरीचं समर्थन करत होतो की माझ्या लॉटरी खरेदीचं?
"म्हणजे पुढाऱ्यांच्या आणि पैसे खाणाऱ्या ऑफिसर्सच्या फायद्यासाठी.. असंच ना? आणि इथे आलेला पैसा? ही जी हजारो माणसं राहतात, जगतात सुंदरनगरात त्यांचा खर्च कुठून येतो वाटतंय तुला? या अशिक्षित, असंस्कृत माणसांना कोण देणार पगार? त्यांना अडीअडचणीला कितीही पैसे लागले तरी भाऊ देतात सगळे. शिवाय सणावाराला बोनस, कपडेलत्ते! सुंदराताईला देवी मानतात लोक इथले.."
मी निरुत्तर झालो.
हळूहळू कट्ट्यासमोर माणसे जमा होऊ लागली. तिथे एक फळा मांडण्यात आला. त्याच्या समोर देवासमोर लावतात तसा उदबत्तींचा जुडगा लावला गेली. एका फ्लडलाइटचा प्रकाशझोत फळ्यावर सोडण्यात आला.
फळ्यावर वरच्या बाजूला मध्यभागी मोठ्या अक्षरात "श्री" रंगवला होता तर एका कोपऱ्यात "शुभ" आणि दुसऱ्या कोपऱ्यात "लाभ". खाली तीन चौकटी, मग त्याखाली एक, खाली पुन्हा तीन आणि पुन्हा त्याखाली एक.
एक खुरटी दाढी वाढवलेला, लालबुंद डोळ्यांचा इसम मकरंदकडे येऊन म्हणाला, "दादा, तयारी झाली."
मकरंदने घड्याळात नजर टाकली, म्हणाला, "साडे आठला ओपन आहे आपला..." मग तो फळ्याकडे गेला आणि एक खडू घेऊन चौकटीत अंक लिहू लागला. आता मैदानातला प्रत्येकजण फळ्याकडे पाहत होता. प्रत्येकाचा श्वास रोखलेला होता.
"दुर्री..."मकरंदच्या अंक लिहिण्याबरोबर गर्दीतून आरोळी उठत होती.
"तिरी..."
"पंज्या"...
"ओपन दस्श्या.....दस्श्या ओपन -मेंढी आली! " एकदम जोरदार आरोळी उठली. फटाक्यांचा आवाज घुमू लागला. अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. मी पाहतच राहिलो. मी गंमत म्हणून सांगितलेल्या आकड्यांवर आज अनेकांचं भाग्य उजळत होतं...अनेकांच्या आयुष्यात दिवाळी साजरी होणार होती. साक्षात लक्ष्मीनं आज लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझ्या तोंडून तिची इच्छा बोलून दाखवली होती.
"पुढचे तीन कुणाला सांगू नकोस हां!" मकरंद माझ्या कानात पुटपुटला.
"आणि क्लोज रे?" राजा विचारता झाला.
"तो रात्री एक वाजता!" मकरंदने माहिती पुरवली."प्रत्येक मटक्याच्या वेळा ठरलेल्या असतात. शक्यतो इतर मटक्यांशी क्लॅश होऊ देत नाहीत."
"चला, निघू या काय? साडे आठ वाजले!" मी भानावर येऊन म्हणालो.
"निघायचं लगेच?" मकरंद मैदानाकडं पाहत म्हणाला," अरे, आत्ता कुठे रंग भरायला लागलाय.."
"आता नको, उशीर झालाय. रात्री गावी पोचलं पाहिजे." राजानंही अनुमोदन दिले.
"पुन्हा कधीतरी येईन.." मी पुटपुटलो.
"हा..हा.. हा..." मकरंद मोठ्याने हसला. "आता पुन्हा कशाला येणार तुम्ही लोक इकडे?"
"नाही.. तुला भेटायला कधीतरी..." मी कसंनुसं म्हणालो.
"जाऊ दे रे, ते तुझं जग वेगळं, आमचं हे जग वेगळं.. तू कशाला फिरकतोस आता इकडे? हा... कधी आठवण झाली तर फोन कर मला. आणि पुण्यात कधीही, कसलीही अडचण आली तर सांग, एका फटक्यात सोडवीन - हा मकरंद साठेचा शब्द आहे. आठवण मात्र ठेव हां."
"काय हे मकरंद? तुला, भाऊंना, या सुंदरनगराला आयुष्यात कधी विसरू शकेन का मी?" मी मनापासून म्हणालो.
"बरं, चला आता..." मकरंद आम्हाला घेऊन परत निघाला.
* * * *
उपसंहार
भाऊंच्या गाडीतून आम्ही परत आमच्या गावी सुखरूप पोचलो.
भाऊंच्या यशस्वी भेटीची बातमी ऐकून आमचे मित्रमंडळ अत्यंत खूष झाले.
पाच नोव्हेंबरला ठरल्याप्रमाणे शिवाजी मैदानावर आस-पारा संयुक्त विद्यमाने डर्टट्रॅक मोटरसायकलिंग स्पर्धा झाल्या.
भाऊंच्या शब्दाप्रमाणे मुंबईचे - पुण्याचे तीस - चाळीस स्पर्धक स्वखर्चाने स्पर्धेला आले.
स्पर्धेच्या वेळेत गावात जणू कर्फ्यू लागला होता. सारं गावच मैदानावर स्पर्धा पाहण्यासाठी जमा झालं होतं. कोडोलीकर सरकार - आण्णा कलावंतही आले होते.
हजारो लोकांनी टाळ्या, शिट्ट्या आणि आरोळ्यांनी मैदान दणाणून सोडले. अनेक पटके, टोप्या हवेत उडवल्या गेल्या.
संजय बारकुटे, विजय बारकुटे, निव्या, विष्णू, बालमुकुंद, देवू , श्रीनिवास पाडळे, उत्तम पाटील, विकास पाटील, सुदर्शन माळी, निशिकांत मुक्कणावर, किरण परचुरे, हेमंत सावंत, अजय जोशी, संजय कणकवलीकर - सगळी मंडळी कृतकृत्य झाली.
श्रीकांत गोगटे प्रमुख निरीक्षक म्हणून आले होते. त्यांनी आमच्या प्रयत्नांची वाखाणणी केली. पुढच्या वर्षी कोडोलीच्या माळावर मोटोक्रॉस स्पर्धा घेण्याचं जाहीर करून टाकलं.
इंदिरा गांधी सहकारी साखर कारखान्यानं आमच्या क्लबला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली.
दुसऱ्या दिवशी दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रातल्या वर्तमान पत्रांमध्ये स्पर्धेचे वृत्तांत छापून आले. राजाचा फोटोही आला होता. कुठेकुठे माझाही उल्लेख होता.
पण मकरंद साठे या नावाचा उल्लेख कुठेच नव्हता आणि तो कधीही होणार नाही याची मला खात्री होती. मकरंद साठेचं पुढं काय झालं हे मला माहित नाही. माझं पुढं काय झालं ते त्यालाही माहीत नाही.
प्रत्येक दिवाळीत मला तो हमखास आठवतो. तुम्हाला भेटला तर तुम्ही सांगा त्याला - मी आठवण काढत होतो म्हणून...
या दिवाळीत पुण्याला गेलो तर त्याला भेटीन म्हणतो... लक्ष्मीपूजनादिवशी - तो सुंदरनगरातच असेल आणि सुंदरनगर तिथेच असेल तर!!
विसुनाना