एक दिवाळी अशीही येते-६

      घरच्यांच्या विरोधाला न जुमानता 'मी लक्ष्मीपूजनाला पुण्याला जाणार' हाच धोशा कायम ठेवला. पाडव्याला परत येण्याचे वचन दिले. माझे जाणे कसे अनिवार्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला तेव्हा कुठे, "आता तुला काय बांधून घालणार आम्ही? जा कुठे मुलखावर जायचे तिकडे!"अशा शब्दात त्यांची परवानगी मिळाली.

      नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान,फटाके, फराळ वगैरे उरकले. खरे म्हणजे दरवर्षी येते तशी मजा आलीच नाही. आता उद्या पुण्याला जायचे, तिथे काय होते कुणास ठाऊक? अशा धाकधुकीने मनात फारसा उत्साह नव्हता. संध्याकाळ झाली तसे एका पिशवीत कपडे भरले. आम्ही रात्रीच्या एस.टी. ने पुण्याला निघणार होतो.
"अवसेला प्रवास करू नये. पण आजकाल लोकांना काही धरबंधच राहिला नाही!" असे पुटपुटत आजीने माझी दृष्ट काढली. "नीट सांभाळून जा आणि पोचल्यावर फोन कर."

      नऊ वाजताच्या एशियाडने मी आणि राजा पुण्याला निघालो. बस सुरू झाल्याबरोबर प्रवास सुरू करण्याच्या अगोदर त्याच्या प्रघाताप्रमाणे राजाने," गुरुदेव दत्त!" चा घोष केला. इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना मला कधी झोप लागली ते कळलेच नाही.
"विश्या, ऊठ. पुणे आलं." राजानं मला हालवून जागं केलं तेव्हा कळलं की बस स्वारगेटात उभी होती.घड्याळात नजर टाकली तर रात्रीचा दीड वाजला होता. बाहेर आलो. तिथं शुकशुकाट होता. रांगेत रिक्षा लावून डोक्याला मफलर गुंडाळलेले दहा-बारा रिक्षावाले पेंगत, नाहीतर सिगरेट फुंकत बसले होते. हवा चांगलीच थंड होती.
"मालक, हडपसरला येणार काय?" राजानं पहिल्या रिक्षावाल्याला विचारलं.
"हडपसरला कुठं?" रिक्षावाला धूर सोडत म्हणाला.
"सुंदरनगर...." मी कुडकुडत होतो.
"नाय.. नाय...,तिकडे नाय. मागं विचारा ," रिक्षावाल्यानं माशी उडवावी तसे आम्हाला उडवून लावले.
एकेकाला विचारत आम्ही शेवटच्या रिक्षावाल्यापर्यंत पोचलो. त्यानंही नन्नाचा पाढा वाचल्यावर मात्र राजाचं डोकं सटकलं.
तो परत पहिल्या रिक्षावाल्याकडे वळला," अय रांडेच्या, तू कवातरी हडपसरला जाशील न्हवं? तुझा नंबर लिहून घेतलाय मी. भाऊंना देतो. घावलास की मग समजंल तुला."
रिक्षावाला तंतरला."भाऊ म्हंजे?"
"भाऊ म्हंजे आनंदराव धारगुडे!" मला आता अवसान आले होते.
"तुमाला भाऊंकडे जायचं हाय का? अवो, मग पहिलेच सांगायचं ना! बसा, साहेब, बसा...बसा!" रिक्षावाला आता फारच अदबीने बोलू लागला.
आनंदराव ऊर्फ भाऊ हे काय प्रकरण काय आहे ते आता हळू हळू समजू लागले होते.
"अहो, पण भाऊ सुंदरनगरात रहात न्हाईत. मेन रोडवर ऱ्हातात." रिक्षावाला आम्हाला समजावून सांगत होता. "त्यांचं गेस्टहौस तितंच हाये, वरच्या मजल्यावर!"
"मग तिकडंच घ्या..." राजानं हुकूम सोडला.
"घ्या , घ्या सिगरेट घ्या ," रिक्षावाला आता फारच मऊ झाला होता. राजानं सिगरेट शिलगावली.

      स्वारगेट ते धारगुडे गेस्ट हाउस, हडपसर या प्रवासात भाऊ किती थोर आहेत, त्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत याचे भावपूर्ण वर्णन रिक्षावाला करत होता.
"हे आलं बघा, भाऊंचं घर." एका चारमजली आपार्टमेंटवजा इमारतीसमोर रिक्षा थांबवत रिक्षावाला म्हणाला.
"किती झाले?" मी.
"कसले?", रिक्षावाला.
"भाडे!" मी.
"काय राव, चेष्टा करताय काय गरीबाची? भाऊंना सांगा, निल्या शेवंत्याच्या रिक्षातून आलो. त्यानं नमस्कार सांगिटलाय. " रिक्षावाला उर्फ निल्या शेवंते अजिजीनं म्हणाला.
"बरं..बरं!" राजानं त्याला निरोप दिला.

      इमारतीच्या गेटमध्ये पद्धतशीर शिक्युरिटीची माणसं होती. त्यांच्याशी आम्ही कोण? कुठले? कशासाठी आलो? वगैरे बोलल्यावर त्यांनी 'आत' फोन लावला. तिसऱ्या मजल्यावर एक दिवा लागला.
त्यांचे बोलणे झाल्यावर एका वॉचमनने आमची तपासणी केली. आमच्या पिशव्या, खिसे, हात, पाय वगैरे चांगले चाचपून पाहिल्यावर तो खोटं-खोटं हसत म्हणाला, "डूटी हाये, करावं लागतं!"
मग त्याने आम्हाला लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर नेले. तिथे एक पंचविशीतला, सडपातळ बांध्याचा, घाऱ्या डोळ्यांचा, हसतमुख तरुण उभा होता.
"या, या, देशपांडे... तुमचीच वाट पाहत होतो!" तो तरुण सलगीने म्हणाला,"मी मकरंद साठे, भाऊंचा सेक्रेटरी. भाऊ झोपलेत आता. दिवसभर खूप कामात होते. सकाळी लवकर उठायचं आहे ना..."
"बरोबर आहे साठेसाहेब." राजानं रुकार दिला.
"साठेसाहेब? अहो, नुसतं मकरंद  म्हणा मला!" मकरंद हासत म्हणाला. त्याच्या बोलण्यात एक मित्रत्वाची भावना होती. समोरच्या माणसाला चटकन आपलंसं करून घेण्याची कला त्याला साधलेली होती.
"या..." त्यानं एका फ्लॅटचं दार उघडलं आणि आतले दिवे लावले,"हे आमचं गेस्ट हाउस... मी शेजारच्या फ्लॅटमध्ये राहतो."

      एखाद्या फाइव-स्टार हॉटेलमध्ये शोभावा असा तो 'सुईट' होता. वॉल-टू-वॉल कारपेट, राजेशाही कोच, काचेचे सेंटर टेबल, असंख्य लोलकांचे झुंबर, स्प्लिट एसी, व्हेनेशियन ब्लाईंडस लावलेल्या फ्रेंच विंडोज, एका कोपऱ्यात उंची मद्यांनी भरलेला बार, भिंतीवर ओरिजिनाला ऑइल पेंटिंग्ज, सोनेरी नक्षीकाम केलेलं फॉल्स सीलिंग... आम्ही एका राजमहालात उभे होतो. आमचे पाय जमिनीला टेकलेले नव्हतेच मुळी. ते होते पर्शियन गालिच्यात एक इंच रुतलेले आणि आम्ही उभे होतो जणू मऊमऊ ढगांवर!

      हडपसरमधल्या बाहेरून अत्यंत सर्वसाधारण दिसणाऱ्या, न रंगवलेल्या एका इमारतीत असा रंगीबेरंगी स्वर्ग अवतरला असेल असं स्वप्नातही वाटणं शक्य नव्हतं.
"बापरे!" माझ्या तोंडून निघून गेलं.
"आत बेडरूम्स आहेत. किचन आहे. फ्रीजमध्ये खायचं प्यायचं सगळं आहे. आणखी काहीही लागलं तर बेल मारा. लगेच मिळेल." मकरंद 'काहीही' या शब्दावर जोर देत म्हणाला.
"आता काहीच नको. झोपतो आता." राजा म्हणाला.
" निवांत झोपा. सकाळी बोलू...गुडनाईट!" मकरंद मिस्किल स्वरात म्हणाला आणि आम्हाला आत सोडून निघून गेला.
"राजा, हे भलतंच प्रकरण दिसतंय ," मी
"विश्या, झोप आता..."राजानं चर्चा संपवली.
बेडरूमच्या राजेशाही बेडवर आम्ही लवंडलो. उबदार दुलईत झोप कधी आली ते कळलेच नाही.
****

      सकाळी जाग आली तेव्हा ठरवून टाकलं, आता जे जे होईल ते फक्त पाहत राहायचं. फार डोकं चालवायचं नाही. 'युअर बाथरूम ईज अ रूम टू' या जाहिरातीची आठवण करून देणाऱ्या न्हाणीघरात सकाळची आन्हिकं उरकून दिवाणखान्यात आलो. राजा अगोदरच तयार झाला होता आणि कोचावर बसून पेपर वाचत होता.
"गूड मॉर्निंग स्,सर!" कडक इस्त्री केलेला सूट घालून दाराजवळ उभ्या असलेल्या वेटर(?) ने कडक सलाम ठोकला. तो मला उद्देशून सर म्हणाला तेव्हा माझ्या आवाजात उसना भारदस्तपणा आणत मी 'गूड मॉर्निंग' म्हणालो.
"ब्रेकफास्टला काय घेणार, सर - ?" त्याने हातातले पदार्थ टेबलावर मांडत विचारले.
"मी..." माझे उत्तर घशातच अडकले. कारण टेबलावर जॅम, बटर, ब्रेड, ऑम्लेट, टोस्ट, फळे, ज्यूस, कॉफी यांच्या बरोबरच दोन बियरच्या बाटल्या आणि खारे काजूही होते,"हे काय? सक्काळी, सक्काळी बियर...?" मी थक्क होऊन विचारले.
"आमचे बरेच गेस्ट हेच घेतात, सर. म्हणून...." तो अदबीने म्हणाला.
"अरे विश्या, तू ते टोस्ट खा आणि कॉफी ढोस. झालं ना?" राजाने मला समजावले, "वोक्के, यू गो" राजाने आपले रुबाबदार इंग्रजी वेटरवर झाडले. तसा आणखी एक सलाम ठोकून तो निघून गेला.

      मी कोचावर बसलो तर तो गुबगुबीत कोच चांगला आठ इंच आत दबला. बोस म्युझिक सिस्टिमवर बिस्मिल्लाखानाची सनई सुरू होती.  अहाहा, सकाळी आठ-साडे आठची वेळ, थंडगार वातावरण, मनाजोगता ब्रेकफास्ट, गरमागरम-वाफाळती कॉफी, कानात बिस्मिल्लाखांसाहेबांची सनई, समोर तीनचार मराठी-इंग्रजी  पेपर्स! आदर्श सकाळ...  तिचा मनसोक्त आनंद लुटत असतानाच बेल वाजली.
यावेळी दारात मकरंद साठे उभा होता. "गुड मॉर्निंग, विश्वास!, विश्वासच नाव आहे ना तुझं?" मकरंदच्या बोलण्यात तीच सलगीची, आपुलकीची छ्टा होती. मग राजाकडे वळत म्हणाला, "गुड मॉर्निंग, राजे सरकार!"
"गुड मॉर्निंग, या, आत या.." मी.
"अरे विश्वास, हे आहो, जाहो करू नकोस बाबा.., अरे, मी तुझ्यापेक्षा फारतर दोन-तीन वर्षांनी मोठा असेन. किती? वय किती आहे तुझं?"
"बावीस"
"आणि माझं सव्वीस!! बघ, अरे आपण मस्तपैकी अरे-जारे म्हणू, काय?" तो हसत म्हणाला.
त्याचं व्यक्तिमत्त्व एकदम उमदं, छाप पाडणारं होतं.
"बसा.. आपलं.. बस ना... घे, कॉफी घे..." मी त्याचा पाहुणचार त्यालाच परत करत होतो.
"अरे, आत्ताच ब्रेकफास्ट झालाय माझा... डोन्ट बॉदर! तू घे ना..." तो बसत म्हणाला, " काय राजूमालक, झोप-बीप झाली ना मस्त?"
"झकास," राजा खुशीने म्हणाला.
"आणि काय पाहिजे काय खायला-प्यायला?"
"आता काय लाजिवताय होय?" राजा त्याच्या पाठीवर थाप मारत म्हणाला.
साठेच्या सलगीची लागण आता राजाला झाली होती.
"पण, हे विश्वासराव काय खुलत नाहीत अजून... काय विसुभाऊ?" तो माझ्याकडे पाहत राजाला म्हणाला.
"न्हाई, त्यो जरा बावचळल्यागत झालाय..." राजाने बियर बाटलीकडे बोट दाखवत म्हटले.

      मकरंद मोठ्याने हसू लागला. "विसू, अरे ते आमच्या नेहमीच्या पाहुण्यांना लागतं. बरीच मोठी मंडळी येतात इथे. अरे, काहीजण तर सकाळीच पहिल्या धारेची मागणी करतात, काय समजलास? म्हणून ब्रेकफास्टला बियर - तंदुरी चिकन देण्याच्या प्रघात आहे इथे. मंत्री, मोठे ऑफिसर्स, दादा - भाई , चित्रपट निर्माते...कधीकधी ही रोजसुद्धा येतात. त्यांच्या एकेक सवयी पाहून अगोदर मीही असाच बावचळून जायचो. पण आता काही वाटत नाही. अरे, तीन-चार वर्षापूर्वी मीपण तुझ्यासारखाच एक मध्यमवर्गातून आलेला इंजिनियर होतो... साधा इंजिनियर नाही, सीओईपीमधून कॉँप्युटर सायन्स केलंय मी..." त्याच्या स्वरात कोरडेपणा होता.

      मी 'आ' वासून ऐकत होतो. सीओईपीतून कॉँप्युटर इंजिनियर झालेला एक मध्यमवर्गीय, सुसंस्कृत, उमदा, हसतमुख तरुण एका अंडरवर्ल्ड डॉनचा सेक्रेटरी? काहीच ताळतंत्र लागत नव्हते.
"मग तू इथे...!!?" माझ्या तोंडून निघून गेलेच.
"विश्या, लेका तुला किती वेळा सांगिटलं? लै चौकशा नको करूस!" राजानं मला झापलं.
"असू दे राजाभाऊ, अरे कुणालाही हा प्रश्न पडणारच! इंजिनियर झालेला , सदाशिवपेठेतला एक कोकणस्थ ब्राह्मण मुलगा इथे एका कुप्रसिद्ध गुंडाचा सेक्रेटरी म्हणून कसा?" मकरंद स्पष्टपणे म्हणाला,"हा प्रश्न अजून मलाच पडलाय. पाच वर्षांपूर्वी मला जर कोणी तुझ्या आयुष्यात हे असं होणार आहे म्हणून सांगितलं असतं तर मी त्याला वेड्यात जमा केलं असतं. पण आता वाटतं - आपल्या आयुष्यात पुढं काय वाढून ठेवलंय हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाच्या बापालाही कळणं शक्य नाही.. म्हणजे ब्रह्मदेव असेल तर हां..." तो पुन्हा हसू लागला. मी आणि राजा दोघेही अवाक झालो होतो.
"अरे, हे तर काहीच नाही... तुला माहीत नसेल म्हणून सांगतो - मी फक्त भाऊंचा सेक्रेटरी नाही - त्यांचा मेव्हणा आहे मी! माझी बहीण - मयुरी  - म्हणजे आताची सुंदराताई - त्याची पहिली बायको आहे. सुंदरनगर - नाव ऐकलंस ना? ते  सगळं माझ्या ताईचं आहे. आहेस कुठे?" आता मात्र आम्ही उडालोच. सुंदरनगर - म्हणजे भाऊच्या बायकोच्या नावाची वस्ती- टाळक्यात हळुहळू प्रकाश पडत होता.

      एकदम स्वर बदलत तो म्हणाला,"असो. या विषयावर पुन्हा कधी बोलू. तर.. आज दुपारी तीन वाजता भाऊ तुम्हाला भेटतील. दुपारी ते तसे रिकामे आहेत. एक रायटर येणार आहे मुंबईहून - भाऊंच्या नव्या पिक्चरची स्टोरी सांगायला. तेव्हा बसू... तो पर्यंत निवांत फिरून या, जेवण करा. खाली वाहनं आहेत -पाहिजेत तर-  मी निघतो आता - आज लक्ष्मीपूजनाची बरीच कामं आहेत.."
आम्हाला काही बोलण्याइतके सावरण्याची संधी न देताच तो निघूनही गेला.
काही वेळाने मी राजाला म्हणालो," राजा... हे भलतंच प्रकरण दिसतंय..."
"विष, तू लै विचार करतोस बाबा. आसंच असतंय. दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय"राजाने नेहमीप्रमाणे एक डायलॉग मारलाच.
मकरंद साठे या व्यक्तीविषयी गहन विचार करण्यात मी बुडून गेलो.
* * * *

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.