एक दिवाळी अशीही येते-२

      राजाचे गॅरेज म्हणजे त्याच्या घरासमोरच्या अंगणात टाकलेले पत्र्याचे छप्पर होते. एका भिंतीवर त्याच्या औजारांचा एक फलक होता.  त्यावर वेगवेगळ्या नंबरांचे पट्टीपाने, रिंगपाने, बॉक्सपाने, ऍलन कीज, पक्कडी, राघू पक्कडी, स्क्रू ड्रायव्हर लटकवण्यासाठी जागा होत्या.  पण त्यातली निम्म्याच्या वर हत्यारे कामगारांमध्ये फिरत असल्याने तो फलक रिकामाच दिसे. २०  बाय १५ च्या जागेत आणि गॅरेजसमोर, रस्त्यावरच्या झाडाखाली दुरुस्तीला आलेल्या स्कूटर, मोटरसायकली आणि मोपेड गाड्या, काढलेली आणि उघडलेली इंजिने,  क्लच प्लेटा, ब्रेकशू, गंजक्या रिम, सायलेन्सर, शॉकऑप (शॉक ऍब्सॉर्बर्स), जुने स्पेअर्स, पॅकिंग सील्स आणि शेल्लॅकच्या बाटल्या,  ऑइलच्या बुधल्या आणि जुने ऑइल काढलेल्या बुट्ट्या, ग्रीसचे डबे,  चेन, व्ही बेल्ट्स,  स्प्रॉकेट, पुल्या, गियर्स, पिस्टन, पिस्टन रिंगा, कारब्युरेटर, कनेक्टिंग रॉड, स्क्रू, नट, वायसर (वॉशर्स), बोल्ट, क्लच आणि ब्रेक केबल्स यांची एकच गर्दी उसळलेली असे. (बघा, मला  गॅरेजमध्ये बसूनबसून किती माहिती मिळाली.) या गर्दीतच गॅरेजमधले २ अनुभवी, ४ शिकाऊ आणि २ बारके कामगार वळवळत असत. राजा फक्त खास गिर्‍हाइकांच्या गाड्या, मॉडिफिकेशन आणि 'दमवणाऱ्या' गाड्यांनाच हात लावत असे. बारक्या हा प्रकार पाने, स्क्रू ड्रायव्हर आणून देण्यापासून ते 'चा' सांगणे, बिडी-काडी आणणे या कामांसाठी राखीव होता. वर्षानुवर्षे तेल सांडून आणि ग्रीसचे हात पुसून भिती, खांब आणि फरशी यांच्यावर एक काळा, बुळबुळीत राप चढलेला होता. त्यामुळे ते एक गॅरेज आहे,  हे वेगळे सांगण्याची गरज नव्हती. तरीही "हेच ते तासगावकर बंधू यांचे... तासगावकर मटन शॉप" च्या धर्तीवर “हेच ते राजू देशपांडे  यांचे... राजू देशपांडे  गॅरेज" असा बोर्ड लटकत होता. त्याखाली प्रोप्रा.राजू देशपांडे !! शिवाय, 'इंधनाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग' असेही एक वाक्य लिहिले होते. त्याबद्दल विचारले असता "विश्या, अरे साधा अर्थ आहे! तुम्ही इथे दुरुस्तीला गाडी टाकली की तिच्या टाकीतल्या इंधनाच्या प्रत्येक थेंबाचा वापर झाल्यावरच गाडी परत मिळेल!" असे राजाने मिस्किलपणे सांगितले होते.

      तर काय सांगत होतो? स्पर्धेचे कळल्यावर अनेक मंडळी राजाच्या गॅरेजवर चकरा टाकू लागली.  इनॅमलवेष्टित तांब्याच्या तारा गुंडाळण्याचे रिकामे झालेले रीळ हे गॅरेजमध्ये काम करणाऱ्या माणसाचे बसण्याचे स्टूल असते हे सर्वांना माहीतच आहे.  अशी सापडतील ती अनेक धडकी-मोडकी, काळपट रीळस्टुले - सापडतील त्या रिकाम्या जागांवर ठेवून मंडळी स्थानापन्न होत.  मग ब्रिस्टॉल शिलगावून, डोळे बारीक करून, गहन विचारात गुंगत आपापली मते मांडत.

      मग नेहमीप्रमाणेच या सर्व लोकांतला 'विंग्रजी' भाषा उत्तम (!) वाचणारा आणि लिवणारा (दीड)शहाणा माणूस म्हणून माझा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मला जाणवू लागले. त्यामुळे सर्व चर्चा आणि बैठकांमध्ये माझी उपस्थिती अत्यंत अनिवार्य असून,  माझ्या मताला मोठीच किंमत असल्याचे मला कळून चुकले.

      नेहमीप्रमाणे गावात (अर्थातच) अशाच प्रकारची स्पर्धा घेण्याची इच्छा असलेला आणखी एक गट होताच. राजा मोटोक्रॉस घेणार हे गावभर झाल्यावर या गटाकडून 'अशी स्पर्धा घेण्याची कल्पना मूळ आमचीच आहे, त्यामुळे आम्हीच ती घेणार,  असा प्रचार सुरू झाला. आता या गटाशी 'चर्चा' करणे भाग होते. मी अगोदरच म्हटल्याप्रमाणे असे बखेडे सोडवण्यात राजाचा हातखंडा असल्याने अर्थातच त्या मंडळींनी लवकरच आपला सवतासुभा सोडून राजाच्या स्पर्धेत सक्रिय मदत करण्याचे मान्य केले. मग तीही मंडळी राजाच्या गॅरेजवर चकरा मारू लागली.

      या चर्चांमध्ये एका एक्स्पर्ट निरीक्षकाची भूमिका घेऊन मी सहभागी होत असे आणि फक्त महत्त्वाच्या जागीच माझी मौलिक टिप्पणी करत असे. अर्थात त्यामुळे मी नेहमीच गॅरेजमधील  महत्त्वाच्या जागी, म्हणजे एकमेव लोखंडी खुर्चीवर स्थानापन्न होत असे हे वेगळे सांगणे नकोच.

      तर अशा बैठका सुरू झाल्यावर आमच्या (म्हणजे माझ्या! आणि खरे म्हणजे सर्वांच्याच) लक्षात आले की प्रतिस्पर्धी गटातील मंडळींचे म्हणणे खरेच होते. त्यांनी या स्पर्धेविषयी नुसता विचार केला नव्हता, तर त्याबद्दल अभ्यासही केला होता आणि मग त्याला केवढे मोठे भगीरथ प्रयत्न लागतील,  याचा अंदाज आल्याने त्यांनी तो विचार सोडून दिला होता.

      महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यातला कोणीही राजा नव्हता. "... की रे!"ची भीष्मप्रतिज्ञा केल्यावर त्यापासून ढळेल तो राजा कसला? (म्हणूनच कदाचित भीष्माचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजेसाहेबांनी तिशी ओलांडल्यावरही लग्न करण्याचे टाळले होते.)
"आता तुम्ही म्हणताय ते खरं. हे करायचं अवघड. पण पुण्यात घेतातच का नाही?" राजाचा प्रश्न होता.
"राजा, अरे पण ते पुणं आहे आणि तिथं कायपण होऊ शकतं...", संज्या बारकुटे म्हणाला. संजय आणि विजय बारकुटे हे दोघे बंधू उच्चशिक्षित  - इंजिनियर - वगैरे. संजय बारकुटेने एकदा कधीतरी पुण्याच्या मोटोक्रॉस स्पर्धेत भाग घेतला होता. (तो स्पर्धा पूर्ण करू शकला नाही हा भाग वेगळा.) यामुळे त्यांच्याकडे या भूतपूर्व-विरोधी गटाचे नेतृत्व आपोआपच चालत आलेले होते.
"मग आपलं गाव काय कमी आहेय का?" राजाचा गावाबद्दलचा अभिमान उफाळून आला.
"राजा, पण ते म्हणतात त्यात तथ्य आहे." मी माझा निर्णय दिला,"मोटोक्रॉस स्पर्धा कशी घेतात ते आपल्याला मुळीच माहीत नाही."
"त्याला काय-काय लागतं ते घेतलं की झालं की!"  राजाला स्पर्धेच्या यशाबद्दल प्रचंड आत्मविश्वास होता.
हे 'काय काय' म्हणजे सरकार दरबारी परवानग्या, अधिकृत मान्यता वगैरे. सरकारी परवानग्या मिळवणे या कामात राजा एकदम वाकबगार होता. पंचक्रोशीतल्या कोणत्याही सरकारी कार्यालयातल्या शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी राजाची ओळख असे. म्हणजे नसली तरी तो ती काढू शकत असे. मिळवलेला संदर्भ त्या व्यक्तीसाठी इतका खासंखास असे की राजाने घातलेली गळ ती व्यक्ती नाकारू शकत नसे. बऱ्याच वेळेला तर राजाने खुद्द त्या व्यक्तीलाच काही वैयक्तिक बाबीत मदत केलेली असे. राजा वैयक्तिक स्वार्थासाठी कधीच काही करत नाही हेही सर्वज्ञात होते. या त्याच्या अनेक मैत्रीसंबंधांमुळे राजाला सर्वजण मदत करत.
तर अशा रितीने जे-जे लागते ते सर्व होणारच याची खातरजमा होती. मग मंडळी स्पर्धा कुठे ठेवावी या विषयाकडे वळली.
"कोडोलीच्या माळावर ठेवू. एकदम तयार आहे ट्रॅक. जादा काही करायची गरज नाही." विजा बारकुटे म्हणाला. त्याचा भाऊ संजा बारकुटे हौशी मोटोक्रॉस खेळाडू होता. तो गावाबाहेरच्या एका उजाड माळावर प्रॅक्टिस करत असे. त्या माळाजवळच कोडोली हे गाव असल्याने त्याला `कोडोलीचा माळ` म्हणत.  या माळावर निसर्गतया निर्माण झालेले काही उंचवटे आणि खड्डे होते. त्यामुळे तो माळ गाड्या उडवण्याच्या स्पर्धेसाठी उत्तम असे त्याचे म्हणणे होते.
"असं काय ? चला बघू या." म्हणत आमची फौज माळाकडे निघाली. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकास आणि पर्यायाने साऱ्या गावाला आम्ही 'स्पर्धेची जागा पाहण्यास जात आहोत' हे जाहीर झाले. त्यामुळे गावातले बरेच जण आमच्या संगतीने आपापल्या दुचाक्या घेऊन कोडोलीच्या माळाच्या दिशेने निघाले.

      माळावर बरेच मातीचे ढिगारे, खड्डे होते. नुकताच पाऊस पडून गेल्याने चिखलही होता. काही खड्ड्यात पाणी साचलेले होते. काही ठिकाणी गवत माजले होते. असा मोटोक्रॉसचा नैसर्गिक ट्रॅक त्रैलोक्यात मिळणार नाही, याची आम्हाला खात्रीच झाली. बघता बघता चांगले पंचवीस-तीस गडी माळावर गाड्या उडवून ट्रॅकची चाचणी करू लागले.  त्यात एकादोघांची हाडे ढिली झाली, एका गाडीच्या पुढच्या चाकाची रिम वाकडी झाली. त्यामुळे हा ट्रॅक भलताच चॅलेंजिंग होणार, अशी प्रत्येकाची खात्री झाली.
"कुणाचा रं हा माळ?" विकशा पाटलानं पाईंटाचा मुद्दा काढला.  कारण त्या माळावर स्पर्धा ठेवायची,  तर माळ उजाडच असला तरी त्याच्या मालकाची परवानगी लागणार हे स्पष्ट होते.
 "कोडोलीकर सरकारांचा." हे कोडोलीकर सरकार म्हणजे कोडोली गावचे पूर्वाश्रमीचे वतनदार आणि लोकशाहीत कोडोली बुद्रुक ग्रामपंचायतीचे आजन्म सरपंच होते. तसे बऱ्यापैकी खाष्ट म्हणून त्यांचा लौकिक होता.
"त्यांचं माझ्याकडे लागलं,"  बालमुकुंद मिस्त्री म्हणाला.  सरकार रिवाजाप्रमाणे बुलेट मोटरसायकलच वापरत. ती मोटरसायकल सरकारांना आपल्या मिशीइतकीच प्रिय. बुलेट एका किकमध्ये स्टार्ट झालीच पाहिजे, तिचा आवाज दोन मैलांवरून ऐकू आलाच पाहिजे, तिचा हेडलाईट 'सर्चलाईट झक मारंल' असा झगझगीत असलाच पाहिजे,  असल्या बऱ्याच 'च' बाबी बालमुकुंदा 'बुलेट स्पेशालिष्ट्' म्हणून सांभाळत होता. त्याकारणाने आठवड्यातून सरकारांची एखादी फेरी बालमुकुंदाच्या गॅरेजवर होत असे. मुकुंदानेही त्या बुलेटला एकदम झ्याकपाक ठेवले होते.  त्यामुळे मुकुंदावर सरकारांची खास मर्जी होती. ते मुकुंदाचा शब्द मोडणार नाहीत, ही खात्री असल्याने "स्पर्धेचे स्थळ : कोडोलीचा माळ" ही स्पर्धेच्या जाहिरातीवरची अक्षरे आम्हाला स्पष्ट दिसू लागली.

      हळूहळू स्पर्धेचे वारे गावाच्या कानात शिरू लागले होते.  आमच्या दैनंदिन बैठका जोमाने सुरू होत्या. मध्यंतरी बालमुकुंदाने कोडोलीकर सरकारांच्या बुलेटला असे टायमिंग सेट केले की ती अर्ध्या किकमध्येच स्टार्ट् होऊ लागली आणि तिचा आवाज तीन मैलांवरून 'सपष्ट' ऐकू येऊ लागला. त्यामुळे "शेर्त्या लावताय व्हय माळावर?  अरं, मंग लावा की! इच्यारताय काय त्यात, मर्दांनो?" अशा शब्दात सरकारांची परवानगी आम्हाला मिळाली. त्यांच्या दृष्टीने मोटोक्रॉस म्हणजे नव्या युगातल्या बैलगाड्यांच्या शर्यतीच होत्या. (एका दृष्टीने खरंच आहे ते!) अर्थात साऱ्या गावालाही ते स्थळ थोड्याच दिवसात जाहिरात न करताच कळले ही गोष्ट अलाहिदा. कारण "आमच्या माळावर मोटारसायकल शेर्त्या हायती, बगायला यायचं बरं का" असं मिशीवर ताव देऊन सांगत दस्तूरखुद्द सरकारच गावभर फिरू लागले.

      ही परवानगी मिळाल्यावर आमच्या उत्साहाला खूपच उधाण आले. आम्ही कोडोलीच्या माळावर एका दिवसात कधीही आणि कितीही फेऱ्या मारू लागलो. माळाचा सर्व्हे करून ट्रॅक कसा करता येईल त्याची मनातल्या मनात आखणी करू लागलो. बोराच्या झाडापाशी मांडव घालायचा, तिथनं स्टार्ट - मग सरळ जाऊन मारुतीच्या दगडापाशी काटकोनातलं वळण,  मग परत सरळ जाऊन पुढच्या टेंगळावर पहिली उडी - थेट पुढच्या डबक्यात- वगैरे. माळावरच्या झाड, झुडूप, दगड, ढिगारा, खड्डा, डबके या सर्वांना सांकेतिक नावे देऊन बऱ्याच उहापोहानंतर ट्रॅकचे तीन कच्चे आराखडे निर्माण करण्यात मला यश आले. त्यांचे सर्व मंडळींनी कौतुक केल्यावर माझ्या अंगावर मूठभर मांस चढले.   
***
  पण प्रत्यक्षात स्पर्धा कशी घेतात त्याबद्दल काहीच माहीत नसल्याने एखाद्या अनुभवी व्यक्तीस विचारणे भाग होते.
"संज्या,  तू पुण्याला पाराच्या स्पर्धेत खेळलास न्हवं? तुला म्हाइत असंल की लेका!"  इति सुद्या माळी. संज्या जणू आपण जागतिक मोटॉक्रॉस स्पर्धांचे बाप आहोत अशा आविर्भावात वावरत असे. सुद्या माळ्याला त्याची हवा पंचर करायची होती.
"नाही म्हणजे... तशी मला थोडीफार माहिती आहे, पण म्हणजे..."संज्या चाचपडला.
"संजू, ते राहू दे. तुला पाराचा पत्ता आणि टेलिफोन नंबर तरी माहीत असेल," परचुरे.
"हां. तो आहे." संज्याला धीर आला.

      तो फोन नंबर घेऊन आम्ही मग श्रीकांत गोगट्यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळवला. त्यांची भेट घेण्यासाठी त्यांना फोन केला. तो गृहस्थही पुणेकर असूनही इतका भला निघावा? त्यांनी चटकन  "स्पर्धा ठेवताय ? कधीही या.  फक्त येण्याच्या आदल्या दिवशी मला फोन करा म्हणजे झाले. माझ्याकडून जितकी होईल तेवढी मदत मी करीन." असे सांगितले. आम्ही कोण? कुठले? याची चौकशीही न करता त्यांनी हे निमंत्रण दिलेले ऐकून आमच्या आनंदाला पारावारच राहिला नाही.

      पुण्याला जायचं, तिथं फिरायचं म्हणजे स्वतःच्या वाहनानेच गेलेले बरे असा सर्वांचाच विचार पडला. उत्तम पाटलाची म्हणजे त्याच्या वडलांची एक डिझेल ऍम्बॅसेडर होती. ते बाहेर जात तेव्हा स्वतःसाठी वापरत.  इतर वेळेला ती गावातल्या गाडीतळावर भाड्यासाठी लावलेली असे.
"मी आम्ब्याशिटर दीन. पण डिझेलचा खर्च मात्र काण्ट्रीबुशननं." उत्म्याने प्रस्ताव मांडला. वाहनाचा खर्च वाचल्यामुळे तो एकमताने मंजूरही झाला. उत्म्या आणि विकशा ही जोडी आळीपाळीने ड्रायव्हरचे काम करणार होती. त्यामुळे ड्रायव्हर पगार,  त्याचा भत्ता वगैरे वाचणार होते. सहा जणांचे खाणे पिणे (हे महत्त्वाचे) आणि डिझेलचा खर्च याला सहाने भागून येणारी रक्कम एक हजाराच्या आसपास जात होती.  निव्या, उत्म्या, विकशा, राजा, विज्या, संज्या अशी मंडळी पैसे घालून जायला एका पायावर तयार झाली.  माझ्या खिशात दिडक्या नसल्याने मी तोंड उचकटले नाही,  पण या सहा जणांमध्ये माझ्यासारखी महत्त्वाची व्यक्ती असणे गरजेचे होते असे मी आडवळणाने राजाला सुचवले.  तेव्हा सहा जण जात आहेत,  तर आणखी एका (हडकुळ्या आणि फुकट्या) माणसाने फारसा फरक पडणार नाही असा विचार त्याने केला असावा. "विश्या,  तू पण चल की रे!"  तो म्हणाला. राजाचा शब्द मोडणे कुणालाच शक्य नव्हते. "आता तू म्हणतोयस तर येतो मी." मी म्हणालो.

      पुण्याला जायचे मुक्रर होताच आम्ही गोगट्यांना फोन केला. "उद्या येताय ? बरं, मग अकरा वाजता मी वाट बघतो तुमची." त्यांच्या घराच्या खाणाखुणा समजावून घेतल्या. कर्वे रोडवर कुठेतरी त्यांचे घर होते.
दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे चार वाजताच आम्ही निघालो.  पुण्याला जायला खासगी वाहनानेही पाचेक तास लागलेच असते. शिवाय चहापाणी, नाश्ता, घर शोधणे, हे सारे. मजल-दरमजल करत आम्ही पुण्याला पोचलो. ऍम्बॅसेडर जुनीच होती, पण तेलपाणी केल्याने इंजिन ठीक होते. त्यामुळे प्रवास निर्विघ्न पार पडला. डेक्कनजवळ पत्त्याची चौकशी केली आणि पाचेक मिनिटात आम्ही गोगट्यांच्या घरासमोर होतो. गाडीतून उतरलो. गोगट्यांचे घर म्हणजे एक व्हिक्टोरियन थाटाचा दुमजली बंगला होता.

      पुरुषभर उंचीचे हिरव्या रंगाचे फाटक बंद होते. तिथेच बाजूला एक बेलचे बटण होते. ते दाबले तसे फाटकात असलेल्या एका दरवाज्यातून एक गुरखा बाहेर डोकावला, "क्या काम है?"
 "गोगटे साब को मिलने का है, " मी माझी हिंदी पाजळली.
"शाब अभी बाहर गया है, "गुरखे नेहमी एकेरीतच का बोलतात,  हे न सुटलेले कोडे आहे.
"पर उन्होने तो हमे अकरा बजे बुलाया था मिलनेकू", राजा.
"लेकिन हम बोलता है, शाब अबी नही है." गुरखे स्वतःला मात्र हम म्हणतात.
"लेकिन तुम देखो तो - साब हुंगे अंदर." विकशा. "हम फोन करकू आये है. वैसेच नय."
"ऐसा सब लोग बोल्ता है. बाद में शाब हमको गुश्शा करता है."
आता याला कसे समजवावे, असा विचार करत असतानाच, "बहादूर, कौन है ?" अशी हाक आली.

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.