त्या दिवसात मी बरेच काही सामाजिक कार्य करत असे. या 'सामाजिक कार्या'ला माझ्या घरातले आणि शेजारपाजारचे लोक धंदे करणे, लष्करच्या भाकऱ्या भाजणे असेही म्हणत. त्या दिवसात, म्हणजे कॉलेज संपून नोकरी मिळण्याच्या मधल्या काळात. त्या काळी आजच्यासारखे कँपस इंटरव्ह्यू अजून सुरू झाले नव्हते. एवढेच कशाला? शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन-दोन वर्षे नोकरी मिळवण्यासाठी भटकत राहावे लागत असे. परवापरवाची गोष्ट आहे... असे म्हणता म्हणता आता त्यालाही तब्बल सोळा वर्षे लोटली.
तर काय सांगत होतो ? मी इंजिनियरिंग कसेबसे संपवून कॉलेजबाहेर पडलो. काहीही करण्याचा जबरदस्त कंटाळा आला होता. एक-दोन महिने निवांत घरीच काढले. लायब्ररीची पुस्तके वाचत, मित्रांबरोबर भटकत, कधी कधी नुसतेच लोळत. मग त्याचाही कंटाळा आला म्हणून नोकरी शोधू लागलो. त्या काळी नोकऱ्या फारशा नव्हत्याच. त्यातही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरला तर पुण्याशिवाय कुठेच नोकरी मिळत नसे. आणि या पुण्यातल्या कंपन्याही नवीन, लघु उद्योग स्वरूपाच्या. या कंपन्यांतल्या नोकऱ्या म्हणजे फार तर दोन-तीन हजार रुपये पगाराच्या. त्यामुळे नोकरी मिळाली, तरी महिन्याचा खर्च चालवण्यासाठी घरून पैसे मागवावे लागत, अशी परिस्थिती होती. ज्यांना मोठ्या कंपनीत नोकरी मिळे ते नशीबवान. त्यांना पाच हजारांच्या वर पगार मिळे आणि त्यात त्यांचा महिन्याचा खर्च निघत असे. अशा परिस्थितीत नोकरी मिळणे म्हणजे काही समाधानाची बाब नव्हती. काहीच न करण्यापेक्षा हे बरे म्हणून मी नोकरी शोधू लागलो खरा, पण जाहिराती बघता त्यातल्या बऱ्याचशा 'फिरता विक्रेता' याच स्वरूपाच्या होत्या, हे लक्षात आले. मग माझे नोकरीतले स्वारस्य संपले.
त्यापूर्वीची गोष्ट, म्हणजे कॉलेजमध्ये असताना मी कविता, कथा आणि एकांकिका लिहीत असे. त्यात बऱ्यापैकी गतीही होती. त्यामुळे एकांकिका लिहिणे, त्या बसवणे, लोकांना गोळा करणे, 'सांस्कृतिक' इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती करणे; अशा अनेक भानगडी मी त्या काळी लीलया करत असे. हे आठवले की आता माझे मलाच आश्चर्य वाटते. कॉलेज संपल्यावरही हा किडा वळवळत होताच. तेव्हा आता नोकरी तर मिळत नाही, मग असाच काहीतरी 'कार्यक्रम' करण्याची कल्पना माझ्या डोक्यात आली.
माझा चुलतमामा राजा देशपांडे, याचे एक स्वयंचलित दुचाकीदुरुस्तीचे दुकान म्हणजे साध्या भाषेत गॅरेज होते. (आजही आहे.) राजा नात्याने माझा मामा असला तरी तो मामापेक्षा माझा मित्रच जास्त होता. कामधंदा नसल्याने मी त्याच्या गॅरेजमध्ये जाऊन तासनतास बसत असे. त्याची सगळी गिऱ्हाइके त्याचे मित्रच बनलेली होती. साऱ्या गावाची खबरबात घेऊन लोक राजाच्या गॅरेजमध्ये येत आणि मग चहा-सिगरेटच्या संगतीत दिवस कसा निघून जाई, तेच कळत नसे. राजा तसा हिकमती. त्यामुळे लोकांच्या समस्त समस्या सोडवण्याची, त्यांना सल्ले देण्याची जबाबदारी आपोआपच त्याच्याकडे चालत येई. तंट्यात मध्यस्थी करणे हा तर त्याचा आवडता उद्योग. गावातली अनेक भांडणे राजाने साम, दाम, दंड, भेद, नीती या साऱ्या मार्गांचा अवलंब करून सोडवली होती. आमचा राजा म्हणजे अप्पूराजा या कमला हासनच्या चित्रपटातला राजा. आणि विशेष म्हणजे असल्या अनेक भानगडी करताना कधी राजाच्याच खिशाला चाट बसे, तर कधी हाता-पायाला झालेल्या दुखापती घेऊन इस्पितळात दाखल व्हावे लागे. पण तरीही तो दादा किंवा भाई नव्हता. तो फक्त राजाच होता.
राजा म्हणजे एक अवलिया इसम. ब्राह्मणाच्या जातीत जन्मला म्हणून ब्राह्मण. याच्या खांद्यावर जानवे होते. जातीमुळे मांसाहार, मत्स्याहार तो करत नसे. तसेच तो श्रावणात केशकर्तन व मद्यपान करत नसे. या गोष्टी सोडल्या तर तो ब्राह्मण होता, हे कानीकपाळी ओरडूनही कुणाला पटले नसते. सहा फुटांवर एखादा इंच उंची, छळकाटा बांधा, काळाशार वर्ण, बारीक कापलेले कुरळसर केस, खुरटी दाढी, सिगारेट ओढून पांढरट डाग पडलेले काळे ओठ आणि तांबारलेले डोळे (दारूमुळे नव्हे - ते नेहमीच तसे असत). तो त्याच्या खर्जातल्या आवाजात " एय् रांडेच्या!" इतकंच म्हणाला की समोरच्याचा धीर सुटत असे. त्याच्या तारुण्यात तो तारुण्यातल्या नाना पाटेकरसारखा दिसत असे. गॅरेजमध्ये काम करून करून घट्टे पडलेल्या त्याच्या मोठ्या, दगडी हातांची थप्पड खाल्लेला माणूस दोन दिवस तरी उठला नसता.
पण असे असले तरी तो अत्यंत दिलदार होता. दिलेला शब्द पाळण्यासाठी तो काहीही करायला तयार असे. अगदी काहीही. शिवाय त्याच्या कट्टर शत्रूंनाही तो चटकन मित्र बनवत असे. माणसे आपलीशी करण्याची त्याची हातोटी विलक्षण होती. अगदी गोवा-बेळगाव-तळकोकणापासून ते नाशिक-नगर भागापर्यंत त्याची मित्रमंडळी पसरलेली होती. त्यामुळे या गावांतले लोक आमच्या गावी त्याचे नाव घेऊन येत आणि त्यांची कामे होत; तर आमच्या गावातले लोक तिथे जाऊन याचे नाव सांगून आपले काम करून घेत.
त्याची एक नाजूक बाब म्हणजे, तोही कधीमधी चित्र काढत असे, कविता करत असे, नाटक लिहीत असे. त्याच्या एका मिथ्यक एकांकिकेचे कथानक तर अत्यंत हृदयस्पर्शी होते. तो नाटकात कामही करत असे. पण त्याचे एकंदर रूप पाहून त्याला कोणी कलाकार मानत नसत, याची त्याला खंत होती. (आणि कित्येक वर्षांनी परवाच त्याने फोनवर मला एका समांतर चित्रपटाची त्याला सुचलेली कथा ऐकवून “विश्या, कमला हासनचा फोन नंबर काढ रे, भेटू या त्याला.” असे म्हटले, तेव्हा तो कमला हासनला भेटणारच याची खात्री वाटली.)
असेच एक दिवस राजाला मी म्हणालो, "राजा, कंटाळा आला. मस्त नाटक बसवावे म्हणतो!" त्यावर तो म्हणाला, "अरे विश्या, बसवू या की रे!" मग बघता बघता त्याने गावातल्या सगळ्या नाटकहौशी मंडळींना गोळा केले. तालमींसाठी फुकट हॉल मिळवून दिला आणि प्रयोगाची तिकिटेपण खपवली. नाटकाच्या दिवशी नाट्यगृहाच्या बाहेर उभे राहून पाहुण्यांचे स्वागत करण्याऐवजी स्टेजवर प्रॉपर्टी नीट लागते की नाही, काम करणाऱ्या प्रत्येकाला जे पाहिजे ते मिळते की नाही, ते पाहिले. मग विंगेत उभे राहून नाटक पाहिले आणि पडदा पडल्याबरोबर गायब झाला. असा हा राजा.
तर सांगण्याचा मुद्दा असा की, मला नोकरी नसण्याच्या काळात (त्या काळाला बेकारी म्हणणे जिवावर येते, कारण मला नोकरी नसली तरी मी 'बेकार' नव्हतो...) मी त्याच्या गॅरेजवर जाऊन चकाट्या पिटत असे किंवा आपल्याला आता 'वेळ मारण्यासाठी' काय करता येईल याचा आराखडा तयार करत बसे. असाच विचार करता करता मला एक विलक्षण कल्पना सुचली. तसा मी पूर्वीपासूनच अत्यंत विलक्षण विचारशक्तीचा माणूस आहे!! राजाच्या गॅरेजात एका मोटोक्रॉस रेसचा फोटो होता. फोटो कसला?- कॅस्ट्रॉल ऑइल कंपनीचं कॅलेंडर होतं ते. ते बघता बघता मी त्याला म्हणालो, "राजा, आपण एक मोटोक्रॉस रेस ठेवली तर?"
नेहमीप्रमाणेच राजा म्हणाला,"अरे विश्या, ठिवू या की रे!"
राजाचं "...की रे!" म्हणजे जे ठरवले आहे ते होणारच याची खात्री! आणि मोटोक्रॉस म्हणजे तर राजाचा आवडता विषय! दुचाकी वाहनांमधला मोठा मुरलेला माणूस तो. त्याच्या वयाच्या विशीत त्याने अनेक गाव/तालुका/ जिल्हापातळीवरच्या रोड रेस स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. रोड रेस कसल्या? रोड रेज (Road Rage) स्पर्धाच असायच्या त्या! दोन-तीन मोपेड रेसेस मध्ये त्याने नंबरही मारला होता. त्या दिवसात मोपेड हे वाहन फार वापरात होते. सामान्य माणसाला परवडणारी स्वयंचलित दुचाकी. हीरो-मॅजेस्टिक, कायनेटिक लुना, टीव्हीएस ५० इतकेच काय, पण समस्त गवळी समाजाची आवडती; कोल्हापूरच्या घाटगे पाटलांची लक्ष्मी, या साऱ्या गाड्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी 'मॉडिफाय' करून देण्याची राजाची खासियत होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या दुचाकी वाहन स्पर्धेबद्दल त्याला प्रचंड आत्मीयता असणे स्वाभाविक होते.
त्याने मोटोक्रॉसचे मनावर घेतले आणि बघता बघता ती बातमी गावभर पसरली. हौशी मंडळी गॅरेजवर चकरा मारू लागली. स्पर्धा कधी घ्यायची, कुठे घ्यायची, कशी घ्यायची याची खलबते होऊ लागली. यामध्ये राजाचे समव्यावसायिक (म्हणजे मिस्त्रीगण), त्याचे इतर अनेक प्रकारचे मित्र, माझ्या
नाटकमंडळातील या यंत्रक्षेत्राशी दूरदूरचा संबंध नसलेली कलाकार मंडळी आणि नेहमीप्रमाणेच विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अशी मांदियाळी होती. ही सारी मंडळी गॅरेजवर जमू लागली, राजा "बारक्या, चार च्या सांग रे" असे वारंवार म्हणू लागला आणि दिवसाकाठी सहा-सात ब्रिस्टॉलची पाकिटे फस्त होऊ लागली.
निव्या, विष्णू, बालमुकुंद, देवू, ही गॅरेजवाली मंडळी; श्रीनिवास पाडळे, उत्तम पाटील, विकास पाटील, सुदर्शन माळी हे राजाच्या खास 'बैठकी'तले; तर निशिकांत मुक्कणावर, किरण परचुरे, हेमंत सावंत, अजय जोशी, संजय कणकवलीकर असे माझे नाटकमंडळातले दोस्त या बैठकांना नियमित हजेरी लावू लागले. ही बैठक प्रत्येक दिवशी सकाळी दहा ते रात्री एक-दोन वाजेपर्यंत फक्त जेवणाच्या अपरिहार्य सुट्ट्या घेऊन सुरू असे. म्हणजे नेहमीच्या भाषेत आम्ही सर्व मंडळी राजाच्या गॅरेजवर पडीक राहू लागलो.