परत आलो आणि लक्षात आले की आम्ही पाच नोव्हेंबर नक्की केली खरी, पण मध्यांतरीच्या काळात म्हणजे सत्तावीस ऑक्टोबरला दिवाळी येत होती. दिवाळीच्या आधीच सगळी कामे संपवण्याची गरज होती. कामांची एकच झुंबड उडाली - आमचा क्लब तयार करायचा होता, त्याची 'घटना' लिहायची होती, क्लब रजिस्टर करायचा होता, 'एफेम्सीआय' ला क्लबची नोंदणी करायची होती, लेटरहेड-पावतीपुस्तकं छापायची होती, मग शिवाजी मैदानाची परवानगी मिळवायची होती , 'पारा' ला रीतसर स्पर्धा आयोजित करण्याबद्दल विनंतिपत्र पाठवायचे होते, ट्रॅक तयार करायचा होता, रायडर्सना निमंत्रणे पाठवायची होती - आम्हाला काय काय करावं लागणार याची जंत्री गोगटे साहेबांकडून मिळाली होती. सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू होता आणि नोव्हेंबर पाचला स्पर्धा. मध्येच आलेली दिवाळी. म्हणजे वेळ अगदी थोडा होता. आमची धावपळ सुरू झाली.
राजाने कोणी काय करायचे त्याची वाटणी करून दिली. त्याप्रमाणे मंडळी आपापल्या कामाला लागली. शिवाजी मैदान परवानगीचे काम दस्तूरखुद्द राजाकडे होते; तर गावातल्या एका सुप्रतिष्ठित, तरुण रक्ताच्या पुढाऱ्याला - हे एका साखरसम्राट आमदार व राज्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि भावी राजकीय वारसदार वगैरे होते - क्लबच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याची जबाबदारी विजय आणि संजय बारकुटे यांच्या खांद्यावर पडली. गावात फिरून 'पावत्या फाडणे'- अर्थात देणग्या गोळा करणे हे काम राजाची मित्रमंडळी आणि गॅरेजमालक यांच्यावर सोपवण्यात आली होती.
बालमुकुंद मिस्त्री हा जुना-जाणता मिस्त्री. तो आमच्या गावच्या 'धी गॅरेज ओवनर्स असोशिएशन्न्' चा शेक्रेटरी होता. त्यामुळे स्वाभाविकच समस्त 'धी.... ' ची मेंबर म्हणजे गावातले सगळे गॅरेजवाले मिस्त्री आपापल्या गिऱ्हाईकाकडून ही सक्तीची 'पट्टी' गोळा करणार होते. शिवाय 'बांदवलकर बंधू यांचे किराणा भुसार जनरल स्टोअर्स - आमचे येथे सर्व वस्तू योग्य दरात मिळतील. पत्ता - गांधी पुतळा' किंवा 'अप्सरा क्लॉथ स्टोअर्स - महिलांची फ्रॉकपासून नऊवारी साडीपर्यंत सर्व वस्त्रे मिळण्याचे एकमेव ठिकाण. पत्ता - शिवेचा मारुती' असल्या जाहिराती मिळवून त्यांची कापडी बॅनर्स रंगवण्याचे काम आमच्या संजय कणकवलीकर, निशिकांत मुकाण्णावर, हेमंत सावंत आदी 'नाटकी' मंडळींकडे लागले होते.
गोगट्यांनी एफ् आय एम या संघटनेची 'मोटरस्पोर्टस क्लबाची मार्गदर्शक तत्त्वे' अशा नावाची इंग्रजीतली पुस्तिका आम्हाला सप्रेम भेट दिली होती. ही पुस्तिका तब्बल पाचशे रुपये (त्यावेळी २८ रु. गुणिले १७ डॉलर) किमतीची असल्याने ती चांगलीच महागडी भेट होती. त्या पुस्तिकेत क्लबची उद्दिष्टे, क्लबचे स्वरूप, क्लबची आदर्श घटना इ. मूलभूत तत्त्वे दिली होती. ती वाचून तिचा अर्थ समजून तिच्याप्रमाणे क्लबची घटना तयार करण्याचे (माझ्या दृष्टीने) सर्वात महत्त्वाचे आणि अत्यंत अवघड काम अर्थातच माझ्याकडे चालत आलेले होते. शिवाय 'फर्ड्या' इंग्रजीत सर्व पत्रव्यवहार करणेही माझ्याच अखत्यारीत येत होते.
दिवस भराभर निघून जात होते. आम्ही आता फक्त सकाळी आठ आणि रात्री आठ वाजता राजाच्या गॅरेजवर मीटिंग घेऊन चर्चा करत होतो. बाकी वेळ कामात कसा जात होता ते कळत नव्हते. सर्वजण स्पर्धेच्या नशेत झिंगून गेले होते. आमच्या बरोबर गावालाही झिंग चढत होती. गाड्या उडवण्याची स्पर्धा आता फक्त गाड्या घसरवण्याची स्पर्धा उरली असली तरी आणि ती आता कोडोलीच्या माळावर न होता शिवाजी मैदानात होणार असली तरी त्याने गावाच्या उत्साहात फारसा फरक नव्हता. सुरुवाती-सुरुवातीला “हॅ, गाड्या उडवणार न्हाइ व्हय? मग काय कसली मजा येनार?"असे उद्गार कढणारेही कोडोलीकर सरकारही आता, "या खेपेला र्हाऊं दे! पुढच्या येळंला मातुर माळावरच घेनार बरं का, हां... लेकाच्यांनो, गाड्या घसरून पडल्यावरसुदिक लई मजा येतिया म्हनं!" असे लोकांना सांगू लागले होते.
लोक गावातून गरागरा फिरणाऱ्या आमच्या मोटरसायकलच्या टोळक्यांकडे आनंद, कुतुहल आणि उत्साह अशा संमिश्र भावनांनी पाहत होते. निव्याने त्याच्या मोटरसायकलचे सायलेन्सर, मडगार्ड, हेडलँप असे 'अनावश्यक' भाग काढून टाकल्याने तो त्या नागड्या आणि मोठमोठ्याने कोकलणाऱ्या मोटरसायकलवरून गावातून निघाला की स्पर्धेची आपोआप आणि फुकट जाहिरात होत होती. हळूहळू ते लोण गावातल्या इतर तरुण तुर्क मंडळींपर्यंत पसरल्याने गावाच्या वेगेवेगळ्या भागात मैदानाऐवजी गल्लीबोळ डर्टट्रॅक स्पर्धा सुरू झाल्या. प्रत्येक गल्लीत च्यांपियन तयार होत होते. गाड्या म्वाडिफाय करण्यासाठी गावातल्या गॅरेजवर गाड्या येत होत्या. त्यामुळे बऱ्याच स्पेशालिष्ट मिस्त्रींचा धंदाही जोरात होता.
"पुन्या-म्हमईस्नं रायडरं येनार हायती!"- रायडरं!!!
"पुन्यास्नं दोन टिमा येनार हायेत"
"नाशकास्नं पन येनार हायेत म्हनं"
"आरं, नाश्काचं काय घिऊन बसलायसा, मर्दान्यानो! पार केरळातनं येनार हायेत."
"आरं तिच्यायला. खरंच काय?"
"मग म्या काय खोटं बोलतुया व्हय? म्हादेवाच्या पिंडीला हात लावून सांगतु म्या"
"पुन्याचा श्याम कोठारीबी येनार हाय म्हनं!"
"हॅ, त्यो कसला येतुया. त्यो गाड्या उडिवतो निस्ता. मातीच्या शेर्तीत नाय खेळत त्यो!"
"आरं, मला निव्यानं सागिटलंय त्यो येनार म्हून"
"त्यो काय येत न्हाइ बघ"
"येनारच!"
"येत न्हाई, लागली बीट?" - बीट म्हणजे बेट - पैज.
"मर्दान्या, अरं त्या गाड्यांची टायरं येक फूट रुंद असत्यात!"
"आरं, त्ये काईच न्हाई. एका शेकंदात शंभर स्पीड घेत्यात म्हनं..."
"आरं, आठ गियरं असल्यावर काय झालंय स्पीड न घेयाला."
"आन काचकन बिरेक दाबला की गपाककन् थांबत्यात. येक इंच बी हालत नायती."
"म्या पर्त्येक्ष पायलंय न्हवं. कितीबी तिरकी केली तरी गाडी पडतच न्हाई ती." - प्रत्यक्ष म्हणजे पोस्टरमध्ये.
"हां लेका. येका फोटूत तर चालवनाऱ्या गड्याचं डोस्कं जिमनीला टेकलंवतं. तरीबी गाडी पळत होती - हां"
अशा चर्चा दिवसा चौका-चौकात, पानपट्ट्यांवर, हाटिलात च्या-भजीबरोबर आणि रात्री सामाजिक पेयांच्या संगतीने गावात रंगत होत्या. प्रत्यक्षात स्पर्धेत कोण स्पर्धक भाग घेणार, कोणत्या गाड्या येणार हे आम्हालाच माहीत नव्हते. त्यामुळे कोणी त्याबद्दल विचारलेच तर," बरेचजण येणार आहेत. पुणे, मुंबई, नाशिक - सगळीकडून. अजून नाव नोंदणी सुरू झालेली नाही, त्यामुळे नक्की नावे सांगता येणार नाहीत." असे गुळमुळीत उत्तर ठोकून देण्याची आतल्या गोटातील सर्वांनाच राजाची ताकीद होती.
गोगट्यांनी 'पाराचे काही रायडर पाठवीन' असे आश्वासन दिल्यामुळे आम्ही निर्धास्त होतो.
दिवस भराभर निघून चालले होते. शिवाजी मैदानासाठी नगरपालिकेची परवानगी मिळाली होती. आमचा 'आस' क्लब स्थापन झाला होता. राज्यमंत्र्यांच्या भावी वारसदारांनी त्याचे अध्यक्षपद स्वीकारले होते. विज्या बारकुटे उपाध्यक्ष झाला होता, राजा कार्याध्यक्ष झाला होता, मला उप-कार्याध्यक्ष असे बिरुद प्राप्त झाले होते, बालमुकुंद खजिनदार झाला होता. बाकीची मंडळी कार्यकारिणी सभासद झाली होती. त्यांच्या समाधानासाठी त्यांनाही प्रसिद्धी विभाग प्रमुख, स्पर्धा व्यवस्थापन प्रमुख अशा उपाध्या दिलेल्या होत्या. या क्लबची मूळ इंग्रजी घटना आणि तिचा मराठी तर्जुमा मी तयार केल्याने मला उगीचच डॉ. आंबेडकर झाल्यासारखे वाटत होते. एफेमेस्सीआयला त्या घटनेची प्रत पाठवून आणि त्यांची रोख रुपये १०,००० सदस्य वर्गणी भरून (प्रायोजक - स्व. इंदिरा गांधी सहकारी साखर कारखाना, बलवडी खुर्द) क्लबला त्यांची मान्यताही मिळाली होती. पाराला रीतसर पत्र पाठवून त्यांना स्पर्धा घेण्याची लेखी विनंती केली होती. त्यांनी ती मान्य करून शिक्कामोर्तब केले होते. पुणे, मुंबई, नाशिक इथल्या स्पर्धकांना पत्रेही पाठवून झाली होती. पन्नासेक हजार रुपये वर्गणीतून आणि जाहिरातीतून गोळा झाले होते. आता फक्त स्पर्धकांच्या अधिकृत प्रवेशपत्रिकांची वाट पाहत होतो.
बघताबघता दिवाळी समोर येऊन ठेपली. गावातल्या आणि पंचक्रोशीतल्या पंधरा-वीस फुरफुरणाऱ्या खोंडांनी स्पर्धेत प्रवेश घेतला होता. पण ते सारे हौशी (ऍमच्युअर) गटात मोडत होते. व्यावसायिक (प्रोफेशनल) एंट्री अजून एकही आलेली नव्हती. गावातला प्रत्येक जण मात्र मुंबई-पुण्याच्या स्पर्धकांना आणि त्यांच्या गाड्यांना पाहण्यासाठी आतुर झाला होता. ते स्पर्धक जर आले नाहीत तर लोक आमच्या तोंडाला काळे फासतील अशी रास्त भीती प्रत्येक क्लब मेंबराला वाटू लागली. कारण वर्गणीच्या पावत्या फाडणारे बालमुकुंद, त्याचे गॅरेजवाले मित्र आणि जाहिराती गोळा करणारे आमचे नाटकातले मित्र यांनी श्याम कोठारीच मोटोक्रॉस-डर्टट्रॅकमधल्या करामतींच्या सुरम्य आणि चमत्कारिक, पण काल्पनिक कथा पैसे गोळा करताना अगदी तिखट-मीठ लावून लोकांना ऐकवल्या होत्या. इथे कुणा लेकाने असली स्पर्धा प्रत्यक्षात पाहिली होती? कारण स्पर्धेत कोण भाग घेणार हे कळल्याशिवाय पैसे द्यायला लोक तयार नव्हते. मग नेहमीप्रमाणे मार्केटिंगचे लोक जसे ग्राहकांना चंद्रावर नेतात तसे आमच्या 'द्रव्य समुच्चयक' मंडळाने मनाला येईल ते (राजाने सक्त ताकीद देऊनही) ठोकून दिले होते आणि ते आता आमच्या अंगलट येण्याची लक्षणे दिसू लागली होती.
***
एके दिवशी सकाळी बैठक भरल्यावर या विषयावर गंभीर चर्चा झाली. गंभीर म्हणजे गरमागरम. बालमुकुंद, निव्या इत्यादी मंडळी तापली होती. "आम्ही पैकं गोळा केलं. आता रायडरं आली न्हाईत तर आपलं काय खरं न्हाई. आपन तर लोकान्ला त्यांचं पैकं परत द्येनार. आतापावतर ज्यो काय खर्च झाला आसंल त्यो राजानं सोत्ताच्या खिश्यातनं दिला पाय्जेल!" असं त्यांचं म्हणणं होतं. तर उत्म्या आणि विकशा," राजानं काय येकट्यानं ठरवली नाय रेस. सगळ्यांनी जबाबदारी घ्यायला पाय्जेल." असं म्हणत होते. वातावरण चांगलंच गरम झालं.
"अरं असं कशाला? गोगट्यांना फोन लावूया. बघू या तेंचं काय म्हणणं हाय ते." राजा म्हणाला.
गोगट्यांना फोन लावला. ते म्हणाले," देशपांडे , मी आजच तुम्हाला फोन करणार होतो. सॉरी, सांगायला वाईट वाटतंय पण इथे 'पारा'चे स्पर्धक कुणी इतके लांब यायला तयार होत नाहीयेत. गाड्या नेणं अवघड आहे असं म्हणतात."
राजाला ब्रह्मांड आठवलं. तरीही धीर गोळा करून तो म्हणाला," पण तुम्ही तर म्हणाला होता की येतील म्हणून?"
"खरं आहे. पण काय आहे, इथे मुंबईच्या एका क्लबानं सात नोव्हेंबरला स्पर्धा ठेवली आहे. तुमची स्पर्धा करून लगेच परत मुंबईला जाणं शक्य नाही. शिवाय तिकडे येण्याजाण्याचा खर्च देणार आहेत. बक्षीसही बरंच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ती जुनी स्पर्धा असल्याने तिचे चँपियनशिप पॉईंटही जास्त आहेत. त्यामुळे सगळेच रायडर तिकडे जाण्यासाठी धडपडत आहेत."
"मग नाशिकमधले?" राजाची आशा .
"त्यांची पण तशीच कंडिशन आहे," गोगटे.
"मग आता?" राजा हताशपणे म्हणाला.
"तुम्ही काळजी करू नका. स्पर्धा घेण्यासाठी मी स्वतः ऑफिशियल म्हणून येतो. यावर्षी तुमच्या गावच्या स्पर्धकांची हौशी गटाची स्पर्धा ठेवू. मी तुम्हाला स्पर्धा कशी आयोजित करायची त्याचं ट्रेनिंग देतो. या अनुभवामुळे तुम्ही पुढच्या वर्षी छान स्पर्धा ठेवू शकाल; आणि त्यावेळी आपण डेट्स क्लॅश होणार नाहीत याची काळजी घेऊ." गोगटे सहानुभूतीने म्हणाले.
कृष्ण येतो म्हणतो, पण त्याचे सैन्य बरोबर नाही. पण त्याचा काय उपयोग? हे काही महाभारत नव्हते! श्याम कोठारीच्या कथा ऐकलेल्या गावकऱ्यांना गावठी च्यांपियन कसे चालणार? पण त्यात गोगट्यांचाही काहीच दोष नव्हता. आम्हीच गावात फुशारक्या मारून ठेवल्या होत्या. आपलेच दात आणि आपलेच ओठ.
आता मात्र सगळ्यांची हवा टाईट झाली. उरलासुरला आधार गेल्यामुळे आता 'आलिया भोगासी असावे सादर' या उक्तीप्रमाणे वागावे लागणार याची खात्री पटली.
"राजा, कोणकोण रायडर येणार याची खात्री केल्याशिवाय तू स्पर्धा कशाला ठेवलीस?"इति परचुरे
"आता आपुन काय करायचं?" विक्शा
"तरी आम्ही सांगत होतो, असली स्पर्धा ठेवायची म्हणजे फार अवघड काम आहे," विज्या.
"झालं येवढं मोप झालं, आता स्पर्धा रद्द करून लोकांचं पैकं दिवून टाकू परत्," निव्या.
"आनि आप्ल्या अद्धेक्षाला काय सांगनार?" बालमुकुंद.
"तेला काय सांगायचं? तेला काय फरक पडतुय? तेनं काय केलया म्हनून तेला सांगाया जायचं?" उत्म्या.
"आसं कसं? त्यो पडला अद्धेक्ष. डुक धरला म्हजी उद्याला गावात राहवू देयाचा न्हाई!" विष्ण्या.
"तर...तर... बरा राहवू देयाचा न्हाई? गाव काय तेच्या 'बा'ला आंदण दिलाय काय कुणी?" विक्शा.
"अरे हो, हो... जरा ऐका. इतकं काय तिरिमिरीला यायचं करणं न्हाई. अजून कायतरी करता येतं का ते बघू." राजाचा दुर्दम्य आशावाद पाहून मी थक्क झालो. आता या परिस्थितीतही 'कायतरी' करणं मलातरी अशक्यच वाटत होतं.
"हे बघा, तुम्ही गप घरी जावा आता. मी करतो काय तरी," राजानं बैठकीचं सूप वाजवलं. मी मात्र मागे रेंगाळलो.
"आता रे राजा? हे भलतंच झालं. आपण चांगली स्पर्धा भरवली इतकी. सगळी तयारी पण झाली जवळजवळ. आता रायडर नाहीत म्हणजे कसली स्पर्धा आणि कसलं काय?" मी त्याला म्हणालो.
"विश्या, काही काळजी नको. जास्तीत जास्त काय हुईल? मला वीस-पंचवीस हजार रुपये पदरचे घालावे लागतील. इतकंच ना? अरे, असे कितीतरी पैसे आले आणि गेले... काय? मला काय करायचेत पैसे साठवून? माझ्यामागं कोण आहे?" राजा कोरडेपणानं म्हणाला.
"असं कसं? पंचवीस हजार काही लहानसान रक्कम नाही. तुझं हातावरचं पोट. पुढंमागं साठवलेलेच पैसे कामाला येणार!" मी त्याला समजावत म्हणालो.
"आपला भरोसा देवावर. हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा..." राजा एकदम तत्त्वज्ञान सांगू लागला.
"अरे, पण पुढची तरतूद...?" मी.
"बसा, ह्यो विषय संपला." राजानं पडदा टाकला.
"बरं, ते जाऊ दे. तू काय करायचं म्हणतोस पुढं?"
"चल, बस मागं." राजानं स्कूटरला किक मारत म्हटलं आणि आता हा काय करतो? या उत्सुकतेनं मी त्याच्यामागं टांग टाकली.