खरे तर मला असले जगणे पटतच नाही
रोज तेच ते काम उरकणे पटतच नाही...
मला भेटती रोज माणसे नको-नकोशी
बघून हसणे, हात मिळवणे पटतच नाही...
स्वप्ने पडती अजूनही मज रोज, तरीही
आता स्वप्नांवर विसंबणे पटतच नाही...
कसे कुणाला सांगू माझ्या मनातले मी?
कुणासही का माझे म्हणणे पटतच नाही?...
रोज नव्याने विचार करतो- "बदलेल उद्या..."
रोज उद्याचे पुढे सरकणे पटतच नाही...
पुढे-पुढे मी चालत आहे 'अजब' दिशेने;
रस्ता चुकला तरी परतणे पटतच नाही...
अजब