तुझ्या शहरात मी जातो कितीदा मस्त होताना
खुली तेथेच दारूची दुकाने गस्त होताना
कसा ओशाळला कोणी भरवसा ठेव म्हणताना
उगा धास्तावलो मीही पुन्हा आश्वस्त होताना
तुझ्या डोळ्यांमध्ये डोळे कसे घालून मी पाहू ?
तुझ्या डोळ्यांत दिसतो मीच चिंताग्रस्त होताना
जगू दे, जीवना आता मला थोडे जगू दे रे
नको आता मुळी रोखूस अस्ताव्यस्त होताना
जणू मी श्वास घेतो, सोडतो निःश्वास, भवताली
नवी दुनिया उभी होते जुनी उद्ध्वस्त होताना
पहा नामोहरम झाले मला जिंकूनही जेते !
(जराही पाठ नव्हती टेकली मी पस्त होताना )
कसा एकांत आला ! पांगली गर्दी मनामधली
जसे सुनसान होते शहर कर्फ्यूग्रस्त होताना...
मला हे माहिती आहे, तुला जाणीव ही आहे
तुला मी पाहिले आहे कितीदा स्वस्त होताना !
किती हे लाघवी हसणे तुझे सामोपचाराचे !
कसा जपतोस इतका चेहरा संत्रस्त होताना ?
जरी वाटायचे मीही तुझा होतो कधी काळी
दिलासा शेवटी तो, पण दिलासा मस्त होता ना
चित्त