दिवाळी पहाट

आली पहाट हलके हसऱ्या धुक्याची
अंगी खट्याळ हसरा फुलवीत काटा
दारी दिव्यात उजळे हळुवार नक्षी
तेजाळ थेंब ढळती उजळीत वाटा

 अंधार थंड बुजरा लपतोच कोठे
ज्योतीस वात धरता उचलून माथी
तेजात चूर  अवघे जग रंगताना
झेपा अनार हिरवे उसळून घेती

एकेक हास्य उजळे प्रतिमा घराची
स्वप्नातलेच दिसते घरकूल माझे
ये सांगता न असले सुख लाभता हे
डोळ्यांत चंद्रनिवल्या प्रतिबिंब साजे

आकाशदीप डुलतो, हसतात झाडे
लावी पहाट टिकली रविरूप भाळी
आनंद नाचत फिरे गगनी,धरेशी
तेजात न्हात बघ ही उतरे दिवाळी!

अदिती
 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.