तुटलेले शब्द
संध्येचा प्रवास
अनावर काया
ओढीत नेतो.
संचिताचा मारा
चुकवीत नाही,
पण एक प्रदेश
बोलावीत आहे.
गंध त्या अंगणीचा,
लोभसवाणा,
सुगंधाचे गणित
बदलत आहे.
सृष्टीचे निदान
अखंडित स्वरूप,
थकलेल्या गात्रांना
पेलवत नाही.
अंधाराचे कारुण्य,
भीतीचे भय,
स्वयंभू जनावर
माझ्या पाठी.
ओजंळभर आशा,
बिलगले ऊन,
साराच प्रवास
निमित्तमात्र.
२. श्रावणसरी
रस्त्याआडच्या अनेक रस्त्यांवरून मी तिच्या दारापर्यंत पोचतो.
ती मनमुराद कोंडलेलं हसते.
मग श्रावणसरी.
विझलेल्या, असलेल्या, नसलेल्या, जागत्या वासनांवर.
श्रावणसरी.
बहर तिचा की कुणाचा?
की कुणाचाही?
अनादि सत्याकडे पाहिल्यासारखी ती जागची उठते.
मला जायला सांगते.
चक्र पुन्हा सुरू.
रस्त्यातून संभोगाकडे.
संभोगातून रस्त्याकडे.
तरीही श्रावणसरी.
श्रावणसरी.