निर्भयतेच्या नभात...!

 

मी भीतीच्या बिळात राहत आहे
* * *
मी ऐकत नाही वर्णन दुःख-कथांचे
मज नको वाटते दर्शन उग्र व्यथांचे
मी मिटून डोळे दुनिया पाहत आहे!

मज अंधाराने दिसू दिले ना काही...
मी पल्याड माझ्या कधीच गेलो नाही
मज सूर्य जरी तो रोजच बाहत आहे !

 एकेक श्वास हा पापे प्रसवत गेला
जगण्याची सारी वीणच उसवत गेला
मज महावस्त्र का तशात लाहत आहे ?
 
जगण्यावर साऱ्या मालिन्याची छाया
ही थकून गेली तारुण्यातच काया
मी शाप कोणते कळे न साहत आहे !
 
मी मधेच रडतो गाणे गाता गाता...
होणार कसे अन् काय स्वतःचे आता ?
माझीच काळजी मज अव्याहत आहे !
 
यामुळेच माझा मज तिटकारा येतो
शुद्धीस्तव मग मी अग्निपरीक्षा देतो
मी क्षणाक्षणाने स्वतःस दाहत आहे !

 
 

 

  * * *
 
संपेल उद्या पण तगमग माझी सारी
पोचेनच नक्की मी मुक्तीच्या द्वारी
हृदयात एक हा नाद अनाहत आहे !
 
उरले न स्वतःचे कसलेही गाऱ्हाणे
मज इतरांसाठी पुढेच आता जाणे...
मी विश्वाचे आर्त प्रवाहत आहे !

बंदिस्त न मजला करेल कुठली कारा
मी झालो आता विश्वप्रकाशी तारा..
झालो वारा; अवकाशी वाहत आहे !
* * *
 
...निर्भयतेच्या नभात राहत आहे
मी...
निर्भयतेच्या नभात राहत आहे....!

* * *

प्रदीप कुलकर्णी
 
 

 

मराठी माती - मराठी माणसं - मराठी मती - मराठी मानसं
The views expressed here are strictly personal and manogat administration does not necessarily subscribe to them.