षड्जातच हे मयूर गात जिथे वेडावुन
त्या तिथेच भ्रमर एक गुंजन करी नादावुन
ऐशा त्या उपवनात बहरती फुले कितीक
मधुर कुणी, कुणि सात्त्विक, मादक कुणि, रूक्ष एक
तो जातीचा मधुकर-मग मधु कसा न लावि पिसें
दंश करू कुणा किती याची चिंताच नसे
या त्याच्या खेळाची किति झाली आवर्तने
सु-मनांच्या हर तऱ्हा चाखी तो लीलेने
सामोरे एक फूल--ते विवर्ण--ते मंथर
गुंजारव ऐकुनिया क्षण एकच भयकातर
भृंगवृंद असे येती, दंशुनिया ते जाती-----ज्ञात सारे---परि होते ऐकिवात
पण जर का एक डंख जागवी चेतना सारी
येईल का अननुभूत अनुभूती ती न्यारी?
घ्यावा का एक डंख या एका भ्रमराचा?
जाणिवा न लोपल्या,-- तरिही ते धीर करी---
धूसरसा बंध जरी ऐसे ते मुक्त होय
लक्ष लक्ष गगनांचे बळ त्यास देऊन जाय---
भृंगाचा खेळ जुना-- हेहि त्या फुला ठावे
वेदना न, पण त्यातुन घेई ते चैतन्य नवे
फूल म्हणे भ्रमराला, चंचल तू--तुजला ठावे
इथे तिथे उडताना थांबणार नाही कधी
हे तुझेच वागणे--- हे असेच नियतविधी
मग कुणी निश्चिंतपणे कसे तुवां विश्वासावे
आभासाचे दान तुझे मग कुणी कसे घ्यावे?
अजूनही कितीक फुले राहिली चाखायाची
छद्म बंध तोडुनिया तिथेच तू झेपावे
हिंदोळा थांबला, पण रिते विश्वास श्रेय
सौख्याचा घट्ट दुवा--- तोही निखळून जाय-----
मुग्धा रिसबूड