एक प्रीतीची मौज राजसा
फेसाळते किनाऱ्यावर..
हात घेऊनी माझा हाती
सजणा, तू असता तर......!
सोनेरी रुपेरी रंगांची ही
नक्षी उमटे रेतीवर
त्या नक्षीमध्ये रंग भरण्या
सजणा, तू असता तर......!
बघ क्षितिजाला भेटे नभ हे
चढली लाली पटलावर
लाली ती मम भाळी भरण्या
सजणा, तू असता तर......!
फिदा लहरी रूपावरी त्या
चंद्रमा झळके अवनीवर
चांद तो मम मुखी पाहण्या
सजणा, तू असता तर......!
खर्जातली ऐक गाज त्याची
खारा वारा अंगावर
कुंतल माझे मुक्त करण्या
सजणा, तू असता तर......!
प्राजक्ता