आज फिरूनी मी पिसाटाच्यापरी बेहोष झालो
मुक्त गाणे वादळाचे एकट्याने गात गेलो
गर्द रानी विहरताना निर्झराचे गोड गुंजन
दूर कुठल्या आम्रवृक्षी कोकिळेचे मधुर कूजन
धुंदशा जादूभऱ्या या सुरांनी मी पिसा झालो
मुक्त गाणे वादळाचे एकट्याने गात गेलो
मेघ गगनी भरुनि येता, सूर्य झाकोळून जाता
अन तयांच्या गर्जनेने ही धरा भयभीत होता
मी विजांसह रुद्र या वर्षेमधे आपाद न्हालो
मुक्त गाणे वादळाचे एकट्याने गात गेलो
चार भिंती एक छप्पर बांधू न हे शकती मला
मुक्त मी झंझा, मला चारी दिशा असती खुल्या
शुष्क पाचोळा कसा पायातळी चुरडीत गेलो
मुक्त गाणे वादळाचे एकट्याने गात गेलो
मुक्ततेचा स्पर्श होता, मुक्ततेचा गंध येता
गात्र गात्र आपुले अन भोगांतुनी या मुक्त होता
विस्तीर्ण मी, अमर्याद मी; हे निळे आकाश झालो
मुक्त गाणे वादळाचे एकट्याने गात गेलो
हर्षल भडकमकर