तनामनातून दाटलेला
पहाटवारा झपाटलेला
वितान हे गच्च तारकांनी -
जणूं बिछानाच थाटलेला!
तुझ्यात मी चिंब चिंब न्हालो..
.. जरी मनातून आटलेला...
इथेच मी आसपास राहे,
..तुला जरी दूर वाटलेला...
खरेच तो काय मीच होतो...?
...कधी मला 'मीच' वाटलेला...!
मनात माझ्या रडे जटायू..
'कुणीतरी' पंख छाटलेला
अजूनही वाट शोधताहे...!
...असा कसा मी पिसाटलेला..!
शरीर - आभाळ.. एक झाले..
...पतंग मी पार फाटलेला ...!
कुठे न यादीत नाव माझे..
..हळूच उल्लेख काटलेला...
अभद्र होवून सोवळ्याने - ,
..म्हणे मला - ".. तूच बाटलेला..."!
जरी तुला वाटले - रडावे,
ठरेल तो हक्क लाटलेला...
संतोष कुलकर्णी
|