कविता कशी हवी हे माझ्या इतकं तुम्हीही जाणत असता
पण तरी सुद्धा...
घिश्यापिट्या शब्दांची भेळ तुम्ही बनवत असता
नवी क्षितिजे, नव्या वाटांपासून दूर पळत असता
तेच शब्द, तीच रुपकं, यमकं फक्त बदलत असता
तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात
एक अबोल चोर असतो
भावनांनी नटलेला पिसाऱ्याचा
एक छुपा मोर असतो
तुम्हालाही कळत असतं...
प्रतिभेची एक सर मनामध्ये पडली पाहिजे
पिसारा फुलवायची मोराला सवय जडली पाहिजे
पण तरी सुद्धा...
तुम्ही आपल्या वहिवाटेच्या प्रेमात पडत असता
नवी क्षितिजे, नव्या वाटांपासून दूर पळत असता
तेच शब्द, तीच रुपकं, यमकं फक्त बदलत असता
|