इतकाच मला जगण्याचा सारांश समजला आहे
हे विश्व निर्मिले आणिक परमेश्वर निजला आहे....
वादळे मोहमायेची तटवून लावली तरिही
प्रत्येक किनारा माझा लाटांनी भिजला आहे...
हे कधीच कळले नाही, मी कशास मंथन केले
तेजाच्या गर्भातुनही अंधार उपजला आहे...
घेऊच कशाला उसनी जाणीव कुण्या दुसऱ्याची
अद्यापहि माझी प्रतिभा सुफला अन सुजला आहे!
दिसतात तुम्हाला पणत्या गंगेवर तरंगणाऱ्या
(तो अर्थ जिवाचा माझ्या, मीहूनच त्यजला आहे!)
लावून जोर जीवाला चढलास पायऱ्या इतक्या
घे जरा दमाने आता, शेवटचा मजला आहे!
घेऊन काळरात्रीला भिरभिरतो माझ्या भवती
त्या कटास का समजावे तो कुठून शिजला आहे...
देतोस जरी तू इतके, का निखळ नसावे सारे?
(देऊन दुःख थोडेसे, आनंद विरजला आहे...)
या रणांगणावर तुमच्या नि:शस्त्र उभा आहे मी
यावेच कुणीही आता, मी शब्द परजला आहे!
प्रसाद शिरगांवकर