'मनोगत' चा दुसरा दिवाळी अंक आपल्या हाती सोपवताना अतिशय आनंद होत आहे. दीपावलीचा हा महोत्सव खरे तर मानवी मनात हर्षोल्हासाची कारंजी फुलवणारा. पण यंदाचा हा आनंद चोख, निर्भेळ नाही याचे किंचित वैषम्यही वाटते. आनंदासोबतच सजग, संवेदनशील मराठी मनाला सतत एक चुटपूट, अस्वस्थता जाणवत आहे. दीपोत्सवाचे स्वागत करताना हे स्वागत संपूर्णतः अम्लान नाही, याची जाणीव होत आहे.
सभोवतालचे एकंदरीत आर्थिक, सामाजिक आणि राजकीय वातावरण व त्यातील अस्थिरता यामुळे समाजाचेच स्वास्थ्य ढळल्यासारखे झाले आहे. अगदी आर्थिक जगापासून सामाजिक आणि साहित्यिक जाणिवा व चळवळींपर्यंत एक मरगळ पसरलेली दिसते आहे. आर्थिक मंदीच्या तडाख्यातून वाचणे जगात कुणालाही - अगदी अमेरिकेलाही - शक्य नाही हे आता स्पष्ट झाले आहे. आर्थिक अस्थिरता आणि त्यामुळे भल्याभल्यांची उडालेली दाणादाण हे एक कारण आहेच, पण यात सर्वस्वी नवीन असे काही नाही. आजवर अशा प्रकारची अनेक अरिष्टे माणसाने पचवलेली आणि परतवलेली आहेत. मानवाचा अविचल आणि दुर्दम्य आशावाद आणि प्रखर बुद्धिवाद याच्या आधारावर मानवाने असंख्य आस्मानी - सुलतानी आपत्तींवर मात केली आहे. आज मात्र मानवाची हीच अस्त्रे गंजू लागली आहेत की काय अशी शंका येत चालली आहे.
जनसामान्यांपर्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन पोहोचवण्यात आलेले अपयश ही स्वातंत्र्योत्तर काळातील एक मोठी सामाजिक हार मानावी लागेल. गेल्या काही वर्षांत तर हे अपयश अधिकच ठळक झाले आहे. अंधश्रद्धा, बुवाबाजी, गंडेदोरे, कर्मकांडे यांवरील वाढत चाललेला विश्वास चिंता करायला लावणारा आहे. एका बाजूला भोगवादीपणा आणि हाती आलेला दिवस अधिकाधिक लुटून, ओरबाडून घेण्याचे वृत्ती बळावत असतानाच दुसरीकडे नव्या पिढीतला नशीब, दैव, व्रतवैकल्ये, कर्मकांडे यांच्यावरचा वाढता विश्वास गोंधळात टाकणारा आहे. या सगळ्याला सरसकट 'संस्कृती' हे गोंडस नाव देणे ठीक नाही. संस्कृती म्हणजे तरी काय? व्याख्येनुसार मूल्ये आणि प्रथा - व्हॅल्यू अँड कस्टम्स- म्हणजे संस्कृती. यातली अधिकाधिक मूल्ये लयाला जाऊन फक्त पारंपरिक प्रथांनाच आपण संस्कृती म्हणून कवटाळून बसतो आहोत की काय असे वाटण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे. देवळांमधील तरुण तरुणींची गर्दी तर वाढते आहेच, पण मूर्तीसमोर हात घट्ट जोडून उभे असलेल्या युवकांच्या चेहर्यावरचे भावही अधिकाधिक खोल, गहिरे आणि प्रखर होत आहेत. या लोकांना नेमके काय हवे आहे? प्रयत्नवादावरचा विश्वास उडून केवळ समर्पण ही भावना शिल्लक राहावी असे काय यांच्या कोवळ्या आयुष्यात झाले आहे? नव्या पिढीच्या गरगरायला लावणार्या वेगाने या पिढीला अधिक विचारी आणि विवेकवादी करायला हवे. पण होते आहे ते नेमके त्याच्या उलट. समाजात घुसळण वाढली की जे चिरंतन, निके आहे ते नवनीत म्हणून वर यायला हवे. पण प्रत्यक्षात? श्रद्धा असावी की नाही हा वैयक्तिक प्रश्न खराच, पण श्रद्धेचे बटबटीत स्वरूप कधीही त्याज्यच ठरते. आजकाल तर बटबटीत नाही ती श्रद्धाच नाही असे वाटण्याइतपत श्रद्धेचे स्वरूप ओंगळ झाले आहे.
राजकारणातील विविध घटनांनी गेले वर्ष गाजत राहिले आहे. यामागचे निवडणुकाभिमुख राजकारण ध्यानात घेतले तरी कायदा, घटना वगैरे गोष्टींकडे बघण्याची बेफिकिरी डोळ्याआड करता येणार नाही. आणि राजकारणीच कशाला, सर्वसामान्य माणसालाही कायद्याचा कितीसा धाक राहिला आहे? कायद्याचा आदर करणारा तो कमकुवत, दुबळा असाच समज रुढ होत चाललेला दिसतो. गुन्हेगार हा पकडला जाणारच आणि त्याला योग्य ते शासन होणारच, हा विश्वासच राहिलेला नाही. एखाद्या दिवशी एखाद्या ठिकाणी स्फोट, हत्या, दंगली होतात, लोक चार चिंतातुर सुरकुत्या कपाळावर टाकून 'कसे होणार या देशाचे? या सगळ्यांना पकडून गोळ्या घातल्या पाहिजेत' अशी भाकड चर्चा करतात, आणि परत तसेच सुस्त, बेफिकिरी, अजगरी आयुष्य जगू लागतात. गुन्हेगार पकडले गेले तर त्यांचे खटले वर्षानुवर्षे रेंगाळत पडतात, तपासकामातील ढिलाईमुळे कधी गुन्हेगार निरपराध सुटतात, तर अगदी फाशीची शिक्षा झालेले गुन्हेगारही दयेचा अर्ज प्रलंबित राहिल्याने तुरुंगात का होईना, जगत राहतात. गुन्हेगारी प्रवृत्तींना जरब बसणार तरी कसा? ज्या देशात खुद्द न्यायालयच 'या देशाला परमेश्वरदेखील वाचवू शकणार नाही' असे उद्वेगपूर्ण उद्गार काढते, त्या देशात सामान्य नागरिकाला कायद्याबद्दल आदर कसा राहील?
सवंग, उथळपणा पत्रकारितेच्या क्षेत्रातही दिसतो आहे. हिंसक घटना दाखवताना तेच तेच फुटेज परत दाखवले की सगळा देशच पेटून उठला आहे असा लोकांचा समज होतो, इतपतही पोच या वाहिन्यांना राहिलेली नाही. हेडलाईन्स पाहिल्या की बातम्या आणि मालिका यातला फरक कळेनासा होतो. एकंदरीत सगळे कसे मसालेदार, चटपटीत झाले पाहिजे; मग ते वस्तुस्थितीशी कितीही फारकत घेणारे असो, असेच पत्रकारितेचे धोरण दिसते आहे.
तर असे हे सगळे आहे. 'व्हेन स्मॉल पिपल बिगीन टु कास्ट लॉंग शॅडोज, इट इज द टाईम फॉर द सन टु सेट' असे वाटावे असे. दीपोत्सवाच्या शुभ प्रसंगी असे नकारसूर काही बरे वाटत नाहीत हे खरे, पण 'मला काय त्याचे' असे म्हणून आपण आपल्या चकलीचा तुकडा मोडावा इतके अलिप्त राहणेही योग्य नव्हे. 'हर शाख पे उल्लू बैठे हैं, अंजाम - ए - गुलिस्तां क्या होगा' असे वाटावे अशी परिस्थिती आहे खरी, पण अशा मरगळीतूनच क्रांतिकारी स्थित्यंतरे झाली आहेत. तसेच काहीसे आपल्या महान देशाच्या बाबतीत होईल असा आशावाद आपण तेवत ठेवूया. तरूण पिढीत असणारी ऊर्जा, एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करण्याची ताकद हे सगळे अधिक योग्य दिशेने वापरता येईल असाही एक दिवस येईलच. एक मराठी महिला राष्ट्रपती होणे, ऑलेंपिकमध्ये पदक आणि श्रीहरीकोट्याहून चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण या यावर्षी घडलेल्या आनंदाच्या काही ठळक घटना . दिवाळी अंकाचे शताब्दी वर्ष असणारी ही दिवाळी पुढील वर्षीच्या अनेकोत्तम घटनांची नांदी ठरेल असा आशेचा दीप आपण मनात कायम ठेवू. हाच विश्वास मंदावलेल्या दिव्यांना संजीवनी देणारा ठरेल.
बोगद्याच्या टोकाशी दिसणारा उजेड हा नेहमी आपल्या अंगावर येणार्या आगगाडीचाच असतो असे नव्हे, तो बहुतेक वेळा, अंधाराचे पहाड फोडून आसमंत उजळणार्या सूर्याचा असतो.. तेंव्हा कुसुमाग्रजांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या कुवतीनुसार प्रकाशाचा एक छोटासा दिवा लावू या.
ही दिवाळी आपल्या सर्वांच्या आयुष्यात आनंदाचा आणि समृद्धीचा नवा प्रकाश आणणारी ठरो!