माझ्या लहानपणी माझ्या वडिलांचे के. ई. एम इस्पितळात ऑपरेशन झाले. मी ६-७ वर्षांचा असेन. वडील इस्पितळात असताना आम्ही त्यांना भेटायला आई बरोबर इस्पितळात जात असू. तसेच इतरही बरेच नातेवाईक तिथे यायचे. मला इस्पितळाचे वातावरण आवडायचे. प्रत्येकाला स्वतंत्र पलंग, पलंगा शेजारी पांढर्या रंगाचे छोटेसे लोखंडी कपाट. त्यात सफरचंद, केळी, मोसंबी अशी विविध (आणि भरपूर) फळे. कितीही खा.. कोणी काही बोलणार नाही. माझे वडील विशेष खायचे नाहीत, मला आणि ताईलाच द्यायचे. तिथे खाण्यावरून आईसुद्धा ओरडायची नाही. नाहीतर घरी, ‘काय मेला सारखं सारखं खाय खाय करतो? आत्ता जेवलास नं?’ असे ओरडायची. वडिलाचे ऑपरेशन झाले म्हणजे नक्की काय झाले हेही मला कोणी धड सांगितले नाही. ‘आई-वडिलांचा मुलांशी संवाद’ असली आधुनिक थेरे त्या काळात नव्हती. मलाही विशेष उत्सुकता नव्हती जाणून घ्यायची. मला वेगवेगळी फळे खायला मिळायची त्यावर मी खुश असायचो. ताई वेडी. फळे वगैरे न खाता वडिलांचा हात धरून बसायची, मोठ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकायची वगैरे. पांढर्या शुभ्र कपड्यातली नर्स कधीतरी येऊन वडिलांना इंजेक्शन देऊन जायची. आमचे वडील हूं की चूं करायचे नाहीत. पण मला ते बघवायचे नाही. मी त्यांच्याकडे न पाहता दूर कुठेतरी पाहायचो. नर्स गेली की वडील हसत हसत माझ्याकडे बघायचे. मला ते फार शूर वाटायचे (त्या काळी ‘ग्रेट’ हा मराठी शब्द माहीत नव्हता). असो. तर असा तो एक हृदयद्रावक प्रसंग सोडला तर इस्पितळातील वास्तव्य म्हणजे माणसाच्या आयुष्यातली परमोच्च ‘चैन’ असे वाटायचे. सर्व नातेवाईक भेटायला येतात, हसून खेळून बोलतात, अभ्यासाबद्दल चकार शब्द काढत नाहीत, फळे-बिस्किटे वगैरे खाऊ मिळतो, छान छान नर्स, डॉक्टर्स गोड गोड बोलतात. ‘आता कसं वाटतंय? बरं वाटतंय नं? काही लागलं तर सांगा. हा कोण? छोकरा वाटत. वा खेळकर आहे. ’ (म्हणजे ‘मस्तीखोर आहे’ हे मला मोठेपणी समजले) अशा वातावरणाचा हेवा वाटायचा. असे वाटायचे, आपल्यालाही कधी तरी हॉस्पिटलात राहण्याचे भाग्य लाभावे. आपलीही अशीच ‘चैन’ व्हावी. शाळा नाही, अभ्यास नाही, कोणी ओरडत नाही, सगळे हसून खेळून गोड गोड बोलताहेत, छान छान बिस्किटे, फळे खाऊ आणून देताहेत असे आयुष्य असावे असे वाटायचे. पण इतक्या वर्षात ती संधी कधी आलीच नाही.
पण ‘भगवानकी मंदीरमे देर है,अंधेर नही’ ह्या उक्तीचा प्रत्यय नुकताच आला. मध्यंतरी, एकदा पहाटे पहाटे शौचास गेलो असता काही गडबड आहे असे जाणवले. पहाटे पहाटेच तीन वेळा धावावे लागले. प्रकार काय आहे हे अनुभवावरून मी जाणले. पोटात कुठेतरी अल्सरने डोके वर काढले होते. पूर्वी १९९६ (नक्की आठवत नाही) क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतात झाली होती. तेंव्हा मी रोज टीव्ही समोर बिअरचा डबा आणि सिगारेटचे पाकीट घेऊन तासंतास मॅच बघत बसायचो. तेंव्हा असा त्रास झाला होता. डॉक्टर मित्राने अल्सरचे निदान केले होते. त्यावर औषधे दिली होती. प्रश्न मिटला होता. पण त्या बरोबर मला पोटाचा अल्सर, त्याची लक्षणे आणि उपचार ह्याचे ज्ञान झाले होते. पुढे मी कडक पथ्यपाणी, जलचिकित्सा वगैरे केली. सिगरेट पूर्णतः सोडली आणि व्याधीवर जय मिळवला. असो. पण ह्या खेपेस जेंव्हा पुन्हा तसाच त्रास झाला तेंव्हा विचार केला की आजचे काम संपले की आळस न करता डॉक्टरकडे जायचेच. एव्हाना मी व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचलो होतो. चवथ्यांदा शौचास गेलो. तेथून परतल्यावर मला दरदरून घाम आला, छातीत धडधड वाढली, तोल जाऊ लागला, चक्कर आली. कसाबसा भिंतीला धरून तोल सावरला आणि जवळच्याच खुर्चीवर बसलो. वाटले काहीतरी जास्त गंभीर बाब दिसते आहे. हार्टऍटॅक तर नसेल? ह्या विचाराने जरा घाबरलो. वेळ दवडण्यात अर्थ नव्हता. मी स्वतः गाडी ड्राइव्ह करीत जाणे धोक्याचे होते. मित्राला फोन केला. म्हंटले, “बाबा, असं असं मला होतंय. मला हार्टऍटॅकचा संशय येतोय. तू ताबडतोब ये आपण डॉक्टरकडे जाऊया.” बिचारा आंघोळीला निघाला होता तसाच (कपडे होते व्यवस्थित अंगावर) धावला. येता येता त्याने एक सत्कार्य केले. त्याच्या डॉक्टर मित्राला परिस्थिती समजावून, त्याच्या दवाखान्यात बोलावून घेतले. दवाखाना १० वाजता उघडतो, तेंव्हा ९ वाजले होते. १० मिनिटात माझ्या व्यवसायाच्या ठिकाणी मित्र पोहोचला. तोपर्यंत मीही सावरलो होतो. पुन्हा जरा नॉर्मल झालो होतो. त्याला चहा वगैरे पाजला. मी ही घेतला, बरे वाटेल, असे वाटून. आणि त्याच्या स्कूटरवर बसून आम्ही त्याच्या डॉक्टरकडे गेलो.
डॉक्टरांनी लक्षणे विचारली. मी त्यांना संपूर्ण माहिती देऊन पूर्वेतिहासही सांगितला. त्यांनी ईसीजी काढला. शाळेत असताना भूमितीतील ग्राफ काढायला मला आवडायचे. ग्राफ म्हणजे हमखास मार्क. पण डॉक्टरांनी माझा काढलेला ग्राफ काही १० पैकी ८-९ मार्क देणारा नसावा असे त्यांच्या चेहर्यावरून वाटले.
डॉक्टरांना मी म्हंटले, “डॉक्टर, एनीथिंग सीरियस?”
डॉक्टर म्हणाले, “म्हंटलं तर आहे म्हंटलं तर नाही.”
मी, “म्हणजे?”
डॉक्टर, “काही नाही. आपण काही टेस्ट करून घेऊ. तुमचा अंदाज बरोबर वाटतोय. हार्टऍटॅक नसावा पण अल्सर आहे. मी चिठ्ठी देतो, तुम्ही काही टेस्ट करून घ्या, म्हणजे अचूक निदान करण्यास मदत होईल.”
मी मनात हुश्श केले. अल्सरचा काही तेवढा बाऊ नाही. गेल्या खेपेस नुसत्या गोळ्यांनी बरा झाला होता. पण आत्ता का उपटला? दारू नाही, सिगरेट नाही, जाग्रणं नाही, उपवास नाही. ऍसिडिटी वाढावी असे काही नाही. असो. पाहूया टेस्ट करून. डॉक्टरकडून चिठ्ठी घेतली आणि मित्राबरोबर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पोहोचलो.
दीनानाथच्या बाह्यरुग्ण विभागात डॉक्टरांची चिठ्ठी आणि ईसीजी रिपोर्ट दाखविल्या बरोबर तिथल्या नर्सने ताबडतोब स्ट्रेचर आणि वॉर्डबॉइजनाच बोलावले. मला म्हणाले, “झोपा स्ट्रेचरवर.”
अरे! म्हंटले, “कशाला? मी नुसत्या टेस्ट करण्यासाठी आलो आहे आणि चांगला माझ्या पायांनी फिरू शकतो आहे. स्ट्रेचर काय करायचंय?”
तसे मला एका बेडकडे घेऊन गेले आणि म्हणाले, “झोपा इथे.” मी झोपलो. जवळ मित्र होताच. आम्ही गप्पा मारत होतो तेवढ्यात एक लेडी डॉक्टर आली.
“काय काका? काय होतंय?”
सांगितले सगळे. तिने रिपोर्ट आणि चिठ्ठी पाहिली. नर्सला काहीतरी सांगून माझी नाडी वगैरे तपासली. सकाळी काय नाश्ता केला, व्यवसाय काय, वय काय असे जुजबी प्रश्न विचारले. मी उत्तरे देत होतो तेवढ्यात ती गेलेली नर्स एक बारीक नळी घेऊन आली. ती नळी माझ्या नाकातून पोटात सरकविण्यात आली. त्यातून मस्तपैकी फ्रिजचे थंडगार पाणी सोडण्यात आले. मला कळेना मी व्यवस्थित ग्लासने पाणी पिण्याच्या अवस्थेत असताना हा द्राविडी प्राणायाम का? असो. ग्लासभर पाणी पोटात सोडल्यावर पंपाच्या साह्याने ते पुन्हा बाहेर काढले.
“हं, सकाळी कॉफी घेतली का?” नर्स.
“नाही. चहा.” मी.
ती नळी नाकातून पोटात खुपसली असताना बोलायला अडचण होत होती.
“ठीक आहे. पाकीट, घड्याळ, मोबाईल, चष्मा, चेन सगळं उतरवून ठेवा.”
“अहो, मला फक्त काही टेस्ट करायला सांगितल्या आहेत. मी इथे राहायला आलेलो नाही.”
“असं नाही काका! तुम्हाला काही काळ अंडर ऑबझर्व्हेशन ठेवायला पाहिजे.”
“म्हणजे आज इथेच राहावं लागेल?”
“हो. मोठे डॉक्टर सोडतील तेंव्हा घरी जायचं. बरं व्हायचंय ना आपल्याला?”
मी मुकाट तिच्या आज्ञा ऐकल्या. सौभाग्यवतींना फोन करून अशा अशा कारणास्तव दीनानाथ रुग्णालयात दाखल झालो आहे बरोबर मित्र आहे असा फोन केला. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे…. छे! छे! समाधान कसले? किंचित भीती वाटू लागली होती.
सौ. आणि चिरंजीव घाबरे-घुबरे होऊनच हॉस्पिटलात पोहोचले. मीच त्यांना आधी धीर दिला.
“काळजी करू नका. काही टेस्ट करायच्या आहेत. एखाद दुसरा दिवस राहावं लागेल. विशेष गंभीर काही नाही.”