बीप. बीप... बीप. बीप... बीप. बीप... "हा पेजर फेकून द्यायला पाहीजे", असे त्रासिक सूर लावत मी तो आदळत बंद केला. आदल्या दिवशी रात्रीच एक रिलीज संपवून पहाटेच्या साखरझोपेत, नुकत्याच झालेल्या साखरपुड्याच्या आठवणीत पहुडलो होतो. परत डोळा लागतो न लागतो तोच फोनची घंटा खणाणली. आधी पेजर आता फोन. नक्कीच आमचा रिलीज मॅनेजर असणार या खात्रीने वैतागून डोळे चोळत मी फोन उचलला. "Who is it? " मी खेकसलो.
"अरे सुदू, हं ऐकू येतंय का? मी दादा बोलतोय"... आतापर्यंत माझी झोप उजाडलेल्या सूर्याएवढी उडाली होती. भारतातून फोन येण्याचं प्रमाण स्काईपआधीच्या दिवसांत अगदीच नगण्य होतं. पूर्वी एकदा आईने कोणासोबत तरी बाकरवडी पाठवू का म्हणून फोन केला होता तर मी खरडावून सांगितलं होतं, "तुझ्या फोनच्या खर्चात बाकरवडीची पाच पाकिटं आली असती. यापुढे मीच फोन करत जाईन. " भारतातून दादाचा फोन यायचं काहीच कारण नव्हतं. माझ्या हृदयाचा एक ठोका चुकला. सगळं ठीक तर असेल ना? "बोल दादा", मी थोड धैर्य गोळा केलं.
"आधी खाली बैस आणि नीट ऐक. मी अहमदाबादहून बोलतो आहे. बाबांना एक जबरदस्त ऍक्सिडेंट झालाय. डोक्याला खूप मार बसलाय. ते सध्या कोमात आहेत. आई-मी पुण्याहून आणि वैभवी-दादा (माझी होणारी बायको आणि मेहुणा) मुंबईहून अहमदाबादला पोहोचलो आहोत. पण तू काळजी करू नकोस. आय. सी. यू. मध्ये डॉक्टर नीट काळजी घेत आहेत. पिल्लू (बहीण) परीक्षेच्या तयारीत पुण्यात आहे. तिच्या सोबतीला तनुजा (दादाची होणारी बायको) घरी आहे. " एका दमात त्याने मन हलकं केलं. तोवर माझं धैर्य पूर्णपणे कोलमडलं होतं. कसाबसा हुंदका आवरत मी विचारलं "आणि आईऽ कशी आहे? " ती जरा मनाने हळवी आणि तिचा बाबांवर प्रचंड जीव. "घे तिच्याशीच बोल." त्या दिवशी आईला प्रथमच एवढं हिमतीने बोलताना ऐकलं. तिच्या आत्मविश्वासातला फरक लक्षात येण्याजोगा होता.
वैभवीशी एका गंभीर विषयावर बोलायचा हा माझा पहिलाच प्रसंग. या पूर्वी 'गुजगोष्टी' करणं किंवा नवीन फियान्से या नात्याने इंप्रेशन मारण्याचाच अनुभव होता. तिने तिच्या निपुण डॉक्टरी आवाजात "बाबा नक्की बरे होतील" असा दिलासा दिला आणि मी कसाबसा सावरलो.
आईवडिलांपासून दूर राहणार्या प्रत्येकाचं "Worst Nightmare" माझ्यासमोर खर्या आयुष्यात उभं राहिलं होतं. तो पहाटेचा फोन वाजला आणि सगळं काही बदललं होतं.
आठवणींचा पूर
डोळ्यांसमोर सतत हाय-डेफिनिशन मध्ये आठवणींचा सिनेमा चालू झाला होता. मन अचानक वीस वर्षं मागे गेलं. लँब्रेटावर सगळा कुटुंब-कबिला घेऊन निघालेले बाबा माझ्या डोळ्यासमोर आले. समोर हॅंडल धरून दादा, मागे पदर-साडी सावरत, लहान बहिणीला आवरत बसलेली आई, आणि सगळ्यात मागे स्टेपनीवर मागल्या सीटला कवटाळून, कसरती करत मी! हे सगळं अवडंबर आणि (स्टेपनीवर मला नको त्या ठिकाणी दणका देणारे) खड्डे सांभाळत, बाबा मिष्किलपणे विचारायचे "आहेस का रे सुदू... का पडलास मागच्या मागे? ". आज तेच बाबा अहमदाबाद सारख्या अनोळखी गावी, आयसीयूमध्ये आयुष्याशी झगडत पडले होते, आणि मी ५००० मैल दूर राहून काळजीशिवाय दुसरं काहीच करू शकत नव्हतो. स्टेटबॅंकेतल्या नोकरीच्या कामाने अहमदाबादला गेलेले असताना त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या 25असलेल्या ट्रकला धडक दिली होती. डोक्याला बसलेल्या मारामुळे 'स्कल फ्रॅक्चर' होऊन खूप रक्तस्राव झाला होता. मेंदूला सूज येऊन एक बाजू पॅरलाइझ झाली होती तर दुसरी बाजू अनियंत्रितपणे सारखी हलत होती. नशिबाने सारख्या परदेशवार्या करणारा दादा तेव्हा मदतीला भारतातच होता.
विचारांच्या कल्लोळाने आता माझा मेंदू बधिर होऊ लागला होता. Helplessness was killing me. बर्या-वाईट विचारांचं डोक्यात थैमान चालू होतं. पिंजर्यातल्या वाघासारख्या येरझारा घालण्याशिवाय काहीच करता येत नव्हतं.
महिन्यापूर्वीच बॅंकेतल्या कामाकरता बाहेरगावी असलेले बाबा, आमच्या साखरपुड्याकरता मोठ्ठी सुट्टी काढून आले होते. त्यांच्या आनंदाच्या भरात ते पोस्टिंगला असलेल्या कोणत्याशा गावाहून तीन लग्नांना पुरेल एवढं सामान घरी घेऊन आले होते. साखरपुडा उरकल्यावर ते पोस्टिंगच्या ठिकाणी निघाले तेव्हा मी ऐटीत वैभवीला रेल्वेस्टेशनवर त्यांना सी-ऑफ करायला घेऊन गेलो होतो. सामान चढवून माझी वैभवीला सिनेमाला घेऊन जायची घाई चालली होती. माझा उतावीळपणा त्यांनी नेमका हेरला. "तुम्ही निघा आता. गाडी सुटायला अजून वेळ आहे. मी बसतो काही वाचत. " वैभवीने मला चिमटा काढत शांत केलं. बहुदा तिला म्हणायचं होतं "अरे मुला, तू वडिलांना हमाल म्हणून सामान लोड करून द्यायला आलाहेस का सी-ऑफ करायला? " पण शेवटी माझ्या पोरकटपणाला प्रोत्साहन देत त्यांनी आम्हाला बोगी बाहेर काढलं. शेवटी गाडी सुटली... एकदाची... आणि मी उड्या मारत सिनेमाला जायला काढता पाय घेतला.
आपल्या माणसाचं मोल ते दिसेनासे होईपर्यंत का कळू नये हे मला अजून कळलं नाहीये. मला वाटतं आपला सर्वसामान्य व्यवहारीपणा 'आपल्या' लोकांनाही लावायला हरकत नाही. जसं आपण नाही का, दुकानातल्या सुपर-सेल वर तुटून पडतो... "एंजॉय व्हाईल सप्लाईज लास्ट!"... तेच लॉजिक. फरक फक्त एवढाच की हे सप्लाईज संपले तर हजारपट जास्त मोल देऊनही परत मिळत नाहीत.
यू. एस. ए. ते आय. सी. यू.
मी रोज अपडेट घेत होतो. दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस होत होता. मी स्वतःला कामात गुंतवून घेण्याचा विफल प्रयत्न करत होतो. अहमदाबादला आता बाबांच्या मदतीला दोन्ही 'होणार्या डॉक्टर सुना' 'लोक काय म्हणतील?' ह्याची पर्वा न करता धावून गेल्या होत्या. माझ्या आणि दादाच्या सासुरवाड्यांनी लग्नाअगोदरच सासरेबुवांची काळजी घ्यायला त्यांची 'पाठवण' केली होती... ते पण एका नवीन गावी, केवळ जाणिवेने... विश्वासावर. माणुसकीने पारंपरिकतेवर विजय मिळवला होता.
मी आतुरतेने वाट पाहत असलेली गुड न्यूज काही येत नव्हती. शेवटी मी मनिषाताईला फोन केला. ती पुण्यातली आमची शेजारीण. एक नामांकित डॉक्टर, नुकतीच बदलून अमेरिकेत आलेली. तिला तपशील देत अखेरीस मी विचारलं... "ताई... मी जाऊ? ". "किती दिवस झाले म्हणालास तू कोमात जाऊन? ".. "चार".. "लग्गेच निघ". मग माझी चक्रं हलली. दोन दिवसा आधीच घेतलेली कामाची जबाबदारी 'हॅंडोव्हर' करत मी निघालो. It was a leave without pay, but worth every penny lost.
माझ्या सासूबाई, मुंबई एअरपोर्टला होणार्या जावयाला धीर आणि अहमदाबादचं तिकीट द्यायला स्वतः आवर्जून आल्या होत्या. एका आईच्या मायेने सांत्वन करत त्यांनी मला आधार दिला. अहमदाबाद एअरपोर्टला घ्यायला दादा आला होता. मला सावरून घेताना तो चेहर्यावरची काळजी लपवायचा असफल प्रयत्न करत होता. शिक्षणाच्या निमित्ताने आम्ही समजायला लागल्यापासून एकमेकांपासून दूर राहिलेलो असल्याने आम्हां भावांतली भावनिक संभाषणाची ही पहिलीच वेळ, केवळ फॅक्चुअल तपशिलांवरच संपली.
आय. सी. यू. च्या बाहेरच आमची पलटण भेटली... आई आणि सोबत तिच्या होणार्या सुना. माझं बाहेरच इतकं ब्रेन-वॉशिंग झालं की मी आत नेमकं काय पाहणार आहे याचीच मला धडकी भरली. वैभवीच्या पाठोपाठ मी एक-एक बेड आणि पडदा ओलांडून जात होतो आणि अनेक कुटुंबांची अगतिक स्थिती पाहत होतो. कोणी ८० टक्के भाजलेलं, कोणी हार्टअटॅकमधून सावरणारं, कोणी ऍक्सिडंट होऊन लोळागोळा झालेलं, एका पडद्याआड ताटातुटीमुळे एका पत्नीने फोडलेला हंबरडा... मन पिळवटून टाकणारं ते भयाण वातावरण होतं. एव्हाना मला भोवळ आली. कसाबसा तोल सावरत मी बाबांपर्यंत पोहोचलो तर धक्काच बसला... तो औषधांचा उग्र वास, सलाईन, रक्ताच्या पिशव्या, जीव असल्याची ग्वाही देणारं ईसीजीचं ते निर्जीव यंत्र, अनेक ट्युबांचं जाळ, टेबलावर बाटल्यांचा खच, तोंडावर सुतकी भाव ठेवून कामात मग्न नर्स आणि बाबांचा अनियंत्रित हलणारा एकच हात... फोनवर मला धीर देताना हे सगळं बरचं सौम्य करून सांगण्यात आलं होतं. मला सावरायला दोन दिवस लागले.