तू नसताना ...

भास्कर

जोगसाहेबांनी नेहमीप्रमाणे दारावरच्या घंटीचे बटण दोनवेळा दाबले. दारावरच्या 'अच्युत जोग' पाटीकडे समाधानाने पहात ते दार उघडण्याची वाट पाहू लागले. आतून नेहमीप्रमाणेच माधुरीवहिनींची लगबगीने दाराकडे येणारी पावले वाजली.

" ... खूप काम होतं का आज? दमल्यासारखे दिसताय. दुपारी नीलिमाचा फोन आला होता. शरदरावांना कसंसंच होतंय म्हणून डॉक्टर बोलावला होता म्हणाली. नेहमीचंच झालंय त्यांचं हे ..."
नेहमीप्रमाणे जोगसाहेब ऐकतायत की नाही इकडे फार लक्ष न देता माधुरीवहिनी बोलत होत्या. हुश्श करून जोगसाहेब दिवाणावर बसले आणि हातात आलेला लिंबूसरबताचा पेला त्यांनी सावकाश तोंडाला लावला. काहीबाही बोलून माधुरीवहिनी आत गेल्या नि स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या. जोगसाहेबांनी कुठल्याश्या मराठी वाहिनीवर बातम्या बघायला सुरुवात केली. मधेमधे माधुरीवहिनी बाहेर येऊन काही बोलत होत्या. या ना त्या गोष्टी सांगत होत्या. पण दीडेक तासाने त्यांनी जेवणासाठी हाक दिली तेव्हा उमटलेला मोठा हुंकार एव्हढाच जोगसाहेबांचा त्या संवादातला सहभाग. अगदी नेहमीसारखेच.

"आज शेंगा अगदी छान मिळाल्या हो गवारीच्या. आणि दोन रुपये पावशेर. मी म्हटलं, तुला काय गं फायदा होणार यातून? गरीब दिसत होती बिचारी भाजीवाली. पाच रुपये दिले मी आणि दिडपावच कर म्हटलं तर तिनं तीनपाव केलंन् वजन! अगं कोण खाणार आहे घरी, मी म्हटलं तर असू दे म्हणाली. केदारला आवडते ना गवार. तिकडे वाळवंटात काय मिळणार पण त्याला. आणि घरी ही एव्हढी भाजी. मग शेजारी जोशी वहिनींना दिली थोडी. त्यांना आवडते अशी गूळ आणि दाण्याचं कूट घालून केलेली गवार." जोगसाहेब नुसती मान हलवत पुढचे घास घेत होते. माधुरीवहिनी गवारीनंतर, कोथिंबीरीकडे वळल्या. मग शेजारपाजारच्या बातम्या सांगून झाल्या. होता होता शेवटचा ताकभात खाऊन जोगसाहेब उठले आणि वहिनींनी स्वत:चं ताट घेतलं. बायकांनी मागून बसण्याची परंपरा होती जोगांच्या घरात.

बाहेरच्या खोलीत येऊन जोगसाहेब टीव्हीसमोर जरासे रेंगाळले मग घड्याळाकडे पहात त्यांनी पायात चपला सरकावल्या.
"जरा जाऊन येतो गं." जोगसाहेबांचा आवाज टीव्हीच्या आवाजात मिसळून गेला.
आत वहिनींनी मान हलवली.

रोज जेवण झाल्यावर जोगसाहेब एक सिगरेट ओढत असत. जोडीला आणखी एकदोन मित्र. मित्र म्हणजे काय रस्त्यापलिकडच्या घरातले जाधवसाहेब आणि कोपर्‍यावरच्या इमारतीतले नारकरसाहेब. या घरात राहायला आल्यावर सुरुवातीला जोगसाहेब नुसतेच घराबाहेर उभे राहून सिगरेट ओढत असत. मग एकदा जाधवसाहेब भेटले आणि नंतर एकदा टपरीवर सिगरेट घेताना नारकरसाहेब. आता नऊसाडेनऊला घराबाहेर पडून एक सिगरेट आणि गणपतीच्या देवळापर्यंत एक चक्कर हा क्रम नेहमीचा झाला होता. एखादेवेळी शेजारचे जोशीसाहेब येत; कधी चतुर्थी वगैरेच्या निमित्ताने आणखी एखाददोन जण पण नेहमीचे गडी म्हणजे हेच आपले जोग साहेब आणि त्यांचे दोन मित्र. बरं फिरता फिरता फार काही बोलणं होई असं काही नाही. त्यातल्यात्यात नारकरसाहेब त्यांच्या बांधकामखात्यात काय काय खाल्ले जाते यावर काही ना काही कोट्या-विनोद करत पण तेही तसे नेहमीचेच होते. जोगसाहेबांच्या बँकेतही अनेक गमती घडत असत. पण ते सांगायचे कधी त्यांना सुचत नसे. अशी ही चक्कर आटोपून जोगसाहेब घरी येत तोवर वहिनींचे मागचे आवरलेले असे. मग उद्या डब्याला काय करावे यावर वहिनी आपापल्याच बोलत त्यावेळी जोगसाहेब सगळी खिडक्यादारे व्यवस्थित बंद आहेत की नाही हे पहात. हा कार्यक्रम झाला की मग काय झोप आणि उद्या नवीन दिवस चालू. आजही असेच झाले. नाही म्हणायला वहिनींचे उद्याचे डब्याचे स्वगत मधेच त्यांच्या बहिणीचा, नीलिमाचा फोन आल्याने अर्धे राहिले. पण शरदरावांना विशेष काळजी करण्यासारखे काही झालेले नाही हे सांगायलाच तो फोन होता.

एका छापातले असे हे दिवस.

अश्या दिवसांच्या रांगेतल्या एके दिवशी मात्र दोन वेळा घंटी वाजवून झाल्यावर जोग साहेबांना आपल्या नावाच्या पाटीमध्ये एक घडी केलेला कागद खोचलेला दिसला. शिवाय काहीतरी बँकेत विसरून आलो की काय अशी भावना झाली. आतून माधुरीवहिनींची चाहूलही नव्हती. त्यांनी तो कागद उलगडला तर चिठ्ठी!
अहो,
शरदरावांना छातीत दुखल्यामुळे दवाखान्यात ठेवलंय. मी नीलिमाकडे जाते आहे. उद्यापरवा परत येईन. जोशीवहिनी तुम्हाला डबा, संध्याकाळचे जेवण देणार आहेत. किल्ली त्यांच्याकडे ठेवली आहे.
आपली,
सौ माधुरी.

तेव्हा मग जोगसाहेबांना दारावरचे पितळी कुलूप दिसले. ते परत फाटकाबाहेर आले तर समोर जोशीवहिनी!
"मी पाहिलं तुम्हाला येताना." किल्ली देत घाईघाईने त्या म्हणाल्या. "जोगवहिनी म्हणाल्या एखाददोन दिवसात परत येतील. तुम्हाला मी वाढून पाठवू, संध्याकाळचं जेवण हो, की घरीच येताय?"

"अं हो, म्हणजे नाही, म्हणजे .." जोशीवहिनींच्या बोलण्याच्या वेगाने जोगसाहेब गडबडलेच.
 जोशीवहिनींनी लांबपल्ल्याच्या गाडीसारखी पाच सात वाक्ये 'रात्रीचे जेवण' या एकाच विषयावर भराभर ऐकवली. आणि त्या गेल्या. जोगसाहेबांना नेहमी माधुरीवहिनींच्या सावकाश बोलण्याची सवय. त्यातून बरेचसे न ऐकले तरी चालण्यासारखे. एकदम एव्हढ्या फैरींनी त्यांना गारद झाल्यासारखे वाटू लागले.

सावकाश चालत ते परत दारात आले. कुलूप उघडलं. दिवे लावले. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे. पुन्हा त्यांना काही विसरल्याची आठवण झाली. 'काय बरे विसरून आलो', त्यांना काही केल्या आठवेना. अर्धे मिनिट ते दिव्याच्या बटणाजवळ तसेच उभे राहिले. मग एकदम दमल्यासारखे होऊन पुढे होऊन दिवाणावर बसले. एकदम लक्षात आले. हातात सरबताचा पेला नाही. 'जाऊ दे आज एक दिवस', जोगसाहेबांनी हात झटकला. आईनं कुठल्या की पुस्तकात वाचलेलं, जेवायच्या एक तास आधी लिंबूसरबत आरोग्याला चांगले. नाहीतर आधी घरी संध्याकाळी चहा होत असे. 'आज प्यावा का चहा?' चहाच्या विचारानीच एकदम तरतरी येऊन जोगसाहेब उठले. स्वयंपाकघरात गेले तर जेवणाच्या टेबलावर लिंबूसरबताचा पेला! नकळत त्यांनी तो उचलला आणि सरबत प्यायला सुरुवात केली. त्यांना थोडे बरे वाटू लागले.

' ... आता ही किती दिवस तिकडे राहील?' जोगसाहेब विचार करत, एकेक घोट घेत स्वयंपाकघर पाहू लागले. स्टीलचे काळे चकाकणारे डबे, हिंडालियमचे गोरे डबे, काचेच्या बरण्या, तांब्ये, फुलपात्री, तांब्याचं छोटं पिंप. त्यांच्या लक्षात आलं, चहा करायचा म्हटलं असतं तरी कुठे काय आहे हे कुठे माहित आहे. लग्नाआधी, सगळे यायला हवे म्हणून जोगसाहेबांना त्यांच्या आईने स्वयंपाकातले बरेच काही शिकवले होते. पण लग्नानंतर, माधुरीला मदत केलेली मात्र आईला चालत नसे. म्हणून मग काही न करण्याची सवय लागली ती आता आई जाऊन वीस वर्षे झाली तरी तशीच आहे. वेगवेगळे डबे पहात जोगसाहेब मिनिटभर तसेच उभे राहिले. जवळच्या एका गोर्‍या डब्यावरचा बारीक अक्षरात लिहिलेला मजकूर त्यांना वाचता आला. 'चि. सौ. माधुरीस आईकडून. २१.०८. ७८.' लग्नातला डबा! जोगसाहेबांना लग्न आठवले. 

खरं म्हणजे अच्युतला इतक्यात लग्न करायचं नव्हतं. आणीबाणीत झोकून काम करणारा, गोगटेगुरुजींचा लाडका कार्यकर्ता होता तो. क्रांतीचा हा यज्ञ आहे आणि त्यात आपली समिधा पडावी; गुरुजींसारखेच अविवाहित राहून काही समाजकार्य करावे असे भारलेले विचार होते अच्युतचे. अगदीच आईच्या सांगण्यावरून त्या कार्यातल्या कुणाशी लग्न करावे इतपत तडजोड. पण याची कुणकुण लागूनच की काय आईने थेट सगळं ठरवूनच टाकलं. आणि मग आईच्या शब्दाबाहेर जाणार्‍यातलाही नव्हताच अच्युत.

जोगसाहेबांना मंगलाष्टकांबरोबर धोधो कोसळणारा पाऊसही ऐकू येऊ लागला. माधुरीने हाताला हात लावल्यावर पोटात काहीतरी खोल गेले होते तसेच पुन्हा वाटू लागले. त्यांनी आपल्या हाताकडे पाहिले नकळत. आणि पुन्हा त्या डब्याकडे. तीस वर्ष झाली. तीस. माधुरीशिवायच्या आपल्या आयुष्यापेक्षा तिच्याबरोबरची वर्षे आता जास्त आहेत. जोगसाहेबांचे आकडेमोडीला सरावलेले मन वेगवेगळे हिशोब करू लागले. माधुरीचे वय, आई आज असती तर तिचे असले आकडे मनात येऊन गेले. मग आपल्या वयाचा आकडा मनात घोळवून अजून आपल्याला 'चाळशी' नाही याचा त्यांना पुन्हा बारीकसा आनंद झाला.