मागे वळून पाहता

मीरा फाटक
मागे वळून पाहता

माझं लग्न झालं तेव्हा मी मुंबईत नोकरी करत होते आणि पतिराजांची नोकरी भुबनेश्वरला. भुबनेश्वरला माझ्या क्षेत्रातील नोकरी मिळणं त्यावेळी तरी, म्हणजे तीसएक वर्षांपूर्वी, शक्य नव्हतं. नुसतं घरी बसून रहाणं मला मानवण्यासारखं नव्हतं. पतिराज समंजस, माझ्या इच्छेचा आदर करणारे होते. शिवाय आपल्या सुविद्य(?) पत्नीनं नुसतंच घर सांभाळणं त्यांनाही फारसं रुचलं नसतं. त्यामुळे त्यांनीही नोकरी सोडून ताबडतोब भुबनेश्वरला चल असा आग्रह धरला नाही. एकमेकांच्या पूर्ण संमतीने आमचा दोन ध्रुवावर दोघे आपण तू तिकडे अन मी इकडे असा संसार सुरू झाला. पण भुबनेश्वरच्या पहिल्या भेटीतच भुबनेश्वर आणि मुंबई हे केवळ भौगोलिक दृष्ट्याच भारताच्या दोन ध्रुवांवर आहेत असे नव्हे तर दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टीत हे अंतर तसेच आहे हे विदारक सत्य समोर आले. 

भुबनेश्वर हे ओरिसाच्या राजधानीचे शहर पण प्रथमदर्शनी मला तर ते महाराष्ट्रातल्या एखाद्या जिल्ह्याच्या गावासारखेच वाटले. अरुंद रस्ते, तुरळक दुकाने, बैठी घरे, रस्त्यावर वाहनेही फारशी नाहीत. अर्थात त्यामुळेच रस्ते अरुंद असले तरी चालत होते. वाहतुकीला अडचण यायची ती गायींमुळे. रस्त्यात गायी निवांतपणे रवंथ करत बसलेल्या असायच्या. काही काही तर अशा की हॉर्न वाजवूनही त्यांना ढिम्म होत नसे. मग वाहनेच त्यांना वळसा घालून पुढे जात!

आम्ही ज्या भागात रहात होतो तिथे विद्युतदाब खूप कमी असायचा. त्यामुळे दिवे अगदी मिणमिण वाटायचे. त्यातही अंधार लवकर पडायचा हा आणखी एक मुद्दा होता. मला कॉलेजचे दिवस आठवले. तेव्हा क्रिकेटचा कसोटी सामना कलकत्त्यात असला की कधीकधी ’बॅड लाईट’ मुळे खेळ चार/साडेचारच्या आसपास बंद व्हायचा. ह्या मागचा भूगोल तेव्हा कळला होता तरी इतक्या लवकर संध्याकाळ होते याची गंमत वाटायची. म्हणजे कळलं पण वळलं नव्हतं असं झालं होतं. पण भुबनेश्वरला आल्यावर डिसेंबराच्या मध्यात साडेपाचलाच दिवेलागण झालेली पाहिली आणि उन्हाळ्यात सकाळी साडेपाचलाच लख्ख उजाडलेलं पाहिलं. मग सगळं कळलं आणि वळलंही! तर ते मिणमिण दिवे, करमणुकीसाठी वाचन आणि रेडिओ याव्यतिरिक्त काही नाही (त्यावेळी भुबनेश्वरात टीव्ही आलेला नव्हता.), त्या अंधुक उजेडात वाचनही कठीण आणि आजूबाजूला पण सर्व शांत शांत. यामुळे संध्याकाळच्या वेळी मला तर जरा उदासवाणंच वाटायचं.

जमेच्या बाजूला हिरवीगार वनश्री आणि शुद्ध हवा यांची रेलचेल होती. इथली शिल्पकला, चित्रकला, हस्तकला आणि चांदीच्या फिलिग्रीच्या वस्तू ह्याबद्दल खूप ऐकलं होतं. मला ह्या कलांमध्ये फारसा रस नसल्याने त्याचं अप्रूप वाटलं नाही. सोने-चांदी माझ्यापासून जरा फटकूनच असतात! त्यामुळे तोही प्रश्न नव्हता. पण मला इथली कोणती कला सर्वात जास्त आवडली असेल तर ती नृत्यकला- ओडिसी नृत्य! इथल्या नंतरच्या दीर्घ वास्तव्यात मी ओडिसी नृत्याचे अनेक कार्यक्रम पाहिले आणि त्यांनी खूप आनंदही दिला. पण त्यातला एक अविस्मरणीय आहे. ओडिसी नृत्यांगनांमध्ये कनिष्ठिकाधिष्ठित असे जिचे वर्णन करता येईल त्या संजुक्ता पाणिग्रहीचे नृत्य मला SPIC MACAY च्या कृपेने केवळ आठ दहा फुटांवरून पहायला मिळाले. फार सुंदर अनुभव होता तो!

ओरिसाच्या पहिल्या भेटीनंतर मी मुंबईला पुन्हा कामावर रुजू झाले. नंतर मी मधूनमधून रजा घेऊन भुबनेश्वरला येत असे. इथली पहिली गोष्ट खटकली ती म्हणजे इथे सार्वजनिक वाहतूकसेवा जवळजवळ नव्हतीच. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या नावाखाली सायकलरिक्षा असत. बहुतेक लोकांकडे स्वत:च्या सायकली, स्कूटरी, चारचाकी गाड्या असत. माझे पतिराज पेट्रोल जाळण्यापेक्षा स्वतःच्या शरीरातल्या कॅलऱ्या जाळणे सर्व दृष्टींनी श्रेयस्कर अशा विचारांचे. त्यामुळे ते ये/जा करण्यासाठी सायकल वापरत. शिवाय माझे तिथे जाणे थोड्या काळासाठी असल्याने स्कूटर घेण्यात त्यांना काहीच जस्टिफिकेशन दिसत नव्हते. पण माझ्या त्या अल्पकालीन वास्तव्यात कुठे बाहेर जाण्याचा प्रसंग आला की प्रश्नचिन्ह! मी अगदी नवी नवरी होते तेव्हाही माझे आकारमान सायकलवर ’डब्बलशीट’ बसण्यासारखे नव्हते. तेव्हा ’तेरे मेरे सपने’ चं अनुकरण करू म्हटलं तरी ते शक्य नव्हतं! सायकलरिक्षा हा एकच पर्याय उपलब्ध असे. पण ते अंगवळणी पडायला खूप दिवस लागले. आधी आपलं वजन तो रिक्षावाला ’वाहून’ नेतोय हेच कसंतरी वाटायचं. तरी इथे माणसांनी हातगाडीसारख्या ओढायच्या रिक्षा नसतात. (कलकत्त्यात त्या अजूनही दिसतात.) ह्यात आणखी भानगड म्हणजे रिक्षा ’ठरवायला’ लागत. पण ठिकाणी पोहोचल्यावर त्या ठरवलेल्या पैशापेक्षा जास्त पैशाची मागणी रिक्षावाले करत असत, तीही अगदी गयावया करून. कारणं तर फारच मजेशीर म्हणजे - ऊन किती होतं, थंडी किती होती, चढाचा रस्ता होता, इत्यादी. गरिबाला मदत म्हणून जास्त पैसे द्यायला माझी ना नसायची पण ते ठरवतानाच जास्त पैसे का सांगत नाहीत असं वाटून माझी चिडचिड व्हायची. पुढे इतर लोकांना रिक्षावाल्यांशी बोलताना ऐकलं आणि पैसे देताना पण पाहिलं तेव्हा लक्षात आलं की आपण फारच सौजन्याने बोलतो आणि पैसेही ’गोइंग रेट’ पेक्षा जास्त देतो. म्हणजे मऊ लागलं की कोपरानं खणण्यातलाच प्रकार होता.

दुसरा फरक म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीतला. हा फरक तसा चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा होता. चांगला म्हणजे इथे मिठाया खूप खाल्ल्या जातात. आपल्याकडे साधारण सणाला किंवा काही विशेष प्रसंग असेल तरच मिठाई केली किंवा आणली जाते. पण इथे कुठल्याही घरामध्ये केव्हाही गेलात तरी मिठाई असतेच. नसली तरी सहजपणे विकत आणली जाते. कारण मिठाईची दुकाने खूप असतात. ह्या छेन्याच्या मिठाया अतिशय स्वादिष्ट असतात. (छेना म्हणजे पनीर. पण बाजारात जे पनीर मिळते ते मिठाईसाठी वापरू नये. मिठाईसाठी घरी दूध फाडूनच पनीर करावे.) आपण रसगुल्ला आणि बंगालची घट्ट गाठ बांधलेली आहे. पण ओरिसातील रसगुल्ला बंगाली रसगुल्ल्याच्या कितीतरी पटीने चांगला असतो. शिवाय इतरही मिठाया म्हणजे छेनापोड, छेनाखिरी, संदेश इ. पण खूप छान असतात. ह्या मिठाया खव्याच्या मिठायांसारख्या जडही होत नाहीत. मला मधुमेहाची व्याधी जडेपर्यंत किंवा जडलेली कळेपर्यंत मी ह्या मिठाया मनसोक्त खाल्या.

खाण्यपिण्याच्या चांगल्या नसलेल्या फरकाबद्दल बरंच लिहिण्यासारखं आहे. नेहमीच्या खाण्यातल्या बऱ्याच गोष्टी मिळत नसत किंवा मिळाल्या तरी दर्जा अगदीच निकृष्ट. इथल्या लोकांचं मुख्य खाणं भात हेच असल्यामुळे गहू एखाद्याच दुकानात कधीतरी मिळायचा. त्याचा दर्जाही बेताचाच. डोळेफोड करून तो निवडून दळून आणावा लागत असे. गूळ मिळाला तरी त्याचीही गुणवत्ता बेताचीच. पावसाळ्यात तर गूळ काकवी किंवा मध यांच्यासारखा प्रवाही व्हायचा. शेंगदाणे, साबूदाणा, सुकं खोबरं, मटकी, चिंच, ज्वारी किंवा ज्वारीचं पीठ हे पदार्थ मिळणं म्हणजे महाकर्मकठीण. मग पुण्यामुंबईहून कोणी येणार असलं की त्यांना ह्या वस्तुंची यादी द्यायची. काही दिवसांनी एका मराठी गृहस्थांनी एक दुकान शोधून काढलं. त्यात फक्त शेंगदाणे आणि भुईमुगाच्या शेंगा एवढंच मिळायचं. शेंगदाणे खूप चांगले नसले तरी आमची गरज भागवली जाईल इतपत असायचे. मग काय सगळे तिकडे! ’चुकला मराठी शेंगदाण्याच्या दुकानात’ अशी म्हण तयार व्हायला लागली. त्यावेळी चांगला ब्रेडही भुबनेश्वरमध्ये मिळत नसे. एकंदरीत जास्त पैसे घेऊन मालाची गुणवत्ता चांगली ठेवावी ही संकल्पनाच तिथे तेव्हा माहीत नव्हती.

भाजीपाल्याच्या बाबतीतही आनंदच होता. मेथी, पालक ह्या पालेभाज्या, तसेच मटार, फ्लॉवर, ढब्बू मिरची ह्या भाज्या फक्त हिवाळ्यातच मिळायच्या. कोथिंबीरही फक्त तेवढेच अडीच/तीन महिने मिळायची. त्यामुळे तर माझी फारच पंचाईत व्हायची. पदार्थ विशेष चांगला झाला नसला तर कोथिंबीर घालून त्याची चव बरीच सुधारता येते हा माझा अनुभव. आता पितळ उघडं पडायला लागलं! उपरनिर्दिष्ट भाज्या एरवी मिळत नसल्यामुळे पावभाजी फक्त थंडीच्या दिवसातच करता यायची. नेहमी मिळणाऱ्या भाज्या म्हणजे भोपळा, परवर, वांगी-भरपूर बिया असलेली! माझं माहेर वाईचं. त्यामुळे मला कृष्णाकाठची वांगी खायची सवय. त्यांच्या तुलनेत ही वांगी मनासच येत नसत. मुळीच दृष्टीस न पडणारी भाजी म्हणजे अळूची. अळकुड्या मात्र नेहमी मिळत.