ठेवू कशाला भंगलीं स्वप्ने उरी कवळून मी ?
ही राख सारी चाललो वाऱ्यावरी उधळून मी !
होतो नभाचा लाडका; होत्या सभोती तारका...
हे एवढे होते तरी पडलो कसा निखळून मी ?
वणव्यात दुःखांच्या जरी; मी कोंडला गेलो तरी...
बाहेर येताना किती आलो पुन्हा उजळून मी !
अद्याप अर्थांची सुते, का काढती काही भुते ?
केव्हातरी काहीतरी गेलो खरा बरळून मी !
आता तुला माझ्यासवे बोलायचे नाही नवे....
तेव्हा तुझ्याशी बोललो होतो जरा उसळून मी !
होईल केव्हा शांत हा ? माझ्यातला आकांत हा ?
लाटांतल्या लाटांतुनी उठतो किती खवळून मी !
काही न आता व्हायचे; आगीस मग का भ्यायचे ?
होणार नाही राख; नाही जायचो वितळून मी !
तू दावल्यावर आमिषे...विसरून सारी किल्मिषे...
बोलायला येतो पुन्हा; जातो पुन्हा हुरळून मी !
हातात येते आणखी...वाळूच वाळू सारखी...
आयुष्ये हे माझे रिते काढू किती ढवळून मी ?
स्वप्नातही, भासांतही...रक्तातही, श्वासांतही...
साऱ्याच अस्तित्वात या गेलो तुझ्या मिसळून मी !
एकांत हा तेजाळतो; अद्यापही गंधाळतो...
तुज पाहिले कोठेतरी, केव्हातरी जवळून मी !