वेड लावी जीवा,
कान्हा तुझी रे बासरी,
ओढाळ अंतरी,
नित्य घुमे..
रिता रिता गमे,
भरलेला घट शिरी,
असार.. संसारी
असोनिया..
कदंब वनात,
अवचित तू समोरी,
मोरपीस शिरी,
खोवुनिया..
खोडसाळ हसू,
खटयाळ ओठांवरी,
साथीला पावरी,
खोडकर..
चित्त अनावर,
आवरू कसे तरी?
तूच रे सावरी,
गिरिधारी..
वाहिल्या घागरी,
जन्मजान्हवीच्या तीरी,
आता पुरे येरझारी,
संसाराची…