“आज शहात्तर वय आहे माझं. दोन महिन्यात सत्त्याहत्तर!” थोडं स्वतःशीच बोलल्यासारख्या त्या आजी म्हणाल्या. “ग्लिन, माझा धाकटा भाऊ, म्हणायचा, ‘रिटा, डोक्यावर टोपी घातल्याशिवाय फिरू नकोस थंडी वार्याची … मी फिरतेच आहे; तो मात्र गेला बिचारा मागच्यावर्षी.” त्यांचा आवाज कातर होऊ लागला. “कधी कधी असह्य होतं गं सगळं. सगळ्या धाकट्यांचं पुढे निघून जाणं; आणि आपली साथ न देणारं आपलंच शरीर. कधी कधी तर कोणी नुसता खांद्यावर हात ठेवला तरी मस्तकात कळ जाते.” त्यांनी कुठल्याशा अवघड आजाराचं नाव सांगितलं. “हाडं ठिसूळ होतात, स्नायू ताठरतात…” असं काही बाही म्हणाल्या. मी फक्त समजुतदारपणे मान डोलावली.
बसमध्ये या आजी भेटल्या आणि एकदम गप्पाच मारायला लागल्या. त्यांच्या देखण्या, भारतीय काकूची गोष्ट, सुंदर चुलतभावंडांचं कौतुक आणि अश्याच सगळ्या ‘गेले ते दिन’ प्रकारच्या आठवणी. मी निवांतपणे ऐकत होते. आम्ही बसमधून उतरलो तरी त्या बोलत होत्या. आनंदयात्री आजी आहेत असा विचार करत होते. तितक्यात त्यांनी विषयांचा सांधा बदलला.
“कधीकधी असह्य होतं ना, तेव्हा मग मी एका कोपर्यात जाते आणि गुपचूप पोटभर रडून घेते.” त्या पुढे सांगत होत्या, “अगदी हलकं हलकं वाटतं बघ!”
“बरोबर आहे. अश्रूपात हा ताणमुक्तीचा नैसर्गिक उपाय आहे!” मी म्हणाले.
पण उत्तर चुकलंच. मी बोलल्यासरशी त्यांना माझं अस्तित्व एकदम नव्याने दिसल्यासारखं झालं आणि आपण फार बोलून गेलो की काय असा त्यांचा चेहरा झाला.
“भेटू पुन्हा!” म्हणत त्या एकदम वळून निघून गेल्या.
आजींना माझे उत्तर आवडले नाही तरी त्यांना सापडलेला ताणमुक्तीचा मार्ग अगदी नैसर्गिक आहे हे सोळा आणे सत्य. ‘रडा आणि मुक्त व्हा.’ असे ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ च्या चालीवर म्हणता येईल. रडण्यात लठ्ठ होण्याचा धोका नाही, पण नाक चोंदण्याची मात्र शक्यता आहे. शिवाय हे रडणे म्हणजे नुसते डोळ्यातून पाणी वाहू देणे नाही. म्हणजे कांद्याचा वास घेऊन रडून उपयोग नाही. बरे वाटायला लावण्याची जादू केवळ भावनाभराने आलेल्या रड्यात असते. कारण कांद्याने किंवा धुळीने आलेले डोळ्यातले पाणी वेदनेने आलेल्या अश्रूंहून वेगळे असते.
आपल्या डोळ्यांत तयार होणार्या आसवांचे तीन ढोबळ प्रकार मानले जातात. एक म्हणजे डोळा स्वच्छ ठेवण्याचे काम करणारे, दुसरे म्हणजे डोळ्यांचे संरक्षण करणारे आणि तिसरे म्हणजे आपण ज्याला रडू म्हणतो ते, भावनांच्या भरात डोळ्यात येणारे. या तिन्ही प्रकारच्या अश्रूंचा मुख्य घटक पाणी हाच असला तरी त्यातली प्रथिने, क्षार आणि विकरे (हार्मोन्स) यांचे प्रमाण वेगवेगळे असल्याचे आढळले आहे. सगळ्याच प्रकारचे अश्रू वरच्या पापणीमागे लपलेल्या अश्रूग्रंथीत तयार होतात, पापणीची उघडझाप झाल्याने डोळ्यावर पसरतात आणि डोळ्याच्या, नाकाच्या शेजारच्या, कडेच्या एका छिद्रातून वाहून जातात. भावनातिरेकाने किंवा झणझणीत वासाने जर जास्त अश्रू आले तर ते डोळ्यातून गळतातच पण नाकातूनही गळू लागतात. बराच वेळ असे झाल्यावर मग सर्दीसारखा परिणाम होऊन नाक चोंदते.
माणसाच्या अवाढव्य मेंदूमुळे डोक्यात अनेक विचार सतत चालू असतात. केवळ अन्न व जोडीदार मिळाला की झाले ही ‘रानटी’ अवस्था मनुष्यजात केव्हाच पार करून आली आहे. मी काय केले की काय होईल; ह्याने काय केले की मला त्रास होईल; तिने काय केले की मला बरे वाटेल अश्या ‘आत्ताच्या’ गोष्टींपासून ते आयुष्यभराच्या निर्णयांपर्यंत आपला मेंदू सतत विचार करत असतो. यात कधी कधी अनपेक्षित घडते, धक्के बसतात, मनाची उलथापालथ होते. शारीरिक जखमेप्रमाणे मनालाही ‘लागते’. कुठेतरी ‘आत’ काहीतरी तीव्रतेने दुखू लागते, खुपू लागते. डोळे भरून येऊ लागतात व हुंदका फुटतो.
प्रतिकूल परिस्थितीचा विचार करताना मेंदूमध्ये काही ‘विषद्रव्ये’ तयार होतात. यांना विषद्रव्ये म्हटले जाते खरे पण ती थोड्या प्रमाणात कायमच शरीरात वावरत असतात. शिवाय मी विचार ‘करताना’ म्हटलेले आहे पण हा विचार जाणीवपूर्वक केलेला नाही तर आपोआप झालेला विचार. म्हणजे रिटाआजींना एखादा फोटो बघून म्हणा किंवा एखादी जुनी भेटवस्तू, भेटकार्ड पाहून आपल्या धाकट्या भावंडांची आठवण होते. यात काही वेळा आनंदी घटना आठवून आनंद वाटतो. म्हणजे मेंदून छान रसायने, आनंदद्रव्ये तयार होतात. तर कधी हे सगळे कायमचे निघून गेले आहेत किंवा आता असे आनंदी क्षण पुन्हा येणार नाहीत अश्या विचाराने एकाकीपणा भेडसावतो म्हणजे दु:खाची रसायने, विषद्रव्ये तयार होतात. या विषद्रव्यांचे प्रमाण वाढले की शरीराला जे जाणवते त्याला आपण ‘ताण’ म्हणतो. दु:खाने किंवा भावनातिरेकाने जे रडू येते त्यात ही ताणामुळे निर्माण झालेली विषारी द्रव्ये बाहेर टाकली जातात. त्यामुळे थोडावेळ रडल्यावर बरे वाटते. कधी कधी रडू कोसळण्याचे तात्कालिक कारण अगदीच क्षुल्लक असते. नंतर आपण या एवढ्याशा गोष्टीसाठी कसे काय रडलो? याचे आश्चर्यही वाटू शकते. अर्थातच खरे कारण म्हणजे त्या कोसळण्याच्या वेळेपर्यंत वेगवेगळ्या प्रसंगी जमलेली विषद्रव्ये!
काही जोरात लागले, कुठे खूप दुखत असले तर शारीरीक दु:खाने कळवळून रडू येते. अश्या शारीरीक इजेमुळे, दुखण्यामुळे येणार्या अश्रूंमध्ये नैसर्गिक वेदनाशामक घटक आढळतात (१). त्यामुळे ‘आसुओंको पीकर जी गयी’ वगैरे म्हणतात ते शास्त्रीय दृष्टिकोनातूनही खोटे म्हणता येणार नाही.
अश्रूंमध्ये कोणकोणती रसायने हे हल्लीच कळले असले तरी रडण्यामुळे मनावरचा ताण कमी होतो ही काही नवीन संकल्पना नाही. सहसा नाटकांच्या समीक्षणांमध्ये आढळणारा कॅथार्सिस हा शब्द ग्रीक तत्त्ववेत्ता ऍरिस्टोटलने दोनेक हजार वर्षांपूर्वी रूढ केलेला आहे. कॅथार्सिस म्हणजे भावनांचे प्रकटीकरण करून ताणमुक्ती. रडून, मोठ्याने ओरडून, खूप बोलून ताण कमी होतो अशी कल्पना. कधीतरी खटकन कुठे लागले तर जोरात ओरडून पहा; कमी दुखल्यासारखे वाटेल. आपल्या (आणि इतर अनेक) संस्कृतीत रडण्याला प्रतिष्ठा नाही, तेव्हा मग प्रकटीकरणाचे दुसरे उपाय योजले जातात. रडून होतो तसा ताणाच्या विषद्रव्यांचा यात थेट निचरा होत नाही तर दुसरी रासायनिक द्रव्ये हळूहळू तयार होऊन ताणद्रव्यांना निष्प्रभ करतात.
आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक लहानसहान ताण आपण ताणद्रव्यांच्या स्वरूपात जमवून ठेवत असतो. पण रिटाआजी म्हणाल्या तसे कोपर्यात जाऊन पोटभर रडून घेणे नेहमीच शक्य होईल असे नाही. यावर उपाय म्हणजे सगळे रडत असताना रडणे! उदा. चित्रपट पहाताना. अगदी टुकार दर्जाचे रडके चित्रपटसुद्धा कधी कधी खूप यशस्वी होताना दिसतात. जर बहुसंख्य प्रेक्षकांना चित्रपट पाहून रडण्याची संधी मिळत असेल तर त्या चित्रपटाची ‘लोकप्रियता’ चक्रवाढीने वाढणे सहज शक्य आहे. माणसाला दुसर्याच्या दु:खाशी समरस होता येण्याचे नैसर्गिक अंग आहे. त्यामुळे चित्रपटातील दु:खाने वाईट वाटणे साहजिक; तर कोणत्याही मार्गाने भावनिक होऊन रडू फुटले की ताणद्रव्यांचा निचरा ठरलेला. चित्रपट निर्माते आणि प्रेक्षक दोहोंसाठी अगदी ‘जिंका जिंका’ परिस्थिती.
सध्याच्या माहितीप्रमाणे भावनिक अश्रू हे माणूस-स्पेशल आहेत. म्हणजे केवळ मनुष्यजातीत आढळणारे. काही निरीक्षकांनी सील आणि हत्तीही त्यांना दु:ख झाल्यावर रडतात असे नोंदवले आहे, पण अजून ही माहिती तितकीशी मान्यताप्राप्त नाही. खरे तर आपले शरीर पाणी जपून वापरते. मग अश्रूंच्या बाबतीत ही उधळपट्टी कशी काय? हा प्रश्न बर्याच शास्त्रज्ञांना पडला होता. अश्रूंची उत्क्रांती माणूस जलीय कपि असताना झाली असावी हे त्यावरचे सध्याचे उत्तर आहे. जलीय कपि म्हणजे पाण्यात वावरणारे बिनशेपटीचे माकड. आपले सरळसोट शरीर, पोहायला सोयीची चपटी पाऊले, शरीरावर विरळ, तोकडे केस हे सगळे जलीय काळात झालेले बदल. गालावरून वाहणारे अश्रूही त्यापैकीच एक, असे आता मानले जाते. मनुष्यजातीची सामाजिक वीण गुंतागुंतीची होऊ लागली, मेंदूचा आकार वाढू लागला, तशी व्यवधाने आणि पर्यायाने दु:खेही वाढली. ताणद्रव्यांची निर्मिती वेगात होऊ लागली. अश्यावेळी रडून ‘मोकळे’ होणे हे मन:स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले. म्हणून जलीय स्थिती पार करून लाखो वर्षे लोटली तरी अश्रू माणसाची साथ टिकवून आहेत. प्राचीन मानवांपेक्षा आता आपल्यावर आदळणारे अनपेक्षित, प्रतिकूल घटक कित्येक पटींनी वाढले आहेत. त्यामुळे गरज भासेल तेव्हा वारशाने मिळालेले हे वरदान वारंवार वापरायला हवे.
संदर्भ :