तो वाळत टाकून गेला मला
एका कोरड्या फांदीवर
आणि मी वादळात न उडण्याची
काळजी तेव्हढी करीत बसले
मी मोज-मापाच्या काठा-काठावरून
संकोचत फिरत राहिले
आणि मला तेच हवं असं समजून
तिथेच गरगरण्याचा शाप देऊन निघून गेला तो!
जेव्हा विसरले होते मी माझं असणं
तेव्हा स्वतःचा प्राण फुंकून
उभं केलं होतं त्यांनं
मग मी कुणाच्या पायावर
एव्हढी ताठ उभी राहिले
याचा अचंबा वाटून
ढकलूनच गेला की तो!
आता ना कोरडी फांदी उरलीये माझ्याजवळ
ना गरगरण्यासाठी वर्तुळही राहिलंय एखादं
आणि कोसळण्याचं काय?
काही क्षण उभे राहिले स्वतःच्या पायावर
तरी स्वतःलाच अचंबा वाटतो आजकाल!