रूट ३१२ चा रस्ता
मिनचिनहून (Minqin) जिंचांगला (Jinchang) जाणाऱ्या रस्त्यावरील एका छोट्याश्या गावात बस कचकन थांबली व कुटुंब नियोजनाच्या स्थानिक गटविभागाची प्रमुख अधिकारी असलेली डॉक्टरीणबाई व तिच्या बरोबरीच्या दोन नर्सेस तेथे उतरल्या. त्या डॉक्टरणीने नुकतेच बसमध्ये त्याला अगदी ठामपणे जे काही सांगितले होते, त्यामुळे आपणही तिथे उतरावे व त्यांचे तेथले कार्य प्रत्यक्ष पाहावे असे गिफर्डला तीव्रपणे वाटले. पण दोन क्षणातच त्याने अगदी नाईलाजाने विचार बदलला. कारण एक परदेशी पत्रकार ह्या अशा अतिदूरवरच्या खेड्यात आला आहे, तेही कुटुंब नियोजनाचे कार्य बघण्याकरिता, ह्याचा गहजब झाला असता व साध्य काहीच झाले नसते.
ह्या देशात गेली सहा वर्षे पत्रकाराचे काम करण्यामुळे ह्या मोठ्या देशाच्या बऱ्याच समस्यांची गिफर्डला बऱ्यापैकी जवळून माहिती झाली होती, तरीही आताच त्या डॉक्टरणीच्या तोंडून जे काही त्याने ऐकले होते, ते पचवणे त्याला कठीण जात होते. “प्रत्येक तालुक्यातील पोलीसांचा कुटुंबनियोजनाच्या अंमलबजावणीचे कार्य बघणारा एक विभाग असतो. जर कुठे त्यांना एखादी अशी स्त्री आढळली की जिचे गर्भारपण कायद्यात बसणारे नाही, तर ते तिला गर्भपात करण्यास सांगतात. ह्याउप्पर जर ती स्वतःहून कुटुंबनियोजनाच्या दवाखान्यात गेली नाही, तर ते तिला तेथे जबरदस्तीने नेतात व गर्भपात घडवून आणतात.” त्या डॉक्टरणीला ह्याबद्दल काहीच विशेष वाटत नव्हते. आपण हे जे करतो आहोत ती एक उत्तम प्रकारची देशसेवा आहे, अशी तिची ठाम समजूत दिसून येत होती. “एखादीचा गर्भ पूर्ण विकसित झाला असेल, तर तिच्या गर्भाशयात आम्ही एक इंजेक्शन देतो, म्हणजे ते मूल मरते.” असल्या प्रथांबद्दल गिफर्डने ऐकले होते खरे, पण तसे आपण करतो असे कुणीतरी स्वतःहून त्याला सांगायची ही पहिलीच वेळ होती. ह्या सर्वांबद्दल ती पूर्ण समाधानी दिसत होती. ‘ह्या देशात लोकसंख्या खूपच वाढली आहे’ ती म्हणाली होती.
ह्या देशाबद्दल तीव्र घृणेची एक लहर गिफर्डच्या मनात निर्माण झाली. असे पूर्वी वाटले नव्हते असे नाही, पण त्याच्या येथल्या इतक्या दीर्घ वास्तव्यात फार कमी वेळा असे झाले होते, हेही तितकेच खरे.
रॉब गिफर्ड
रॉब गिफर्ड हा विशी-बाविशीचा, मूळ ब्रिटिश तरूण चीनमध्ये प्रथम १९८७ साली आला तो विद्यार्थी म्हणून. त्याने नुकतीच त्याच्या इंग्लंडातील एका विद्यापीठातून ‘चिनी अभ्यासा’तील विशेष पदवी मिळवली होती व आता तो बैजिंग विद्यापीठात चिनी भाषा शिकणार होता. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर तो पत्रकार झाला होता व १९९९ मध्ये अमेरिकन ‘नॅशनल पब्लिक रेडियो’चा चीनमधील पत्रकार म्हणून तो त्याच्या आवडीचा व कुतूहलाचा विषय असलेल्या चीनमध्ये परत आला होता. २००५ साली गांसू (Gansu) प्रांताच्या दौर्यावर असताना त्याला देशाच्या पूर्व टोकापासून पश्चिम टोकापर्यंत जाणार्या रूट ३१२ ची माहिती प्रथम कळली. चीनच्या पूर्व किनार्यावरील शांघायमधून निघून हा प्रमुख रस्ता ३,००० मैल पार करून चीनच्या पश्चिमेस कझाकस्तानच्या सीमेवरील कोराझ गावात जाऊन संपतो. नानजिंग (Nanjing), हफय (Hefei), शिनयांग (Xinyang), शियान (Xi’an), लांजू (Lanzhou), जिउच्यूआन (Jiuquan), तुर्पान (Turpan) व उरुम्ची (Urumqi) हे ह्या मार्गावरील काही प्रमुख टप्पे. २००६ साली चीन सोडण्याच्या अगोदर त्याने ह्या रस्त्याच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास केला. ह्या प्रवासाची कहाणी गिफर्डने ‘चायना रोड’ ह्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.
पुस्तकाचे आवरण
हे पुस्तक अगदी संकुचित अर्थाने ‘प्रवासवर्णन’ म्हणता येईल. इतर अनेक, विशेषतः पाश्चिमात्य लेखक एकतर चीनच्या महासत्तेच्या तेजाने भाळून गेलेले असतात, नाहीतर त्यांना त्यांच्या चष्म्यातून चीनची प्रत्येक बाब चुकीची व निर्भर्त्सनीय वाटत असते. गिफर्ड ह्या दोन्ही टोकांपासून दूर आहे. त्याला चीनविषयी आत्मीयता आहे, पण ती डोळस आहे, चिकित्सक वृत्तीची आहे. तसेच हे पुस्तक ‘एकदा जे वाचावयास घेतले, ते संपल्यावरच खाली ठेवले’ ह्या सदरात मोडणारे नाही. कारण त्यात ‘प्रेक्षणीय’, टूरिस्टी स्थळांची वर्णने नाहीत, खाण्यापिण्याची वर्णने नाहीत. हा आहे एक डोळस व संवेदनाशील वृत्तीने केलेला प्रवास. गिफर्डच्या प्रवासातील अनेक व्यक्तींच्या भेटींची, त्याच्या अनुभवांची वर्णने ह्यात आहेतच, पण तेव्हढेच महत्त्वाचे आहे ते त्याची तेथल्या संस्कृतीच्या सर्वांगाची केलेली निरीक्षणे, व मुख्यतः सामजिक, राजकीय व ऐतिहासिक संदर्भांचा घेतलेला वेध.
ह्या प्रवासास निघण्याअगोदर गिफर्डने प्रवासाची केवळ कच्ची आखणीच केली असावी. म्हणून वेगवेगळ्या वाहनांनी तो प्रवास करू शकला— कधी टॅक्सी, कधी बस, कधी ट्रकमधून, तर कधी शहरातून जीप्स व इतर एस. यु. व्हीज घेऊन दूर फिरावयास निघालेल्या श्रीमंत तरूणांच्या वाहनांतून. काही विवक्षित व्यक्तींना भेटण्याचे त्याने अगोदरच ठरवले होते, त्या सर्व व्यक्ती शहरी होत्या. ह्यात विद्यार्थी, रेडियो टॉक शोजची निवेदिका, फॅक्टरी मॅनेजर, कलाकार व सर्वसाधारणपणे ज्यांची गणना ‘विचारवंत’ म्हणून केली जाईल अशा व्यक्ती होत्या. पण ह्या सर्वांहून महत्त्वाचे म्हणजे गिफर्डकडे कुठल्याही अनोळखी व्यक्तीशी सहजपणे गप्पा चालू करण्याची हातोटी असावी. त्यामुळे सबंध प्रवासात तो अनेकविध सामान्य लोकांशी बोलताना आढळतो. ह्यात ज्या ट्रक अथवा टॅक्सीतून तो प्रवास करत असे त्यांचे ड्रायव्हर्स आहेत, बसमधील सहप्रवासी आहेत, रस्त्यात सहजपणे भेटलेले कुणी आहेत, रस्त्याकडेस धाबा चालवणारे आहेत. तसेच शेतात राबणारे शेतकारी आहेत, रेल्वे बांधणारे मजूर आहेत, खेड्यापाड्यात जाऊन मोबाईल विकणारा विक्रेता आहे, रस्त्यात भेटलेले काही सेल्समन आहेत, वेश्याही आहेत, इतकेच नव्हे तर शियान ह्या चीनच्या पूर्वाश्रमीच्या राजधानीजवळील पवित्र समजल्या गेलेल्या डोंगरावर गुहेत राहणारा एक दाओ (Tao) भिक्षूही आहे!
शिनयांग हे रूट ३१२ वरील शांघायच्या पश्चिमेस साधारणपणे ४०० मैल दूर असलेले हनान (Henan) प्रदेशातील एक महत्त्वाचे शहर. ह्या प्रदेशात सुमारे ३००, ००० एच. आय. व्ही. ग्रस्त लोक आहेत, व त्यातील अनेक शिनयांगच्या उत्तरेस असलेल्या शांगचाय (Shangcai) ह्या गावाच्या परिसरात राहतात. एड्ससंबंधात कार्यरत असलेल्या हू जिया ह्या बैजिंगमधील गृहस्थासमवेत शांगचायला जायचे असे गिफर्डने ठरवले. हे गाव १०७ नंबरच्या उत्तर-दक्षिण असलेल्या महामार्गावर वसलेले आहे. चीनच्या नैऋत्येस असलेल्या बर्मा व लाओसमधील सोनेरी त्रिकोण ह्या नावाने संबोधेल्या जाणाऱ्या टापूतून येणारे ट्रक ड्रायव्हर्स तेथील ड्रग्स व वेश्याव्यवसायास बळी पडून हा रोग येथे घेऊन आले. परंतु हनान राज्याच्या सरकारने रक्त विकण्याचा जो प्रकल्प राबविला, त्यातील आरोग्यविघातक अवस्थेमुळे येथील लोकांत हा रोग झपाट्याने फैलावला. नव्वदीच्या दशकाच्या सुरूवातीस मध्यवर्ती सरकारने राज्यांना आतापर्यंत देण्यात येणारी मदत थांबवली. ह्यामुळे सर्व राज्यांना स्वतःचा पैसा उभारणे भाग झाले. हनानच्या राज्याच्या आरोग्य अधिकार्यांनी शेतकर्यांकडून रक्त विकत घेऊन, त्यातील प्लाझ्मा काढून घेऊन औषधी कंपन्यांना विकण्याचा घाट घातला. ह्यात नफा खूप असावा. छोट्या गावात रक्तपेढ्या स्थापन केल्या गेल्या, तसेच अगदी लहान गावांत जाण्यासाठी फिरत्या पेढ्याही तयार झाल्या. रक्त काढण्याच्या प्रक्रियेत, रक्त सुईने दात्याच्या शरीरातून काढण्यात येई, हे रक्त सरळ खोलीच्या मध्यभागी असलेल्या एका मोट्या भांड्यात जमा केले जाई. त्यातील प्लाझ्मा काधून घेतल्यावर ते रक्त दात्याच्या शरीरात परत पाठवले जाई, कारण चिनी प्रथेप्रमाणे लोकांना शरीरातले रक्त ‘सांडलेले’ आवडत नाही. नव्वदीच्या दशकाच्या शेवटास जेव्हा ह्या रोगाच्या प्राथमिक केसेस येऊ लागल्या, तेव्हा असे काहीही झालेले नाही, असे सांगण्यात आले. मग २००४ साली अचानक त्यांनी पवित्रा बदलला व एड्ससंबंधी उपाययोजना सुरू केली. पण ह्या जागेतील सदर घटनांची तीव्रता लक्षणीय आहे, व स्थानिक अधिकार्यांना त्याबद्दल कसलाही गाजावाजा नको असतो.