थोडे हसून गेली, लटके रुसून गेली
माझ्या सभोवताली जाळे विणून गेली
"शप्पथ, कुठे, कधी मी हे सांगणार नाही"...
(माझेच नाव नकळत ती गुणगुणून गेली )
माश्यावरून जावे अलगद निघून पाणी
माझी हयात सारी तैसी सरून गेली
खंतावतो कधी ना हा पारिजात माझा
नेली कुणी फुले वा खाली सुकून गेली
संवेदना म्हणाली, 'झाली जखम मनाला'.
कविता तिच्यावरी पण फुंकर बनून गेली..
मी एकटाच होतो... मी एकटाच आहे
ती पायवाट होती... आली... निघून गेली
आक्रोश केवढ्याने आहे सुरू कधीचा
भीतीमुळेच हिरवी पाने गळून गेली