मागे वळून पाहता

मीरा फाटक

(पृष्ठ २)

दूध मिळायचे ते गाईचे. म्हशीचे दूध भुबनेश्वरात कोणीच पीत नाही असे त्यावेळी तरी आम्हाला सांगितले होते. मला आचार्य अत्र्यांच्या ’साष्टांग नमस्कार’ मधील कवी भद्रायूची आठवण झाली! बरीच वर्षे आम्ही ते आधीच पातळ असलेले आणि पाणी घालून अधिक पातळ केलेले गाईचे दूधच वापरत असू. कारण दुसरा पर्यायच नव्हता. पुढे काही वर्षांनी मुंबईहून आलेल्या आमच्या एका परिचित मद्रदेशीय महिलेने खूप शोधाशोध करून म्हशीचे दूध मिळवले आणि आम्हाला पण ते मिळू लागले!

जशी सार्वजनिक वाहतूक सेवा नव्हती तशीच सार्वजनिक उद्याने पण नव्हती. मुले लहान असताना त्यांना संध्याकाळी कुठे फिरायला न्यायचे असा मोठा प्रश्न पडायचा. वाहनसेवा नव्हती, उद्याने नव्हती तसेच मध्यमवर्गीयांना जाता येईल अशी उपाहारगृहे पण नव्हती. होती ती एकदम तारांकित किंवा मग अगदीच खोपटं, जिथल्या स्वच्छतेबाबत शंका आल्यामुळे तिथे जाणं नको वाटायचं. आम्ही मुलांना घेऊन, मुंबई-भुबनेश्वर असा ३५/४० तासांचा प्रवास करून थकून भागून घरी यायचो. बरं, तेव्हा त्या आगगाडीला वातानुकूलित डबे पण नव्हते. (अर्थात असते तरी कदाचित त्यावेळी आम्हाला ते परवडलेही नसते.) तर असे थकून आल्यावरही चुलीपुढे उभे राहून मुगाच्या डाळीची खिचडी तरी रांधणे क्रमप्राप्त असायचे.

असेच दिवस चालले होते. थोड्या वर्षांनी मला भुबनेश्वरला नोकरीही मिळाली आणि मी मुलांना घेऊन दीर्घ वास्तव्यासाठी भुबनेश्वरला आले. मुलांचे शाळेत प्रवेश वगैरे झाले. धाकटा तर जेमतेम ३ वर्षांचा होता. त्याच्या शाळेतच पाळणाघर होते. किंवा पाळणाघराशी संलग्न शाळा होती असं म्हटलं तर ते जास्त योग्य ठरेल. ते भुबनेश्वरमधील पहिले आणि बरीच वर्षे एकमेव असलेले पाळणाघर! पतिराजांनी स्कूटरही घेतली. मग भुबनेश्वरात ये/जा करणे बरेच सोपे झाले. ह्या शहराचा विस्तार फार नसल्याने स्कूटरवरून कुठेही जाणे शक्य होते. फक्त मला कामाला जाण्यासाठी सायकलरिक्षाचं ते दिव्य रोज करायला लागायचं. अर्थात त्यात माझाच थोडा दोष होता. मला वाहन चालवायला येत नाही!

हळू हळू मी सर्व गोष्टींची सवय करून घ्यायला लागले. कार्यालयात आणि इतरत्रही काही समानशील मंडळी भेटली आणि त्यांच्याशी धागे जुळले. शिवाय इथे महाराष्ट्र मंडळही होते. त्यात जमेल तसा सहभाग घ्यायला सुरुवात केली. पुढे पुढे मला ते आवडायलाही लागले आणि सहभाग वाढला.

असेच बरेच दिवस, महिने, वर्षे गेली आणि एक दिवस माझ्या लक्षात आले की सुरुवातीच्या "कसं होणार आपलं इथे?" ह्या धास्तावलेल्या मनःस्थितीपासून मी "बरंच निभलं की!" अशा जराशा सैल आणि स्थिरावलेल्या मनःस्थितीपर्यंत पोहोचेले आहे! आणखी थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की हा प्रवास घडवण्याचे श्रेय काही अंशी माझे पती, माझी स्नेहीमंडळी आणि महाराष्ट्र मंडळ यांना जातेच, शिवाय मी स्वतःमध्ये प्रयत्नपूर्वक केलेले बदलही त्याला थोडेसे कारणीभूत आहेत. पण सर्वात मोठा वाटा आहे तो भुबनेश्वरात अल्पावधीत घडून आलेल्या बदलांचा.

माझा आणि भुबनेश्वरचा परिचय होऊन आता जवळजवळ ३० वर्षे होतील. एवढ्या वर्षांत भुबनेश्वर खूपच बदललं, खूप सुधारलं. गेल्या १०/१५ वर्षांत तर फारच! आता सायकलरिक्षा जवळजवळ नाहीशाच झाल्या आहेत. त्यांची जागा ऑटोरिक्षांनी घेतली आहे. अर्थात त्याही ठरवायला लागतातच, मीटरची बात नस्से! काहीही असलं तरी वेळ खूप वाचतो हे मात्र खरं. तसेच आता ’शेअर्ड ऑटो’ सुद्धा खूप झाल्या आहेत. ह्या सहा आसनी नसून तीन आसनीच असतात, पण त्यात ६ जणांना बसवतात- मागे तीनच्या जागी चार आणि पुढे रिक्षाचालकाच्या शेजारी ’जरा सरकून घेऊन’ दोन! पण तरीही खूप सोय होते. रस्ते रुंद झाले आहेत. काही काही रस्त्यांवर तर दुभाजकही बांधले आहेत. वाहतूक नियंत्रक दिवेही आता कुठे कुठे दिसायला लागले आहेत. रस्त्यावरील वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे आणि रस्त्यावरील गायींच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे! बैठी घरे जाऊन त्याजागी अगदी टोलेजंग नसल्या तरी चार-पाच मजली इमारती उभ्या रहायला लागल्या आहेत.

पूर्वी कोणतेच ’पार्क’ नसलेल्या भुबनेश्वरात साध्या पार्कांबरोबर काही वर्षांपूर्वी ’ऍम्यूझमेंट पार्क’ आलं आहे. दूरचित्रवाणी येऊन तर बराच काळ लोटला, पण गेल्या चार-पाच वर्षात मराठी वाहिन्याही बघता येण्याची सोय झाली आहे. काही वर्षांपूर्वी बिग बझार आले. अगदी अलीकडे रिलायन्स फ्रेशही आले. मटकी, साबूदाणा, शेंगदाणे अशा पूर्वी न मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी ह्या दोन्ही ठिकाणी सहज आणि चांगल्या मिळायला लागल्या. वाण्यांकडेही शेंगदाणे, सुकं खोबरं, चांगला गूळ हे मिळायला लागलं. चांगल्या प्रतीची कणीकही वाण्यांकडे मिळायला लागली. आता पुण्यामुंबईहून आयात करायला लागणाऱ्या वस्तूंची यादी बरीच आखूड झाली आहे. पालेभाज्यांच्या बाबतील अजूनही फारसा फरक नाही पण इथल्या स्थानिक पालेभाज्या म्हणजे खडा, कोसळा (दोन्ही साधारण आपल्या माठासारख्या) ह्याही ठीकठाक असतात असे लक्षात आले आणि हो, कोथिंबीर जवळजवळ बारा महिने मिळायला लागली!! दुधाची परिस्थिती तर खूप सुधारली आहे. आता ओरिसा सरकार पुरवठा करत असलेले दूध बऱ्यापैकी घट्ट असते.

हात दाखवून थांबवता येणारी टॅक्सी अजूनही इथे नाही पण फोन करून घरी टॅक्सी मागवता येईल अशा सेवा उपलब्ध आहेत. पूर्वी -म्हणजे फार पूर्वी नाही, फक्त ९/१० वर्षांपूर्वी- मुंबईला जाण्यासाठी आठवड्यातून फक्त तीन दिवस विमानसेवा उपलब्ध होती. आता मुंबईसाठी दरदिवशी तीन उड्डाणे आहेत! गेल्या ४/५ वर्षात आयटी कंपन्या आल्यापासून तर भुबनेश्वरचा नूरच पालटला आहे. अंगावर जीन्स आणि रंगीबेरंगी टीशर्टस, कानाशी मोबाईल (माझी एक मैत्रीण त्याला कर्णपिशाच्च म्हणते!) किंवा आयपॉड आणि सर्वांगात सळसळता उत्साह अशा आजच्या पिढीच्या व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त अशी तरुण मंडळी आता इथेही मोठ्या प्रमाणात दिसायला लागली आहेत. ह्यापाठोपाठच भुबनेश्वरात बरिस्ता आले, सीसीडी आले, स्मोकिन’ जोज आले, पिझ्झा हट आले. मध्यमवर्गीयांना कधी बाहेर खावेसे वाटले तर जिथे जाता येईल अशी मोजकी का होईना पण उपाहारगृहे आली. भुबनेश्वर बदललं, आधुनिक झालं! आधुनिकीकरणाचे काही तोटे म्हणजे झाडतोड होणे, मोकळी हवा कमी मिळणे हे झाले आहेत पण आधुनिकीकरणाने झालेले फायदे तोट्यांच्या तुलनेत किती तरी जास्त आहेत.

आता सेवानिवृत्ती जवळ आली. महाराष्ट्रात जाण्याचे वेध लागले, ओढही लागली! पण मला माहीत आहे की इथून निघताना माझ्या डोळ्यात पाणी, जिभेवर इथल्या मिठाईची गोडी आणि कानात संजुक्ता पाणिग्रहीच्या नूपुरांचा झंकार असणार आहे!