नेहमीसारखाच धडपडता दिवस

अनु

(पृष्ठ २)

वेळ संध्याकाळ ५. ३०
आता कुठे जरा कामाची भट्टी जमते आहे.. (आ‌ईने ऐकले असते तर लगेच 'दिवस गेला इटीपिटी आणि चांदण्याखाली कापूस वेची' म्हणाली असती.) पण आता निघायला हवे. भराभर गाशा गुंडाळून अनू घरी निघते. नेहमीप्रमाणे वळायचं असलेल्या वळणाला कमी लोक वळत असल्याने विरुद्ध दिशेच्या गाड्या नियम तोडून सुसाट धावत आहेत. अनू चार पाच जणांकडे जळजळीत कटाक्ष टाकायचा प्रयत्न करून घाबरत घाबरत वळणावर वळते.

वेळ संध्याकाळ ६. ००
कोंढवा रस्त्यावर ला‌ऊडस्पीकरच्या भिंती लावून लोक ’सोणी दे नखरे सोणे लगदे’ वर वेडेवाकडे नाचत आहेत. वाहतुकीचा मुरंबा बनवण्याच्या कामात चार पाच उद्धट स्वयंसेवक झटत आहेत. आज काय आहे बरं? अरे हो. हनुमानजयंती. हनुमानजयंतीला ’सोणी दे नखरे’, गणपतीत ’त्तेरा त्तेरा त्तेरा सुरू..र’, आंबेडकर जयंतीला ’ब्राझिल.. लालालालाला’, ईदेला ’गोविंदा गोविंदा गोविंदा....’ झेंड्यांचे रंग तेवढे भगवे हिरवे निळे लाल. सर्वांचे ध्येय एकच. जास्तीत जास्त कानठळ्या बसवणे आणि जास्तीत जास्त वेळ वाहतुकीची वाट लावणे. सर्वधर्मसमभाव की काय म्हणतात तो हाच की काय? अनू मनातले वैतागलेले विचार बाजूला सारत बीबीसी साठी ’इंडिया..खंट्री ऑफ सेलिब्रेशन्स..’ बोधवाक्य असलेली अदृश्य जाहिरात मनात तयार करत मंदगतीने पुढे सरकते.

वेळ संध्याकाळ ७. १५
आज ’मेथीचे पराठे आणि आमटीभात’ असा आटोपशीर बेत ठेवून जावाच्या क्लासाला वेळेत पोहचण्याचा अनूचा बेत आहे. शेजारी एका भांड्यात ठेवलेले उरलेले भाकरीचे पीठ संपवण्याच्या सदहेतूने ते पराठयाच्या कणकेत ढकलले जाते आणि घात होतो! पोळी आणि भाकरी यामधला हा प्रकार हाताळता हाताळता आरामात ८ च्या क्लासाला ९ ला घरातून निघण्याची वेळ ये‌ईल. ’मायकेल, उसे लिक्विड ऑक्सीजन में डाल दो, लिक्विड उसे जीने नहीं देगा और ऑक्सीजन उसे मरने नहीं देगा’ या चालीवर अनू ’पराठे की कणिक में भाकरीका पीठ डाल दो, भाकरीका पीठ पराठा लाटने नहीं देगा और मेथी पराठा थापने नहीं देगी’ असा डायलॉग मारून अनू लाटणे आणि थापणे या दोन्ही क्रिया करून झालेले प्रकार कसेबसे भाजते आणि क्लासाला पळते.

वेळ रात्र ८. ५५
’लिफ्ट बंद हो गयी, नौ बज गये’ ही सुवार्ता रखवालदार देतो. ’जाने दो ना भैय्या, अभी तो पाच मिनट है, देर हो रही है’ वगैरे प्रयत्न अनू करून पाहते, ’देर हो रही है तो घरसे जल्दी निकलनेका’ असा फतवा काढून तो निश्चयाचा महामेरू तंबाखू मळायला घेतो आणि अनू धापा टाकत जिने चढायला घेते. या क्लासाच्या इमारतीची गंमत म्हणजे ’पहिला मजला’ अशी पाटी असलेला मजला तीन जिने चढून झाल्यावर येतो आणि क्लास असतो तिसर्‍या मजल्यावर. क्लास चालू हो‌ऊन युगे लोटली आहेत. (म्हणजे दोन तासांमधला एक तास गेला आहे!) अनू क्लासात जागे राहण्याचा प्रयत्न करत वहीत काही अगम्य गोष्टी लिहून घेते.

वेळ रात्र १०. ४५
अनू क्लासाहून परत येते. नेहमीप्रमाणे ’देवा नारायणा, निवांत बसून टीव्ही बघायची आणि गोष्टीची पुस्तकं वाचण्याची उसंत कधी देणार आहेस? नको तो क्लास, नको ती नोकरी’ असा विचार करत अनू ताट वाढून घेते. ’अगं, पराठे आज छान झाले होते.’ हे ऐकून अनू धन्य होते आणि सुखावते. शेवटी मेथीच्या भाकर्‍यांचा गोंधळ ’एंड युजर’ उर्फ खाणार्‍यांपर्यंत पोहचला नाही या कल्पनेने अनूला बरे वाटते. ’स्वयंपाक, कामं, ही धावपळ आणि गडबड, आणि दिवसाच्या शेवटी ’सर्व मॅनेज केल्याचा आनंद’ हा आपला प्राण आहे, हे सर्व संपलं तर माझ्यात जास्त मी राहणार नाही..’ असा विचार करत (दाराला दुधाची पिशवी लटकवून) अनू झोपेच्या आधीन होते...