(पृष्ठ २)
मी घरी तसाच निघून आलो. जितू आणि संगीताने त्यांना उचलून घरी आणलं. पण तरीही ते रात्री कधी तरी गायब व्हायचे आणि पिऊन पडायचे. दारूही अशी प्यायचे की शुद्ध उतरली की दारू पिणं सुरू. भान असणारी अवस्थाच ते नाकारायचे. दारू प्यायला हवी एवढं भान आलं की प्यायला सुरवात. मग कुठेतरी पडणं आलंच. कुणीतरी त्यांना उचलून घरी आणायचं. दोन-तीन दिवस हेच चाललं होतं. अशातच चौथ्या दिवशी सहज त्यांच्या घरावरून जात होतो. तर रस्त्यातच सुस्नात काका जानवं घातलेल्या अवस्थेत सूर्याला अर्घ्य देत होते. मी पार चक्रावूनच गेलो. दोन-तीन दिवस नशेत शुद्ध हरपून बसणारा हा माणूस आज या अवस्थेत? कालपर्यंत शुद्ध गमावलेला माणूस कुणी वेगळा असावा असं वाटावं असंच हे चित्र. त्यांना पाहून मला तर काही सुचेचना. उगाचच भीती वाटायला लागली. मला पाहून ते म्हणाले, "अरे इकडे ये. आज संध्याकाळी येणार ना?" माझ्या तोंडून कसाबसा 'हो' शब्द निघाला नि थेट घराकडे धूम ठोकली. त्या दिवशी तरी मी काही त्यांच्या घरी गेलो नाही. म्हणजे धाडसच झालं नाही.
घरातही आई-बाबांना काकांविषयी कळलं होते. ते काही बोलले नाहीत. पण दोन दिवसांनी काका पुन्हा भेटले आणि "कधी येताय?" म्हणून विचारलं. हे काका नेहमीचे दिसत होते. मी "आज येतो' असं सांगितलं. घरचेही हो म्हणाले. मग त्या दिवशी पुन्हा एकदा आम्ही चौघं त्यांच्याकडे गेलो. तेही पूर्वीसारखेच आम्हाला शिकवायला लागले. जणू काही घडलंच नाही. आम्ही 'तो' विषयही कधी काढला नाही. पण दोन-चार महिने गेले की पुन्हा ते झटका आल्यासारखे दारू प्यायचे. दोन-तीन दिवस नशेत कुठेही पडून असायचे. मग कुणीतरी त्यांना त्यांच्या घरी आणून सोडायचं. काही जण त्याचाही फायदा उचलून त्यांच्या खिशातले पैसे काढून घ्यायचे. तीन दिवसांनंतर स्वारी पुन्हा पहिल्यासारखी व्हायची. त्यांच्यातला हा बदल पाहिल्यानंतर फार धक्का बसायचा. दोन्ही अवस्थेतला माणूस एकच आहे, यावर विश्वास ठेवणं अवघड जायचं. हा माणूस अगदी टोकाच्या दोन अवस्थांमध्ये कसा जगतो? असा प्रश्न पडायचा.
त्यांचं हे रूप आता आमच्या अंगवळणी पडलं होतं. आमचं त्यांच्याकडे जाणं सुरूच होतं. दुपारच्या वेळीही आम्ही त्यांच्याकडे जात असू. ते स्वतःविषयी फार कमी बोलत. आमच्याशी तर बोलण्याचा प्रश्नच नव्हता. पण बोलले काही तर दळवीकाकांशीच. त्यांच्या दारू पिण्यामुळे बाबाही अंतर ठेवूनच त्यांच्याशी बोलायचे. मग एके दिवशी असंच कळलं. काका, कुठल्याशा राजघराण्यातले आहेत, पण काही कारणावरून त्यांचं आणि घरच्यांचं बिनसलं आणि त्यांनी घर सोडलं. सरकारी नोकरी पत्करली. ते कळल्यानंतर मला फारच आश्चर्य वाटलं.
काकांविषयीचं गूढ वलय माझ्या मनात तयार झालं होतं. त्यांच्या घरी जाण्याचं एक अनामिक आकर्षण मनात होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी गूढ वाटत होतंच, पण त्यांच्या घरातल्या काही वस्तू, पुस्तकं, पेटी या सगळ्यांमध्ये काही गूढ लपलंय असं वाटायचं. हे गूढ त्यांच्या घराकडे खेचून न्यायचं. एकदा असंच दुपारी त्यांच्या घरी गेलो. काका तेव्हा स्वयंपाक करत होते. मी पहिल्या खोलीत बसलो. बसल्या बसल्या तिथं पडलेल्या पुस्तकांपैकी एक उचललं. कसलं तरी अध्यात्मावरचं पुस्तक होतं. चाळता चाळता त्यातून काही तरी पडलं. तो पिवळट कागद मी उचलला. ते पत्र होतं. पत्र पडतानाच उलगडलं गेलं होतं. उचलताना त्यावरचा काही मजकूर दिसला. उत्सुकतेपोटी मी तो वाचायला सुरवात केली. पत्राची सुरवातच 'प्रिय'ने केली होती. त्याच्यापुढे काकांचं नाव होतं. मी झरझर वाचत गेलो. काकांच्या प्रेमाला नकार देत असल्याचं ते पत्र होतं. पत्राखाली सही केलेली नव्हती. मी वाचत असतानाच काका आले. मी पटकन पत्र बंद करून ते पुस्तकात ठेवलं. काकांनी बहुधा मला वाचताना पाहिलं असावं. ते काही बोलले नाहीत. पण झटकन पुढे येऊन त्यांनी ती सगळी पुस्तकं उचलली आणि आतल्या खोलीत नेऊन टाकली. त्यावेळी एक विचित्र अवघडलेपण आलं. असह्य शांतता निर्माण झाली. मग काही तरी आणण्याच्या बहाण्याने मी तिथून निघून गेलो.
काकांचं लग्न का झालं नाही? त्यांनी ते का केलं नाही? असे प्रश्न आधी पडले होते, पण त्याचा फारसा विचार कधी केला नव्हता. आता त्याचं उत्तर मिळालं होतं. पण हे रहस्य कळल्याने आलेलं अवघडलेपण बरेच दिवस कायम होतं. त्यानंतरही आम्ही त्यांच्याकडे परवचा म्हणण्यासाठी जातच होतो, पण त्यांच्याशी बोलण्यात जाणवणारं अवघडलेपण सुटत नव्हतं. त्याचवेळी माझी परीक्षा संपून दुसरं वर्ष लागणार होतं. बाबांनी मला शिक्षणासाठी नाशिकला ठेवण्याचं ठरवलं. सुटी संपून शाळा सुरू होण्याच्या बेतात असताना माझं नाशिकला जाण्याचं पक्कं झालं. हे सांगायला मी काकांकडे गेलो. पण काका घरी नव्हते. दुसर्या दिवशी सकाळी मी जाणार होतो. पण तोपर्यंत माझी त्यांच्याशी भेट झालीच नाही. मी निघून गेलो. त्यानंतर गावी येणं होत गेलं, पण कधीतरी सुट्टीत. त्यावेळीही काकांकडे जात होतो. गप्पाटप्पा व्हायच्या. या काळात मीही मोठा होत गेल्याने काका अधिक जवळीकीने वागायचे. आमच्यातले नाते आता बरोबरीवर व्हायला लागले होते. बोलताना ते खूप खुले झाल्यासारखे वाटले. अगदी 'नॉन व्हेज' जोकही रंगवून सांगायला लागले. नंतर नंतर तर मग गावी आलो की संध्याकाळी माझ्या खांद्यावर हात टाकून ते फिरायला यायचे. आमच्या भरपूर गप्पा रंगायच्या. पण तरीही त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल विचारायचे धाडस कधी झाले नाही. तेही स्वतःहून कधी बोलले नाही. पुढे माझं गावी येणं जाणं कमी झालं. मी पूर्णपणे अभ्यासात अडकलो. खरं तर शहरी झालो. नंतर कधी तरी गावात आल्यावर काकांची कोकणात बदली झाल्याचं कळलं. त्यांच्याशी संपर्काचं साधनच सुटलं.
खरं तर त्यांनी स्वतःहून संपर्काचे दोर कापून घेतले असंच म्हणावं लागेल, कारण त्यांनी जाताना पत्ताही दिला नाही. अचानकच ते निघून गेले. काकांचं अस्तित्व त्यानंतर फक्त कधी तरी गप्पांमधूनच जाणवायचं. पण आत्ता ही आठवण येण्याचं कारण काय? काकांचं पत्र. नुकताच गावी गेलो तेव्हा कोल्हापुरातून काकांनी पोस्ट केलेलं पत्र मिळालं. पत्रात लिहिलं होतं,
माणसाच्या आयुष्यात काही वळणं येतात. एका वळणावर मीही प्रेमात पडलो. पण घरच्यांना ते मान्य नव्हतं. प्रश्न जातीचा होता. अखेर मीही हात टेकले. तिचंही तिच्या घरच्यांनी लवकर लग्न करून टाकलं. दुर्देवानं आमचं प्रेम पूर्णत्वाला गेलं नाही. तिला विसरून जाणं मला अतिशय जड गेलं. त्यामुळे ती सोडून गेल्यानंतरही इतर कुणाशी लग्न करावं असं कधीच वाटलं नाही. तिला मी कधी विसरूच शकलो नाही. त्या प्रेमाचा परिणाम माझ्यावर दीर्घकाळ राहिला. मधल्या काळात माझ्या अनिर्बंध झालेल्या वागण्यालाही अपूर्ण प्रेमातून आलेला सैरभैरपणाच कारणीभूत आहे. पण आता मी बर्यापैकी सावरलोय. आयुष्यातलं ते वळण टाळून मी आता पुढच्या वळणावर आलोय. मानसिककदृष्ट्या बर्यापैकी स्थिर झालोय. तू त्या दिवशी माझं पत्र वाचलं. पण त्या पत्राचं विश्लेषण करण्यासारखं तुझं वय नव्हतं. तुझा आठवले काका असा का वागतो, असा प्रश्नही तुला पडत असेल, पण त्याचंही उत्तर मी तुला तेव्हा देऊ शकत नव्हतो. पण मी त्याचं कारण तुला आता तरी कळणं गरजेचं आहे, म्हणून हे पत्र. आता तरी मला समजून घेशील ना? तुला अनेकोत्तम आशीर्वाद. गावी आलो की तुला नक्की भेटेन.
तुझा,
आठवले काका