केतकर

सन्जोप राव

(पृष्ठ २)

"ही सगळी सव्य अपसव्यं तू कर हवी तर! पण मला बाकी आता विद्यार्थ्यांशी बोलायला लावू नकोस. त्रास होतो रे! एखादा असतो मारे एमेस्सी झुऑलजी वगैरे. त्याला विचारलं की बाबा पृष्ठवंशीय आणि अपृष्ठवंशीय प्राण्यांत फरक काय? तर त्याचा चेहरा असा होतो की ज्याचं नाव ते! मग त्याला म्हटलं की जाऊ दे, तुला मराठीत विचारतो; कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट म्हणजे काय माहिती आहे का तुला? तर तो म्हणतो की हे बीएस्सीला होतं, आता विसरलो. आता काय बोंबलणार अशा पोरांसमोर? एखादा बॉटनीवाला असतो, त्याला म्हटलं की वांग्याची, मिरचीची फॅमिली सांग तर तो म्हणतो, अहो हे सगळं हल्ली इंटरनेटवर लगेच आणि फुकट मिळतं. ते कुणी कशाला लक्षात ठेवेल? अरे, मी तर आता जुना झालो, ही मुलं तरुण आहेत; त्यांचं ज्ञान जास्त अपडेटेड असायला पाहिजे. त्यांनी मला चार नव्या गोष्टी सांगायला पाहिजेत. आणि होतंय काय, की मला जे पन्नास वर्षांपूर्वीचं आठवतंय तेवढंही या कार्ट्यांच्या लक्षात असत नाही. म्हणून प्लीज, मला असलं काही करायला सांगू नकोस..." मी काहीच बोललो नाही.

तसाच कधीतरी 'म्युझियम ऑफ ऑर्थ्रोपोडा' चा विषय निघाला. कीटकांचा शास्त्रोक्त अभ्यास करून केलेला हा पुण्यातला एकमेव संग्रह. तोही केतकरांच्या घराण्यानंच केलेला. पुढे ज्या जागेवर तो संग्रह होता, ती जागाच पाडली गेली म्हणून तो संग्रह पुण्यातला एका प्रथितयश महाविद्यालयाला देणगी म्हणून देण्यात आला. अपेक्षा अशी होती की ते महाविद्यालय त्या संग्रहाचं जतन आणि शक्य झाल्यास संवर्धनही करेल.

"धूळ खात पडलीत रे सगळी स्पेसिमेन्स!" केतकर सांगत होते. "कित्येक तर बुरसून, किडून गेलीयत. माती झाली रे माती सगळ्याची! कितीतरी शिकता आलं असतं त्यातून. किती लोकांना उपयोग झाला असता. किती रिसर्च करता आला असता, पण कुणाला काय आहे त्याच?..." केतकरांचा आवाज अधिकच कापरा झाला होता.

मध्ये एकदा मी त्यांना फोन केला होता.
"सर, एक काम आहे. "

"बोल. "

"अहो, घरात कुठून तरी एक उंदीर शिरलाय. हुसकावून जात नाही. लपून बसतोय. वैताग आलाय आणि किळस वाटत्ये हो! काही उपाय सांगा की.. "

"घे लिहून. " केतकर म्हणाले. "औषधाचं नाव रोबॅन. स्पेलिंग आर ओ बी ए एन. वीसेक रुपयांचं एक पाकिट असतं. सहा वड्या होतील त्याच्या. वर्तमानपत्राचा चतकोर कागद घ्यायचा. त्यावर एक वडी ठेवायची. त्यावर थेंबभर गोडंतेल टाकायचं आणि आपलं कपाट, फ्रिज आणि भिंत याच्यामध्ये मोकळी जागा असते की नाही, त्यात हा कागद गुंडाळून ठेवायचा."

"गुंडाळून का बरं?"

"कारण उंदीर इज अ क्यूरियस ऍनिमल. तू त्याचं खाद्य उघड्यावर ठेवलंस तर त्याला संशय येईल. तो पहिल्या दिवशी नुस्ता वास घेऊन जाईल. दुसर्‍या दिवशी ते खाद्य तिथंच दिसलं तर तो खाईल. आता रोबॅन कंटेन्स ब्रोमोडायलॉन. काय आहे हे?"

"नाही बुवा माहिती!"

"इट इज ऍन ऍंटीकोऍग्युलंट. त्यामुळं त्याच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव होईल. इंटर्नल ब्लीडिंग. आणि तो घराच्या बाहेर जाऊन मरेल."

"वा. आता कुठं मिळेल मला हे रोबॅन? "

"कुठल्याही शेती सेवा केंद्रात मिळेल. तू मंडईच्या बाजूला जाणार आहेस का एकदोन दिवसांत? बरं मग स्वारगेटकडे? मग असं कर, माझ्या घरी ये. तुला रोबॅन देतो, शिवाय एक कप चहा आणि एक सिग्रेटही देतो. अगदीच नशिबवान असलास तर रात्रीचं उरलेलं काही खायलाही देतो."

"रात्रीचं उरलेलं? हा काय प्रकार आहे?

"अरे, कोकणस्थाच्या घरी पाहुण्याला खायला म्हणजे शिळंपाकंच..!" केतकर खदखदून हसले.

तर असे हे केतकर! ज्या वयात कोणत्याही नवीन ओळखी नको वाटत असतील अशा त्यांच्या वयात मी त्यांना भेटलो. ज्या वयात गुरू म्हणून आपला अहंकार फुलू लागलेला असतो, अशा माझ्या वयात मला ते गुरू या भूमिकेत भेटले. वास्तविक त्यांचं माझं जमण्याचं काहीच कारण नव्हतं. पण हे मेतकूट जमून गेलं. त्यांचं माहिती नाही, पण माझा बाकी बराचसा स्वार्थ साधून गेला. एका खरोखर ज्ञानी माणसाची संगत मला लाभली. त्याहून महत्त्वाचं म्हणजे निखळ ज्ञान, चिकीत्सा आणि सत्य - सगळे पूर्वग्रह, संस्कार, संकेत बाजूला ठेऊन शोधलेलं निव्वळ झळझळीत सत्य - यावरचा माझा विश्वास केतकरांनी पुनरुज्जीवित केला, अधोरेखितही केला.

अलिकडे एखाद्या रविवारी फोन वाजतो. केतकर असतात.
"आहेस का घरी? "

"आहे की! काय हुकूम? "

"काही नाही. तुझ्या घराच्या कोपर्‍यावर आलोय, म्हटलं रिकामा असशील तर ये सिग्रेट ओढायला."

"अहो, हे काय बोलणं झालं सर? आलोच. "

मी जातो. केतकर एका सिग्रेटीच्या थोटकावर दुसरी पेटवत असतात.
"जाड झालास."

"होय हो. आजकाल कामात अडकलोय इतका! वेळच होत नाही व्यायामाला. खाणंपिणंही बिनसलंय."

"अरे सकाळी व्यवस्थित खाऊन बाहेर पडत जा, रात्री जेवला नाहीस तरी चालेल. ब्रेकफास्ट लाईक अ किंग, डिनर लाईक अ पॉपर, माहिती आहे ना?"

"होय. सर, हल्ली ते आपोआपच होतं. प्रोफेसर आणि पॉपर यात फरक आहे कुठं आता "

आम्ही दोघेही हसतो. केतकर सिग्रेट पुढे करतात.
"घे."

"नको, हा तुमचा ब्रँड झेपायचा नाही मला. मी आपली लाईट घेतो. बाकी काय म्हणताय?"

"चाललंय. किडे मारतोय. अरे, परवा तुझी आठवण आली होती. म्हटलं तुला विचारावं. तू मायक्रोबायॉलॉजिस्ट..."

"अहो सर, माझा आणि मायक्रोबायॉलजीचा काही संबंध आहे का आता? माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आठवतंय मायक्रोमधलं..!"

"नाही तरीपण तू तज्ज्ञ त्यातला! मला एक सांग, समज एक चांगली सुपीक जमीन आहे. ब्लॅक कॉटन सॉईल. भरपूर ऑरगॅनिक मॅटरही आहे त्यात. आपल्याला त्यात समज सोयाबीन लावायचं आहे. काय? आता मी त्यात समज एक बॅक्टेरिअल कल्चर घातलं. किती? तर प्रत्येक एकराला... "

केतकर रंगात येऊन बोलत असतात. त्यांच्या चेहर्‍यावर एखाद्या नुकत्याच सायन्स शिकायला लागलेल्या मुलाचं कुतूहल असतं. त्यांचा आवाज एका विज्ञानाच्या प्राध्यापकाचा नसतो, एका वस्तुनिष्ठ अभ्यासकाचा असतो. त्यांच्या डोळ्यात एका विज्ञानप्रेमीची चमक असते. केतकर बोलत असतात, आणि मी भारावून, अधिकाधिक नम्र होत ऐकत असतो. केतकरांच्या सिग्रेटीवर अर्धा इंच राख जमलेली असते. माझ्याही.