तू नसताना ...

भास्कर

(पृष्ठ २)

हातात रिकामा पेला घेऊन जोगसाहेब तसेच बाहेर आले. आणि त्यांच्या काळ्यापांढर्‍या फोटोसमोर उभे राहिले. फोटोतल्या अच्युतच्या केसांची झुलपं, माधुरीचा नवथर कोवळेपणा आधी लक्षातच आला नसल्यासारखे निरखून पाहू लागले. त्यांनी आपल्या केसातून हात फिरवला. 'अगदी टक्कल नाही पण थोडे विरळ झाले आहेत आता आणि रुपेरी मेंबर बहुमतात आहेत. माधुरीचे मात्र अजून बरेच काळे नि तसेच लांब आहेत केस. तिचे डोळेही तसेच आहेत. लहान बाळासारखे, गोल आणि निष्पाप. बाकी चेहरा मात्र ..' असा विचार करता त्यांना आत्ताचा माधुरीवहिनींचा चेहरा आठवेचना. 'हा काय वेडेपणा', असं आपणच आपल्या मनाला दटावून जोगसाहेब फोटोसमोरून वळले, नि आतल्या खोलीत गेले.

मधेच गोल होऊन पडलेली साडी, कपाटासमोर ठेवलेली खुर्ची, विखरून पडलेल्या एकदोन बॅगा यात 'बाई बाई किती पसारा घातलाय मी, थांबा, तुम्ही नका आवरू, मी बघते' असं म्हणत माधुरी येईल असं वाटून जोगसाहेबांनी चटकन मागे पाहिलं. आणि मग मान हलवून सगळं आवरायला घेतलं. खुर्ची टेबलासमोर ढकलली. बॅगा परत वर उचलून ठेवल्या. आणि साडीची घडी... एकदा कुठे नाटकाला जायच्या घाईत आवरायला मदत म्हणून कपाटातून साडी काढून देणार्‍या अच्युतला आईने पाहिलं. आणि मग काय महाभारत झालं ते झालं. स्वत:शीच थोडं हसून त्यांनी साडी घडी करून पलंगावर ठेवली. पलंगावर पडेलला कंगवा उचलून आरशासमोर ठेवला. तिथेच केदारचा त्याच्या मद्रासी मैत्रिणीबरोबरचा फोटो. '... अगदी गळ्यात गळे. आणि आम्ही राजरोस लग्न करून महाबळेश्वरला गेलो तरी फिरताना हात धरायला लाजत होतो.' मनातल्या विचार कोणी ऐकला तर नाही ना म्हणून पुन्हा जोगसाहेबांनी खोलीत नजर फिरवली.

सगळे जागच्या जागी व्यवस्थित. मग ते जरा पलंगावर टेकले. 'महाबळेश्वरला सूर्यास्त बघताना किती नि काय काय बोललो आपण. आयुष्यात काय करायचे, कसे करायचे. ते पुढे झाले न झाले. खरे तर नाहीच झाले. पण माधुरीशी खरी गाठ बांधली गेली ती तेव्हाच. तिला घेऊन गोगटे गुरुजींकडे गेलो तेव्हा त्यांनीही भरभरून आशीर्वाद दिला होता. केव्हढा जोश होता तेव्हा. काही करावे असा. क्रांती आणण्याची केव्हढी खात्री होती.' जोगसाहेबांनी एक सुस्कारा सोडला आणि मागे टेकत डोळे मिटले. खोलीत माधुरी असल्यासारखा तिचा गंध भरून राहिला होता. स्वयंपाकघरातून तिच्या कांकणाची किणकिण येते आहे असे त्यांना खात्रीने वाटू लागले. पण ती खरी नाही असं पुन्हा त्यांचंच मन त्यांना सांगू लागलं. तिच्या वेणीचे एकेक पेड सोडवून तिच्या केसातून एक खोल श्वास घ्यावा, असं वाटून जोगसाहेब व्याकूळ झाले. 'कधी येईल माधुरी?'

अंग झटकून जोगसाहेब उठले. पुस्तकांच्या कपाटाची काच सरकवली. आणि पाकिटापाकिटातून ठेवलेले फोटोंचे ढीग बाहेर काढले. हे नीट लावायला अल्बम आणले होते पण ते काम अजून झालेलं नाही. जोगसाहेबांनी अल्बमही काढले. पहिले पाीट उघडले. केदारची मुंज. 'किती तरूण दिसतो आपण दोघे या फोटोत', एकेक फोटो अल्बममध्ये लावत ते विचार करू लागले. 'आईचं म्हणणं मुंज थाटात करायची नि आपण मुंज बिंज काही नाही, पैसे जास्त झाले असतील तर दान करू असे बाणेदारपणे सांगितलेले, पण फक्त माधुरीला! शेवटी साधेपणाने मुंज केली खरी. पण त्यातून साध्य काहीच झालं नाही. पुढे आई होती तोवर या साधेपणाच्या डोहाळ्यांचे बोल माधुरीने ऐकून घेतले. आपल्याला तेव्हा बोलता आलं नाही.' जोगसाहेबांना अपराधीपणा ग्रासू लागला. 'कधीतरी माधुरीची माफी मागायची आहे.' आधीही एकदा असे ठरवल्याचे जोगसाहेबांना आठवले. त्यामुळे अपराधीपण आणखी वाढले. शेवटी, आता ती परतली की पहिले काम हेच करायचे असे ठरवून ते पुढचे फोटो पाहू लागले.

कुणाकुणाच्या लग्नातले एकदोन फोटो. घरात कधीमधी काढलेले. माधुरी अगदी आहे तशी दिसते. कॅमेरा नवा होता तेव्हा किती हौसेने काढलेले. जोगसाहेबांना नाना गोष्टी आठवू लागल्या. त्यांनी हातातला फोटोंचा गठ्ठा खाली ठेवला आणि उठून त्या आठवणींसोबत ते येरझार्‍या घालू लागले.
'माधुरी काय म्हणत असते, आपण कधी नीट ऐकलेच नाही की काय? आपल्याला काय हवे ते आपण कधी बोलून दाखवतो. केदार तर जास्तच जोरात. पण ती तसं कधी बोलल्याचं आठवत कसं नाही? हे आपल्या आधी कधी कसं लक्षात आलं नाही?' अस्वस्थता जोगसाहेबांना कुरतडू लागली. 'आयुष्यात जे करायचे होते ते तर केलेच नाही. लग्न केले पण तेही नाते आपल्याला निभावता येत नाही नीट. आपल्याकडून काय सुख मिळाले आहे माधुरीला?' असे विचार जोगसाहेबांच्या मनात ताडताड वाजू लागले. छातीत धडधड होऊ लागली. 'ती आपल्याला सोडून गेली तर?' विचारासरशी जोगसाहेब दचकले. त्यांचे वडील अप्पा अचानक गेले तेव्हाचा त्यांच्या आईचा हरवलेला चेहरा त्यांना आठवला. एकदम वीज चमकल्यासारखे त्यांच्या लक्षात आले, 'आईचेही असेच झाले असणार! बोलायचे, सांगायचे काही राहून गेले असणार. छे! असे व्हायला नको. आता जे दिवस राहिले आहेत ते एकमेकांच्या साथीने घालवायला हवे. केदार अमेरिकेला गेला तो तिकडचाच होणार. पण आपण माधुरीच्या साथीनं राहायचं. तरुणपणी संधी नाही मिळाली पण आता काय कमी आहे. धडधाकट शरीर आहे. हिंडू, फिरू, काही समाजकार्य करू, तिला विचारू काय करावंसं वाटतं' जोगसाहेबांचा निर्धार पक्का झाला. ते आतुरतेने दारावरच्या घंटीची वाट पाहू लागले; अधीर झाले. पण बाहेर कसलीच चाहूल नव्हती. अचानक त्यांना आठवले की चिठ्ठीत कधी परतणार ते लिहिले होते. 'आज की उद्या? कधी परत येणार म्हणाली ती? कुठे गेली ती चिठ्ठी?' जोगसाहेब भरभर बाहेरच्या खोलीत आले. कुलपाजवळ पडलेली चिठ्ठी उचलून पुन्हा वाचू लागले.

अहो,
मायना वाचून जोगसाहेबांच्या अस्वस्थ चेहर्‍यावर थोडकं स्मित उमटलं. मनात ती हाक ऐकूही आली. दुसर्‍या खोलीतून माधुरीने हाक तर मारली नाही ना म्हणून त्यानी कानोसा घेतला. काही आवाज नाही तरी त्यांच्या चेहर्‍यावरचा ताण थोडा सैलावला. त्यांना आठवलं, केदारच्या वेळी बाळंतपणात ऑफिसच्या पत्त्यावर येणार्‍या पत्रांत प्रिय अच्युत म्हणून सुरुवात असे; खरीखुरी पत्रं. पुन्हा कधी पत्र लिहिण्याची वेळ बाकी आली नाही. कुठे बरं ठेवली आहेत ती पत्रं?

'शरदरावांना छातीत दुखल्यामुळे दवाखान्यात ठेवलंय. मी नीलिमाकडे जाते आहे. उद्यापरवा परत येईन. जोशीवहिनी तुम्हाला डबा, संध्याकाळचे जेवण देणार आहेत. किल्ली त्यांच्याकडे ठेवली आहे.'

उद्यापरवा म्हणजे नक्की काहीच नाही. त्यांनी सगळे शब्द परत परत वाचले. पण काहीच नवे सापडले नाही. हातातली चिठ्ठी खिशात ठेवून जोगसाहेब परत आतल्या खोलीत आले. कपाटात ती जुनी पत्रं शोधायला. कपाटात एक जुना, गोडसा, अत्तराचा वास होता. त्या वासाने त्यांना सणासमारंभांच्या तयारीची आठवण करून दिली. पण त्यामुळे एकटेपणा अजून टोकदार वाटू लागला. तिकडे दुर्लक्ष करायचा प्रयत्न करत त्यांनी कपाटातले कपडे खालीवर करून बघायला सुरुवात केली. लॉकरमध्ये ठेवलेला तो पत्रांचा गठ्ठा त्यांना लगेच सापडला. पहिले पत्र उलगडून ते वाचू लागले.

प्रिय अच्युत,
आज इथल्या दवाखान्यात जाऊन आले. सगळे काही नॉर्मल आहे. सोबत आई व नीलिमा होत्या. पण तुम्ही असावेत असे खूप वाटले. ..
माधुरीच्या गोल, वळणदार अक्षरातले पत्र. 'सोबत तुम्ही असावेत असे वाटले' असे म्हणते ती. तेव्हा आपली पत्रंसुद्धा किती उत्कट असायची. आता किती वर्षे झाली काही संवादच नाही. काही बोलणे होतच नाही. पुन्हा जोगसाहेबांचे विचार या चक्रात अडकले. कधी परत येणार ती? किती किती सांगायचे राहिले आहे या वर्षांत. उद्या अप्पांसारखं आपल्यालाही काही झालं तर सांगायला वेळही मिळणार नाही.

पत्र! पत्र लिहायला पाहिजे आत्ताच्या आत्ता! जोगसाहेबांचा विचार पक्का झाला. घाईघाईने ते कागद शोधू लागले. शेवटी दुसर्‍या, केदारच्या खोलीत त्याच्या जुन्या वहीतले कोरे कागद आणि तिथलेच पेन घेऊन जोगसाहेब केदारच्या टेबलखुर्चीवर बसून पत्र लिहू लागले.