(पृष्ठ २)
दक्षिणेत आल्यापासून आग्नेय दिशेकडील टेकड्यांच्या पलीकडे चंद्रभान कधी गेला नव्हता. तीनचार दिवसांचा वेळ काढून त्या परिसरातही जाऊन पहावे असा विचार त्याच्या मनात आला. अशा अपरिचित परिसरातच हव्या त्या किंमतीला एखादी अतिशय आकर्षक वस्तू मिळू शकते हा त्याचा जुना अनुभव होता. वेळ मिळाला तसा रथ घेऊन नेहमीप्रमाणे एकटाच तो त्या दिशेला गेला. इथले लोक भोळे आणि तुलनेने अधिक धार्मिक आहेत हे त्याने ऐकले होते. त्यांच्याशी व्यवसायाची बातचीत करताना सोपे जाईल म्हणून त्याने मुद्दामच श्रद्धाळू माणसासारखी वेशभूषा केली. तिसर्या टेकडीचे वळण संपले तशी जवळपासच्या घरांची छपरे दिसू लागली. लहान मुलाच्या खिशातून पडलेल्या गोट्यांप्रमाणे टेकडीच्या पायथ्याशी घरे विखुरलेली होती. सर्वात उजवीकडे वेगळ्या पडलेल्या घरांच्या जोडगोळीने त्याचे लक्ष वेधून घेतले. या व्यवसायातील अनेक दिवसांच्या अनुभवातून त्याला नेमकी घरे ओळखण्याची कला अवगत झाली होती. टेकडी उतरून झाडांचा आडोसा पाहून त्याने त्याचा रथ बाजूला लावला आणि घरांच्या दिशेने चालत निघाला. निघण्यापूर्वी गळ्यातील माळ ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने कपड्यांची रचना करायला आणि कपाळावर ठसठशीत आडवे गंध लावायला तो विसरला नाही.
मात्र दोन्ही घरांचे दरवाजे बंद आहेत हे पाहून तो निराश झाला. आजूबाजूला कोणाला विचारण्याचीही सोय नव्हती. एका घराची खिडकी उघडी दिसत होती. घरातील वस्तू पाहण्याची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना. आजूबाजूचा कानोसा घेऊन त्याने सावधपणे आत नजर टाकली आणि तो थक्क झाला. घरातल्या अस्ताव्यस्त पडलेल्या पसार्याच्या अवकळेनेही आतल्या त्या मेजाचे खानदानी सौंदर्य झाकले गेले नव्हती. मेजाला कोण्या मूढमतीने रंगसफेदी केली होती. पण ते एका दृष्टीने बरेच होते. निदान या वस्तूचे अस्सल रुप लपून राहिले होते. इतकी अप्रतिम वस्तू त्याने पूर्वी पाहिली नव्हती. कदाचित कुरुवंशाच्याही फार पूर्वी दक्षिण भारतात राज्य करणार्या एखाद्या राजघराण्याच्या आलिशान भोजनगृहात ही वस्तू असावी. जर हे मेज मिळाले तर साक्षात राजेसरकारांना तो विकता येईल आणि मोठ्ठे घबाड पदरात पाडून घेता येईल असे त्याला वाटले. अचानक माणसांचे बोलणे ऐकू येऊ लागले तसे त्याने मागे वळून पाहिले.
घराच्या दिशेने तिघेजण चालत येत होते. मनुष्याच्या अस्तित्वाचा साक्षात पुरावा मिळाल्याने चंद्रभानला हुरूप आला. सराईत व्यावसायिक हास्य चेहर्यावर आणत त्याने तिघांना अभिवादन केले.
"नमस्कार, माझे नाव चंद्रभान. दक्षिणप्रांतातील महापराक्रमी राजघराण्याचा मी एक नम्र सेवक आहे."
"अच्छा! मी रामा. हे माझे भाऊ शिवा आणि गोविंदा. इथे आमच्याकडे येण्याचे कारण?" एकाने संवाद चालू ठेवला. मात्र त्याच्या नजरेत चंद्रभान ही संशयास्पद व्यक्ती आहे हे स्पष्ट दिसत होते.
"राज्यसरकारातील पुरातत्त्व विभागातील पुरातन वस्तू संग्रहालय आणि संस्कृती संगोपन केंद्राचा प्रमुख या नात्याने मी येथे आलो आहे."
"म्हणजे?"
"आपल्या आदरणीय राजेसाहेबांनी दक्षिणप्रांतातील संस्कॄतीचे रक्षण करण्यासाठी एक मोठे संग्रहालय उभारण्याचे नक्की केले आहे. त्यासाठी काही वस्तू येथे मिळते का हे पाहण्यासाठी मी येथे आलो होतो."
"छ्या. इथे तुम्हाला काय मिळणार? इथे आमच्यासारखे लाकूडकाम, लोहारकाम वगैरे करणारे अविवाहित लोक राहतात. हा आता राजेसाहेबांना दरबारात काही सजावट वगैरे करून हवी असेल तर सांगा. आम्ही त्यात मदत करायला तयार आहोत."
"मला एकंदर कल्पना होतीच. हा एकूणच सर्व प्रदेश रखरखीत दिसतो. इथे काही मिळेल असे मलाही वाटत नव्हते. पण सरकारी काम. काय करणार? असो. तुम्हाला भेटून आनंद झाला. मी निघतो. मात्र तत्पूर्वी मला थोडेसे पाणी मिळेल का प्यायला?"
"हो हो. देऊ की. आमच्याकडे तुम्हाला प्यायच्या सर्व वस्तू मिळतील. हॅ हॅ हॅ हॅ!" असे म्हणत रामाने दरवाजा उघडला.
घरात गेल्यावर चंद्रभानने इतरांच्या नकळत त्या मेजाचे जवळून निरीक्षण केले. ती वस्तू नक्कीच फार मौल्यवान होती. मात्र या मूर्खांना गंडवून अगदी कमीत कमी किंमतीत ही वस्तू पदरात पाडून घेण्यासाठी काही युक्ती आवश्यक होती.
"भलतेच अवजड दिसतेय हे मेज. तुम्ही वापरत नाही वाटतं. रंग बाकी छान दिलाय. हे मेज विकणार वगैरे असाल तर सांगा. संग्रहालयाच्या कामासाठी मी अनेकांना भेटत असतो. कोणाला हवे असेल तर विकता येईल." सहजच बोलल्याप्रमाणे चंद्रभानने विषय काढला.
"रंगाचं म्हणाल तर ही आमच्या गोविंदाची करामत. रंगाच्या कामगिरीत त्याचा हात धरणारा कोणी नाही. तुम्हाला हवे असले तर घ्या. मात्र ५०० मोहरा द्याव्या लागतील. राजेसाहेबांना तितक्याशा जड नाहीत त्या. काय रे शिवा?", रामा म्हणाला.
"नाही तर काय! त्यांच्या घोड्याची झूल देखील सोन्याची असते असे म्हणतात."
खरे तर त्या मेजासाठी ५०० मोहरा हा फारच स्वस्तातला व्यवहार होता. राजेसाहेबांनी मेजासाठी निदान दशसहस्र मोहरा तरी दिल्या असत्या. मात्र कसोशीने प्रयत्न केला तर कोणतीही वस्तू अगदी कमी किंमतीत मिळते हे एक तत्त्व चंद्रभान शिकला होता. ते त्याला पाळायचे होते.
"छे छे! संग्रहालयासाठी काही फायदा नाही त्याचा. आणि या असल्या बोजड आणि अनाकर्षक वस्तूसाठी ५०० मोहरा कोणीही देणार नाही.", चंद्रभान म्हणाला.
"तुम्ही किती द्यायला तयार आहात?" रामालाही ती वस्तू घरातून काढून टाकायची असावी.
"तसा कोणालाही फारसा उपयोग नाही या वस्तूचा. किती अवजड आहे! पण मला विचाराल तर मी ७५ मोहरा देऊ शकेन फार फार तर!"
"फक्त ७५? अहो गोविंदाच्या रंगकामाची मजुरीच ३५ मोहरा आहे! शिवाय लाकडाची किंमत वेगळीच."
"पहा बुवा, थोडीशी किंमत मी वाढवून देऊ शकतो पण फार नाही."
"एक मिनिट, एक मिनिट. तुम्ही एकदा हे मेज नीट पाहून तर घ्या. मग किंमत ठरवू."
आता परवानगीच मिळाल्याने त्याने अतिशय काळजीपूर्वक त्या मेजाचे निरीक्षण सुरू केले. रंग दिल्याने मेजाचा मूळ चकचकीतपणा लपला होता. मात्र जसजसा चंद्रभान बघत होता तसतशी त्याची मेजाच्या अस्सलपणाबद्दल खात्री पटू लागली. खाली झोपून त्याने मेजाची खालची बाजू अलगद हात फिरवून पाहिली. तसा तो चमकलाच. एखादी मुद्रा कोरलेली असावी. खिशातून चाकू काढून लाकडाला धक्का लागणार नाही अशा बेताने त्याने रंग खरवडून काढला. त्या जागेवर उलटी अंबारी लावलेल्या हत्तीची मुद्रा कोरलेली त्याला स्पष्ट दिसली. पांडवांच्या आधी सुमारे अडीचशे वर्षांपूर्वी मध्यप्रांतात राज्य करणार्या एका राजघराण्याची ती मुद्रा होती. संथगतीने पुढे चालणार्या हत्तीवरील अंबारीचे तोंड मागील दिशेला असणारी ती मुद्रा दक्षिणेत फारशी कोणाला माहिती असणे शक्य नव्हते. ’प्रगती करत असतानाही आपल्या संस्कृतीकडे, परंपरेकडे दुर्लक्ष करू नये.’ हे त्या राजघराण्याचे धोरण अधोरेखित करणारी यापेक्षा चांगली खूण त्यांना मिळाली नसावी. हे मेज विकत घेण्याचा चंद्रभानचा निश्चय अधिकच पक्का झाला.
"अगदी साध्या लाकडापासून बनवलेले मेज आहे हे. तुम्हाला कोठे मिळाले?" हातात खरवडून काढलेला रंग दाखवत चंद्रभान म्हणाला.
"इथे एका मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम आम्हाला मिळाले होते. पण आमचे पैसे चुकते करण्याऐवजी तिथल्या पुजार्याने मंदिरातील ही वस्तू घेऊन जायला सांगितले."
"तरीच. अहो एखादी महागडी वस्तू असली तर कोणी तुम्हाला अशी फुकट नेऊ देईल का? अगदी साध्या लाकडापासून बनवलेले हलक्या दर्जाचे मेज आहे हे!"
"एक मिनिट, एक मिनिट." हातात एक ताम्रपत्र घेऊन येत गोविंदा म्हणाला.
"जेव्हा हे मेज मी रंगवत होतो तेव्हा त्याच्या फळीखाली चिकटवून ठेवलेले हे पत्र मला मिळाले. ह्या मेजाला लांबी लावताना त्रास होत होता म्हणून मी ते काढून घेतले. कोणती भाषा आहे काही कळत नाही. तुम्हाला काही समजतंय का बघा."
चंद्रभानने ताम्रपत्र काळजीपूर्वक पाहिले. मध्यप्रांतातील शौर्यवदन राजाला त्याच्या विवाहामध्ये रुखवतात मिळालेले हे मेज होते. वरपक्षाकडील संस्कृतीचा आदर राखण्यासाठी ’सन्मुखगज-विन्मुखअंबारी’ ही मुद्रा कोरत आहोत हे ठळकपणे त्यात नमूद केले होते.
चंद्रभानला हा पुरावा पाहिल्यानंतर चेहर्यावरील आनंद लपवण्यासाठी अपरिमित कष्ट घ्यावे लागले.