(पृष्ठ ३)
शाळांमध्ये विज्ञान शिकवण्यासाठी, विद्यार्थ्यांचे कुतूहल, त्यांच्या शंका यांचे निरसन करण्यासाठी तेवढे सक्षम शिक्षक मिळतातच असे नाही. शास्त्रज्ञांनी शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक शंका दूर करणे, नवीन संशोधनाबद्दल त्यांना माहिती देणे असे काही करता येईल का? कार्यबाहुल्यामुळे तुम्ही स्वतः कदाचित यासाठी वेळ देऊ शकणार नाही पण थोडा रिकामा वेळ असलेल्या शास्त्रज्ञांना हे करता येईल का?
खरे म्हणजे आमच्यापैकी सर्वांनीच हे करणे अतिशय जरुरीचे आहे व हे करण्यासाठी वेळही काढायला हवा. मला जेव्हा शाळा व महाविद्यालये यात विज्ञानावर व्याख्यान देण्यासाठी बोलावतात तेव्हा मी आवर्जून जाते, तिथल्या विद्यार्थ्यांना पार्टिकल फिजिक्स म्हणजे काय?, संशोधन म्हणजे काय?, याबद्दल माहिती देते. त्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील कुतूहल, जिज्ञासा आणि त्याचे समाधान झाले की दिसणारा आनंद हे सर्व पाहून हे करायला अधिकच हुरूप येतो. सेवानिवृत्त शास्त्रज्ञांनी अशा प्रकारचे उपक्रम हाती घ्यावेत असे फार वाटते. यासंदर्भात मला असेही वाटते की, ज्येष्ठ महिला शास्त्रज्ञांनी तरुण महिला शास्त्रज्ञांसाठी काही कार्यक्रम हाती घ्यावेत. ह्या क्षेत्रातील आपले अनुभव, ह्या क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी व त्यांना तोंड कसे द्यावे इत्यादी गोष्टी सांगून त्यांच्या घडणीस हातभार लावावा. इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेस च्या WiS ह्या पॅनेलतर्फे आम्ही असे कार्यक्रम चालू केलेही आहेत. ह्याबद्दलची अधिक माहिती पुढील दुव्यावर मिळेल. http://www.ias.ac.in/womeninscience
संशोधनक्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्यांसाठी काही टिप्स? संशोधन म्हणजे १०% इन्स्पिरेशन आणि ९०% पर्स्पिरेशन असं मी ऐकलंय! तुमच्या मते ही टक्केवारी कशी आहे?
संशोधनाच्या क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की संशोधन करताना आपल्याला ज्यात रस आहे ते करण्याचे स्वातंत्र्य मिळतेच पण त्याबरोबरच ते करण्याची विलक्षण जबाबदारीही आपल्यावरच येते. अंतिम दिनांकाची बंधने आपली आपणच घालून घ्यावी लागतात आणि ती पाळण्यासाठी मान मोडून काम करावे लागते. चिकाटीची तर फारच आवश्यकता असते. १० टक्के इन्स्पिरेशन आणि ९० टक्के पर्स्पिरेशन हे तर महान शास्त्रज्ञ एडिसनच म्हणाला आहे तिथे आपल्यासारख्यांची काय कथा! मला असे वाटते की हे पर्स्पिरेशन म्हणजे बी पेरण्यापूर्वी कष्ट करून जमिनीची मशागत करण्यासारखे आहे. मोत्याच्या पिकासाठी बियाणे उत्तम हवेच पण जमिनीच्या मशागतीसाठी कष्टही केले पाहिजेत.
सध्या सुरू असलेल्या एल.एच.सी. प्रयोगाबद्दल काही सांगता येईल का?
'एल.एच.सी.' म्हणजे 'लार्ज हेड्रॉन कोलायडर' हे सर्वप्रथम सांगावेसे वाटते. हे कोलायडर्स किंवा ’धडकदार’ का लागतात ते पुढे येईलच.
पदार्थ मूलकणांपासून बनलेला असून, त्यांच्या गुणधर्मांवरून पदार्थाचे गुणधर्म निश्चित होतात, हे समजल्यानंतर भौतिकशास्त्रज्ञांनी मूलकणांचा वेध घेण्यास सुरवात केली. याचा आरंभ आपल्याला माहीत असलेल्या रुदरफोर्डच्या प्रयोगांनी झाला. ह्या प्रयोगात रुदरफोर्डने अल्फा किरणांचा मारा टिनच्या पत्र्यावर केला आणि अणू हा मूलभूत नसून तो अणुकेंद्र व इलेक्ट्रॉन्स यांनी बनलेला आहे हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतरच्या १०० वर्षात वेगवेगळ्या प्रकारचे मूलकण - इलेक्ट्रॉन, प्रोटॉन इत्यादी - यांना प्रचंड वेगाने एकमेकांवर धडकवून हे मूलकण काय आहेत व ते एकमेकांशी कसे "बोलतात" हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले. या सर्व मूलकणांच्या वस्तुमानात मात्र मोठी तफावत असल्याचे दिसून आले. ही तफावत का असावी याचे उत्तर सैद्धांतिक शास्त्रज्ञांनी दिले आहे आणि त्यातील बऱ्याच गोष्टींना कोलायडर्सच्या प्रयोगांनी पुष्टी मिळालेली आहे. तरी अजून थोडेसे राहिले आहे. त्यासाठी शेवटचा ठोका पाहिजे! त्यासाठीच एल.एच.सी. बांधण्यात आला आहे. इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन, प्रोटॉन-अँटिप्रोटॉन, प्रोटॉन-इलेक्ट्रॉन अशा मूलकणांच्या धडका गेल्या वीस वर्षांत विविध "कोलायडर’मधून घडवण्यात आल्या आहेत. या प्रयोगांमधून मिळालेली माहिती आधीच्या स्टॅंडर्ड मॉडेलच्या सिद्धांताला पूरक अशीच आहे. पण त्यात मांडलेल्या आणखी काही गोष्टींचा प्रत्यक्ष पुरावा शोधण्यासाठी प्रोटॉन - प्रोटॉन धडकेची आवश्यकता आहे. ही धडक घडवण्याची संकल्पना १९८६ साली अस्तित्वात आली व तेव्हापासून याची तयारी सुरु झाली. माझ्यासह काही भारतीय शास्त्रज्ञ तेव्हापासून ह्याच्याशी संलग्न आहेत. ही धडक घडवणे म्हणजेच गेले काही दिवस ज्याबद्दल खूप चर्चा चालली होती तो जीनिव्हा येथील CERN ह्या प्रयोगशाळेत सप्टेंबरमध्ये घडवण्यात आलेला एल.एच.सी.प्रयोग. ह्या प्रयोगातून अपेक्षित कणांचे अस्तित्व सिद्ध झाले तर स्टॅंडर्ड मॉडेलच्या सिद्धांताला पुष्टी मिळेल. पण ती नाही मिळाली तरी नवा सिद्धांत जन्म घेईल. म्हणजे प्रयोगातून काही तरी निष्पन्न होईलच. शिवाय ही तर प्रयोगाची सुरुवात आहे. यावर पुढेही काम होत राहीलच.
महास्फोटातून (बिग बॅंग) विश्वाच्या निर्मितीनंतर काही क्षणांतच इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन, पॉझिट्रॉन आदी कण अस्तित्वात आले. लवकरच होणाऱ्या एल.एच.सी.च्या पुढील प्रयोगातून ह्या संबंधात माहिती मिळण्याची शक्यता आहे.
'Leelavati's Daughters' ह्या नावाचे एक पुस्तक प्रकाशित होत आहे असे ऐकले आहे. त्याबद्दल जरा सांगा न!
इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेसचे वुइमेन इन सायन्स (WiS) असे एक पॅनेल आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक यामध्ये करीयर करू इच्छिणाऱ्या तरुण मुलींना मार्गदर्शन करणे हा या पॅनेलचा उद्देश आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये संशोधन हाही एक पर्याय असतो हे पटवून देण्यासाठी WiS ने काही कार्यक्रम हाती घेतले आहेत. याचाच एक भाग म्हणून 'लीलावतीज डॉटर्स' हे पुस्तक काढण्याचे ठरले. ह्या पुस्तकात भारतातील नामवंत महिला शास्त्रज्ञांची (डॉ. आनंदीबाई जोशी, डॉ. इरावती कर्वे, डॉ. असीमा चटर्जी इत्यादी) संक्षिप्त चरित्रे आहेत. तसेच गेल्या ५०-६० वर्षात विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केलेल्या भारतातील महिला शास्त्रज्ञांचे आत्मचरित्रवजा लेख आहेत. संशोधन क्षेत्रात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुण महिलांना ह्या पुस्तकामुळे प्रेरणा मिळेल आणि त्यात लिहिलेल्या अनुभवांतून बरेच काही शिकायलाही मिळेल अशी आशा आहे. १ नोव्हेंबरला इंडियन ऍकॅडमी ऑफ सायन्सेसच्या वार्षिक सभेत हे पुस्तक प्रकाशित होईल.
तुमच्याशी बोलताना असे वाटले की तुम्ही शास्त्रीय विषयाशी संबंधित लेखन किंवा ललित लेखनदेखील चांगले करू शकाल! तसे कधी केले आहे का?
मी स्वतः एके काळी कविताही करीत असे! साहित्याचा छंद घरात सगळ्यांनाच आहे. लहानपणी 'महाराष्ट्र बालकवी' स्पर्धेत मला बक्षिसही मिळाले होते. आता मात्र ललित लेखन अगदी बंद आहे. मात्र शास्त्रीय विषयांशी संबंधित लेखन बरेच करते. 'रेझोनन्स' ह्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शास्त्रविषयक मासिकात मी मधूनमधून लेखन करते.
तुमच्याबद्दलची माहिती जमा करत होते तेव्हा तुम्हाला मिळालेले मानसन्मान व तुमची कामगिरी वाचता वाचताच मला धाप लागली! माझा शेवटचा प्रश्न ह्यासंबंधातच आहे. तुमचे मानसन्मान व कामगिरी यातील एकाने मी फार प्रभावित झाले आहे. ते म्हणजे तुम्ही तुमच्या सहकाऱ्याबरोबर केलेल्या संशोधनास ड्रीस-गोडबोले परिणाम या नावाने ओळखले जाणे. पण हे झाले माझे मत! तुम्हाला स्वतःला यातील कोणता सन्मान सर्वात मौल्यवान वाटतो?
मला स्वतःला मुंबई आय.आय.टी.ने दिलेले Distinguished Alumnus Award हे सर्वात महत्त्वाचे वाटते.
केवळ 'आईने पाठीवर मारलेली शाबासकीची थाप' एवढीच भावना यामागे आहे की आणखी काही?
ते तर आहेच, पण आणखी एक कारण आहे. आय.आय.टी.सारख्या संस्थेतून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे, माहिती-विज्ञान क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हे तर सर्वविदीत आहे. पण त्याच संस्थेला, ज्याचा समाजाला प्रत्यक्ष किंवा नजीकच्या भविष्यकाळात फारसा उपयोग नाही अशा मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचा गौरव करावासा वाटला याचा मला अधिक आनंद झाला. एक प्रकारे 'आपल्याला तंत्रज्ञानात पुढे जायचे आहेच पण मूलभूत संशोधनातही आपण मागे पडता कामा नये' या विचारसरणीला आय.आय.टी.ने दिलेली ही मान्यताच आहे असे मला वाटते.
रोहिणीताईंनी आपला बहुमूल्य वेळ ह्या मुलाखतीसाठी दिला आणि विज्ञान व त्याच्याशी संबंधित अनेक मुद्यांवर आपले विचार सांगितले ह्याबद्दल त्यांचे आभार मानून आणि सर्व मनोगतींतर्फे त्यांना शुभेच्छा देऊन मी त्यांचा निरोप घेतला.
मीरा फाटक