व्यायाम 'हराम' आहे!

अभिजित पेंढारकर

घरी आलो, तोवरही अर्धांगिनी अंथरुणातच निपचीत पडली होती. लाथ घालूनच उठवायची इच्छा होती, पण सभ्यतेच्या मर्यादा आड आल्या.
हा प्रकार रोजच व्हायला लागल्यावर पर्वतीचा नाद सोडून द्यावा लागला. एकतर रोजची बारा-चौदा तास झोपायची सोय होत नव्हती. त्यातून पायातलं त्राणच निघून गेल्यासारखं वाटत होतं. पहिल्या दिवशी उत्साहानं अर्ध्या पायर्‍या चढून गेलो, पण दुसर्‍या दिवशी पाव, तिसर्‍या दिवशी आधपाव, चौथ्या दिवशी सात पायर्‍या, असं करत करत दोन ते तीन पायर्‍यांवरच मी गार व्हायची वेळ आली होती. मग पर्वती रद्द झाली.  तरीही, व्यायामाची उमेद मी सोडली नव्हती. कुठं तरी जिम लावावी, असा विचार केला. जवळपास कुठेही सोयीची (अर्थात, कमी त्रासाची) जिम मिळेना. ज्ञानप्रबोधिनीत जायला लागलो. एका मित्रालाही वजन कमी करायची खुमखुमी आली होती.

तिथला इन्स्ट्रक्‍टर नेमका कुठल्या तरी जुन्या ओळखीचा भेटला. आम्ही आलोय म्हटल्यावर त्याच्या अंगात बारा हत्तींचं बळ आलं असावं बहुधा. एखादा खाटिक नवा बकरा मिळाल्यावर जेवढा खूश होईल, तेवढाच आनंद त्याला झाला. आम्हाला कसली कसली वजनं उचलायला लावून, कुठली कुठली चक्रं फिरवायला लावून, स्वतः जिमभर उंडारत फिरायचा. बरं, मुला-मुलींची जिमही वेगवेगळी होती. त्यामुळं निदान तो तरी विरंगुळा होईल, हा हेतूही फोल ठरला. सुजलेलं अंग कमी होण्याऐवजी कष्टानं अंगावरच सूज चढलेय, हे लक्षात आल्यावर जिमचा उत्साहदेखील आठ दिवसांत मावळला. तिथले पैसेही फुकट गेले.

"अहो, पोहायला तरी जा आता!'' बायकोनं शेवटचं अस्त्र सोडलं.
मग मला तीन-चार वर्षांपूर्वी पंधरा-वीस दिवस कष्ट करून पोहायला शिकल्याची आठवण झाली. तसं, विहिरीत जीव वाचविण्याइतपतच पोहता येत होतं मला, पण एवढ्यात हार पत्करून चालणार नव्हतं. शहरातल्या तमाम स्विमिंग पूलवर जाऊन चौकशी केली. कुणाची वेळ जमणारी नव्हती, तर कुणाची फी अवाच्या सव्वा होती. कुणाचा टॅंकच खराब होता, तर कुणाकडे ऍडमिशन फुल होती. कुणाकडे सध्या जीवरक्षक नव्हते. उगाच टॅंकच्या व्यवस्थापकांचा जीव धोक्‍यात कशाला घाला, असा विचार केला.

एस.पी.च्या टॅंकची वेळ जमून आली. तरीही, सकाळी सहाला उठण्याचं शिवधनुष्य पेलावं लागणार होतं. कारण त्यानंतरची कुठलीच वेळ माझ्या सोयीची नव्हती. ऍडमिशन घेऊन टाकली आणि दुसर्‍या दिवशी जामानिमा करून टॅंकवर धडकलो. सकाळी सहाची गार हवा, वारा आणि बर्फासारखं गार पाणी...आहाहा! काय आल्हाददायक अनुभव हो! अंगाचं नुसतं लाकूड झालं होतं. त्याशिवाय, स्विमिंग टॅंकशी चार वर्षांनी संबंध आलेला...त्यामुळं दर पाच फुटांवर होणारी दमछाक...! काठाकाठानंच पोहलो, तरी पुरेवाट झाली. घरी आल्यानंतर दोन दिवस उठता-बसता नाकी नऊ येत होते. एकदा झोपल्यावर या कुशीवरून त्या कुशीवर काही झालो नाही! कुणाकडे वळून बघायचं, तरी मानेला प्रचंड त्रास द्यावा लागत होता.

माझे व्यायामाचे असे अनेकविध चक्षुचमत्कारिक आणि अंगविक्षेपित प्रयोग फसले होते. त्यामुळं सगळे तूर्त थांबवले होते. एके दिवशी सहज टीव्ही बघत बसलो होतो. बाबा रामदेवांचं सप्रयोग व्याख्यान सुरू होतं. त्यांनी प्राणायामाचं महत्त्व सांगितलं. श्‍वास रोखून धरायचा आणि निःश्‍वास टाकण्याचं तंत्र त्यांनी सांगितलं. मला वाटलं, अरे, आपल्याला एवढे दिवस हे का नाही सुचलं?

...हिंदी चित्रपटांतले घरच्यांसोबत न बघण्यासारखे अनेक प्रसंग आपण वर्षानुवर्षं श्‍वास रोखून बघत आलो आहोत (आणि नंतर काहीच हाती न पडल्यानं त्याबद्दल पस्तावलोही आहोत!) तसंच, सुटकेचा निःश्‍वास तर प्रत्येक संकटानंतर टाकला आहे! हे आपल्याला जमण्यात काहीच अडचण नाही!!
मग त्या दिवसापासून मी बाबा रामदेवांचा परमभक्त झालो. वर्षानुवर्षांच्या प्रदीर्घ अनुभवामुळे आता श्‍वास रोखून ठेवणं आणि उच्छ्वास टाकणं मला सहजरीत्या जमू लागलं आहे...जय बाबा रामदेव की!