दिवाळी अंक २००९

नोकरशाही

सुधीर कांदळकर

असो. तर एका घाईगर्दीच्या दिवशी पावणेचार वाजलेले. केव्हा एकदाचा तास सव्वा तास सरतो आणि पाच वाजतात आणि निघतो असे झालेले.

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"साहब, पाच एक्साईजवाले वर येताहेत." रखवालदार.

"रजिस्टर लिहिले का?" मी

"मी लिहायला सांगितले पण त्यांनी नाही लिहिले."

"ठीक आहे."

तो रिसिव्हर ठेवतो तोच,

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस?"

"फाऽऽईव्ह पऽर्सन्स फ्रॉम एक्साऽऽईज हॅव कम. शाल आय सेंऽऽड देम?" दूरध्वनी चालिका.

"ओ के." मी.

"मी एक्साईज इन्स्पेक्टर शिंदे. हे सुपरिटेंडंट XXX, हे इन्स्पेक्टर अमुक अमुक, हे तमुक तमुक."

"बसा साहेब! वेलकम टू हील्डन. मी सुधीर कांदळकर, एडीएम. एक्साईज पाहातो." (इतरांना) "बसा साहेब, बसा!!"

बझर दाबून पाणी मागवले. चहा थंड पेय जे हवे ते मागवले. "बोला. आज रूटीन व्हीझीट की विशेष काम?"

"आम्ही व्हीजिलन्स मधून आलो. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन आहे."

"ठीक आहे. प्रथम तुमच्या कोणाही एकाचे आय कार्ड प्लीज." मी.

शिंदेसाहेबांना ओळखपत्राची मागणी रुचलेली दिसली नाही, पण दाखवले. मी डायरीत ओळखपत्र क्रमांक टिपून घेतला. क्रमांक टिपून घेतला म्हणून ते काहीसे अस्वस्थ झाले.

"ए.सी. (असिस्टट कमिशनर) चे लेटर?" मी.

"हे पाहा." शिंदेसाहेब.

मी शिपायाला ते पत्र घेऊन आमच्या संचालकाकडे द्यायला सागितले. पण शिंदेसाहेबांनी आक्षेप घेतला. म्हणाले, "लेटर आम्ही पार्टीला देत नाही"

दिवाळी आली की हे लोक आपल्या कार्यकक्षेपासून दूरच्या विभागातल्या कारखान्याच्या दौर्‍यावर अनधिकृतपणे जातात, दमदाटी करतात व पैसे उकळतात कोणी तक्रार केलीच तर तो मी नव्हेच. हे जगजाहीर आहे. म्हणजे इन्स्पेक्टर खराही आणि तोतयाही. किंवा इन्स्पेक्टर खरा पण तपासणी खोटी. त्यामुळे त्याच्या हस्ताक्षरात नोंद होणे महत्त्वाचे असते.

"हे बघा साहेब, या पत्रात तुमच्या भेटीचा उद्देश - पर्पज ऑफ व्हीझीट - लिहिलेला नाही. तुम्ही तोंडीही तो सांगितलेला नाही. तुम्हाला माझे सहकार्य हवे असेल तर मला लेटर पाहीजे, नाहीतर माझ्या साहेबांना भेटा." मी.

ते आता भरपूर रागावले. त्यांचा चेहराच सांगत होता. मग ते त्यांच्या सुपरिटेंडंटशी काहीतरी बोलले. मग मला म्हणाले, "तुम्हाला कॉपी घ्या पाहिजे तर पण ओरिजिनल आम्ही देणार नाही."

आता माझा मेंदू वेगाने काम करायला लागला होता. "ठीक आहे. हे एक्साईजचे व्हीझीट रजिस्टर भरा." (रजिस्टरमध्ये भेटीचा हेतू - पर्पज ऑफ व्हीझीट हा एक रकाना आहेच.)
"ते सगळे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यावर नंतर भरू."

मी शिपायाकडून एसीच्या पत्राची प्रत संचालकांना पाठवली व सांगितले की एक्साईजवाले साहेब लोक ओरिजिनल देत नाहीत, गेटवरचे बुक लिहिले नाही व एक्साईज व्हीझीट रजिस्टर नंतर लिहिणार म्हणतात. काय करायचे विचार.

----

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

"येस सर?"

संचालकांनी अंतर्गत दूरध्वनीवरून विचारले व मी व्यावसायिक शब्दात खरे ते सागितले.

"काय करूया आपण आता?" त्यांनी विचारले.

"तुमची परवानगी पाहिजे सर, ओरिजिनल लेटरशिवाय इन्व्हेस्टिगेशन सुरू करायला. एक्साईजचे व्हीझीट रजिस्टर हे लोक नतर लिहू म्हणतात. ते करू द्यायला मला अधिकार नाही." मी.

माझा आणि संचालकाचा आपसातला संवाद चांगला असे. म्हणजे कुणाही अधिकार्‍यासमोर मी काहीही बोललो किवा कागदाचे चिटोरे मोजके शब्द खरवडून पाठवले तरी छुपा अर्थ त्यांना अचूक कळत असे. म्हणजे शोधकार्य - इन्व्हेस्टिगेशन बोगस असू शकते हे आमच्या सूज्ञ संचालकांना कळले.

इथे मात्र मी फक्त त्याची परवानगी घेत आहे असा अर्थ निघाला आणि माझ्या शब्दांनी तणाव बराचसा कमी झाला.

"ठीक आहे. काम चालू करा, त्यांच्या चहापाण्याची, खाण्यापिण्याची सोय करा आणि मला येऊन भेटा." संचालक.

"काय काय रेकॉर्ड्स पाहिजेत साहेब?" मी.

"एक्साईज अकाऊंट्सपैकी लिस्ट ऑफ रेकॉर्ड्स, डेली प्रॉडक्शन रिपोर्ट, आर. जी. वन, पी. एल. ए, सेनव्हॅट रजिस्टर, इनपुट स्टॉक रजिस्टर, जॉब वर्क रजिस्टर, आणि फिनान्शिअल अकाउंट्सपैकी कॅश बुक, बॅंक बुक, बॅंक स्टेटमेंट, सेल्स रजिस्टर, जी. एल., पर्सनल लेजर, गेटवरचे मटेरिअल इनपुट रजिस्टर, आणि इतर प्रायव्हेट रेकॉर्ड्स."
मी प्रथम माझ्या कॅबिनमधले डाव्या बाजूचे टेबल रिकामे करून तिथे दोन इन्स्पेक्टर्सना बसून काम करायची सोय केली, माझ्या टेबलवर समोर दोन इन्स्पेक्टर्स बसले आणि सुपरिटेंडंटना माझ्या टेबलाशी उजव्या बाजूला बसवले, एक्साईज अकाउंट बुक्स त्यांच्यासमोर ठेवली. नेहमी प्रशस्त वाटणार्‍या कॅबिनला आता झोपडपट्टीची गर्दीयुक्त अवकळा आली. चारजणाचे काम सुपरिटेंडंटच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले. त्यांना हवे नको बघायला (खरे तर त्यांच्यावर लक्ष ठेवायला) एक शूर शिपाई दिला आणि संचालकांना भेटलो.

"काही गंभीर मामला?" संचालक.

"अजिबात नाही." मी.

"आपले रेकॉर्ड्स ठीक? काही गफलत? कायद्याचा काही मुद्दा?"

"सगळे रेकॉर्ड्स तयार. गफलत अजिबात नाही. कायद्याच्या मुद्द्याचा कीसही नाही."

"मग आलेत तरी कशासाठी?"

"दिवाळी जवळ आली आहे ना! वर्गणी जमा करीत असतील. म्हणून व्हीझीटची नोद करायची नसेल असे वाटत होते. पण असे असेल तर त्यांची वागणूक वेगळी असते. गोड बोलतात, चहापाणी घेतत आणि पॅकेट घेऊन जातात. मी 'रूटीन व्हीझिट आहे का' म्हणून विचारले पण. स्पेशल इन्व्हेस्टिगेशन आहे म्हणे. कधी कधी त्यांच्या अपेक्षा जास्त असतात तेव्हा जरा नाटकं करतात. नाहीतर इन्व्हेस्टिगेशनचा कोटा पुरा करायचा असेल. पण बहुधा 'रॅडम सिलेक्टेड सरप्राईज इन्स्पेक्शन' असणार. तो ऍडिशनल कमिशनर आला होता ना मागे, त्याने ही पीडा आपल्यामागे लावली असणार. आणि हे लोक एक्साईज व्हीझीट बुक, नतर लिहिणार म्हणे. पाहिजे तर आपण कमिशनर ऑफिस मध्ये विचारून कन्फर्म करू शकतो की ही व्हीझीट ऑफिशिअल आहे वा नाही."

"ठीक आहे. वाजवी किंमत असेल तर पैसे फेकून घालवा. जास्त मागत असतील तर घासाघीस करा. पाहिजे तर मला बोलवा. आपल्या कामात हा नसता खोळंबा कशाला? आपला वेळ वाचवायला पैसे द्या. कर नाही त्याला डर कशाची? जास्तच नाटक करत असतील तर करायचे ते करूद्यात. एक पैसा देऊ नका मग. जास्तीत जास्त काय होईल खोटी डिमांड ठोकतील. वी शाल फाईट ऍंड विन."

"नक्कीच सर. मैत्रीपूर्ण समझौत्याला पहिले प्राधान्य. नाहीतर खुशाल डोके आपटा म्हणावे."

मी पुन्हा माझ्या जागेवर आलो. आता सुपरिटेंडंटना विचारले की रूटीन व्हीझिट आणि जास्त अपेक्षा असेल तर स्पष्ट बोला. आडपडदा ठेवायचे कारण नाही. त्यानी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले की तसे असते तर आनंद वाटला असता.

मी म्हटले "मग तुम्ही ए.सी. चे लेटरही देत नाही आणि व्हीझीट बुकही लिहीत नाही हे कसे काय? शिवाय आमच्या रेंज एरियातले आम्ही हाईयेस्ट रेव्हीन्यू पेयर्स आहोत. आमचे प्रॉडक्ट हे कझ्यूमर प्रॉडक्ट नाही. सर्व ग्राहक हे कोका कोला, पेप्सी इ. उद्योगसमूह असून त्यांना आम्ही भरलेल्या संपूर्ण एक्साईज ड्यूटीचे क्रेडिट मिळते. त्यामुळे आमच्या प्रॉडक्टचा काळा बाजार होण्याची शक्यता शून्य आहे आणि म्हणून आमचे नाव रॅंडम इन्व्हेस्टिगेशनला येण्याची शक्यता पण कमी आहे."

"आम्ही व्हीझीट बुक लिहिणार. काळजी करू नका."

----

ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.

नंबर नजीबाबादचा दिसत होता. आमचे कस्टमर्स कोका कोला आणि पेप्सी यांचे कारखाने भारतभर विखुरलेले आहेत.

"हॅलो, मि. सुधीर?" हा शैलेश इराडा. केरळी गृहस्थ. नजीबाबादहून बोलत होता. दाक्षिणात्य असला तरी बंबैया हिंदी माझ्यापेक्षा जास्त चांगले बोलतो.

"येस सर? बोला शैलेशजी. काय म्हणताय? हुकूम फरमाइये."

"व्हेरीसील एक सेट एकदम अर्जट. आणखी एक. सीओडी (डिलीव्हरी अगेस्ट पेमेट) करू नका, डायरेक्टली पाठवा. वीसपंचवीस हजाराची मामुली रक्कम होईल. एका आठवड्यात पैसे पाठवतो."

"ठीक आहे, आजच काढतो. आता कोटेशन पाठवतो, पण परचेस ऑर्डर मात्र आजच मेल वा फॅक्स करा."

"इकडे बिजली लापता, कॉम्प्यूटर, फॅक्स दोन्ही बंद. जशी बिजली येईल तशी ताबडतोब पीओ पाठवतो."

"प्लीज मिसेस अनिताला जरा फोनवर पर पी.ओ. नंबर द्या, आमच्या बिलावर यायला पाहीजे. नाहीतर पेमेंट निघत नाही तुमच्या अकाऊंट्समधून. मी लाईन ट्रान्स्फर करतो."

"अनिता, शैलेश इराडा, नजीबाबाद लाईनवर आहे. पी.ओ. नंबर घे, कोटेशन पाठव. सहा सिक्स व्हेरीसील्स, प्राईस तीन हजार पाचशे प्रत्येकी, प्लस प्लस नेहमीप्रमाणे, आणि आजच पाठवायची सोय कर. मारिओला सांग, बोना कामात आहे."

"येस सर!" अनिता.

----

"ऑपरेटर, कस्टमरचे कॉल्स अनिताला दे, ती कामात असेल तर साहेबांना." मी.

"ओ.के. पण आताचा फोन तुम्हाला डिरेक्टली आला. मी नाही दिला."

"हो, ठाऊक आहे! बाय."

----

"ठीक आहे शिंदेसाहेब. नो प्रॉब्लेम. तुम्हाला जे तपासायचे ते तपासा. तुम्हाला माझे पूर्ण सहकार्य मिळेल. फक्त एक करा पण आम्हाला फार त्रास देऊ नका. आमची कार्यालयाची वेळ साडेआठ ते पाच आहे. आम्ही सर्व आता दिवसभर काम करून थकलेलो आहोत. तेव्हा शक्यतो काम पाचपर्यत आटपा. नंतर माझा स्टाफही घरी जाणार. स्टाफ गेल्यावर मात्र मी काहीही मदत करू शकणार नाही. तुमचे काम चालू राहिले तरी चालेल. तुमच्या मदतीला फक्त शिपाई असेल. तो चहा, खाणेपिणे याची सोय करेल. आणि नंतर घरी जाताना वाहतूक कोंडी वगैरेचा त्रास साडेआठनऊपर्यंत असेल. आणि स्पष्टच सांगतो कारण चुकीच्या अपेक्षा आणि गैरसमज नकोत, तुम्ही आमचे शत्रु नाही आहात. पण कायद्याने चालत आहात तेव्हा तुमची घरी जायची सोय तुमची तुम्हाला करावी लागेल. मी तुम्हाला परतीच्या प्रवासाला गाडी वगैरे देणार नाही. फार फार तर माझ्या मालाडच्या रस्त्यावर मी दोनतीन जणाना कुठेतरी सोडू शकेन. तुमच्या कामाच्या वेगावरून तुम्हाला तीन ते चार दिवस लागतील असे वाटते." मी.

गेटवरून रखवालदाराकडून मी व्हीजीटर्स रजिस्टर मागवले, त्यांच्यासमोरच पावणेचारची वेळ टाकून पाचही नावांची नोंद केली आणि रिफ्यूज्ड टु साईन असा शेरा लिहून माझी स्वाक्षरी ठोकली. जरी सौजन्याने वागणार असलो तरी आता कायद्याच्या दृष्टीने काटेकोर काळजी घेणार होतो. काही शंका आलीच तर आमचे कन्सल्टंट श्री. बी. एच जोशी, सेवानिवृत्त एक्साईज असिस्टट कमिशनर हे दूरध्वनीवर उपलब्ध होतेच.

आता काम सुरु झाले. त्यांच्याकडून एक्साईज अकाउंटबद्दल एकेक प्रश्न येत होते आणि मी उत्तरे देत होतो. हिशेबाबाबत प्रश्नाची उत्तरे द्यायला मी आमचे श्री. विलास जाधव याना बसवले. सगळ्या बाबी सभ्य आणि सौजन्यपूर्ण शब्दात स्पष्ट केल्यामुळे त्यांनी अवास्तव अपेक्षा ठेवल्या नाहीत व ताण निवळला. आम्हा सर्वांच्या आत्मविश्वासाने शिंदेसाहेब मात्र नाराज झालेले दिसले. त्यानी स्टोअर्सचे हिशेब पाहाण्याची इच्छा व्यक्त केली. त्वरित त्याना स्टोअरमध्ये पाठवून दिले व स्टोअर कीपर श्री. बोना डिसोझांना तशा सूचना दिल्या.

----

आता त्यांचे काम होईपर्यत कंटाळवा वाट पाहाणे. त्यांच्या तुरळक प्रश्नाची उत्तरे देणे. विरंगुळा म्हणून तसेच वेळ घालवायला मी एका वाह्यात मित्राला दूरध्वनी केला. माझ्यासमोर हे लोक होतेच.

"काय रे सेक्रेटरीच्या मिठीतून वेळ बरा मिळाला मला फोन करायला? पहिले तिचे गळ्यातले हात बाजूला कर आणि मग बोल." मित्ररत्न. (ही केवळ गंमत बरे का, ती माझी मुलगी शोभेल.)

"जे न देखे रवी! सध्या अशोकवनात आहे." मी.

"कोण ती का तू?"

मी गप्पच.

"कोण तूच का"

"हो."

"राक्षसिणीच्या पाहार्‍यात का?"

"हो!"

"सरकारी लोक जमलेत?"

"कित्ती हुश्शार रे तू?"

"टेन्शन कमी करायला फोन केलास?"

"कसं रे तुला एवढं कळतं? बोलूनचालून मित्र कोणाचा? माझ्या सहवासात थोडीफार अक्कल आली बरं तुला."

"खास कारण नसले तर पाचनंतर फोन करू नकोस. मी झोपणार आहे. स्वप्नात बो डेरेकची डेट आहे मला."

"हॅ! हॅ!! हॅ!!!" मी दुरध्वनि ठेवला.

----