दिवाळी अंक २००९

संवाद : प्रा. दीपक पवार

शब्दांकन: मुग्धा रिसबूड

मराठी आता जागतिकीकरणाच्या वार्‍याबरोबर बदलत चालली आहे. अनेक आधुनिक प्रवाह तिला येऊन मिळत आहेत आणि ती समृद्ध होत आहे. पण त्याच्याबरोबरीनेच मराठीविषयक प्रश्नही प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. मराठी भाषा वाचवणे म्हणजे काही मूठभर आणि जुन्या विचारांच्या मंडळींची मक्तेदारी असे समीकरण आज आपण सरळ सरळ मांडतो. पण मराठीविषयक प्रश्नांचा जाणतेपणे विचार करून , कोणताही अभिनिवेश न बाळगता त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न काही जण चिकाटीने करत आहेत. विशेष म्हणजे हे काही जण तरुण--म्हणजे पस्तीस ते पन्नास वयोगटातले आहेत ही अत्यंत आशादायक बाब आहे. जानेवारी २००८ पासून मराठी अभ्यास केंद्र मराठीच्या प्रश्नांमध्ये सातत्याने लक्ष घालत आहे. मराठीविरोधी व्यवस्थेशी अत्यंत सूक्ष्म पातळीवर आंदोलने करून लढा देत आहे. भाषेसाठी रस्त्यावर उतरणार्‍या आंदोलनांचा शिरस्ता मोडीत काढून अभ्यास केंद्राने एक वेगळा पण आशादायक प्रवाह समाजात सोडला आहे. अभ्यास केंद्राचे अध्यक्ष प्रा. दीपक पवार यंदाच्या स.पां.जोशी स्मृति-मराठी-भाषा-प्रचारक-पुरस्कारा चे मानकरी आहेत. ' मराठी माती मराठी माणसं-मराठी मती मराठी मानसं ' हे ब्रीद जपणार्‍या मनोगतच्या वाचकांसाठी प्रा.पवार यांच्या अभ्यास केंद्राचा वेगळा प्रवाह निश्चित दिशा देणारा ठरावा. मराठीप्रेमी मनोगतींनी हा प्रवाह अधिक बळकट करावा अशी रास्त अपेक्षाही त्यांच्याकडून आहे. प्रा. दीपक पवार यांच्याबरोबर अभ्यास केन्द्राच्या कार्यासंबंधी साधलेला संवाद, मनोगतींसाठी शब्दांकित केला आहे.



प्रा. दीपक पवार
प्रा. दीपक पवार

तुम्ही चळवळीत कसे आलात ? चळवळीपासूनचा अभ्यासकेंद्रापर्यंतचा प्रवास कसा झाला ?

मुळामध्ये २००२ साली शासनाने माहिती तंत्रज्ञानाचा पर्याय मराठीला दिला तेव्हा आम्ही अनेक लोक मराठीच्या या चळवळीमध्ये उतरलो आणि त्या चळवळीला दारूण अपयश आलं. याचं कारण म्हणजे त्या चळवळीमध्ये नियोजन नव्हतं आणि सेलिब्रिटींच्या आधारावर अशा प्रकारची आंदोलनं यशस्वी करता येऊ शकतात अशा प्रकारची एक भावना त्यावेळच्या चळवळ चालवणार्‍या लोकांमध्ये होती. त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे अंतिमतः या चळवळींना दुसरं काही व्यापक उद्दिष्ट असतं तसं व्यापक उद्दिष्ट या चळवळीला नसल्यामुळे केवळ मराठीच्या बेरोजगार होऊ शकणार्‍या शिक्षकांची चळवळ असं रूप तिला आलं आणि ती बंद पडली. या चळवळीच्या अनुभवामुळे मी कशा पद्धतीने चळवळ चालवू नये हे शिकलो. त्यानंतरच्या काळामध्ये मी ग्रंथालीत होतो , आणि ग्रंथालीचा जो 'मराठी विद्यापीठ' नावाचा प्रकल्प दिनकर गांगल आणि आम्ही सुरू केला त्या प्रकल्पाच्या प्रवर्तकांपैकी मी होतो. तिथे गांगल आणि मी- आम्ही दोघे थोडा वेगळा विचार करत होतो असं मला वाटतं. म्हणजे असं की ते सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातनं सगळं पाहात होते आणि मी भाषेचं काम हे मुळामध्ये राजकीय आहे अशा पद्धतीने त्याच्याकडे पाहात होतो. पण नेटवर्किंग किंवा लोक जोडणं, संस्था जोडणं, मग ते सायबर स्पेसमध्ये जोडणं असेल किंवा प्रत्यक्षामध्ये जोडणं असेल - हा एक समान धागा आम्हा दोघांच्याही विचारांमध्ये होता असं मला वाटतं. ग्रंथालीमधून संस्थात्मक मतभेदांमुळे मी बाहेर पडलो. त्यानंतर न्यायालयीन मराठीच्या कामामध्ये दोनेक वर्षं शांताराम दातारांबरोबर स्वतःला गुंतवून घेतलं. या काळामध्ये मी न्यायालयांमधनं मराठी कसं वापरलं जाईल, यासंबंधानं बरंच काम केलं आणि तसं म्हटलं तर जी चळवळ ठाण्यापुरती मर्यादित होती - ठाणे जिल्ह्यापुरती मर्यादित होती, तिचा आवाका वाढवण्याच्या दृष्टीने आणि ती चळवळ इतर प्रश्नांशी जोडण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न मी केले आणि त्यातनं 'मराठी अभ्यास केंद्र' हा उपक्रम आम्ही सुरू केला.

अभ्यासकेंद्राचं नेमकं काम काय ?

अभ्यास केंद्राची मुळातली भूमिका अशी की भाषेचं काम हे संशोधनात्मक पद्धतीनं चाललं पाहिजे. भाषेचं काम जर लोकांशी जोडलेल्या स्वरूपाचं असेल तर त्या प्रकारचं काम करत असताना फक्त अस्मिता , फक्त भावना या प्रकारे काम केलं तर ते फार काळ टिकत नाही. प्रतिक्रियात्मक आंदोलनं किंवा प्रसिद्धीखोर आंदोलनं यांच्यातून फार काही गवसत नाही. त्यामुळे संशोधनात्मक चळवळ असं अभ्यास केंद्राचं स्वरूप आहे. मात्र , अभ्यास केंद्र हा आम्ही कल्पिलेल्या चळवळीचा एक भाग आहे. एकीकडे संशोधनात्मक काम व्हावं आणि दुसरीकडे तिचं जनआंदोलनामध्ये रूपांतर व्हावं असा आमचा हेतू आहे. पण त्या टप्प्यापर्यंत आम्ही अजून पोहोचलेलो नाही. कारण त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आज अभ्यास केंद्राकडे नाही.

मराठीसाठी काम करणाऱ्या इतर संस्थांपेक्षा हे कसं वेगळं आहे ?

अभ्यास केंद्राचा इतर संस्थांपेक्षा वेगळेपणा म्हणजे व्यावसायिक पातळीवर चाललेलं काम. दुसरं म्हणजे त्यागाच्या भावनेतून आम्ही हे काम करत नाही. म्हणजे असं की व्यक्तिगत पातळीवर तुमचं जे सामाजिक आकलन असतं त्यामुळे मध्ये मध्ये आपल्याला वाटतं की अरे , आपण हे मराठीचं काम करतोय , लोकांना काहीच कसं वाटत नाही ? पण आमची मुळातली समजूत अशी आहे की हे काम आपल्याला करावंसं वाटतंय म्हणून आपण करतोय, ते आपल्याला पटतंय म्हणून करतोय. इतरांनी ते मान्य करावं अशा प्रकारची दडपशाही किंवा बळजबरी आपल्याला करता येणार नाही. आपल्याला फक्त इतकंच करता येईल लोकांचं मतपरिवर्तन व्हावं. हा एक महत्त्वाचा फरक इतर संस्थांमध्ये आणि अभ्यास केंद्रामध्ये आहे. दुसरा फरक म्हणजे आम्ही पत्रकं काढणारी संघटना नाही आहोत. म्हणजे पत्रकं काढून लोकांना आवाहनं करून समाज बदलत नाही हा मला आत्तापर्यंत आलेला अनुभव आहे. तुम्ही पत्रक काढलंत तर त्याला पाठिंबा देणारी, त्याला एका अर्थानं समर्थन देणारी प्रत्यक्ष आणि सातत्यानं होणारी कृती हे मराठी अभ्यास केंद्राच्या कामाचं वैशिष्ट्य आहे.

तुम्ही आताच म्हणालात की केंद्र व्यावसायिक पद्धतीनं काम करतं ; व्यावसायिक पद्धतीनं म्हणजे नेमकं कसं काम करतं ?

एक म्हणजे अभ्यास केंद्राची रीतसर नोंदणी आम्ही केली. दुसरं म्हणजे अभ्यास केंद्राची एक सक्रिय कार्यकारिणी आहे. म्हणजे जे लोक अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते आहेत ते काम करणारे आहेत. ते नुसते मार्गदर्शक नाहीयेत , नुसते सल्लागार नाहीयेत. दर आठवड्याला अभ्यास केंद्राची किमान एक बैठक होते आणि अभ्यास केंद्राचे कार्यकर्ते आठवड्यातनं दोन ते तीन वेळा भेटतात. त्यातनं आम्ही आमचा प्राधान्यक्रम ठरवतो. जेव्हा आम्ही बी. एम. एम. च्या अभ्यासक्रमाचं मराठीकरण करत होतो तेव्हा आम्ही तेवढंच काम नव्हतो करत. तेव्हा आम्ही मराठी शाळांचंही काम करत होतो , संगणकावरच्या मराठीचं कामही करत होतो. याचं करण असं कि तुम्ही जर एका मुद्द्यावर चळवळ चालवलीत तर त्या मुद्द्याला सातत्यानं समाजातनं पाठिंबा मिळत नाही --कुठल्याही मुद्द्याला. आणि तो पाठिंबा आटला की संस्थेचं काम संपतं.
दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की अभ्यास केंद्राचा प्रत्येक कार्यकर्ता हा वेगवेगळ्या प्रकारची कामं करू शकणारा आहे. जो संगणकावरच्या मराठीचं काम करतो तो गरज पडली तर मराठी शाळांच्या आकडेवारीसाठीसुद्धा काम करतो. अशा प्रकारे एका अर्थाने आंतरविद्याशाखीय असं काम अभ्यास केंद्राचं आहे. त्यामुळे अभ्यास केंद्राच्या कामाला सातत्य आहे आणि त्याला वास्तवाचा आधार आहे - हाही महत्त्वाचा फरक आहे असं मला वाटतं.

लोकांना मराठीच्या प्रश्नांबाबत थेट भावनिक आवाहन करण्यापेक्षा मराठी शाळांचा स्तर उंचावणं , सरकारी कामकाजात मराठी , न्यायालयीन कामकाजात मराठी यांसारखे प्रश्न का हाताळावेसे वाटले ?

मराठी शाळांबद्दल आम्ही लोकांशी बोलतो तेव्हा त्या बरोबरीने आम्ही भावनिक आवाहन करतोच. ते केलंच पाहिजे. पण मराठी शाळांची गुणवत्ता सुधारली पाहिजे असं आम्हाला कुणी सांगितलं तर आम्ही त्याच्याकडे मराठीचा शत्रू म्हणून पाहात नाही. आम्ही असं मानतो की ती सुधारली पाहिजे. फक्त आम्ही उलट असाही प्रश्न विचारतो की , इंग्रजी शाळांच्या गुणवत्तेबद्दल तुम्हाला एवढी खात्री आहे का ? आणि मराठी शाळा स्पर्धेत टिकल्या पाहिजेत , मराठी मुलांची गुणात्मकता वाढली पाहिजे याबद्दल आमच्या मनात शंका नाही , पण त्याच्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोण आहे त्याच्याकडे मात्र आम्ही अधिक चौकसपणाने, अधिक जाणतेपणाने पाहतो असं मला वाटतं.


प्रचलित वा सहज माहितीचे असूनही मराठी शब्दांच्या जागी बोलताना पटकन इंग्रजी शब्द आधी सुचतात, आणि ते बोलले जातात असे अनेकांच्या बाबतीत घडते. इंग्रजी शब्दांची सरमिसळ केलेली मराठी बोली ही जास्त अनौपचारिक आणि सहज तर जास्तीत जास्त शब्द मराठीत बोलणे हे औपचारिक, कृत्रिम, मुद्दाम केलेले असे वाटते. तर हे होऊ नये ह्यासाठी मराठी अभ्यास केंद्र काय करू शकतं?

या बाबतीत मला उदारमतवादी दृष्टिकोण ठेवावासा वाटतो. शहरी भागांत शिक्षण बहुतांश इंग्रजीतून होतं शिवाय बहुतेक सगळे इंग्रजी शब्द परिसरातूनच येत असतात. जिवावर उदार होऊन असे शब्द टाळण्याची गरज नाही. समाजाच्या कलाने घेणं बरं. पण तरी भाषा प्रवाही असते , बदलत असते म्हणून क्रियापदं सोडून उरलेले शब्द इंग्रजी असणं हे मराठीच्या प्रवाहीपणाचं लक्षण नव्हे. माध्यमांमध्ये हल्ली असे शब्द मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. अशा वेळी नवीन मराठी शब्द घडवायला लागले तर ते घडवावेत. ते रुजायला वेळ लागतो , पण माझं प्राधान्य असे शब्द तयार करण्यालाच असेल. जसं- सगळे जण संकेतस्थळ हा शब्द ताबडतोब स्वीकारतीलच असं नाही. पण तो शब्द आता तयार झालाय आणि वापरलाही जातो आहे. या सगळ्याला आपण वेळ दिला पाहिजे.

दुसरं असं की इंग्रजी शब्दांची सरमिसळ केलेली मराठी बोली ही जास्त अनौपचारिक वाटते. पण याची दुसरी बाजू अशी की आपण इंग्रजाळलेलं मराठी वापरतो, तसं टाईम्स का नाही मिंग्लिश वापरत? घ्यावा त्यांनीही मध्येच एखादा मराठी शब्द! बाळासाहेब ठाकरे काय बोलले हे त्यांनी मराठीत लिहावं की! असं आदान-प्रदान का नको? तेव्हा मग त्यांना बाटल्यासारखा अनुभव का येतो?

हे सगळं करत असताना मराठी साहित्य विरुद्ध मराठी अस्तित्व असा लढा निर्माण होऊन दोन्ही संपुष्टात येतील अशी भीती नाही का वाटली ?

मराठी साहित्य समीक्षा आणि व्यवहारातलं मराठी यांच्यामधलं जे द्वंद्व आहे ते मराठीच्या शिक्षकांनी निर्माण केलेलं द्वंद्व आहे. याचं कारण म्हणजे त्यांचं कार्यक्षेत्र , त्यांच्या एकूण विचारांचा जो आवाका आहे तो साहित्य समीक्षेच्या मराठीबद्दलचा आहे आणि त्याबद्दल माझी काहीही तक्रार नाही. अशा प्रकारचं द्वंद्व आहे असं मी मानत नाही. आता आम्ही मराठीच्या शिक्षणाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तीन विद्यापीठांकडे दिला. शासनापर्यंत तो पोहोचवला आणि आम्ही असं म्हटलं की साहित्य समीक्षेचा विभाग आणि उपयोजित मराठी आणि भाषाविज्ञानाचा विभाग हे विभाग सर्व विद्यापीठांनी पदवी पातळीवर सुरू करावेत आणि पदव्युत्तर पातळीवर मराठीचे किमान चार ते पाच विभाग असावेत. जगात कोणत्याही भाषेमध्ये - कोणत्याही प्रगत भाषेमध्ये - साहित्य हा एक विभाग हाच भाषेचा एकमेव विभाग म्हणून मानण्याची चैन परवडत नाही. पण आपल्याकडे लोक ती करतात. बहुजन समाजतली मुलं जिथे शिक्षण घेत आहेत त्या व्यवस्थेमध्ये तुम्ही त्या मुलांना इतर मार्ग का उपलब्ध करून देऊ नये ? आणि आपला अभ्यासक्रम बंद पडेल म्हणून साहित्य समीक्षेचा अभ्यासक्रम ठेवा हे कुठल्याही व्यावहारिक निकषावर टिकणारं नाही. केंद्र सरकारचं , महाराष्ट्र सरकारचं हे धोरण नाही. लोकांना तुम्ही पर्याय उपलब्ध करून द्या. ज्यांना साहित्य समीक्षा शिकायची असेल आणि तशी त्यांची गुणवत्ता असेल तर ती ते शिकतील. ज्यांना व्यावहारिक मराठीच्या अंगानं जायचं असेल ते तिथे जातील. पण व्यावहारिक आणि उपयोजित मराठीच्या अंगानं जातील याचा अर्थ त्यांच्याकडे काही गुणवत्ता नाही या म्हणण्याला काही अर्थ नाही.

संगणकावर मराठी लिहिता यायला लागल्यापासून अनेक लोक लिहिते झाले आहेत आणि त्यात शुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करत लिहिणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे . वर्तमानपत्रांमधूनही अशुद्धलेखन सर्रास आढळतं . ह्याबाबत तुमचे विचार जाणून घ्यायला आवडतील . वर्तमानपत्रांनी शुद्धलेखनाकडे लक्ष पुरवावं म्हणून अभ्यास केंद्र काही करतं का ? अभ्यास केंद्राकडे त्यासाठी काही योजना आहेत का ?

मला व्यक्तिशः असं वाटतं की शुद्ध- अशुद्ध लेखन असं न म्हणता प्रमाण लेखन- अप्रमाण लेखन अशा नव्या चौकटीत हे सगळं बसवायला हवं. या बाबतीत तोडगा काढण्याच्या दृष्टीने का विचार होत नाही? माध्यमं शुद्धलेखन-चिकित्सक (spell-checker) का वापरत नाहीत? शासन का वापरत नाही?

अभ्यास केंद्राच्या यशाचे आजवरचे महत्त्वाचे टप्पे सांगाल का ?

तीन पातळ्यांवर आम्हाला मोठं यश मिळालं - एक म्हणजे संगणकावर मराठी युनिकोडच्या साहाय्यानं यावी आणि एक समान कळफलक मराठीचा असावा ही मागणी याअगोदर तरल स्वरूपात लोकांनी केली होती. समान कळफलक असावा म्हणजे काय असावं , मराठीतनं कामकाज करावं म्हणजे काय हे आमच्या केंद्रानं पहिल्यांदा लोकांसमोर मांडलं. सुशांत देवळेकरनं त्यासाठी एक पुस्तिका लिहिली. ती पुस्तिका आता महाजालावर उपलब्ध आहे.त्या प्रकारचं नेटवर्क आम्ही मुंबई महापालिकेमध्ये , महाराष्ट्र शासनामध्ये केलं. महाराष्ट्र शासनाने त्याच्या सर्व आस्थापनांमध्ये युनिकोडचा वापर करून मराठीचा वापर करणं अनिवार्य केलेलं आहे. पण यातली अडचण अशी आहे की जे लोक - म्हणजे शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग - हे सगळं करायला बांधील आहेत - तिथले बहुतांश अधिकारी हे अमराठी आहेत आणि जे मराठी आहेत त्यांना सुद्धा फारसं काही पडलेलं नाही. त्यामुळे ते परिपत्रक शासनाने सहा महिन्यांपूर्वी काढलं तरी त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. आम्ही माहिती तंत्रज्ञान सचिव आणि महासंचालकांना विचारलं होतं की , लोकांनी युनिकोडकडे वळायचं असेल तर तुम्ही काय प्रशिक्षण देणार ? तर ते म्हणाले की आम्ही तशी व्यवस्था करू. पण व्यवस्था करू म्हणून काहीही व्यवस्था केली नाही. मुंबई महापालिकेमध्ये आम्ही आयुक्तांना असं म्हटलं की तुम्ही संगणकावरनं शिक्षण शाळांमध्येही उपलब्ध करा. तेव्हा त्यांनी असं म्हटलं की , " पण इंग्रजीतनं काम करणं सोपं आहे." या प्रकारचे पूर्वग्रह , जे सत्तेच्या पदांवर आहेत , अधिकारपदांवर आहेत अशा लोकांमध्ये असल्यामुळे तत्त्वतः आम्हाला यश मिळालंय पण ते वास्तवात रूपांतरित झालं नाही.
महत्त्वाचं यश आहे ते बी. एम. एम. च्या मराठीकरणाचं. आम्ही गेलं वर्षभर प्रयत्न करून पत्रकारांच्या आणि अभ्यासकांच्या मदतीने हा अभ्यासक्रम मराठीत आणला. लोकांनी असा प्रयत्न केला की तो अभ्यासक्रम एक तर येऊ नये आणि आला तर इंग्रजी आणि मराठी अभ्यासक्रम वेगळा असावा , तो एक झाला तरी यंदा तो सुरू होऊ नये , तो सुरू झाला तरी त्याला मुलं मिळू नयेत. या सर्व पातळ्यांवरचे प्रयत्न नेटवर्किंगच्या आधाराने आम्ही मोडून काढले. आणि मला असं वाटतं की सनदशीर मार्गाने , चिकाटी ठेवली तर मराठीचे प्रश्न सुटू शकतात याचं हे एक उदाहरण आहे.
यातला एकमेव महत्त्वाचा अडथळा असा आहे की मराठीचे हजारो प्रश्न आहेत एक संस्था एक प्रश्न एक वर्ष सोडवत असेल तर मराठीचे प्रश्न सोडवायला शे-पाचशे वर्षं लागतील. तेवढी वर्षं आपल्याकडे नाहीयेत. ज्या वेगाने भाषेचा आणि ज्ञानभाषा म्हणून व्यवहारातनं संकोच होतो आहे ते पाहता हे यश खूप कमी आहे. पण इतकं दारुण अपयश आसपास आहे की हे थोडं यश ही दिलासा देणारी गोष्ट आहे.


नजीकच्या भविष्यकाळात केंद्रासमोर कोणत्या योजना आहेत ?

आमच्यापुढे आता मराठी शाळांचा महाराष्ट्रातला डेटाबेस - माहितीकोष - बनवणं आणि मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठीची श्वेतपत्रिका तयार करणं हा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. माध्यमांसाठी एक प्रकल्प आहे - इंग्रजीत माध्यमविषयक चांगलं लेखन उपलब्ध आहे ते मराठीत आणणं. मराठी भाषा आणि वाङ्मय-मंडळाच्या माध्यमाने आम्ही ज्या मुलांना एकत्र आणलंय त्यांना रोजगराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी काही प्रमाणात प्रयत्न करणं हेही एक काम आहे. शिवाय माहितीच्या अधिकाराचा वापर करून मराठीचे अधिकाधिक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
या सगळ्यासाठी तीन ते चार पुस्तिका आम्ही योजल्या आहेत. एक मराठी शिक्षणाच्या विस्तारीकरणावरची आहे , एक मराठी शाळांवरची आहे, एक माहितीच्या अधिकारावरची आहे. या पुस्तिका म्हणजे नजीकच्या भविष्यकाळातली आमची योजना आहे.

अगदी सुरुवातीपासून तुमच्याबरोबर असलेल्या कोणाकोणाची नावं घ्याल ?

अभ्यासकेंद्राच्या संपूर्ण कामात दहा ते पंधरा जणांनी सातत्याने लक्ष घातलं. मी सगळ्यात पहिल्यांदा डॉ. प्रकाश परबांचं नाव घेईन. ते माझे शिक्षक आणि भाषाविज्ञानाचे अभ्यासक. त्यांचा कार्यकर्त्याचा पिंड नाही तरी ते अभ्यास केंद्रात अभ्यासक आणि कार्यकर्ते या दोन्ही पातळ्यांवर काम करतात. आमची भाषा-नियोजनाबद्दलची किंवा मराठी शिक्षणाच्या विस्तारीकरणाची जी भूमिका आहे ती डॉ. प्रकाश परबांनी मांडलेली आहे. मराठी शिक्षणाच्या किंवा शाळांच्या बाबतीत काम करणारी वीणा सानेकर आहे--ती अगदी सुरुवातीपासून आहे. संगणकावरच्या मराठीसाठी काम करणारा सुशांत देवळेकर--त्याने खूप आक्रमक पद्धतीने हे सगळं काम केलं. राममोहन खानापूरकर आहे , संतोष आग्रे आहे , गीता मांजरेकर आहे. दातार आता आमच्याबरोबर नाहीत. आम्ही वेगळी संस्था चालवतो. दातारांबरोबर आम्ही न्यायालयीन मराठीचं काम करतो.

मला एक असं वाटतं की व्यावसायिक शिस्तीनं आम्ही या गोष्टी करतो. त्यामुळे एक माणूस हा सातत्यानं काहीतरी आऊटपुट देत राहतो. त्यामुळे माणसं कमी असली तरी तुमची कामं जास्त होतात.

चळवळीत काम करताना स्वतःला कधी बदलावं लागलं का ?

खूपच बदलावं लागलं. माझी पटकन चिडण्याची वृत्ती आहे. त्याच्यावर मला खूप नियंत्रण आणावं लागलं. दुसरी गोष्ट म्हणजे मी एक पाहिलं की अंतिमतः माणसं कशासाठी काम करतात ? दोन कारणं आहेत. एक म्हणजे माणसांना स्वतःला असं वाटलं पाहिजे की हे काम माझं आहे. ते दोन कारणांनी माणसांना वाटतं. एक म्हणजे त्या कामाला मान्यता मिळणार असेल तर, किंवा ह्या कामाने आपण सगळे मिळून काहीतरी चांगलं मिळवणार आहोत ही भावना त्याच्यातनं तयार झाली पाहिजे. मला असं वाटतं की ही वृत्ती अभ्यास केंद्रामध्ये आणण्याचा मी प्रयत्न केला. मला असं वाटतं की माणसांमध्ये बिनसतं वैचारिक पातळीवर, व्यक्तिगत पातळीवर. माझी मूळ वृत्ती अशी आहे की माणसं तुटू शकतील. हा बदल नैसर्गिक बदल आहे. मला चळवळ चालवायची आहे आणि त्यासाठी अपरिहार्य गोष्टी मी केलेल्या आहेत. अनेक लोकांनी त्या केल्या आहेत--मी त्यातल्या खूप कमी केल्या आहेत असं मला वाटतं.

आज अभ्यास केंद्र ज्या वळणावर आहे तिथपर्यंत टिकाव धरत पुढे चालत आलात , यातलं गमक काय ?

आम्हाला काय करायचं आहे याबाबत आम्हाला स्पष्टता आहे. ही अतिशयोक्ती किंवा सामूहिक पातळीवरची आत्मप्रौढी वाटेल. पण आज महाराष्ट्रामध्ये मराठीचं काम करणार्‍या मंडळींमध्ये एवढी स्पष्टता असणारी पहिली टीम आम्ही आहोत. राजकीय पक्षांनाही तेवढी स्पष्टता नाहीये. स्वयंसेवी संस्थांना तर अजिबात नाही. तुकड्यातुकड्यांनी लोक पाहतात. म्हणून आमच्या कामाला मी मराठीकारण असं म्हणतो. मराठी भाषा , समाज आणि संस्कृतीचं अर्थकारण आणि राजकारण याची व्यापक व्याख्या आम्हाला कळली आहे. त्यामुळे आम्हाला कळतंय की आम्ही कुठे चाललो आहोत. कार्यकर्त्यांसाठी आम्ही कामं काढत नाही आहोत. कामं आहेत. त्या कामांसाठी आम्ही लायक माणसं शोधतो.

चळवळीत गेला नसतात तर काय झाला असतात ?

पत्रकार झालो असतो. माझी मुळातली इच्छा लेखक होण्याची होती. मला कादंबरी किंवा तत्सम काहीतरी लिहायचं होतं. पण मी आता असा विचार करतो की हे काही पूर्ण वेळाचं काम नाही. निदान मला तरी तसं वाटत नाही. मी असं पाहतो की हे मी आता जे करतोय ते काम मला आतून समाधान देणारं आहे. ज्या क्षणी मला असं जाणवलं की आपल्याला भाषेचं काम करायचं आहे त्यानंतर मला स्पष्टता आली. ती स्पष्टता आल्यानंतर असं वाटतं की हे काम प्राधान्याने करायचं काम आहे. याव्यतिरिक्त मला काय करायला आवडेल ? तर स्वतःसाठी -- वाचण्यासाठी वेळ द्यायला आवडेल. -- किंवा काहीतरी सर्जनशील लिहायला आवडेल. पण मी करतोय त्या कामाला काही पर्याय नाही. ह्याच्या सोबत मी ते करीन. ह्याच्याशिवाय मी काही करीन असं मला वाटत नाही.


पण मग एक व्यक्ती म्हणून तुम्हाला हे मारक नाही का ठरत ?

आहे ना , मारक आहे. पण मला एवढा विश्वास नाही की मी पूर्णवेळ लिहिण्यासाठीच स्वतःला राबवू शकेन. पण मला आवडेल असं कादंबरी लिहून खूप पैसे मिळवून शांतपणे तंगड्या टाकून बसायला.


सध्याच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकांच्या दर्जाबाबत तुम्हाला काय वाटतं ? मराठीच्या शिक्षणाच्या तंत्रामध्ये काही बदल आवश्यक आहेत असं वाटतं का ? असल्यास कोणते ? त्यासाठी काय करता येईल ?

सगळीच विसंगती आहे. कामात रस घेणारे विरळा. शाळेत शिकवणार्‍या शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात. असे शिक्षक काय प्रेरणा देणार ? पाठ्यपुस्तकाबाबत मी आमचं सामूहिक मत मांडतो. विद्याधर अमृतेंनी एस. एस. सी. बोर्डाच्या पुस्तकांना समांतर पुस्तकं ठेवण्याची योजना मात्र मांडली आहे.


स्वतःसारखे अनेक दीपक पवार तयार करण्याची आज गरज आहे. त्यासाठी काय करावंसं वाटतं ? किंवा काय करता ?

मला बरेचदा असं वाटतं --म्हणजे मी जेव्हा माणसांना भेटतो -- म्हणजे आधी जसं आपण कॉलेजात असताना वगैरे - समोरच्याशी आपली नाळ जुळेल का हे पाहायचो , तसं मी आता पाहतो की या माणसाशी आपली वैचारिक नाळ जुळेल का , किंवा हा माणूस कार्यकर्ता होऊ शकेल का ? आपल्यासोबत राहू शकेल का ? आधी मी एखाद्या माणसाकडनं पूर्ण अपेक्षा बाळगायचो. पण साक्षात्काराचा भाग असा आहे की प्रत्येक माणसाकडनं तुम्ही संपूर्ण अपेक्षा बाळगू शकत नाही. एखाद्या माणसाकडे समजा लिहिण्याचं कौशल्य आहे , एखाद्याकडे समजा घरी बसून संगणकावर काम करण्याचं कौशल्य आहे. तर त्या माणसाला तुम्ही जाणवून द्या , की बाबा , एवढ्या भागापुरता तू खूप महत्त्वाचा आहेस. पण ही जी माणसं आहेत ना , ती एका अर्थानं तैनाती फौजेसारखी आहेत. ती त्या त्या वेळेला तुम्हाला उपयोगी पडतात. पण त्यांचे प्राधान्यक्रम बदलू शकतात. अंतिमतः काम हे केडर करतं. जे त्या कामासाठी पूर्णवेळ मन आणि तन द्यायला तयार आहेत असे लोक. पैसा उभा राहतो. मला आजही असं वाटतं की अभ्यास केंद्रानं थोडी दिशा बदलली तर पैसा मिळेल. एखाद्या राजकीय पक्षाच्या जवळ जर आम्ही गेलो तर खूप पैसे मिळतील. आम्हाला राजकीय पक्षांच्या बाबत अजिबात ऍलर्जी नाही. प्रश्न असा आहे की आज आम्ही जो मराठीचा विचार करतोय तितका सकस विचार जर राजकीय पक्ष करत नसतील तर आमची एवढी ताकद नाहीये की आम्ही राजकीय पक्षांचा अजेंडा आतून बदलू शकू. त्यामुळे आमच्यापुढे दोन मार्ग आहेत. एक तर राजकीय पक्षांचे अजेंडे बदलत राहणं, किंवा आपण राजकीय पक्षांना विकल्प होणं. मला दुसरा पर्याय जास्त महत्त्वाचा आणि योग्य वाटतो. दुसरा पर्याय कष्टाचा आहे, पण तो तुमच्या निष्ठेतनं आलेला आहे. त्यामुळे तो निर्माण व्हायला वेळ लागतो, पण संपायलाही खूप वेळ लागतो.

दुकानांच्या पाट्या मराठीत (देवनागरीत) करण्याच्या राजकीय पक्षांच्या आंदोलना(खेळी)बाबत तुमचं काय मत आहे ? त्याने मराठीच्या वापरासंबंधाने काही फायदा होण्याची शक्यता आहे असं वाटतं का ? असल्यास किती आणि अशाप्रकारे फायदा होईल ? नसल्यास , का नाही ? तोटा होईल का ? कसा ?

दुकानदारांच्या विरोधात आंदोलन करून शक्तिप्रदर्शन करण्यात मला तरी गैर वाटत नाही. मुंबईसारख्या महाराष्ट्रात असलेल्या ठिकाणी शासनाला नडण्याची हिंमत होतेच कशी? पण गेली पन्नास वर्षं दुकाने-आस्थापने यांचा गुमास्ता कायदा अस्तित्वात आहे. त्या कायद्याचं- सरकारी नियमांचं पालन न करणार्‍यांच्या विरोधात जसं आंदोलन केलं तसं आंदोलन नियमांची अंमलबजावणी न करता दुकानदारांना प्रमाणपत्र देणार्‍या मराठी कर्मचार्‍यांविरुद्धही करायला हवं होतं. मला जाग आली की आंदोलन करायचं - असं सध्या चाललेलं आहे.. त्याने छाती फुगते पण लोक मूळ प्रश्न विसरतात.

भारतात महाराष्ट्राच्या बाहेरही अशा चळवळी आहेत का ? त्याबद्दल तुमचं काय मत आहे ?

अशा चळवळी कर्नाटकात आहेत. केरळमध्ये आहेत. केरळ शास्त्र साहित्य परिषदेनं मोठ्या प्रमाणावर त्या भाषेच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केलेले आहेत‌.सगळीकडे प्रतिक्रियात्मक आणि रचनात्मक अशा दोन्ही प्रकारच्या चळवळी आहेत. या सगळ्यांना एकत्र बांधता येईल का हा विचार आम्ही आमच्या पातळीवर करतोय. पण आम्ही सर्वभाषावादी नाही. इतर भाषांचं काय होईल ते त्यांचे त्यांचे लोक पाहातील. पण मी आधी मराठीच वाचवायला जाणार. तामीळ लोकांनी मराठीचा विचार करायचा , मराठी लोकांनी तामीळचा करायचा-- हा स्नेहसंमेलन टाईप प्रकार मला नाही आवडत.

वाचकांसाठी काही आवाहन ?

अगदी सोपं आवाहन की ज्यांना मराठीबद्दल काहीतरी वाटतंय त्यांनी पहिली गोष्ट- आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालावं. म्हणजे मी माझ्या मुलांना मराठी शाळेत घालणार नाही, माझे दैनंदिन व्यवहार मराठीत करणार नाही --पण मी राज ठाकरेंच्या सभेला टाळ्या वाजवणार- हा प्रतिक्रियात्मक मराठीपणा आहे. त्यामुळेच मराठीचं वाटोळं झालेलं आहे. वागण्यात नसेल, आणि तुमच्या घरांमध्ये संक्रमित होणार नसेल तर तुम्ही आडनावाचे मराठी आहात. अशा मराठी माणसाचा शुभेच्छुक म्हणून उपयोग होऊ शकतो. त्यापलीकडे नाही.
आणि दुसरं आवाहन असं आहे की जागतिकीकरणामुळे आम्हाला मराठीसाठी काही करता येत नाही ह्या खोट्या सबबी सांगू नका. जगात एकच जागतिकीकरण नाही. अनेक जागतिकीकरणं आहेत. आम्ही जागतिकीकरणाच्या बाजूचेच आहोत. पण आम्ही मराठीनिष्ठ जागतिकीकरणाच्या बाजूचे आहोत. जिथे आमची भाषा ही ज्ञानभाषा होईल. आता आम्ही चळवळीमध्ये संगणकाचा प्रचंड वापर करतो . संगणक हे जागतिकीकरणाचं अपत्य आहे. आम्ही ते मराठीसाठी वापरत आहोत. आम्ही ते इंग्रजीच्या गुलामगिरीच्या सक्षमीकरणासाठी वापरत नाही. तेव्हा असा दुटप्पीपणा सोडून द्यावा.

श्री. दीपक पवार यांनी आपला बहुमूल्य वेळ ह्या मुलाखतीसाठी दिला आणि मराठी भाषा आणि चळवळींविषयक अनेक मुद्यांवर आपले विचार सांगितले ह्याबद्दल अंकसमिती आणि मनोगतींतर्फे त्यांचे मन:पूर्वक आभार.