दिवाळी अंक २००९

माणकेश्वराचा पुतळा

मिलिंद जोशी


ही गोष्ट आहे वाईजवळच्या एका छोट्या गावातली. गाव म्हटलं तर फार अगदी छोटंही नाही आणि अगदी फार मोठंही नाही शहरासारखं. असेल अदमासे हजार एक उंबर्‍यांचं. सुंदर टुमदार गाव. गावच्या चारही दिशांना सह्याद्रीचे उंच उंच डोंगर आणि या सभोवार पसरलेल्या डोंगरांच्या मधोमध तयार झालेल्या बशीसारख्या भव्य गोलाकार खोलगट खोर्‍याच्या अगदी मधोमध वसलेलं हे गाव. तसं तर या दरीचा आवाका खूपच मोठा होता आणि त्यात छोटी छोटी खेडी आणि वाड्या चिकार सामावल्या होत्या. पण दरीच्या अगदी मध्यावर असलेलं आणि बाजाराचं असं हेच गाव होतं. त्यामुळे या सार्‍या भागाचं जणू हे एक प्रमुख केंद्र बनलं होतं.

सह्याद्रीचे डोंगर आणि त्यात तयार झालेली ही खोलगट बशी, यांचं आणि या संपूर्णच परिसराचं दृश्य फार लोभसवाणं दिसायचं. सह्याद्रीच्या या डोंगरांच्या माथ्यावर होती घनदाट जंगलं आणि कातळांची मैलोन्‌मैल लांब पसरलेली पठारं. या जंगलांना आणि या पठारांना चहूकडून राकट काळ्या ताशीव कड्यांनी उचलून धरल्यासारखं वाटायचं. या कड्यांच्या खाली साग, पांगारा, गुलमोहोर, ऐन, किंजळ, फणस अशा वृक्षांची गर्दी आणि त्यानंतरच्या डोंगर उतारावर भाताची खाचरं. या खाचरांच्या मधून मधून थोड्याश्या सपाटीवर लाल चुटुक कौलारू घरांच्या छोट्या छोट्या वाड्या. कुणा कुणा धनिकांच्या श्रीमंती डौलदार बागा आणि त्यात निगुतीनं लावलेली निलगिरीची अन सिल्वर ओकची झाडं. पावसाळ्यात दरीच्या मध्यावर उभं राहिलं की या डोंगरांनी आणि दरीनं चहुबाजूंनी हिरवी गर्द शाल लपेटून घेतल्यासारखं वाटायचं. अन या गर्द हिरवाईच्या मधनं दिसायचे ते पांढर्‍या शुभ्र फेसानं ओथंबून कोसळणारे धबधबे. या धबधब्यांमधनं उडणारे तुषारकण सार्‍या दरीभर उडायचे आणि पावसाचे दरीत उतरणारे ढग आणि हे तुषार कण यांच्या मिश्रणाच्या वर्षावानं अंगावर थंड शिरशिरी उठायची.

निसर्गाच्या या सौंदर्यदानाबरोबरच निसर्गानं या भागाला आणखी एक देणगी प्रदान केली होती. माणकेश्वराचा पुतळा. हजारो वर्ष उन, पाऊस, वारा यांचे तडाखे खाऊन खाऊन, पश्चिमेकडचा कोकणकडा निसर्गतःच असा तासला गेला होता की यातून एक भव्य, सुंदर शिल्प तयार झालं होतं. लांबून बघताना हा कडा म्हणजे एखाद्या रुपवान पुरुषाचा चेहराच वाटायचा. या चेहेर्‍याचं भव्य कपाळ, टपोरे डोळे, सरळ नाक, किंचित विलग होऊ पाहणारे जाड ओठ, त्याखालची रुंद हनुवटी, गोल रसरशीत गाल सारं काही अगदी स्पष्ट दिसायचं. चेहेर्‍यावर धीर गंभीर आणि उदात्त भाव होता असं वाटायचं. शेकडो शिल्पकारांनी मिळून वर्षानुवर्षं खपून खपून मेहेनत घेउन तयार केल्यासारखा हा पुतळा अगदी ताशीव, घोटीव होता.

कित्येक पिढ्यान्‌पिढ्या हा स्थितप्रज्ञ पुतळा या भागावर प्रेमाचा वर्षाव करत असाच उभा होता. श्रद्धेनं लोक याला माणकेश्वराचा पुतळा म्हणायचे. दूरदूरहून पर्यटक या भागात निसर्गाचा हा अदभुत कलाविष्कार बघण्यासाठी यायचे. अन गावातले लोक अभिमानानं पाहुण्यांना गावाचा हा मानबिंदू दाखवायचे.

या भागातल्या लोकांची या पुतळ्यावर श्रद्धा तर होतीच पण त्याचबरोबर सर्वसाधारणपणे असते तशीच याही पुतळ्याबरोबर एक आख्यायिका निगडीत होती. असं म्हणायचे की, पुराणकाळात एकदा माणकेश्वर म्हणजे साक्षात भगवान शंकर पृथ्वीलोकाची यात्रा करत असताना या प्रदेशात आले आणि या भागाच्या निसर्ग सौंदर्यानं त्यांना मोहून टाकलं. त्यामुळे माणकेश्वरानं इथल्या लोकांना वर दिला की या भागात धनधान्याची कायम समृद्धी राहील. लोकांना कधी काही कमी पडणार नाही. लोक खाऊन पिऊन सुखी असतील. लोकांनी माणकेश्वराला इथंच राहण्याची विनंती केली. म्हणूनच माणकेश्वरानं आपल्या वास्तव्याचं प्रतीक म्हणून या शिल्पाची निर्मिती केली आणि लोकांना असंही सांगितलं की "कलियुगात हुबेहुब या शिल्पासारखाच दिसणारा एक संत महात्मा या गावात येईल आणि तो साक्षात माझंच रुप असेल. "

चार बुकं शिकलेल्या आणि शहरात जाऊन आलेल्या लोकांना आता ही दंतकथा वाटायला लागली असली तरीही सर्वसाधारण गावकर्‍यांची आजही दृढ श्रद्धा होती की एक दिवस अगदी निश्चित असा कुणी संत महात्मा या गावात येईल. म्हणजेच त्या संतात्म्याच्या रुपानं स्वतः माणकेश्वरच जिवंत रुपात या गावात वास्तव्यास येईल.

माणकेश्वरानं निर्माण केलेलं हे स्वतःचं शिल्प म्हणजेच हा पश्चिम कड्यावरचा माणकेश्वराचा पुतळा. लोकांची अशी ठाम समजूत होती की माणकेश्वराच्या पुतळ्याच्या अखंड कृपादृष्टिमुळेच हा सारा भाग आणि या भागाच्या केंद्रबिंदूतलं हे गाव समृद्ध होतं. शिवाय गावातले लोक खाऊन पिऊन समाधानी होते. साधे सरळमार्गी शेतकरी होते. दिवसभर आपापल्या शेतांमध्ये काबाड-कष्ट करणारे होते. एकमेकांच्या उपयोगी पडणारे होते.

गावाच्या एका अंगाला, मुख्य गावापासून थोड्या अंतरावर पांडुरंग देशमुखांचं घर होतं. पश्चिमेकडे तोंड असलेलं घर, घराच्या पुढ्यात शेणानं सारवलेलं खळं आणि तिथून पुढं माणकेश्वराच्या पायथ्यापर्यंत असलेली देशमुखांचीच भातशेती. घराला लागून घराच्या दक्षिण अंगाला गोठा. या गोठ्यात चार तरी गुरं कायम बांधलेली. या गोठ्याच्या पलिकडे चांगली बांधलेली चार पुरुष खोल विहीर अन विहिरीच्या काठावर पाणी काढण्यासाठी बसवलेला रहाट. या विहिरीच्या पलिकडे देशमुखांची आंबा, चिकू, फणसाची एक दोन एकरांची राई. पांडुरंग देशमुखांचं घर जसं स्वच्छ, सुंदर, सात्त्विक होतं, तेवढेच ते स्वत: ही मनानं शुद्ध, निर्मळ, पवित्र होते. गावातल्या लोकांना त्यांचा आदर वाटायचा.

पांडुरंग पाच वर्षाचा असतानाच त्याचे वडील वारले. पुढं आईनंच पांडुरंगाला लहानाचा मोठा केला. रोज संध्याकाळी आपल्या घराच्या खळ्यात बसून पांडुरंग माणकेश्वराच्या पुतळ्याकडे पाहत राहायचा, त्याच्याशी गप्पा-गोष्टी करायचा. आज दिवसभरात काय काय घडलं ते सारं त्याला सांगत राहायचा.
"आई माणकेश्वर बोलत का नाही गं? " एक दिवस लहानग्या पांडुरंगानं आईला विचारलं.
"बोलेल बाबा नक्की बोलेल... तो नाही पण त्याच्या रुपानं जो महात्मा या गावात अवतरणार आहे तो तरी तुझ्याशी नक्कीच बोलेल... " अन मग आईनं माणकेश्वराशी निगडीत आख्यायिका पांडुरंगाला सांगितली.
"आई, ते महाराज कधी येतील? मला बघायला मिळतील ते? माझ्याशी बोलतील? "
"हो रे राजा. तुझ्या जन्मात तर नक्की येतील ते. " आईच्या बोलण्यानं पांडुरंगाचं समाधान झालं आणि मग तिथून पुढं माणकेश्वराला तो रोज विचारू लागला,
"आईनं सांगितलेले ते महाराज कधी येणार? "
माणकेश्वर जसा होता तसाच शांत स्थितप्रज्ञ होता. पण पांडुरंगाला मात्र वाटायचं की मंद स्मित करत माणकेश्वर त्याला सांगतोय की "येतील... ते नक्कीच येतील. "

दिवसामागून दिवस जात होते. पांडुरंग मोठा होत होता. पांडुरंगाची आई पांडुरंगाच्या वाढीची, जडण-घडणीची विशेष काळजी घेत होती. सच्छील वर्तणूक, परोपकारी भाव, सात्त्विक विचार असे सगळे चांगले संस्कार आई पांडुरंगावर घडवत होती. पांडुरंगही चांगला मुलगा होता. लहानपणापासूनच तो विचारपूर्वक बोलायचा. आईला तिच्या कामात मदत करायचा. येणार्‍या जाणार्‍या लोकांशी, इतकंच काय गोठ्यातल्या जनावरांशीही प्रेमानं वागायचा. पांडुरंगाला पारंपरिक शालेय शिक्षण मिळू शकलं नाही. पण त्याच्या आईनं त्याच्यावर केलेले संस्कार त्याहूनही मोठे होते. तसंच माणकेश्वराच्या पुतळ्यालाही त्यानं आपला गुरू मानून टाकलं होतं. लहानपणापासूनच प्रत्येक बारीक सारीक गोष्टही माणकेश्वराला सांगण्याची त्याची सवय मोठा झाला तरीही सुटली नाही. माणकेश्वरही त्याचं सारं काही संयमानं ऐकून घ्यायचा. एवढंच नाही तर पांडुरंगाचा असा ठाम समज होता की वडिलांच्या मायेनं माणकेश्वर त्याला योग्य वेळी योग्य सल्लाही द्यायचा.