नोकरशाही
गद्य साहित्य
कथा
उषःकाल होता होता...
कंत्राट
ती
बॉम्ब
माणकेश्वराचा पुतळा
मि. क्विन ह्यांचे आगमन
रात्र !
ललित
अतुल अलवानी---एक नक्षत्र
अंकल सॅमला तुमची गरज नाही!
कार्निवालची जत्रा
दंतमनोरंजन
नोकरशाही
सफर लेह-लडाखची
या वर्षी विजयादशमी जोरात करायची
लेख
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म
पाटलांच्या गोष्टी
भाषा... नव्याने अनुभवताना!
लेणी संस्कृत साहित्याची
मी एका यंत्रे बनवणार्या खाजगी कंपनीत प्रशासकीय अधिकारी. कंपनीतर्फे सर्व कायद्यांचे पालन व्यवस्थित करणे, सरकारी कामे करणे आणि सरकारी खात्यांशी संपर्क ठेवणे हे माझे मुख्य काम. आम्ही बनवलेल्या यंत्रांच्या सुट्या भागांचा पुरवठा ग्राहकांना करायचे जादा काम एकदा माझ्यावर पडले आणि मग कायम माझ्याकडेच राहिले. जानेवारीचा दुसरा आठवडा. थंडीच्या दिवसात वा पावसाळ्यात पेप्सी कोक वगैरे शीतपेये बनवणार्या कंपन्या उत्पादन दोनतीन आठवडे बंद ठेवून यंत्रे उघडतात आणि सुटे भाग मागवतात. चांगली दीडदोनशे वेगवेगळ्या भागांची यादी असते. त्यांना कोटेशन पाठवणे, प्रॉडक्शन सेल्स परचेस समन्वय साधणे, कांही भाग आयात करणे इ. कामाची गर्दी होती. साल बहुधा २००२.
ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.
"येस?"
"मि. सुधीर?"
"येस! हा बोला मेनन मॅडम, आवाज ओळखला तुमचा."
"मी दुपारी तुमच्या युनिटमध्ये येते आहे."
"काय विशेष?"
"ऍडिशनल. आर. के. येणार आहेत एरियामध्ये. "
"????"
"ऍडिशनल कमिशनर आर. के. शर्मा हो. त्याना रेव्हीन्यू फिगर्स द्यायला हव्यात ना! त्याच गोळा करायला येते आहे. तुमचा फोनही वापरणार."
"अवश्य या. वाट बघतो. जेवायला येणार की चहाला?"
"जस्ट अ कप ऑफ टी, फोनशी मारामारी आणि अ फ्यू गुड वर्डस."
"जरूर या. वाट बघतो."
या मेनन मॅडम एक्साईज इन्पेक्टर. अगोदर पुण्यात होत्या. म्हणून मराठी छान बोलतात. अतिशय कार्यक्षम आणि सज्जन व्यक्ती. दीडदोन वर्षाच्या काळात त्यानी आमच्याकडून कधीही पैशाची अपेक्षा ठेवली नाही. आमची कागदप घेऊन त्यांच्या कार्यालयात येणार्या सचिनला त्यांनी कधीही ताटकळत ठेवले नाही. हसतमुख चेहरा आणि सौजन्यशील तत्पर सेवा हे त्यांचे वैशिष्ट्य. आमच्या कार्यालयातल्या महिलावर्गाशी त्यांचे छान मैत्रीपूर्ण संबंध होते. आमच्या आजूबाजूच्या कारखान्यातून देखील असाच अनुभव होता.
----
ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.
"येस?" मी.
"एक्साईजवाली मॅडम आ रही है साहब." फाटकावरचा रखवालदार.
"हां, ठीक है."
ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.
"येस?"
"मिसेस मेनन हॅज कम. शाल आय सेंड हर इन?" दूरध्वनी चालिका अर्थात टेलिफोन ऑपरेटर.
"शूऽऽअर."
"गुड आफ्टरनून मिस्टर सुधीर!"
"व्हेऽऽरी गुड आफ्टरनूऽऽन मॅऽऽडम."
मी बझर दाबला.
"सचिन बघ कोण आले आहे."
"अरे वा मॅडम. बसा पाणी आणतो." सचिन.
"काय ऊन आहे हो बाहेर! आत थंड हवेत आल्यावर बरं वाटलं. तरी जरा पंखा लावा हो पाच मिनिटं! जानेवारीत पण एवढं ऊन. तुमची मुंबईची हवा मात्र एकदम बेकार." मॅडम.
"अगदी खरं!"
मी पंख्याचे बटण दाबले आणि पंखा मॅडमकडे वळवला.
मॅडमनी पाणी पिऊन पाच मिनिटे थंड हवा खाल्ली. तोपर्यंत योगिता, शोभा, सुमती वगैरे येऊन मॅडमना हाय हलो करून गेल्या. मनातल्या मनात मी मॅडमच्या पी आर ला सलाम केला.
"थर्सडे नाहीतर फ्रायडेला ऍडिशनल येणार आहेत एरियामध्ये." मॅडम.
"ही इज वेलकम. पण कशासाठी? रेव्हीन्यू ड्राईव्ह का?" मी.
"हो."
"नो प्रॉब्लेम."
"तीन महिने सगळी ड्यूटी पी एल ए मध्ये भरायची."
"प्रयत्न करू."
"किती भराल?"
"ऑर्डर किती आहे आणि किती डिलीव्हरी देऊ शकू त्यावर अवलंबून आहे. तुम्हाला ठाऊक आहेच कधी कधी आम्ही बनवलेले मशीन तयार असते पण पेमेंट येत नाही, माल जात नाही आणि ड्यूटी पेयेबल कमी असते. पण रेअरली. तरी ड्यूटी क्रेडिट भरपूर पडलेले असताना कॅश ड्यूटी कोण, कुठून आणि का भरणार? या पगारी नोकरांना पैशाची व्हॅल्यू कुठून कळणार? इन्फ्लेटेड रेव्हीन्यू फिगर्स संसदेत दाखवून जनतेची दिशाभूल करायला आम्ही हातभार लावायचा. खोट्या डिमांड्स काढून ऍसेसीला त्रास द्यायलाही हे तयार. म्हणजे आम्ही खोटेपणा करून, आर्थिक नुकसान सोसून त्याना सहकार्य करायचे आणि वर यांच्या अधिकार्यांनी आम्हाला त्रास देऊन पैसे काढायचे. जास्त शहाणपणा केलाच तर मी सुनावणार तुमच्या साहेबांना. ऑफिसात बसून काम करायचे सोडून असे फिरून आपण भरलेल्या टॅक्समधून सरकारी पैशाची उधळपट्टी करून फिरायला यांना सांगितले कोणी?" मी न राहवून तिडिकीने बोललो.
"अगदी खरं आहे तुमचं. मी निरोप पोचवला. आता मला मध्ये घालू नका. आता तुम्ही आणि ते. बघून घ्या काय ते."
"मी सगळी माहिती काढून तुम्हाला तासाभरात फिगर्स देतो."
"एप्रिल टू डिसेबर लास्ट थ्री इयर्स आणि या वर्षीची फिगर. लक्षात आहे ना? मी बसू तोपर्यंत?
"हक्काने आरामात बसा. फिगर्स योगिता देईल. मी खाली फॅक्टरीत जाऊन डिलीव्हरी स्टेटसची माहिती काढतो. तोपर्यत काही लागले तर योगिता, विलास आणि सचिन आहेतच. सेवेला फोन आहेच."
"आणखी एक भानगड आहे हो."
"?? ??"
"तुमचे डायरेक्टर इथे असायला पाहिजेत हो. साहेबाची इच्छा आहे की तुम्ही त्यांना खाली गेटवर पर्सनली रिसीव्ह करून वर आणायचे. बरोबर एक ए.सी. आणि चार सुपरिटेंडंट आणि साताठ इन्स्पेक्टर्स असतील."
"जमणार नाही. कोणीही लहानमोठा अधिकारी असो. त्याचा ड्यू रिस्पेक्ट मी त्याला देणारच. पण समान पातळीवरून. भलते चोचले जमणार नाहीत. हवे तर येतील नाहीतर गेले उडत. डायरेक्टर मुबईत असले तर जरूर इथे असतील. पण त्यांच्यासाठी मात्र थांबू शकणार नाहीत. आमचे क्लायंट्स ऑल ओव्हर इंडिया पसरलेले आहेत. बिझिनेस फर्स्ट. बिझिनेस असेल तर ड्यूटी जमा होईल. एक्साईजचे बघायला मी आहेच."
मॅडमचा चेहरा चिंतातुर.
"त्यांच्या बैलाला ... ! काळजी करू नका हो मॅडम! सगळे ठीक होईल. आम्ही चोर्या करीत नाही आणि तुम्हीही करीत नाही. आमचे किवा तुमचे कोणीही काहीही वाकडे करू शकणार नाही. जरा माझ्याकडून बिनधास्त राहायला शिका." मी.
'बैलाला' मुळे त्याचा झाकोळलेला चेहरा उजळला. "आमचे मोठे बॉस आहेत हो तेऽऽ. आता देवावर भरोसा." मॅडम.
----
ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग, ट्रिंग ट्रिंग.
"येस?"
"एक्साईजवाले आये है साहब." रखवालदार.
"माझ्याकडे वर पाठवा."
"ते खाली बोलावताहेत तुम्हाला." रखवालदार.
"फोन द्या त्यांना."
"येस?"
"अहो सुधीरसाहेब! त्यांना रिसीव्ह करायला येताय ना?" कोणीतरी एक सुपरिटेंडंट.
"सॉरी! मी कामात आहे. तुम्हीच वर आणा त्यांना."
"साहेब रागावतील."
"त्याला मी काय करणार? क्षमस्व!"
शिपायाला सागितले की त्यांना डायरेक्टराच्या समोरच्या खुर्चीवर बसव आणि डायरेक्टरांना पण खालून कारखान्यातून वर बोलव. ते स्थानापन्न झाल्यावर मी त्यांना भेटलो, माझी ओळख करून देऊन हस्तांदोलन केले, तीन वर्षाची व चालू वर्षाची आकडेवारी दिली. तोपर्यंत डायरेक्टर आले. त्यांची ओळख करून दिली.
"एप्रिलतक तीन महीने सेनव्हॅट क्रेडिट को हाथ नही लगानेका. सब ड्यूटी पी.एल.ए. मे भरनेका." आर. के.
स्वरात भरपूर गर्व आणि आढ्यता. आमच्या संचालकाना ते अजिबात आवडले नाही आणि ते त्याच्या चेहर्यावर स्पष्ट उमटले.
"प्रयत्न करू." संचालक.
"फक्त प्रयत्न नाही चालणार. मला रिझल्ट्स पाहीजेत." आर के.
"प्रयत्न करूच. पण पैसे असतील तर भरणार ना!"
"कुठूनही आणा. तुमच्या पर्सनल खात्यातून काढा." भोवती तोंडपुजेपणा करणारांच्यात राहून या आर. के. शर्मा साहेबाना वाटेल ते बोलायची सवय झाली होती.
"कुठून आणू? जवळ पैसे असतील तर कारखाना काढून इथे गधामजुरी करायची काय जरूर?" आमचे संचालक.
"लपवून ठेवता पैसे तुम्ही लोक. ते काढा. बॅकेकडून फिनान्स घ्या, काय वाटेल ते करा पण सेनव्हॅटला हातही लावायचा नाही."
तेवढ्यात संचालकाना ग्राहकाकडून दूरध्वनी आला. दोन तीन मिनिटे बोलल्यावर संचालक मला हलक्या आवाजात हिंदीतून म्हणाले, "सुधीर, तुम्हीच बोला त्याच्याशी. मी नाही समजावू शकत यांना. मला जे बोलायचे ते माझे बोलून झाले आहे. ग्राहकाला तर फोनवर ताटकळत नाही ठेवू शकत." आणि ते खुर्चीत मागे रेलले आणि खुर्ची किंचित मागे सरकवून फोनवर बोलायला लागले.